नागपूर : दाट धुके पडल्यामुळे मागील १० दिवसांपासून विस्कळीत झालेले रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अद्यापही सुरळीत झालेले नाही. दरम्यान शुक्रवारी गोंडवाना एक्स्प्रेस ही गाडीच रद्द झाल्यामुळे नागपुरातून प्रवास करणाऱ्या २५० रेल्वे प्रवाशांसमोर पेच निर्माण झाला. त्यांना आपले तिकीटच रद्द करण्याची पाळी आली.दिल्ली आणि इतर मार्गावर दाट धुके पडल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. रेल्वेगाडीच्या लोकोपायलटला धुक्यामुळे समोरील सिग्नल दिसणेच बंद झाले आहे. सिग्नल न दिसल्यास अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे धुके असलेल्या कालावधीत रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्या न चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शुक्रवारी रेल्वेगाडी क्रमांक १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ही गाडीच रद्द झाल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली. ही गाडी सकाळी ९ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर येते. परंतु ही गाडी रद्द झाल्याची सूचना रेल्वे प्रवाशांना देण्यात आल्यामुळे ऐनवेळी प्रवाशांसमोर पेच निर्माण झाला. या गाडीच्या एसी २ कोचमधून ८, एसी ३ कोचमधून १२ आणि स्लिपर क्लासमधून १३५ तसेच इतर प्रवासी मिळून एकूण २५० प्रवासी नागपुरातून प्रवास करणार होते. गाडी रद्द झाल्याचे समजल्यामुळे नाईलाजास्तव या प्रवाशांना आपले तिकीट रद्द करण्याची पाळी आली. दरम्यान शुक्रवारी उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस १६ तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस १८ तास, १२६८७ मदुराई-डेहरादून एक्स्प्रेस १६.२० तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली एपी एक्स्प्रेस ४ तास, १२२९६ पटना-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ४ तास, १२७९२ पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस १.१५ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस २.१५ तास आणि १२२९५ बंगळुरू-पटना संघमित्रा एक्स्प्रेस २.४० तास उशिराने धावत आहे. दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसण्याची पाळी आली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटींग रुम फुल्ल झाल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)
२५० रेल्वे प्रवाशांची झाली पंचाईत
By admin | Updated: January 3, 2015 02:35 IST