सेवानिवृत्त प्राध्यापकांनी १७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुचविले उपाय नागपूर : वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. जितकी मोठी शाळा तितके मोठे दप्तर असे समीकरण आजच्या काळात झाले असल्याचे दिसते. वयाला न पेलणाऱ्या वजनापेक्षाही दप्तर जड झाले आहे. दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांसह येणाऱ्या काळात पालकांसाठीही संकट बनू पाहत आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत जातो की दप्तराचा भार वाहण्यासाठी हे कोडे सोडणविण्यासाठी एका शिक्षकाने पुढाकार घेतला आहे. प्राध्यपक म्हणून निवृत्त झालेल्या राजेंद्र दाणी यांनी अभ्यास करून पुस्तकांचे ओझे कसे कमी करता येतील याबाबत आपले निष्कर्ष नोंदविले आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दहा सूत्री उपाययोजना त्यांनी १७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुचविल्या आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत केवळ दहा टक्के दप्तराचे ओझे असावे, असा शासनाचा नियम आहे. परंतु, आवश्यकतेपेक्षा जास्त पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात असल्याचे दिसते. एनसीईआरटीने काढलेल्या परिपत्रकानुसार दुसऱ्यावर्गापर्यंत दप्तर घेऊन शाळेत येण्याची सक्ती नाही, तरी देखील पुस्तके, वह्या, डबा, वॉटरबॅग, ड्रॉईंग बुक घेऊन शाळेत मुलांना पाठविले जाते. विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकांचे वाढते ओझे हा विषय खरच चिंतेचा झाला आहे. मात्र, या समस्येकडे ना शिक्षकांचे लक्ष आहे ना पालकांचे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणाऱ्या या ओझ्याकडे पालक आणि शिक्षक दोघेही सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. दप्तराच्या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांचे शोषण होत असल्याचे दिसते आहे. दप्तराचे प्रचंड ओझे पाठीवर घेऊन घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास, करणे, तसेच शाळेच्या व घराच्याही पायऱ्या चढणे ही तारेवरच्या कसरत विद्यार्थी करीत आहेत. पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे अतिरिक्त विषय अभ्यासक्रमातून कमी करणे. ज्या विषयांचा आपल्याला व्यावहारिक जीवनात जास्त उपयोग होत नाही. अशा विषयांना अभ्याक्रमातून कमी करण्यात येणे गरजेचे असल्याचे दाणी यांचे मत आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेत लॉकर्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-लर्निंगचा वापर करणे काळाची गरज आहे. (प्रतिनिधी)
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी १० सूत्री उपाययोजना
By admin | Updated: June 15, 2016 03:11 IST