न्यायालय : मतिमंद तरुणीवरील बलात्कार प्रकरणनागपूर : कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका २० वर्षीय मतिमंद तरुणीवरील बलात्कारप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सादिक उमर यांच्या न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संदीप कवडू बंड (२८), असे आरोपीचे नाव असून कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी तालुक्याच्या बोरडा (गणेशी) येथील रहिवासी आहे.बलात्काराची ही घटना ४ सप्टेंबर २०१३ रोजी घडली होती. पीडित मुलगी घरी एकटीच असताना आरोपी संदीपने तिच्या घरात घुसून बलात्कार केला होता. पीडित मुलीची आई ही सायंकाळच्या वेळी ४.३० वाजताच्या सुमारास आपल्या जावयासोबत मोटरसायकलने शेतावर काम करून घरी परतताच संदीप हा तिला पळताना दिसला होता. पीडित मुलगी केवळ सीमीजवर होती. तिने हातवारे करीत बलात्काराची घटना आपल्या आईला सांगितली होती. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीही असाच प्रकार संदीपने केला होता, असे पीडित मुलीच्या आईला आठवताच तिने कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून संदीप बंडविरुद्ध भादंविच्या ३७६ (२)(एफ)(एल) कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. उपनिरीक्षक एस. एस. मोले यांनी तपास करून आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात ११ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील उषा गुजर (माणिकपुरे) यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, सहायक फौजदार अरुण भुरे, हेड कॉन्स्टेबल शब्बीर सय्यद यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
बलात्काऱ्यास दहा वर्षे कारावास
By admin | Updated: January 30, 2016 03:10 IST