नागपूर : विधानसभा निवडणुकीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गत दोन आठवड्यांपासून प्रचाराच्या माध्यमातून तयारीला लागलेल्या जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघातील २११ उमेदवारांची बुधवारी १५ रोजी मतदानाच्या माध्यमातून परीक्षा आहे. मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याचा निर्णय रविवारी मतमोजणीनंतर होणार आहे.दरम्यान जिल्हा प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी केली असून बुधवारी सकाळी ७ वाजतापासून जिल्ह्यातील ४१२० मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी ६ पर्यंत चालेल. जिल्ह्यात ३७,०४,६७६ मतदार आहेत. त्यांच्यासाठी ४१२० मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडे १० हजार इव्हीएम आहेत. त्यापैकी ७४६० लागणार असून उर्वरित राखीव असणार आहेत. विविध केंद्रावर २३८१८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी साहित्य वाटपाची प्रक्रिया मंगळवारी सकाळी सुरूझाली. कर्मचारी रात्रीच मतदान केंद्रावर पोहचले असून बुधवारी सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी प्रथम उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर यंत्रणांची चाचणी घेण्यात येईल व नंतर मतदानाला सुरुवात होईल.प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारांसाठी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ५० संवदेनशील (क्रिटिकल) केंद्र आहेत. तेथे पोलिसांची विशेष दिग्गज रिंगणातनागपूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणीस (दक्षिण पश्चिम), काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत (उत्तर नागपूर), सतीश चतुर्वेदी (दक्षिण नागपूर), अनिस अहमद (मध्य नागपूर), सुबोध मोहिते (रामटेक), राजेंद्र मुळक (कामठी), राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (काटोल),रमेश बंग ( हिंगणा), विद्यमान आमदारांपैकी कृष्णा खोपडे (पूर्व), विकास कुंभारे ( मध्य नागपूर), सुधाकर देशमुख (पश्चिम नागपूर), दीनानाथ पडोळे (दक्षिण), सुनील केदार (सावनेर), आशिष जयस्वाल (रामटेक), सुधीर पारवे (उमरेड), चंद्रशेखर बावनकुळे (कामठी) यांचा समावेश आहे. सर्वच मतदारसंघात बहुरंगी लढती आहेत. काटोल मतदारसंघात अनिल देशमुख आणि आशिष देशमुख या काका-पुतण्यात लढत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नागपूरकडे लागले आहे.
नागपूर जिल्ह्यात २११ उमेदवारांची आज मतपरीक्षा
By admin | Updated: October 15, 2014 01:36 IST