नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपघातात मृत्यू झालेले सुधाकर तुर्के (रा. चंदनवाही, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) यांच्या वारसदारांना १४ लाख रुपये भरपाई व त्यावर ७.५ टक्के व्याज मंजूर केले आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निर्णय दिला आहे.
वारसदारांमध्ये मृताची पत्नी संगीता तुर्के व इतर तिघांचा समावेश आहे. सुधाकर तुर्के यांचा २२ एप्रिल २०१४ रोजी टिप्परने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला. ते औषधांच्या दुकानात काम करीत होते. त्यांना ६ हजार रुपये मासिक वेतन मिळत होते. वारसदारांनी भरपाईकरिता सुरुवातीला मोटर वाहन अपघात दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. २० जानेवारी २०१८ रोजी न्यायाधिकरणने त्यांना केवळ ४ लाख ८७ हजार रुपये भरपाई मंजूर केली. त्यामुळे वारसदारांनी भरपाई वाढवून मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील मंजूर करण्यात आले. भरपाईची रक्कम नॅशनल इन्शुरन्स कंपनीने द्यायची आहे.