नागपूर : नागपूर (ग्रामीण) पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. दरम्यान, रविवार व सोमवारी कन्हान, खापरखेडा, केळवद, कुही, देवलापार, वेलतूर, भिवापूर, पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवार्इंमध्ये एकूण ११ दारू विक्रेत्यांना अटक करून त्यांच्याकडून ३५ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.चिरकूट महादेव भरडे (५२), रामराज तुकडोजी पडवार व उमेश दांडेकर तिघेही रा. डोंगरताल, ता. रामटेक, सुधीर गोदाजी घाटगे, रा. मसली, ता. कुही, अभिजित शिवशंकर मेश्राम (२२, रा. तास, ता. भिवापूर), गजानन ऊर्फ गजू देशीलाल उईके (२९, रा. दत्तनगर, खापरखेडा, ता. सावनेर), रामविशाल जोधा यादव (४५, राव गवळीपुरा, कन्हान, ता. पारशिवनी), योगेश बाबूलाल मनगटे (२८, रा. वारेगाव, ता. सावनेर), धोंडबा मारबते, रा. नांदागोमुख, ता. सावनेर व रमेश ढवळापुरे, मांढळ, ता. कुही अशी अटक करण्यात आलेल्या अवैध दारू विक्रेत्यांची नावे आहेत. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. देवलापार पोलिसांनी माहिती मिळताच सोमवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास डोंगरताल येथील चिरकूट भरडे याच्या घराची झडती घेतली. यात ३०० रुपये किमतीची पाच लिटर मोहफुलांची दारू आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, ४.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी डोंगरताल येथील उमेश दांडेकरच्या घराची तपासणी केली असता, ३०० रुपये किमतीची पाच लिटर मोहफुलांची दारू आढळून आली. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. त्यानंतर देवलापार पोलिसांनी ५ वाजताच्या डोंगरताल येथील रामराज पडवार याच्या घराची तपासणी केली. यात रबरी ट्यूबमध्ये १५ लिटर मोहफुलांची दारू आढळून आली. ही दारू ९०० रुपये किमतीची असून, रामराजला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. वेलतूर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ४.४५ वातजाच्या सुमारास मसली येथील सुधीर घाटगे याच्या घराची झडती घेतली. यात पोलिसांना त्याच्या घरी एक हजार रुपये किमतीची सहा लिटर मोहफुलांची दारू आढळून येताच त्याला अटक केली. भिवापूर पोलिसांनी तास शिवारात कारवाई करून अभिजित मेभम यास अटक केली. तो दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून ५०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १० बाटल्या जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, खापरखेडा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या गजानन उईके याच्या पानटपरीची झाडती घेतली. यात त्यांना ७६० रुपये किमतीची दारू जप्त करून गजाननला अटक केली. मोटरसायकलवरून दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी दुचाकी वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, रविवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास रामविशाल याादव हा एमएच-४०/डी-१३१० क्रमांकाच्या मोटरसायकलवर दारू घेऊन येत असल्याचे पोलिसांना तपासणीदरम्यान आढळून आले. त्यामुळे त्याला लगेच अटक केली. या कारवाईत तीन हजार रुपये किमतीच्या दारूच्या ६० बाटल्यांसह एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, गुप्त माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वारेगाव येथे धाड टाकून योगेश मनगटे याच्या घराची झडती घेतली. त्यात २५० रुपये किमतीच्या देशी दारूच्या पाच बाटल्या आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. केळवद पोलिसांनी रविववारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास नांदागोमुख येथे धाड टाकली आणि गुप्त माहितीच्या आधारे धोंडबा मारबते याच्या घराची झडती घेतली. यात त्यांना ५०० रुपये किमतीची पाच लिटर मोहफुलांची दारू आढळून आल्याने धोंडबाला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे कुही पोलिसांनी रविवारी सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास मांढळ येथील रमेश ढवळापुरे याच्या घराची झडती घेतली. यात त्यांना ४०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या आठ बाटल्या अराढळून आल्याने त्याला लगेच अटक केली. याप्रकरणी संबंधित पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
११ दारू विक्रेत्यांवर धाडी
By admin | Updated: October 11, 2014 02:55 IST