नागपूर : संघ लाेकसेवा आयाेग (युपीएससी) च्या परीक्षेत विदर्भाचे तरुण मागे पडतात, ही स्थिती आता मागे पडली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालाने हा समज खाेटा ठरवत नागपूर केंद्राच्या १७ पैकी १२ उमेदवारांनी घवघवीत यश प्राप्त केले. यात नागपूरसह विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा केंद्राचे संचालक डाॅ. प्रमाेद लाखे यांनी सांगितले, नागपूर केंद्रातून युपीएससी हाेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी ६ उमेदवार यशस्वी ठरले हाेते व यंदा हा आकडा दुप्पट झाला आहे. ही केवळ या केंद्रावर नाेंद करणाऱ्यांची संख्या आहे. असे विद्यार्थी असतात जे युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली किंवा पुण्याला जातात. त्यामुळे यशस्वी हाेणाऱ्यांची संख्या आणखी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.यशस्वी हाेण्यामध्ये महाराष्ट्राचाही टक्का वाढला आहे. राज्य शासनाद्वारे नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात राज्यातील विद्यार्थ्यांची परीक्षेसह मुलाखतीचीही पुरेपूर तयारी व्हावी म्हणून अभिरूप मुलाखतीची व्यवस्था केली जाते. या समितीवर स्वत: डाॅ. प्रमाेद लाखे आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ च्या परीक्षेनंतर महाराष्ट्र सदनला अभिरूप मुलाखतीसाठी ११४ उमेदवार दाखल झाले हाेते. यातील ३६ उमेदवार यावेळी यशस्वी झाले आहेत. दरवर्षी ३०० ते ३५० उमेदवार मुलाखतीसाठी असतात, ज्यातील ९७ ते १०० यशस्वी हाेतात. याचा अर्थ युपीएससीद्वारे उच्च अधिकारी हाेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा वाटा ९ टक्के आहे, जाे अतिशय चांगला असल्याचे डाॅ. लाखे म्हणाले.
लक्ष्य पहिल्या १०० मध्ये येण्याचे - युपीएससी पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी सरकारद्वारे राज्यात ६ केंद्र आहेत. सरकारकडून मदत केली जाते. त्यामुळे यशस्वी उमेदवारांचा टक्काही वाढत आहे. आता केवळ पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविण्याचे आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्राच्या संचालकांनी प्रयत्न व सातत्याने उमेदवारांचे माेटिव्हेशन करण्याची गरज आहे.- डाॅ. प्रमाेद लाखे, संचालक, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा केंद्र, नागपूर.
हे आहेत केंद्राचे यशस्वी उमेदवार - जयकुमार आडे (३०० रॅंक), श्रीरंग कावरे (३९६), राहुल आत्राम (४८१), सर्वेश अनिल बावणे (५०३), सावी बुलकुंडे (५१७), अपूर्व बालपांडे (६४९), साैरभ रमेश येवले (६६९), नम्रता अनिल ठाकरे (६७१), सचिन बिसेन, गाेंदिया (६८८), भाग्यश्री नयकाळे (७३७), श्रीतेश भुपेंद्र पटेल, धुळे (७४६) व शिवांगी तिवारी, अमरावती (७५२).