नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही पतंगबाजांच्या नायलाॅन मांजामुळे मुक्या पक्ष्यांवर संक्रांत काेसळली आहे. शहरात मांजामध्ये अडकून शेकडाे पक्ष्यांचे बळी गेल्याची माहिती आहे. दरम्यान, वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये या महिन्यात आतापर्यंत गंभीर जखमी झालेल्या २८ पक्ष्यांना उपचार करून सुखरूप निसर्गमुक्त करण्यात यश आले. मात्र १६ पक्ष्यांना वाचविणे शक्य झाले नाही.
मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी ट्रान्झिटमध्ये उपचारासाठी आणलेल्या किंवा आणण्यात आलेल्या पक्ष्यांची माहिती दिली. साधारणत: १ जानेवारीपासूनच मकरसंक्रांतीचा उत्साह सुरू हाेताे. बंदी असूनही सर्रासपणे नायलाॅन मांजाची खरेदी विक्री झालीच. या मांजाने आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख छाटले. असे गंभीर जखमी झालेल्या ६४ पक्ष्यांना ट्रान्झिट सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. यामध्ये सर्वाधिक संख्या कबुतर आणि रात्री भटकणाऱ्या पिंगळा (घुबड) यांची हाेती. त्यानंतर पाेपट, काेकीळ, डव्ह या काॅमन पक्ष्यांचाही समावेश हाेता. तसेच १४ जानेवारीला एका कुटुंबाने आणलेल्या लेसर व्हिसलिंग डक या प्रवासी पक्ष्याचाही समावेश आहे. ट्रान्झिट सेंटरच्या डाॅ. बिलाल अली, मयूर काटे व शर्थीचे प्रयत्न करून या पक्ष्यांवर उपचार केले. त्यातील २८ पक्ष्यांना सुखरूप निसर्गमुक्त करण्यात आले. १६ पक्ष्यांनी प्राण गमावले व २० पक्षी उपचारानंतर देखरेखीत आहेत. मांजा अद्याप झाडांना, उंच इमारतींना अडकलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी ट्रान्झिटच्या ०७१२-२५१५३०६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन कुंदन हाते यांनी केले.
त्या कबुतराला लाेकमतमुळे जीवदान मिळाले ()
लाेकमत इमारतीच्या मागच्या भागात लटकलेल्या मांजात एका कबुतराचे पंख अडकले. सकाळपासून ताे जीवाच्या आकांताने तडफडत हाेता. ही बाब लाेकमतचे मंगेश व्यवहारे यांना समजली. त्यांनी लागलीच ट्रान्झिट सेंटरशी संपर्क केला. यादरम्यान फाेटाेजर्नालिस्ट विशाल महाकाळकर यांच्यासमवेत युक्ती करून एका दांड्याला थैली बांधून सातव्या माळ्याच्या खिडकीमधून या कबुतराला अलगद काढण्यात आले. दरम्यान, ट्रान्झिटचे वनपाल अनिरुद्ध खडसे, वनरक्षक दिनेश बाेरकर, चेतन बारस्कर, विलास मंगर, स्वप्नील भुरे ही टीम पाेहचली. मांजाने जखमी झालेले कबुतर त्यांच्याकडे साेपविण्यात आले. नंतर ट्रान्झिटमध्ये नेऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.