राजकुमार बडोले : जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण नागपूर : जात वैधता प्रमाणपत्र देणे हे मोठे काम आहे. वैधता करून प्रमाणपत्र देण्याचे काम आव्हान म्हणून सामाजिक न्याय विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने स्वीकारले आहे. राज्यात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या २४ समित्या स्थापन करून या समित्यांचे काम सुरळीत आणि सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. रविवारी नवीन प्रशासकीय इमारत परिसरात विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक १ आणि समिती क्रमांक ३ च्या वतीने आयोजित जात वैधता प्रमाणपत्र वितरण समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर.डी. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपमहासंचालक मुळे, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव यु.सी. लोणारे प्रमुख अतिथी होते. समितीचे अध्यक्ष पंजाबराव वानखेडे व एस.जी गौतम व्यासपीठावर होते. सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, समित्यांना काम करतांना अनेक अडचणी येत आहेत. अडचणींचा सामना करीत अडीच वर्षात समित्यांनी १३ लाख प्रकरणे निकाली काढली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आता जात वैधता प्रमाणपत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून जिल्हास्तरावर एक महिन्याच्या आत जाती वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. या दोन्ही समित्यांमार्फत ८ हजार जाती वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रधान सचिव शिंदे म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात जाती वैधता प्रमाणपत्र समितीसाठी लवकरच पदे भरण्याचा निर्णय घेतला जाईल. घटनात्मक अधिकारापासून लाभार्थी वंचित राहू नये, हा मुख्य उद्देश आहे. समित्यांची सेवा ही गुणवत्तापूर्ण राहणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. यावेळी अलिशा पाटील, मानसी पाटील, रुचिका पाटील, अभिषेक राऊत, आदर्श मोहरलिया, अखिलेश बांते, अमित हटवार, अंजली कांबळे, ओजस सूर्यंवशी, पंकज थूल, सौरभ प्रसाद व रोशनी रहांगडाले या विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक पंजाबराव वानखेडे यांनी केले. संचालन पाडावार यांनी केले. एस.जी. गौतम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
जात वैधता प्रमाणपत्राच्या २४ समित्या स्थापणार
By admin | Updated: December 22, 2014 00:41 IST