डॉ. नीलिमा गुंडी
लहानपणीच्या अनेक आठवणींमधली सगळ्यात मनात ताजी राहिलेली आठवण आहे. आईकडून गोष्ट ऐकण्याची! आमच्या कल्याणच्या ‘रामवाडी’तील सामायिक गॅलरीत रात्री आई मला जेववत असे. जेवताना आईने गोष्ट सांगणे बंधनकारक असे. माझ्याबरोबर शेजारच्यांच्या लहान मुलीही गोष्ट ऐकायला येत असत. मी तीन वर्षांची असल्यापासूनचा तो कार्यक्रम पुढेही बरीच वर्षे टिकून राहिला होता. आईच्या आजोळी कीर्तनकारांची परंपरा असल्यामुळे तिची गोष्टी सांगण्याची पद्धत मोठी आकर्षक असे. त्यामुळे रोज रात्रीचा तो भोजन सोहळाच असे जणू! आईची गोष्ट ऐकताना आपण एकीकडे जेवत आहोत, याचे भानच उरत नसे! गोष्ट ऐकताना गुंगून जाण्यातल्या अनुभवाचा तो ठसा आजही मला जाणवतो.
आईने रोज नवी गोष्ट सांगण्याचा नियम खरंच पाळला होता. सुरुवात बहुधा प्राणी-पक्षी यांच्या गोष्टींनी झाली असावी. चिऊ, काऊ, ससा, कुत्रा अशा अनेकांच्या गोष्टी तिने सांगितल्या. त्या गोष्टी आई साभिनय कथन करीत असे. त्यामुळे आईचे चमकणारे डोळे, तिच्या तोंडचे चिऊ-काऊचे वेगवेगळे आवाज या सगळ्यांचा नाट्यमय परिणाम आम्हा बालवृंदावर होत असे. आम्ही एका वेगळ्याच कल्पित विश्वाचे रहिवासी बनत असू. त्यामुळे एकीकडे आई जो घास भरवत असे, त्यात नावडती भाजी असली, तरी बिघडत नसे! मुलीला जेववण्याची ही मात्रा आईला अचूक सापडली होती.
त्या वयात ऐकलेल्या कितीतरी गोष्टी पुढे वेगवेगळ्या वयांत पाठय़पुस्तकांत भेटल्या. ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली’ म्हणणारा उंदीरमामा, ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ म्हणणारी म्हातारी, ‘थांब, माझ्या बाळाला तीट लावते’ म्हणणारी चिऊताई, आभाळ पडलंय म्हणून धावत सुटलेला ससा, गणपतीला हसणारा चांदोमामा.. अशा कितीतरी पात्रांनी माझ्या मनात तेव्हापासून जे घर केलं आहे, ते आजतागायत! गोष्टी ऐकताना त्या-त्या वेळी मन कोणाची तरी बाजू घेत असे.
जसं की एरवी ससा प्रिय असे, पण ससा आणि कासवाच्या शर्यतीच्या गोष्टीत मन कासवाच्या बाजूने असे! हत्तीपासून उंदरापर्यंतचे प्राणीविश्व त्या गोष्टींतून ओळखीचे झालेले असे. आईने इसापनीती, पंचतंत्र आदीतील गोष्टींबरोबरच काही स्वत:च्या आयुष्यातल्याही गोष्टी सांगितल्या होत्या. ते प्रसंगही चित्तवेधक असत. विशेषत: ती तिच्या लहानपणी सगळ्यांचा डोळा चुकवून प्रयागतीर्थामध्ये गेली असताना तिथे कशी पडली होती आणि मग तिथल्या माकडांमुळे तिला बाहेर काढणं कसं शक्य झालं, या प्रसंगाची गोष्ट त्यातल्या खरेपणामुळे जास्त अद्भुत वाटत असे! तसंच आई तिच्या लहानपणी एकदा समुद्रकिनार्यावरच्या दलदलीत कशी फसली होती आणि मग मोठमोठे बांबू, दुरून टाकून लोकांनी तिला बांबू हाताने धरायला सांगून कसे खेचून काढले, हा प्रसंग म्हणजे अशीच थरारक गोष्ट होती. आई लहानपणी बरीच खट्याळ होती. हे त्या गोष्टींवरून पक्के मनात ठसले होते.
आई स्वत: गोष्टी रचतही असे. त्यात ‘एक होते भटजी, ही तिची गोष्ट आज पुढच्या पिढय़ातल्यांपर्यंत पोहोचली आहे. राजाने दिलेली दक्षिणा पाण्यात पडल्यामुळे रुसलेले आणि राजाने हत्ती, घोडे देऊ केले, तरी त्यांना नकार देत ‘गाढवच हवे’, म्हणणारे ते गोष्टीतले भटजी मोठे विक्षिप्तच होते. ‘माझा पैसाच पडला, चुक् चुक्’, ‘माझं हौसेचं गाढव तुरुतुरु चालतं’ असं त्यांचे गोष्टीतले नादपूर्ण संवाद मोठे डौलदार होते. आईने पुढे-पुढे बिरबलाच्या गोष्टी सांगितल्या. कृष्णाच्या पुराणातल्या गोष्टी सांगितल्या. रामायण, महाभारत हा तर गोष्टींचा खजिना होताच! शिवाजीमहाराजांच्या आणि एकूणच इतिहासातल्याही अनेक गोष्टी तिनं सांगितल्या होत्या. इतिहास हा तिचा शाळेत शिकवायचा विषयच होता, त्यामुळे तिच्यासाठी ‘गोष्ट काय सांगायची?’ हा पेच नसे. त्या-त्या वयात गोष्ट ऐकताना हळूहळू मन आतून जागेही होऊ लागले होते. आईने जेव्हा चिल्या बाळाची गोष्ट सांगितली, तेव्हा ती गोष्ट मला तेव्हाच काय, आजही स्वीकारता येत नाही. अतिथीला संतुष्ट करण्यासाठी आपल्या मुलाचे मांस शिजवून देणारी आई ही कल्पना मला त्या वयात तर जगाचे एक वेगळेच भयंकर रूप दाखवून गेली. या गोष्टी अशा आपली जगाविषयीची कल्पना ताणून-ताणून आपल्याला मोठं करत गेल्या, हे नंतर कळलं. त्या गोष्टींमध्ये चांगलं, वाईट, राजा, चोर, राक्षस, भूत, साधू अशा सगळ्यांना स्थान असे. त्यामुळं जगाचं एक परिपूर्ण सुबक छोटं ‘मॉडेल’ त्या गोष्टींनी समोर ठेवलं होतं. ते एकाअर्थी बरंही झालं!
मोठय़ा वयात वाचनाची आवड निर्माण झाली आणि आईची गोष्टी सांगण्याच्या कामातून सुटका झाली. तरीही तिच्या तोंडून ऐकलेल्या कित्येक गोष्टींनी मनाला एक अस्तर पुरवले, याविषयी शंकाच नाही. श्रावण महिना आला, की ती व्रतकथाही अधून-मधून सांगत असे. नागपंचमीला ती हळद आणि चंदन उगाळून त्याची पाटीवर नागांची चित्रे काढून पूजा करीत असे, त्यांची गोष्ट सांगत असे. त्या वेळी ती म्हणत असे, ‘‘ये रे माझ्या अंड्या, ये रे माझ्या पांड्या, ये रे माझ्या साती भावंडा, नागाचा वेल वाढो, तसा माझा वेल वाढो, तसा माझ्या भावंडांचा वेल वाढो, माझ्या मुलींचा वेल वाढो, तसा सार्यांचा वेल वाढो.’’ तिचे ते मागणे मोठे मन:पूर्वक असे. तिच्या गोष्टींचं पसायदान असं स्वत:पासून सुरू होत-होत विश्वकल्याणाची प्रार्थना करणारे होते. तिच्या सहजीवनात सर्व प्राणिमात्र, सर्व मानवजात सर्वांना स्थान होते. तिच्या त्या गोष्टींनी मनात संवेदनशीलतेचं रोप लावलं होतं, तिच्याही नकळत!
आज चिऊकाऊची सनातन गोष्ट सांगायला घेतली, की ‘चिऊचं घर होतं मेणाचं’ म्हटल्यावर आजचं तल्लख लहान मूल विचारतं, ‘मग उन्हाळ्यात चिऊचं घर वितळेल ना?’ तेव्हा त्यासाठी नवीन गोष्ट रचावी लागते. मात्र, कोणत्या का रूपात गोष्ट असावीच लागते! ती चिऊ-काऊ आणि बाळ यांना एका नात्यात बांधते आणि बाळाच्या भावजीवनाचं पोषण करत असते. त्यामुळे ‘एक होती चिऊ’ हे मुलांसाठी कायमचे पालुपद राहणार व चिऊसकट त्या गोष्टींचं आभाळ बालमनावर प्रेमाची पाखर घालत राहणार अगदी अनंत काळपर्यंत!
(लेखिका ज्येष्ठ समीक्षक आहेत.)