लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : पावसाळा सुरू झाला असून, संभाव्य पूर व इतर नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून पूरबाधित क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. कळमेश्वर तालुक्यातील १८ गावे ‘रेड व ब्ल्यू झाेन’मध्ये असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
कळमेश्वर कार्यालयाच्या सभागृहात आयाेजित करण्यात आलेल्या या विशेष सभेत नैसर्गिक आपत्तीमध्ये कमीतकमी प्राणहानी व वित्तहानी हाेण्याच्या दृष्टीने उपाययाेजनांचे नियाेजन करण्यात आले. विविध आपत्तीसंदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, मदत, प्रतिसाद व पुनर्वसन या बाबी व्यवस्थित हाताळण्यासाठी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाने कळमेश्वर तालुक्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला.
कळमेश्वर तालुक्याची स्थानिक परिस्थिती, भौगोलिक रचना व हवामान विचारात घेता, तसेच विविध आपत्तींचा पूर्वेतिहास पाहता तालुक्यात प्रामुख्याने अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्ती वारंवार उद्भवतात. तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १४९०. ६ मिमी असून, जून ते सप्टेंबर या काळात विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद केली जाते. त्यामुळे हा काळ धोक्याचा मानला जाताे. त्या अनुषंगाने आपत्ती निवारणाचे नियाेजन करण्यात आले. महसूल विभागाने पूरसंबंधी आपत्ती व्यवस्थापन व नियोजन संदर्भातील कामे तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांकडे सोपविली आहेत.
...
या गावांना पुराचा धाेका
तालुक्यात चंद्रभागा, मधुगंगा, खुमारी नाला व मोरधाम या लहान नद्या असून, त्या नद्यांवर जलाशयांची निर्मिती केली आहे. याशिवाय, माेठ्या नाल्यांच्या काठी वसलेल्या गावांनाही पुराचा धाेका उद्भवण्याची शक्यता असते. यात खैरी (हरजी), उपरवाही, मोहपा, भडांगी, खानगाव, म्हसेपठार, पोही, लिंगा, सावळी, वाढोणा (खुर्द), वाढोणा (बु.), धापेवाडा (खुर्द), धापेवाडा (बु.), हरदोली, सवंद्री, सुसुंद्री, सावंगी (मोहगाव) व वाठोडा गावांचा समावेश आहे.
...
अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत धोक्याच्या सूचना प्रसारित करणे, लोकांना सुरक्षितस्थळी हलविणे, पूर परिस्थितीत बचाव कार्य व मदत पुरविणे, साथरोग नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे व आपत्तीकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांना माहिती पुरविणे, आदी कामाचे नियोजन या आराखड्यात केले आहे.
- सचिन यादव
तहसीलदार, कळमेश्वर.