नागपूर विद्यापीठ : ‘इस्रो’चे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार मुख्य अतिथीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त कधी निघणार याची विद्यार्थी आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. अखेर या समारंभासाठी १९ नोव्हेंबर ही तारीख अंतिम करण्यात आली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’चे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार हे या समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मागील वर्षी विद्यापीठातील प्राधिकरणे बरखास्त करण्यात आली होती. पदावर असलेले अधिकारी व नामनियुक्त सदस्य यांच्या भरवशावर विद्यापीठाच्या प्राधिकरणांचे कामकाज सुरू आहे. अशा स्थितीत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लांबणार की काय अशी शंका उत्पन्न होत होती. परंतु मुंबईसह राज्यातील विविध विद्यापीठांनी दीक्षांत समारंभ घेण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेता नागपूर विद्यापीठाकडूनदेखील दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यासाठी १ आॅक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्री ५ आॅक्टोबरपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावर दीक्षांत समारंभ झाला तर त्याचा फटका परीक्षेच्या कामांना बसण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेता दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला.परदेशात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या वर्षाअखेरीस मूळ पदवी सादर करावी लागणार आहे. अन्यथा त्यांचा प्रवेश रद्द होण्याची भीती आहे. शिवाय विद्यार्थ्यांना आतुरतेने दीक्षांत समारंभाची प्रतीक्षा होतीच व सातत्याने प्रशासनाकडे याबाबत विचारणा करण्यात येत होती. याबाबत अखेर विद्यापीठाने निर्णय घेतला असून १९ नोव्हेंबर रोजी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.(प्रतिनिधी)‘एलआयटी’त येणार मुकेश अंबानी ?दरम्यान नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित ‘एलआयटी’च्या (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून देशातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना बोलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची वेळ मागण्यात आली असून ते स्वत: ‘केमिकल इंजिनिअर’ असल्याने त्यांच्याकडून होकार मिळेल असा विश्वास असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
१०३ वा दीक्षांत समारंभ १९ नोव्हेंबर रोजी
By admin | Updated: October 14, 2016 03:24 IST