नागपूर : जिल्ह्यातील वडेगाव(मांढळ) महादुला, वडेगाव काळे, आसलवाडा, परसोडी, देवळीकला, दहेगाव, राजनी, खामली, चेंडकापूर, माळेगाव व मांढळ आदी गावांत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविल्या जाणार आहेत. या गावातील पाणीसमस्या लवकरच मार्गी लागणार आहे. प्रादेशिक नळ योजना आहेत, परंतु पाणीपुरवठा होत नाही, अशा गावांत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नुकताच घेतला आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी गत काळात प्रादेशिक नळयोजनांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहेत. परंतु नियोजनाचा अभाव असल्याने योजना असूनही अनेक गावांना पाणी मिळत नाही.या गावात राष्ट्रीय पेयजल योजना राबवून टंचाई दूर केली जाणार आहे. तसेच बंद पाणीपुरवठा योजना व पेरी अर्बन गावांच्या प्रस्तावित योजना कार्यान्वित करण्यासाठी जिल्ह्यात सर्व्हे करून पेरी अर्बन गावांची यादी तयार केली जाणार आहे. बहुसंख्य ग्रामपंचायती सक्षम नसल्याने जिल्ह्यातील अनेक योजना वीज बील थकबाकी असल्याने बंद पडलेल्या आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा विचार करता या योजना यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. तसेच त्यांनी गुणवत्ता बाधीत गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
१३ गावातील पाण्याची समस्या सुटणार
By admin | Updated: May 10, 2015 02:20 IST