नागपूर : जन्मत: श्रवणदोष असल्याने त्यांनी जगातला कोणताच आवाज ऐकला नव्हता. पैसे नसल्याने यावरील महागडा उपचार ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ करणेही शक्य नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) इएनटी विभागाने यासाठी पुढाकार घेतला. दोन दिवसांत ५ वर्षांच्या आतील १३ चिमुकल्यांवर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ केले. नववर्षात मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे लवकरच या बालकांना बहिरेपणापासून मुक्ती मिळून त्यांच्या मुक्या भावनांना कंठ फुटणार आहे.
जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. परंतु यावरील खर्च अनेकांच्या आवाक्याबाहेर असतो. अशा गरजू बालकांसाठी मेडिकलच्या कान, नाक व घसा (इएनटी) विभागाने नवीन प्रकल्प हाती घेतला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात इएनटी विभागप्रमुख डॉ. अशोक नितनवरे यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प जन्मजात ऐकण्यास असमर्थ असलेल्या चिमुकल्यांच्या पालकांसाठी आशेचे केंद्र ठरला आहे. या प्रकल्पामुळे बहिरेपणा दूर होऊन बोलणेदेखील शक्य झाले आहे.
-विदर्भातील रुग्णांना फायदा
मेडिकलमध्ये १ व २ तारखेला झालेल्या ‘कॉक्लिअर इम्प्लांट’मध्ये नागपूर शहरातील ३, गडचिरोली जिल्ह्यातील १, नागपूर जिल्ह्यातील कुही व काटोल तालुक्यातील प्रत्येकी १, यवतमाळ जिल्ह्यातील १, भंडारा जिल्ह्यातील ३ तर गोंदिया जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश होता. ही सर्व मुले ३ ते ५ वर्षांखालील आहेत.
-या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
दोन दिवसांत करण्यात आलेल्या १३ बालकांवरील ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ या शस्त्रक्रियेसाठी स्वत: प्रसिद्ध ईएनटी सर्जन पद्मश्री डॉ. मिलिंद किर्तने उपस्थित होते. डॉ. अशोक नितनवरे व डॉ. कांचन तडके यांनी या शस्त्रक्रिया केल्या. यांना डॉ. अदविरयू कुथे, डॉ. धार्मिक राणा, डॉ. ज्योती शिंदे, डॉ. सारिका, परिचारिका ढोले व नेहा यांचे सहकार्य मिळाले.
-कर्णबधित मुक्ततेकडे मेडिकलचे पाऊल
केंद्र सरकारच्या ‘स्कीम ऑफ असिस्टन्स टू डिसेबल पर्सनस फॉर परचेस’च्या (एडीआयपी) मदतीने गरीब कुटुंबातील चिमुकल्यांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जन्मत: कर्णबधिर मुक्ततेकडे मेडिकलने टाकलेले हे पाऊल आहे.
-डॉ. अशोक नितनवरे
प्रमुख, ईएनटी विभाग, मेडिकल
-असा ओळखावा बहिरेपणा
::तीन महिन्यांपर्यंतच्या बाळाने आईच्या आवाजाने शांत व्हायला हवे.
:: निदान मोठ्या आवाजाने दचकायला हवे.
:: सहाव्या महिन्यापर्यंत खेळण्याच्या आवाजाच्या दिशेने मान वळवायला हवी.
:: नऊ महिन्यांपर्यंत तोंडाने आवाज काढायला सुरुवात व्हायला हवी.
:: टीव्ही, पंखा, लाईट, आई अशा नित्य परिचयाच्या गोष्टी दर्शवायला हव्यात.
ही लक्षणे दिसून येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.