दंड भरू पण नियम पाळणार नाही : ४४७२२ लोकांनी भरला १.९० कोटीचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दंड भरू पण नियम पाळणार नाही अशी मानसिकता निर्माण झाल्याचे महापालिकेच्या उपद्रव शोध पथकांनी केलेल्या कारवाईवरून दिसत आहे. १६ फेब्रुवारी २०२१ ते १५ जुलै २०२१ या पाच महिन्याच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याने २२४५ दुकानदार व व्यावसायिकांकडून १ कोटी ७१ लाख ४ हजार रूपये दंड वसूल केला आहे.
कोविड संक्रमणाला आळा बसावा. यासाठी नियमाचे पालन व्हावे, यासाठी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागपूर शहरात १५ जुलै पर्यत ४९ हजार ४११ लोकांवर कारवाई करून ४ कोटी ३२ लाख, ४६ हजार ८०० रुपयाचा दंड वसूल केला आहे. मास्क न घालणाऱ्या ४४ हजार ७२२ लोकांकडून १ कोटी ९० लाख ४१ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेत जून २०२० पासून मास्क न घालणाऱ्यांना २०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. ६ जून ते २० सप्टेंबर २०२० या कालावधीत ११ हजार ६४ लोकांवर कारवाई करून २२ लाख १२ हजार ८०० रुपये दंड वसूल केला ११६ सप्टेंबर पासून दंडाच्या रक्कम ५०० रुपये करण्यात आली. ३३ हजार ६५८ लोकांकडून १ कोटी ६८ लाख २९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ऑड ईव्हन नियमाचे उल्लंघन केल्याने दुकानदरांकडून ६४ लाख ४४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोविड संक्रमणाला आळा बसावा, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी दिली.
...
१६ फेब्रुवारी ते १५ जुलै दरम्यान झोननिहाय व्यापाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई
झोन कारवाईची संख्या वसूललेला दंड (लाखात)
लक्ष्मीनगर १६४ १२५९०००
धरमपेठ ३६७ ३०७७०००
हनुमान नगर ८९ ६५६०००
धंतोली २३५ ११८१२०००
नेहरूनगर १३६ ९८५०००
गांधीबाग ४६६ ३२४२००
सतरंजीपुरा २११ १५६५०००
लकडगंज १५५ १०८४०००
आसीनगर १५० १३७६०००
मंगळवारी २७२ २०४८०००
एकूण २२४५ १७१०४०००
.....