शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

चित्ता गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 06:05 IST

पूर्वी भारतात चित्त्यांची चांगली रेलचेल होती. मानवी अतिक्रमणामुळे चित्त्यांचे अधिवास संपत गेले आणि मग चित्तेही दिसेनासे झाले. १९५२ साली तो नामशेष झाल्याचे जाहीर झाले. चित्त्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत; पण त्यानिमित्तानं अनेक प्रश्नही उभे राहिले आहेत..

ठळक मुद्देमानवी अतिक्रमणामुळे चित्त्यांचे अधिवास संपत गेले. आणि मग चित्तेही दिसेनासे झाले.

- सविता हरकारेताशी १२० किलोमीटर वेगाने ‘तो’ धावतो. प्रचंड शक्तिशाली आणि तेवढाच देखणा. छोट्याशा; पण सुबक चेहरेपट्टीचा. त्याचे बळकट लांबसडक पाय अन् एखाद्या सौंदर्यवतीलाही लाजवेल अशी सिंहकटी. सारेच कसे रुबाबदार ! अर्थातच हा प्राणी चित्त्याशिवाय दुसरा कोण असणार?चित्ता एकेकाळी भारताची शान होता. त्याची संगत येथील राजेमहाराजे अत्यंत प्रतिष्ठेची मानत असत. चित्ता पाळणे शाही शौक मानला जायचा, मात्र हा देखणा चित्ता ७० वर्षांपूर्वी या देशातून नाहीसा झाला तो पुन्हा परतलाच नाही. आम्ही आजही त्याच्या परतीची प्रतीक्षा करतोय. पण भविष्यात तरी कधी हे शक्य होईल? समजा झालेच शक्य, तरी त्याचा सांभाळ करणे आपल्याला जमेल?.. आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त असे अनेक प्रश्न आपोआपच निर्माण होतात.पूर्वी विदर्भातील यवतमाळ, बुलडाणा, अकोला या पट्ट्यात पसरलेली माळराने आणि मैदानी भागात चित्त्यांचा आवडता अधिवास होता. महाराष्ट्रात केवळ विदर्भातच नव्हेतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्त्यांची चांगली रेलचेल होती. परंतु हळूहळू परिस्थिती बदलत गेली. मानवी अतिक्रमणामुळे चित्त्यांचे अधिवास संपत गेले. आणि मग चित्तेही दिसेनासे झाले. १९४७-४८ साली मध्य प्रदेशातील सरगुजाच्या महाराजाने भारतातील शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती, अशी नोंद आहे. कारण त्यानंतर या देशात कधी हा सौंदर्यवान प्राणी दृष्टीस पडलाच नाही. १९५२ साली तो नामशेष झाल्याचे जाहीर झाले.एकाअर्थी आमच्यासाठी चित्ता इतिहासजमा झाला होता. ६४ वर्षांनंतर अचानक २०१२ मध्ये चित्त्याला भारतात आणण्याचे स्वप्न सरकार, काही वन्यजीव शास्त्रज्ञ आणि प्रेमींनी रंगविले तेव्हा आशा पल्लवित झाल्या. पण ते स्वप्न अपूर्णच राहिले. अर्थात यामुळे भविष्यात चित्ते भारतात परतण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी तसे प्रयत्न होऊ नयेत, असे नाइलाजास्तव म्हणावे लागावे, अशी आजची परिस्थिती आहे. वन्यजीवप्रेमींचा एक गट यासाठी आग्रही असला तरी वाघच सांभाळता येत नाही तेथे चित्ते काय सांभाळणार, असा त्यांचा सवाल आहे. त्यांच्या या प्रश्नातील वास्तव नाकारता येणार नाही.चित्त्याला वाघापेक्षा खूप जास्त जागा लागते. ती आपण उपलब्ध करून देऊ शकणार आहोत काय? त्यांना पोषक वातावरणनिर्मिती करणे खरच सापे आहे का? चित्त्यांना येथे आणल्यावर त्यांचे हाल होणार असतील, अधिवासासाठी त्यांना वणवण भटकावे लागणार असेल आणि यामुळे मानव-वन्यजीव संघर्षात आणखी भर पडणार असेल तर ते न आलेलेच बरे. उगाच आंधळे प्रेम करण्यात काही अर्थ नाही, अशी या गटाची भावना आहे. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांच्या पुनरागमनासाठी पाच-सहा वर्षांपूर्वी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ३०० कोटींची योजना आखली होती. याचा मोठा गाजावाजा झाला होता. पहिल्या टप्प्यात नामिबियातून १२ चित्ते आणले जाणार होते. मध्य प्रदेशचे कुनो पालपूर आणि नौरदोही अभयारण्य तसेच राजस्थानच्या जैसलमेरजवळील शाहगड येथील वाळवंट आणि गवताळ प्रदेशात त्यांच्या अधिवासाची व्यवस्था केली जाणार होती.‘चित्ता कन्झर्व्हेशन फंड’च्या संचालिका डॉ. लॉरी मार्कल यांनीही भारतातील चित्ता पुनर्वसनाच्या प्रयत्नांना आपला पाठिंबा दर्शविला होता, असे सांगितले जाते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला परवानगी नाकारली अन् चित्त्याचे पुनरागमन होता होता राहिले. चित्ता आणण्याची ही योजना मनमानी, अवैध आणि वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाचे म्हणणे होते. आफ्रिका आणि आशियातील चित्ते पूर्णत: भिन्न आहेत. आफ्रिकेतून आणलेले चित्ते भारतात कसे जगू शकणार हा त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा होता. न्यायालयाच्या या सर्व चिंता दूर सारण्याच्या दृष्टीने नवी योजना सादर करण्याचा निर्णय तत्कालीन पर्यावरण मंत्रालयाने घेतला होता. त्याचे पुढे काय झाले ते कळले नाही.आता नागपूर जिल्ह्यातील वाइल्ड लाईफ कन्झर्व्हेशन अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे चित्त्यांच्या भारत आगमनासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठविण्याचा विचार सुरू आहे. या संस्थेच्या संचालिका डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी या दिशेने तयारी चालविली आहे. विशेष म्हणजे २०१२मध्ये त्यांनी प्रख्यात वन्यजीव अभ्यासक डॉ. लॉरी मार्कर यांच्या मार्गदर्शनात नामिबियात चित्त्यांचा अभ्यास केलाय. तेथील चित्त्यांच्या सहवासात त्या राहून आल्यात. चित्ता यापूर्वी अनेक वर्षं भारतात वास्तव्याला होता. त्यामुळे तो भविष्यातही येथील हवामानाशी सहज जुळवून घेऊ शकेल, असा विश्वास त्यांना आहे. शिवाय चित्ता हा वाघ किंवा सिंह या प्राण्यांसारखा शीघ्रकोपी नाही. तो शांत स्वभावाचा अन् समूहात मिळून मिसळून राहणारा प्राणी आहे, असा त्यांचा अनुभव आहे.चित्ता माणसावर हल्ला करत नाही. त्यामुळे त्याच्यापासून माणसाला धोका नाही. चित्ता आल्याने जैवविविधता राखण्यास मदत होईल. पर्यटन वाढेल, रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा काही वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहेत. त्यात चुकीचे काहीच नाही. चित्ता भारतात परतला पाहिजे. खरे तर तो नामशेषच व्हायला नको होता. पण मानव आणि वन्यजीवांमधील अधिवासाची लढाई त्याला देशोधडीस घेऊन गेली. आताही जेव्हा चित्ते परत आणण्याचा विचार होतोय तेव्हा मानव-वन्यजीव संघर्षाचे जे मोठे आव्हान उभे ठाकले आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.एकेकाळी संपूर्ण आफ्रिका आणि दक्षिण-पश्चिम आशियात चित्त्याचे घर होते. कालांतराने लोकसंख्या वाढू लागल्याने चित्त्यांना राहण्यास जागा कमी करावी लागली. या क्षेत्रात लोकसंख्या जसजशी वाढत गेली तसतसे चित्ते छोट्याछोट्या गटात विखुरले गेले. त्यांना जीवन जगणे कठीण होत गेले. प्राणी मोठ्या समूहात राहतात तेव्हा प्रजननाची शक्यताही जास्त असते. विखुरले गेले की आपोआपच नष्ट होतात.आज माणूस हा पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. आपला सर्वांगीण विकास साधत असताना निसर्गातील इतरही जीवजंतू, पक्षीप्राण्यांना पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे, याचे भान तो विसरत चाललाय. जास्तीत जास्त जागेवर आपला कब्जा करण्याची त्याची धडपड आहे. असे करीत असताना निसर्गाच्या अन्नसाखळीकडे त्याचे पार दुर्लक्ष होत आहे.सुमारे शतकापूर्वी आफ्रिका तसेच भारतासह आशियाच्या काही भागात एक लाखावर चित्ते होते. आता केवळ ७,१०० चित्ते आहेत. त्यापैकी ४,००० दक्षिण आफ्रिकेच्या सहा देशांमध्येच आहेत. आशियात केवळ इराणमध्ये ५० चित्ते जिवंत आहेत, असे सांगितले जाते. या चित्त्यांचे संवर्धन करणेसुद्धा कठीण झाले आहे. सर्वात मोठे कारण म्हणजे चित्ते संरक्षित क्षेत्रात राहात नाहीत. त्यामुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.दरवर्षी १० टक्के चित्ते संपत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या १५ वर्षात निम्म्यापेक्षा जास्त चित्ते दिसेनासे होतील, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. चित्ता संवर्धनाकडे लक्ष वेधण्यासाठी ४ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय चित्ता दिन मानला जातो. एकेकाळचा पालक या नात्याने चित्त्याला वाचविण्यात भारताचेही योगदान मोलाचे ठरणार आहे. देशात चित्ते आणून त्यांचे योग्यरीत्या पालन-पोषण करता आले तर त्याचे स्वागतच आहे. अपेक्षा एवढीच की आज जसे वाघ, हत्ती आदी प्राण्यांना गोळ्या घालाव्या लागताहेत तशा या चित्त्यांना घालाव्या लागू नयेत..(लेखिका लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपवृत्तसंपादक आहेत.)

savita.harkare@lokmat.com