- शर्मिला फडके
जसे चित्रकारांचे स्वभाव तसेच स्टुडिओंचेही. काही मोकळे ढाकळे, स्वागतशील, तर काही खासगी, आपल्या अवकाशाचे स्वातंत्र्य आणि एकटेपण अबाधित राखू इच्छिणारे. तिथे सहजासहजी प्रवेश मिळत नसतो. वाट पाहावी लागते, ओळख व्हायची. चित्रकाराला खात्री पटावी लागते.. त्याच्या चित्रांबद्दल आपल्याला जेन्युइन आस्था वाटत आहे की नाही, त्याची. ‘माझ्या स्टुडिओमध्ये मला तुला नेता येणार नाही, फोटोही काढता येणार नाहीत’ - पहिल्याच भेटीत लक्ष्मण श्रेष्ठ यांनी त्यांच्या शांत आणि ठाम स्वरात डिक्लेअर केलं होतं. मी जराशी निराश झाले. पण वाट पाहायचं ठरवलं. दरम्यानच्या काळात आम्ही ‘चिन्ह’च्या ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या निमित्ताने किंवा इतरही वेळी भेटलो, भरपूर गप्पा झाल्या. या कोणत्याही भेटीत स्टुडिओचं दर्शन झालं नाही. एकदा ते म्हणाले- ‘माझ्या स्टुडिओत मी पेंट करत असताना आजवर फक्त ‘गाय’ (जगप्रसिद्ध चित्रकार गायतोंडे) आलेला आहे. एरवी कोणत्याही व्हिजिटर्सना मी कधीही स्टुडिओच्या आत नेत नाही.’यावेळी मात्र मी फोनवर सांगितलेली ‘पेंटर इन हिज स्टुडिओ’ ही थीम आवडल्याचं ते लगेचच म्हणाले आणि भेटायला बोलावलं.लक्ष्मण श्रेष्ठंचा खारचा दुमजली बंगला नेहमीसारखाच नीरव शांततेमध्ये बुडालेला. लिव्हिंग रूमची सजावट साधी, पांढऱ्याशुभ्र भिंती, पांढरा सोफा, शिसवी कॉफी टेबल, ओसंडून वाहणारी बुक रॅक. कोपऱ्यात टीव्ही. त्याखालची कॅबिनेट डीव्हीडीज्नी खचाखच भरलेली. इंग्मार बर्गमनच्या ‘आॅटम सोनाटा’ची डीव्हीडी त्यातून वरच डोकावताना दिसली. ती पाहून मला बरं वाटलं. धीर आल्यासारखं. भिंतीवर ओळीने पेंटिंग्ज, काही फिगरेटिव.. श्रेष्ठंची सुरुवातीच्या काळातली. काही अॅबस्ट्रॅक्ट चित्रं.. सोफ्यावर ताठ, सरळ बसलेले लक्ष्मण पहाडावरच्या समाधिस्थ साधूसारखे निश्चल, शांत मुद्रेचे. चेहऱ्यावर हास्य आहे. हसताना त्यांच्या डोळ्यांचे कोपरे हसतात. सगळ्याच पहाडी माणसांचे हसतात तसे. पण डोळे तसेच गहन, गंभीर राहतात. खोल डोहासारखे.बंगल्याच्या मागच्या बाजूला वरच्या मजल्यावर त्यांचा मुख्य स्टुडिओ आहे. खालच्या बागेत आजूबाजूच्या हिरवाईमध्ये दडलेल्या काचेच्या ग्रीन हाउससारखा देखणा अजून एक वर्किंग स्टुडिओ आहे. तिथे त्यांचं पेंटिंगचं अंतिम काम चालतं.‘इथे मी माझी बरीचशी वॉटर कलर्समधली किंवा लहान कामं करतो. बाकीचं माझं काम खूप मोठ्या कॅनव्हासवरचं असतं. ही जागा मला त्याकरता पुरत नाही, ते काम मी वरच्या स्टुडिओत करतो. बहुतेक वेळा खाली जमिनीवर कॅनव्हास ठेवून किंवा भिंतीला टेकवून मी पेंट करतो. इझलवर फार कमी.’ - बोलत असतानाच आम्ही हिरवळीने वेढलेल्या बागेतला लहानसा रस्ता ओलांडून त्या स्टुडिओपाशी येतो. दरवाजा बंद आहे. दरवाजाची मूठ विलक्षण, पांढऱ्याशुभ्र स्फटिकाची. लक्ष्मण मला तो क्रिस्टल नॉब फिरवायला सांगतात. त्याचा स्पर्श बर्फगार. मी ती मूठ एकदा डावीकडे फिरवते, पुन्हा उजवीकडे. दरवाजा उघडत नाही. मूठ सोडून दिल्यावर लक्ष्मण मला त्या स्फटिकावर उमटलेले माझ्याच बोटांचे निळे ठसे दाखवतात. नेपाळमधल्या पशुपतिनाथाच्या पहाडावर एका साधूने दिलेला हा स्फटिक आहे. मनात अशुद्ध भावना असतील तर स्फटिक काळा पडतो. त्यांचं बोलणं मला चमत्कृतीपूर्ण वाटतं, मी काही दर्शवत नाही, पण आता हे निळे ठसे उमटले आहेत तर मला आत प्रवेश आहे की नाही, हा विचार मनात येतो. इतक्यात लक्ष्मण आत बोलावतात. त्यांनी स्वत:च दरवाजा उघडलेला असतो. किंचित हायसं वाटून मी आत प्रवेश करते. समोरच भिंतीला टेकून एक आडवा, लांबलचक कॅनव्हास आहे. ‘माझ्याकरता माझा स्टुडिओ पवित्र मंदिरासारखा आहे’ - लक्ष्मण सांगत असतात.स्टुडिओ खरोखरच डिव्हाइन आहे. शांत, शुभ्र प्रकाशाने भरून गेलेला आतला मोकळा, अनक्लटर्ड अवकाश. अत्यंत नीटनेटका. ब्रश आणि पॅलेट्सची सुबक रांग.. स्टुडिओच्या लांबरुंद काचांमधून आत पाझरणारं डिसेंबरमधलं दुपारचं सौम्य, कोवळं ऊन.. मोकळ्या खिडक्यांमधून आत येणारा गार वारा.. आणि लक्ष्मण श्रेष्ठंचे सुप्रसिद्ध मोठे, अॅबस्ट्रॅक्ट कॅनव्हासेस.. समोरच्या भिंतीला आडवे टेकवून ठेवलेल्या लांबरुंद पेंटिंगवरून माझी नजर ढळत नाही.झळझळीतपणा आणि सौम्यपणा, कोमलता आणि ठामपणा अशा विरोधाभासांचा देखणा समतोल या पेंटिंगमधल्या रंगांमध्ये आहे. तपकिरी, पिवळा, केशरी, निळा.. आणि भरपूर शुभ्र. पॅशनेट रंगछटा.. काही उदास, काही आनंदी. काही हिंस्त्र, अंगावर धावून येणारे स्ट्रोक्स.लक्ष्मण श्रेष्ठंची अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज त्यातल्या विलक्षण रंगसंगतीने मोहात पाडतात आणि मग त्या रंगांच्या कवडशांआडची सृष्टी हळू हळू उलगडत जाते. नजर खोल खोल शिरत राहते, सघन, अनघड आकारांच्या आत गूढ, गहन, खोल दऱ्या, त्यातून उसळणारा प्रकाश, स्फटिक रेषा.. एकाचवेळी स्पिरिच्युअल आणि सेन्शुअस अनुभव देणारी पेंटिंग्ज.. त्यात शांतता आहे आणि अमानुष आकर्षणही. लक्ष्मणची पेंटिंग्ज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी एक विलक्षण मेळ सांधणारी वाटतात. काळा शर्ट आणि बेज कलरची ट्राउझर घातलेले लक्ष्मण ऐंशीच्या घरातले असतील असं चुकूनही वाटत नाही. तरुण दिसणारी तकतकीत त्वचा आणि मानेवर रुळणारे काळेभोर, चमकदार, सरळ केस, डोळ्यांच्या कोपऱ्यातल्या किंचित सुरकुत्या हे सगळं त्यांच्या नेपाळी पहाडी हिमालयन वंशाची खूण पटवून देणारं. तरुणपणातल्या त्यांच्या फोटोंमधेही ते अगदी असेच दिसतात. ‘तुमच्यात काहीच बदल नाही’ असं त्यांना सांगितल्यावर ते प्रसन्न हसतात आणि संकोचाने म्हणतात, ‘झाला आहे.’ ते उजव्या हाताचं कोपर दाखवतात. ‘आयुष्यभर जड कॅनव्हास सहज उचलले, पण आता हल्लीच इथे कळ येते आणि मनगटही दुखायला लागतं मधूनच.’ - लक्ष्मण अजूनही रोज स्टुडिओत काम करतात. ‘पण आता पूर्वीसारखं सहा-आठ तास सलग काम करत नाही, दोन-तीन तासांनंतर ब्रेक घेतो. त्यावेळी सुनीताशी गप्पा होतात, दहा मिनिटांचा ब्रेक पुरतो मला.’ सुनीता परळकर आणि लक्ष्मण श्रेष्ठ दोघे जे. जे. स्कूल आॅफ आर्टचे सहाध्यायी. तिथेच प्रेम जमलं. ‘लग्न झालं, त्याला आता पाच दशकं झाली, त्यामुळे फार काही तपशील विचारू नकोस’ - लक्ष्मण दिलखुलास हसतात. बोलताबोलता सहज म्हणतात, ‘मला पेंट करत असताना आणि एरवीही स्टुडिओत असताना संपूर्ण शांतता लागते.’ लक्ष्मण श्रेष्ठ दूरस्थ व्यक्तिमत्त्वाचे, एकांतप्रिय. अॅबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट्सच्या दृष्टीने ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असं त्यांना वाटतं. ‘शांत असणं, राहणं हा एक आंतरिक शिस्तीचा भाग आहे. शांतता मनात रुजवावी लागते, त्याकरता आजूबाजूचा भवतालही शांत असणं गरजेचं आहे. वाचन, संगीत या दोन गोष्टी म्हणूनच मला आवडतात, कारण त्यांच्यामुळे माझं मौन किंवा शांतता भंग होत नाही, उलट जास्त गहन होते. शांततेत तुम्हाला तुम्ही जे शोधत आहात त्याचा शोध लागतो. निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीचा याकरता मला फार उपयोग झाला. त्यांनी मला अंतर्मनात डोकवायला शिकवलं. तिथे मला जे सापडलं ते आपोआप माझ्या कॅनव्हासवर उतरत राहिलं. ‘गाय’ आणि माझ्यामध्ये ‘शांततेची आवड’ हा एक समान दुवा होता. एकदा त्यांच्या स्टुडिओमध्ये ते मला म्हणाले, ‘लक्ष्मण, तू माझा मित्र आहेस कारण तुला शांततेचं मोल कळतं. मला त्यावेळी खूप आश्चर्य वाटलं. कारण मुळात मी शांत नव्हतो. बहुधा माझ्यातली सगळी अस्वस्थता, कोलाहल त्यांच्या सहवासात शांत व्हायची. त्यांच्यासोबत मी शांत राहायला शिकलो. पेंटरकरता, विशेषत: अॅबस्ट्रॅक्ट पेंटरकरता शांतता फ ार गरजेची आहे. त्याशिवाय स्रोतापर्यंत पोचणं कसं शक्य आहे?’ - मग पुढचा काही वेळ लक्ष्मण गप्पच राहतात, गायतोंडेंच्या आठवणींमुळे असेल. मीही त्यांना डिस्टर्ब न करता सुनीतांसोबत गप्पा करते. त्यांना माझा फॅ ब इंडियाचा इंडिगो कुर्ता आवडलेला असतो. ‘लक्ष्मणचाही हा आवडता कलर’ - त्या सांगतात.मला माहीत असतं. त्यांच्या चित्रांमध्येही अनेकदा हा रंग डोकावलेला आहे. लक्ष्मण श्रेष्ठ यांचं पेंटिंग पाहताना सर्वात प्रथम नजरेत भरतो भव्यपणा. प्रचंड मोठ्या कॅनव्हासवरचा आशयही तसाच.. विशाल आणि सखोल. त्यातला अवकाश नजरेत मावत नाही. त्यावरचे आकार एकाचवेळी सघन आणि प्रवाही.. रंगांच्या मधल्या रहस्यमय जागांचा वेध नजर घेत राहते.. राखाडी, शुभ्र, काळा किंवा निळा, पिवळा.. भास आभासाचा खेळ त्यांचे रंग खेळत नाहीत, ते ठामपणे तुमच्या नजरेला भिडतात. निश्चल पहाडी कड्यांसारखे वाटणारे आकार मात्र अचानक कोसळत राहतात. आकाशाच्याही पलीकडचा अवकाश त्यात आहे. अंतर्मनापर्यंत पोचणारा. लक्ष्मण सांगतात- ‘नेपाळ या माझ्या जन्मभूमीतले पहाड, तिथले बर्फाच्छादित पर्वत, कडे, सातत्याने बदलत राहणारा भूभाग, निसर्गाचं एकाचवेळी भीषण आणि तरीही निखळ पवित्र वाटणारं सौंदर्य, तिथल्या हिमालयाची भव्यता कायमच माझ्या अंतर्मनात होती. मुंबईसारख्या शहरात राहताना मला ते सतत आठवत राहिलं. मी नेपाळ सोडलं पण माझ्यातला हा निसर्ग कॅनव्हासवर उतरत राहिला. कदाचित म्हणूनच मी इतके मोठे, भव्य कॅनव्हास वापरत राहिलो.’लक्ष्मण बोलता बोलता उल्लेख करतात.. ‘लहानपणी मी अतिशय मस्तीखोर, आनंदी स्वभावाचा मुलगा होतो!’- शांतता कितीही आत झिरपवली असली तरी ते त्या मुलाला स्वत:तून दूर करू शकलेले नाहीत, हे त्यांच्या क्वचितच ऐकू येणाऱ्या खळाळत्या हसण्यातून अचानक जाणवतं. हिमालयात उगम पावलेल्या निवळशंख झऱ्यासारखं ताजं, टवटवीत हास्य.. काय असावं याचं रहस्य?‘माझ्या मनात निगेटिव्ह विचारांची अडगळ कधी साचून राहत नाही. असं मन खूप रिसेप्टिव्ह असतं. अशा मनात तुम्हाला वातावरणातले संदेश ग्रहण करता येतात. मधला ८० च्या दशकाचा एक काळ होता, जेव्हा माझी करिअर ऐन भरात होती. क्लायण्ट्स, आर्ट गॅलरीज, मीडिया, सोशल सर्कल, कॉकटेल पार्टीज यांचा कोलाहल टाळता येणं मला अशक्य झालं होतं. त्या काळात मी अस्वस्थ होतो, जगण्याचा अर्थ माझ्यापासून दूर जात होता. त्यावेळी गायनी माझ्या हातात निसर्गदत्त महाराजांचं 'क अे ळँं३' हे पुस्तक ठेवलं. आज ते माझ्या जगण्याचाच एक भाग आहे. त्यातून मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे स्वत:तल्या सत्याशी प्रामाणिक राहायचं. आता याचा उपयोग/परिणाम माझ्या पेंटिंगवर नेमका कसा झाला हे सांगणं कठीण आहे, पण तो झाला.’ ‘माझं पेंटिंग माझं रुटीन ठरवतं. माझ्या दिनक्रमात पेंटिंगला प्राधान्य आहे, मग बाकीचे कार्यक्रम. अगदी मी उठतो, जेवतो, झोपतो कधी हेही माझं पेंटिंगच ठरवतं. त्यामुळे कलाकाराची शिस्त वगैरे मला काही सांगता येणार नाही. साधा आणि लवचिक असा माझा दिनक्रम असतो. लवकर उठतो, स्टुडिओमध्ये जातो, संगीत सुरू करतो आणि मग दिवस सुरू होतो. मी कधी फिरायला जाणार, योगा करणार, मित्रांना भेटणार हे सगळं मूडवर अवलंबून. माझ्या स्टुडिओमध्ये संगीत सतत चालू असतं. भारतीय, पाश्चिमात्य, शास्त्रीय संगीत, कधी जाझ. पौर्वात्य लोकसंगीतही मला प्रेरणा पुरवतं. माझं वाचनही स्टुडिओतच होतं. रोज पाच-सहा तास तरी वाचनात जातात. मला वाटतं माझ्यात कायम एक चौकस मुलगा असतो, त्याला सतत प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरं स्वत: मिळवायलाच त्याला आवडतात. वाचनातूनच ती मिळतात. अगदी तरुण होतो तेव्हापासून मी उपनिषद, बुद्ध तत्त्वज्ञानावरची पुस्तकं वाचत आलो ते त्याकरताच. रॉकी, रॅम्बोपर्यंतचे सगळे सिनेमे मला आवडतात. अनेकदा स्टुडिओत असताना गांभीर्य गडद होत जातं, चिंतनाचा ताण येतो, प्रश्नांची उत्तरं तरीही मिळालेली नसतात अशा वेळी कॅनव्हास फाडून टाकणं किंवा सिनेमा बघणं असे दोनच पर्याय असतात. दुसरा पर्यायच मला बहुतेकवेळा उपयोगी पडतो. माझा मूड तत्काळ बदलतो. विचारांची भेंडोळी सुटतात.’‘गाय मुंबईला माझ्या घरी आला की त्याचा मुक्काम स्टुडिओतच असायचा. इथली नीरव शांतता त्याला फार आवडे. माझं एखादं चालू असलेलं चित्र तो जवळ जाऊन निरखायचा. फ ार काही बोलायचा नाही. कधी तरी अच्छा है, गुड असे उद्गार.. ते ऐकण्याकरता मी उत्सुक असायचो. एखादं चित्र विशेष आवडलं तर पाठीवर थोपटायचा. बाकी पेंटिंगबद्दल क्रिटिसिझम वगैरे कधीच नाही. मीसुद्धा कधीही त्याला कसं झालं आहे पेंटिंग वगैरे विचारलं नाही. तसं विचारणं मला अर्थहीन वाटतं. अनेक पेंटर्स त्यांना कोणी सुचवल्यावर लगेच फेरफार करतात, रंगसंगतीही बदलतात. याला मी ग्राहक केंद्रित कला म्हणतो. माझ्या स्टुडिओत त्याला स्थान नाही. कामाशी, वर्क आॅफ आर्टशी प्रामाणिक राहणं म्हणजे तुमच्या जगण्याशी प्रामाणिक राहणं.’लक्ष्मण श्रेष्ठ फिगरेटिवकडून लॅण्डस्केप्स आणि मग त्यातून अॅबस्ट्रॅक्टक्शनकडे वळले. स्थिरावले. मूर्ताकडून अमूर्ताकडे हा प्रवास सहज असला, नैसर्गिक असला तरी सोपा नसतो. त्याकरता आयुष्यभराचं चिंतन, उमज पणाला लागते. ‘चित्रकलेतल्या अॅबस्ट्रॅक्टक्शनबद्दल लोकांच्या मनात अजूनही अनेक गैरसमज आहेत. अमूर्त चित्रकलेला त्यामुळेच गूढ, अनाकलनीय बनवून टाकलं आहे. रंगांमधली लय, आकारांचं सौंदर्य, मनाला सुखावणारी संवेदना, आशयाचं रहस्य हे काहीच न अनुभवता, जो वेळ द्यायला हवा तो न देताच लोक नजर हटवतात कॅनव्हासवरून.. ते आपल्याला हे कळणारच नाही या गैरसमजापोटी. माझ्यासारखा चित्रकार या अज्ञानापुढे हतबल होण्यावाचून अजून काय करू शकणार? लक्ष्मण श्रेष्ठ इण्टेन्सिटीने बोलत राहतात. त्यांची हीच इण्टेन्सिटी त्यांच्या भव्य अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्जमध्ये जशीच्या तशी उतरलेली आहे. खोल, स्थिर शांततेचा अनुभव देणारी त्यांची चित्रं.. त्यातला सपकन वेध घेणारा एखादा धारदार ब्रशचा फ टकारा, अचानक उसळलेले रंग, रहस्यमय पोत, रंगांच्या विस्कळीतपणाला बांधून ठेवणारा आकारांचा नाजूक तोल.. या सगळ्यात मुक्त, चैतन्यमय ऊर्जा आहे. जीवनाचा ताल असाच असू शकतो, असायला हवा हे त्यांना समजलं आहे, हे आपल्याला समजतं. तुम्ही एक खूप मोठा प्रवास करून तुमच्या पेंटिंगपर्यंत येऊन पोचलेले असता. त्या प्रवासामध्ये जे काही बघितलं, जे लोक भेटले, जे ज्ञान मिळालं, जे टाकून दिलं, जे सोबत घेतलं या सर्वांबद्दलचं बोलणं म्हणजेच पेंटिंगबद्दलचं बोलणं. लक्ष्मण श्रेष्ठ पेंटिंग्जबद्दल भरभरून बोलत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रामाणिक एक्स्प्रेशन्सवरून नजर हटवता येत नाही. शांत पण ठाम स्वरातलं त्यांचं बोलणं, शब्दांमधली लय ऐकत राहावी अशी. लक्ष्मण श्रेष्ठंच्या एकंदर व्यक्तिमत्त्वातच आनंद, उत्साह, ऊर्जा आणि निरागसपणा असतो....आणि त्याचबरोबर एक अमानुष निग्रहही. खडबडीत टोकेरी दगडासारखा फटकळपणा. एरवी ते बोलायला, वागायला अत्यंत मृदू. त्यांचा हळुवार आवाज, आलेल्याची नम्र, आदरपूर्वक बूज राखत वागणं, प्रश्नांवर काळजीपूर्वक, विचार करून दिलेली उत्तरं.. पण त्या शब्दांमागे दडलेला खोल, गहन अर्थ नंतर बऱ्याच वेळानंतर सावकाश आपल्या मनात झिरपतो. एखादा माणूस थोर कलाकार असतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वात किती वेगवेगळे अनघड स्तर, अलवार पदर असतात, किती गुंतागुंतीच्या गूढ, गहन जागा असतात हे अशावेळी कळतं. हा माणूस तर मूळचा पहाडी..पन्नासहून अधिक वर्षं लक्ष्मण श्रेष्ठ रंगवत आहेत. पुढेही रंगवतच राहतील. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर- ‘चित्रकार कधीच निवृत्त होत नसतो. बोटांमधे ब्रश धरता येईस्तोवर मी पेंट करतच राहणार. बोटं चालेनाशी झाली तरीही मी पेंट करत राहणार. तेव्हा माझ्यासमोर इझलवर कॅनव्हास नसेल कदाचित, पण मेंदूत असेल.’(लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत.)
sharmilaphadke@gmail.com