ऑनलाइन लोकमक
नागपूर, दि. 1 - नोकरीचे आमिष दाखवून विदर्भातील शंभरावर बेरोजगारांना एका टोळीने गंडा घातला. त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन हे टोळके पसार झाले. अजनी पोलीस ठाण्यात पीडित बेरोजगार पोहचल्यानंतर या टोळीचा गोरखधंदा उजेडात आला.
आदित्य हक्केवार, प्रमोद लक्कावार आणि विपीन ताराचंद भरणे अशी आरोपींची नावे आहेत. नरेंद्रनगर बसथांब्याजवळच्या विनयानंद सोसायटीत आरोपींनी भाड्याच्या सदनिकेत जॉब प्लेसमेंटच्या नावाखाली ४ महिन्यांपूर्वी दुकानदारी सुरू केली होती. कुणाला बँकेत, कुणाला कंपनीत, कुणाला रेल्वेत तर कुणाला अन्य दुस-या ठिकाणी नोकरी लावून देण्याचे आमिष हक्केवार, लक्कावार आणि भरणे तसेच त्यांचे साथीदार दाखवत होते. त्यांच्याकडे आलेल्या बेरोजगारांची शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतर नोकरीच्या हुद्दयानुसार ही मंडळी बेरोजगाराला रक्कम मागायची.
त्यांच्याकडून नोकरी लागल्याचे सांगणारी दलाल मंडळीही त्यांच्या आजुबाजुला घुटमळत होती. त्यामुळे अनेक बेरोजगार या टोळीच्या जाळळ्यात अडकून त्यांना रक्कम देत होते. डिसेंबर २०१६ पासून विदर्भातील अनेक तरुण तरुणींनी त्यांना अशा प्रकारे लाखो रुपये दिले. एकट्या गोंदिया जिल्ह्यातील सिलेझरी सांगळी (ता. अर्जुनी मोरगांव) येथील राष्ट्रपाल अरुण उके (वय २२) आणि त्याच्या काही मित्रांनी आरोपींना ८ लाख रुपये दिले. ही आणि अन्य बेरोजगारांकडून लाखोंची रक्कम उकळणारे आरोपी पळून गेले.
अखेर पोलिसांकडे धाव
चार दिवसांपुर्वी त्यांनी कार्यालयाला टाळे लावले. त्यामुळे ठिकठिकाणाहून नोकरीच्या आशेपोटी येथे येणारे तरुण चकरा मारू लागले. आज सुरू होईल, उद्या सुरू होईल, असा गैरसमज करून कार्यालयात चकरा मारणारे बेरोजगार अखेर वैतागले. शुक्रवारी अनेक पीडित एकत्र झाले. आपली फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अजनी ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. उपरोक्त तिघांसह त्यांच्या साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहेत.