शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नदी पुन्हा जिवंत होते तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 06:05 IST

१९७२ पूर्वी सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदी बारमाही होती. पण त्यानंतर काही वर्षांतच ती मृतवत झाली. गावकऱ्यांच्या सहकार्याने ती आता पुन्हा वाहू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा पश्चिम विभागासाठीचा ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ या कामाला नुकताच मिळाला आहे.

ठळक मुद्दे‘एक कुटुंब एक तास’ या धर्तीवर प्रत्येक कुटुंबाने लोकसभाग देण्याचे निश्चित झाले. ज्यांना थेट श्रमदान शक्य नसेल, त्यांनी ट्रॅक्टर, जेसीबी व पोकलॅन्डचे एक तासाचे ६०० रुपये भाडे देण्याचे निश्चित करण्यात आले. इतरांनी श्रमदान केले.

- हणमंत पाटील

पुण्यात फेब्रुवारी २०१३ मध्ये जोहड बंधाऱ्याचे प्रणेते राजेंद्रसिंह राणा यांचे दुष्काळावर चर्चासत्र होते. त्यासाठी दुष्काळी भागातील पाणी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून संपतराव पवार यांना निमंत्रण होते. राजस्थानातील जोहड बंधाऱ्याची यशोगाथा ऐकल्यानंतर संपतराव यांनी थेट राजेंद्रसिंहजी यांना प्रश्न केला. किती दिवस जोहडची यशोगाथा सांगणार? आमच्या दुष्काळी भागातील अग्रणी नदी मृत होऊन गायब झाली आहे. त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्हाला मदत करणार का? त्यावर राजेंद्रसिंह यांनीही होकार दिला. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत राजेंद्रसिंह यांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ व कर्नाटकाच्या काही भागांतून ६२ किलोमीटर जाऊन कृष्णा नदीला मिळणाऱ्या अग्रणी नदीची पाहणी केली.

खानापूर तालुक्यातील डोंगररांगातून ९१२ मीटर उंचीवर तामखडी भागात अग्रणीचा उगम होतो. १९७२ पूर्वी ही नदी बारमाही होती. त्यानंतर नदीत अतिक्रमण, साचलेल्या गाळाने पात्र दुभंगले. त्यामुळे गेल्या ३० ते ३५ वर्षांत हळूहळू उगमपासून खानापूर तालुक्यातील २२ किलोमीटरचे पात्र गायब होत गेले. पात्रात गाळ साचून झाडेझुडपे उगवली. त्यामुळे पावसाळ्यात पाणी कोणत्याही दिशेने वाहून दोन दिवसांत पात्र कोरडे पडत होते. या सर्व परिस्थितीची माहिती घेऊन स्थानिक गावकऱ्यांनी लोकसहभाग दिल्यास, आम्ही तांत्रिक सहाय देऊ, अशी राजेंद्रसिंह यांनी कबुली दिली. त्यावर संपतराव पवार यांनी लोकसहभाग मिळवून देण्याचे आव्हान स्वीकारले.

खानापूर तालुक्यातील अग्रणी नदीकाठाच्या , तासगावमधील ६ व कवठेमहांकाळ येथील ११ गावांतील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. मात्र, नदी पुन्हा जिवंत होऊन वाहू शकते, यावर गावकऱ्यांचा विश्वास बसेना. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजविण्याऐवजी लोकशक्तीवर संपतराव पवार यांचा विश्वास होता. अवघ्या दोन महिन्यांत जलबिरादरीचे गोपलसिंह, पुण्यातील कार्यकर्ते सुनील जोशी, विनोद बोधनकर, सांगलीच्या वालचंद कॉलेजमधील सुनील कुलकर्णी, नितीन कांबळे आणि निवृत्त अभियंता विलास चौथाई यांनी खानापूर तालुक्यातील अगस्ती ऋषींच्या मठाजवळील उगमापासून ते २२ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील नदी पुनरुज्जीवन करण्यासाठी खोलीकरण, रुंदीकरण व बंधारे बांधण्याचा आराखडा तयार केला. दरम्यानच्या काळात संपतराव यांनी नदीकाठच्या गावागावांत जाऊन शेतकऱ्यांचा लोकसहभाग मिळविण्यासाठी बैठका घेतल्या.

एक कुटुंब एक तास...

नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्याचा मुद्दा जलबिरादरीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. मात्र, परवानगीच्या लालफितीच्या कारभारासाठी थांबण्याची गरज नाही, आपण समाजोपयोगी काम करीत आहोत. त्यामुळे राजेंद्र सिंह व तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह यांना भूमिपूजनासाठी निमंत्रित करण्याचा तोडगा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्याने परवानगीचा प्रश्नही सुटला. पहिल्या टप्प्यात उगमापासून खोलीकरण सुरू केल्यानंतर पहिला बंधारा बलवडी येथील गायकवाड मळ्याजवळ निश्चित करण्यात आला. ‘एक कुटुंब एक तास या धर्तीवर प्रत्येक कुटुंबाने लोकसभाग देण्याचे निश्चित झाले. ज्यांना थेट श्रमदान शक्य नसेल, त्यांनी ट्रॅक्टर, जेसीबी  पोकलॅन्डचे एक तासाचे ६०० रुपये भाडे देण्याचे निश्चित करण्यात आले. ही रक्कम देणे शक्य नसलेल्या कुटुंबांनी श्रमदानात सहभाग दिला. गावातील माजी सैनिक शिवाजी काळे यांनी निधीचा पहिला धनादेश दिला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील डॉ. एन. जे. पवार यांच्यामुळे चार कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर घेऊन विद्यार्थ्यांनीही बंधारे उभारण्याच्या कामासाठी श्रमदान केले. याशिवाय परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी कोल्हापूरच्या आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार लोकसहभागासाठी निधी म्हणून दिला. पुण्यातील आयटी कंपनीचे पंकज हेर्लेकर, नरेंद्र लिंबाणी, चंदन पाटील, इंद्रजित देशमुख, अजित पाटील, विनोद गोसावी, डॉ. रवींद्र व्होरा, नरेंद्र चुघ, महेंद्र घागरे अशा अनेक सेवाभावी संस्था व कार्यकर्त्यांनी अग्रणी पुनरुज्जीवनाच्या कामांसाठी थेट निधी, सिमेंट, वाळू, स्टील अशा पद्धतीने मदतीचा हात दिला.

संपतराव पवार यांच्यासह पुण्यातील कोणत्याही कार्यकर्त्यांचा आपल्या गावाशी काडीचाही संबंध नसताना हे सर्व लोक आपल्यासाठी झटतात, मग आपण का मागे राहायचे, याची जाणीव गावकऱ्यांना प्रकर्षाने झाली. त्यामुळे बलवडी, बेनापूर, गोरेवाडी, सावळज अशा प्रत्येक गावाने लोकसहभागासाठी पुढाकार घेतला.

गावकऱ्यांच्या उत्साहामुळे अवघ्या काही दिवसांत लोकसहभागातून पहिल्या टप्प्यातील सहा सिमेंटचे बंधारा उभे राहिले. बलवडी गावात बंधारा उभा राहू लागल्याने बाजूच्या बेणापूरचे गावकरी येऊन पाहू लागले. एक एक बंधारा उभा राहू लागल्यानंतर बाजूच्या गावकºयांचा हुरूप वाढला. त्यांच्यात लोकसहभागातून बंधारे उभारण्याची स्पर्धा आणि ईर्ष्या निर्माण झाली. साधारण दोन कोटी २२ लाखांचे एस्टिमेट असताना लोकसहभाग व श्रमदानामुळे ही कामे अवघ्या ५० लाखांत झाली.

खानापूर भागात अग्रणी नदीचे पुनरुज्जीवनाचे काम जोमाने सुरू झाल्याची चर्चा जिल्हाभर पसरली. मग, पुढचे काम आणखी सोपे झाले. खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळसह इतर तालुक्यांतील गावकऱ्यांसह स्थानिक आमदार मंडळींनी बांधकाम, पाटबंधारे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह लोकसहभागातून उभारलेल्या खानापूरमधील बंधाऱ्यांची पाहणी केली. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पुढाकार घेऊन जलयुक्त शिवार योजनेतून पुढील कामांची आखणी केली. तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामांची पाहणी करून कौतुक केले. पुढे गावकऱ्यांच्या लोकसहभागाला लोकप्रतिनिधी व प्रशासनाची रसद मिळाली. त्यामुळे खानापूर तालुक्यातील २२ किलोमीटरच्या अग्रणीच्या पात्रात ३८ बंधारे उभारण्यात आले. पुढे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यात नदीच्या खोलीकरणाचे व बंधारे उभारण्याचे काम जोमाने सुरू झाले. यावर्षी झालेल्या परतीच्या दमदार पावसाने उगमापासूनच्या पहिल्या टप्प्यातील सर्व बंधारे भरले असून, १९८५ नंतर तब्बल ३५ वर्षांनंतर अग्रणी दुथडी वाहिल्याची आठवण बलवडीचे गावकरी विलास  पोपट गायकवाड यांनी सांगितले.

अग्रणीमुळे बदलला पीक पॅटर्न...

गेल्या काही वर्षांत अग्रणी लुप्त झाल्याने पावसाचे पाणी पात्रात थांबत नव्हते. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात खानापूर तालुक्यातील गावांना पाणी अन् चाºयासाठी वणवण करावी लागत होती. खोल विहिरी व बोअर मारूनही भूजलात पाण्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे केवळ पावसावर येणारी ज्वारी-बाजरीची पिकं घ्यावी लागत होती. आता तब्बल ३५ वर्षांनंतर बंधारे पाण्याने काठोकाठ भरले. त्यामुळे पाणी झिरपून भूजलात वाढ झाल्याने विहिरीत पाणी आले. बोअरवेलला एका हपस्यात पाणी मिळू लागले. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पीक पॅटर्न बदलला आहे. आता युरोपला निर्यात होणारी द्राक्षे पिकविणाºया बागा आणि टोमॅटो-भाजीपाला घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. आता नदीच्या पात्रातून कोणीही मोटार लावून पाण्याचा जादा उपसा न करण्याची शपत गावकºयांनी घेतली आहे. आता समान पाणी वाटपासाठी संपतराव पवार यांनी प्रत्येक गावात एक समिती स्थापन करण्याचा आग्रह गावकºयांकडे धरला आहे.

ईर्ष्या... पण बंधारे उभारण्याची

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याचा दुष्काळ हा शेतकºयांच्या पाचवीला पुजला आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर खानापूर भागातील अनेक गावांतून उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले. देशभरातून गलाई व्यवसायाच्या माध्यमातून पैसा गावात येऊ लागला तरी दरवर्षी पाणी आणि चाºयाची टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र, गावचा पाण्याचा मूळ प्रश्न सोडविण्याऐवजी गावकºयांमध्ये राजकारणाच्या माध्यमातून सत्तासंघर्ष सुरू झाला. ईर्षेने गावात लाखो रुपये खर्चून कमानी, मंदिर, शाळा अन् संस्था उभारल्या गेल्या. मात्र, पाण्याविना तडफडणाºया काळ््या आईची तहान भागविण्याकडे भूमिपुत्रांचे दुर्लक्ष होतेय. ही जाणीव व तळमळ याच तालुक्यातील पाणी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व ‘क्रांती स्मृतिवनाचे प्रणेते संपतराव पवार यांना होती. खानापूर तालुक्यात दुष्काळ असलातरी गावात गलाई बांधवांमुळे अर्थिक सुबत्ता होती. ही अर्थिक ताकद सत्ता संघर्षाऐवजी विधायक कामांसाठी लावण्याचे आव्हान संपतराव यांनी स्वीकारले आणि करून दाखविले. बलवडी-बेणापूर गावांतील दोन राजकीय गटांत अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष व ईर्ष्या होती. पहिल्यादा संपतराव यांनी एका गटाचे मन वळवून त्यांना बंधारे उभारण्याच्या कामात सहभागी करू घेतले. या गटाने तीन बंधारे उभारल्यानंतर दुसरा गट आला. त्यांनी त्यांच्या ईर्ष्येवर त्यापेक्षा जास्त बंधारे उभारणीला सुरवात केली. दोन्ही गटांतील ईर्ष्या बंधारे उभारणीच्या कामामध्ये लावण्याचे श्रेय अनिल शिंदे व राजाराम शिंदे हे मोठ्या मनाने संपतराव यांना देतात.

नदी बारमाही वाहती ठेवण्याचे आव्हान

‘‘आर्थिक प्रगती कधीच केवळ सरकारी मदतीवर होत नसते. एखाद्या गोष्टीचे महत्त्व लोकांना समजून सांगितले अन् ते त्यांना पटले. की लोक आपल्या पायाने व खर्चाने त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात. अग्रणी नदीचे लोकसहभागातून झालेले पुनरुज्जीवन हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. परंतु, केवळ नदीचे पुनरुज्जीवन करून थांबून चालणार नाही, ती बारमाही वाहती ठेवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. आता नदीपात्रातील पाणी उपसा करण्यावरून वाद होण्याऐवजी त्याचे सामान वाटप झाले पाहिजे.’’

संपतराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

(लेखक लोकमतपिंपरी-चिंचवड आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

patil.hanmant@gmail.com