आशिष दुबे
नागपूर : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत प्रविष्ट करण्यासाठी शाळांना बोर्डाकडून इंडेक्स नंबर घ्यावा लागतो. नागपूर विभागीय शिक्षण मंडळात (बोर्ड) या इंडेक्स नंबरसाठी शाळांकडून १० हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. नागपूर विभागातील शिक्षण क्षेत्रात अधिकाऱ्यांची वानवा आहे. नागपूर बोर्डातही कायमस्वरुपी अध्यक्ष व सचिव नसल्याने कर्मचाऱ्यांकडून अशी मनमानी सुरू आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार काही शाळांनी १० हजार रुपये दिल्यानंतरच त्यांना इंडेक्स नंबर देण्यात आले. ज्यांनी पैसे दिले नाही, त्यांचे प्रस्ताव पेंडिंग ठेवण्यात आले. शाळांना बोर्डाकडून इंडेक्स नंबर मिळणार नाही, तोपर्यंत विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होणार नाही. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी इंडेक्स नंबरसाठी बोर्डात चकरा मारीत आहे.
कापसी येथील एका शाळाने इंडेक्स नंबरसाठी बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला. परंतु इंडेक्स नंबर मिळविण्यासाठी शाळेचा कर्मचारी बोर्डात गेला असता, त्याला १० हजार रुपये लाच मागण्यात आली. ही बाब त्याने शाळेच्या मुख्याध्यापकाला सांगितली. संबंधित मुख्याध्यापकाने यासंदर्भात शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याला माहिती दिली. तो अधिकारी पूर्वी बोर्डात कार्यरत होता. त्याने संबंधित कर्मचाऱ्याला संपर्क करून संबंधित शाळेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यास सांगितले.
- २३३ शाळांचे प्रस्ताव प्रलंबित
सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने २३३ शाळांचे स्कूल इंडेक्सचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहे. विना इंडेक्सनंबर विद्यार्थ्यांना परीक्षे बसविता येत नाही. ३ वर्षासाठी इंडेक्स नंबर दिला जातो. इंडेक्स नंबरचा कालावधी संपण्यापूर्वीच शाळेला अर्ज करावा लागतो.
- चौकशी करू
यासंदर्भात नागपूर बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष अनिल पारधी यांना याबाबत कळविले असता, ते म्हणाले की स्कूल इंडेक्स नंबरसाठी कुणीही पैसे देऊ नये. जर कुणी पैसे मागत असले तर सरळ माझ्याशी संपर्क करावा. इंडेक्स नंबरसाठी पैसे मागितले असेल तर आम्ही त्याची चौकशी करू व दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करू.