बिबट्या शहरात येतो तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 06:00 AM2019-02-10T06:00:00+5:302019-02-10T06:00:06+5:30

माणसं आणि बिबट्या. पूर्वी दोघांचाही स्वतंत्र अधिवास होता, एकमेकांच्या जागेत फारशी लुडबूड नव्हती. आता ते फारसं शक्य नाही. परिस्थितीशी जुळवून घ्यायला बिबट्यांनी कधीचीच सुरुवात केलीय. ज्या वेगानं जंगलांचा ऱ्हास होतोय ते बघता माणसांनाही या सहजीवनाशी जुळवून घ्यावं लागणार आहे.

When the Leopard comes in the city .. | बिबट्या शहरात येतो तेव्हा..

बिबट्या शहरात येतो तेव्हा..

googlenewsNext
ठळक मुद्देबिबट्या हा परिस्थितीशी जुळवून घेणारा, अत्यंत हुशार आणि लवचीक प्राणी आहे. त्यामुळे आपण त्याच्या जंगलावर अतिक्रमण केलं तरी तो त्या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत राहातो.

- मृणाल घोसाळकर

बिबट्याचा नागरी वस्तीत किंवा शहरात प्रवेश.. अमुक परिसरात बिबट्याचा धुमाकूळ.. काही जण जखमी, नागरिक भयभीत..
हल्ली वर्तमानपत्रं, टीव्ही किंवा सोशल मीडियावर दर काही दिवसांनी अशा प्रकारची बातमी झळकते. दरवेळी बिबट्या एखाद्या शहरात दिसून आला की आपल्याला वाटायला लागतं, हल्ली बिबट्या शहरात येण्याचं प्रमाण फार वाढलंय. त्यात तो बिबट्या जर आपल्या जवळच्या परिसरात दिसला असेल तर आपली साहजिकच अपेक्षा असते की वनखात्याने पिंजरा लावावा, बिबट्याला पकडावं आणि लांब कुठेतरी सोडून यावं. खरं म्हणजे आपलं मुळात असं म्हणणं असतं की वन्यप्राण्यांनी वनात राहावं. त्यांनी शहरात येऊच नये.
मुळात बिबट्या शहरात का येतो, या प्रश्नाचा आपण फार खोलात जाऊन विचारच करत नाही. माणसाला वाटतं, आपण कधीच चुकत नाही. त्यामुळे आपण असा निष्कर्ष काढतो की हल्ली बिबटे मनुष्यवस्तीत शिरायला लागलेत. पण ते तरी खरं आहे का? की बिबटे होते तसेच आहेत आणि आपण माणसं बदललोय? या सगळ्या प्रश्नांचा प्रामाणिकपणे विचार केला तर पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आत्ता आत्तापर्यंत जिथे जंगल होतं, तिथे आता नागरी वस्ती झालेली आहे. हे जर आपण मान्य केलं तर मग तिथे दिसणारा बिबट्या ‘आता शहरात’ आलाय असं म्हणण्याला काय अर्थ उरतो? कारण तो त्याच्या जागेवर राहातोय आणि आपण त्याच्या जागेत अतिक्र मण केलंय. इथे खरं तर बिबट्याने तक्र ार करायला पाहिजे, की माझ्या जागेत माणूस का आलाय?
बिबट्या हा परिस्थितीशी जुळवून घेणारा, अत्यंत हुशार आणि लवचीक प्राणी आहे. त्यामुळे आपण त्याच्या जंगलावर अतिक्रमण केलं तरी तो त्या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत राहातो. मग ते अतिक्र मण इमारतींचं असेल, नाहीतर शेतीचं. माणसांच्या सवयींप्रमाणे तो त्याच्या सवयी बदलतो.
त्याच्या परिसरात राहाणाऱ्या माणसांच्या सवयी त्याला माहीत असतात. आपण शक्यतो माणसाच्या नजरेस पडू नये याची बिबट्या त्याच्या बाजूने होता होईल तेवढी काळजी घेत असतो. कारण इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच बिबट्यासुद्धा माणसाला घाबरतो. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी बिबट्याचा वावर वर्षानुवर्षं असला तरी तो पटकन नजरेस पडत नाही.
मुळात बिबट्याची बाहेर पडण्याची वेळ सकाळ आणि संध्याकाळची असते. तो निशाचर प्राणी आहे. त्यातसुद्धा पुरेशी शिकार मिळाली तर माणसाच्या रस्त्यात तो कधी येत नाही; पण जसजसं जंगल आक्र सतंय तसतसं बिबट्याला शिकारीच्या शोधात मानवी वस्तीजवळ येण्यावाचून पर्याय उरलेला नाही.
मानवी वस्तीजवळ आलेला बिबट्यासुद्धा शिकार करतो ती बकºयांची, कुत्र्यांची किंवा कोंबड्यांची. बिबट्या सहसा माणसावर हल्ला करत नाही, कारण माणूस त्याच्यापेक्षा उंच असतो. त्यामुळे बिबट्याला तो स्वत:पेक्षा मोठा प्राणी वाटतो आणि तो हल्ला करत नाही. पण असं जरी असलं तरी लहान मुलांना मात्र बिबट्यापासून भय असू शकतं, कारण ती बिबट्यापेक्षा आकाराने लहान असतात. त्यामुळे बिबट्याला त्यांची शिकार करावीशी वाटू शकते. दुसरं म्हणजे आडबाजूला नैसर्गिक विधीसाठी खाली बसलेली माणसं बिबट्याला आकाराने लहान प्राणी वाटतात आणि तो त्यांच्यावरही हल्ला करण्याची शक्यता असते. पण याबाबत बिबट्याच्या वागणुकीचा सर्वसामान्य ढाचा माहिती असला तरी बिबट्याशी समोरासमोर गाठ पडू नये यासाठीच माणसाने प्रयत्न करणं आणि त्या दृष्टीने काळजी घेणं श्रेयस्कर ठरतं. कारण बिबट्या समोर आल्यावर काय करेल हे १०० टक्के खात्रीपूर्वक कोणीच सांगू शकत नाही. बिबट्या जेव्हा शहरात येतो तेव्हा तो खरा काळजीचा आणि बातमीचा विषय ठरतो. कारण त्याने शहरात येणं, ऐन माणसांचा वावर असेल अशा ठिकाणी येणं हे त्याच्या स्वभावाला धरून नाही. अशावेळी वनविभागाला ती परिस्थिती हाताळण्याचं प्रशिक्षण असतं. त्यांना त्यांचं काम करू द्यावं. ‘पिंजरा लावा आणि तो बिबट्या इथून घेऊन जा.’ असं म्हणण्याला विशेष अर्थ नसतो. उलट असा ‘पकडून दुसरीकडे नेऊन सोडलेला बिबट्या’ त्या नवीन जागी जास्त त्रासदायक ठरू शकतो. कारण त्यालाही ती जागा नवीन असते. नवीन जागेत शिकार कुठे मिळेल, पाणी कुठे आहे, तिथल्या माणसांचं रूटीन काय, हे त्याला माहिती नसतं. ते माहीत नसल्यानं तो त्या नवीन जागी जास्त अनपेक्षित वर्तणूक दाखवू शकतो.
बिबट्याला वनविभागाने पकडून नेले, तरी त्यामुळे त्या भागातलं बिबट्यांचं अस्तित्व संपत नाही. जवळपास राहाणारा नवीन बिबट्या तिथे येऊ शकतो. तो कदाचित जास्त त्रासदायक ठरू शकतो.
बिबट्या या प्राण्याच्या बाबतीत माणसाने काय करायचं आणि काय नाही करायचं, हे आपण जितक्या लवकर शिकून घेऊ तितक्या लवकर माणूस-बिबट्या सहजीवन सुरळीत होईल. ज्या वेगाने जंगलांचा ºहास होतोय ते बघता ते सहजीवन असण्याला पर्याय नाही. एकमेकांना पूर्ण टाळून जगण्याचे दिवस संपले. आता एकमेकांशी जुळवून घेऊनच जगायला लागणार आहे. बिबट्याने त्याच्या बाजूने शक्य तेवढं माणसांशी जुळवून घेतलेलंच आहे. आता प्रश्न एवढाच आहे की माणूस ते कधी शिकणार?

काय काळजी घ्याल?
* बिबट्या ज्या परिसरात आहे, त्या परिसरात पहाटे आणि संध्याकाळी शक्यतो एकेकटे फिरू नका. मोठमोठ्याने बोलत, आवाज करत जा. विजेरी वापरा. माणसाची चाहूल लागल्यावर बिबट्या शक्यतो समोर येत नाही.
* ग्रामीण भागात घरात शौचालय असणं गरजेचं आहे. नैसर्गिक विधीसाठी खाली बसलेल्या माणसावर बिबट्याने हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.
* ऊस, मका अशी पिकं अगदी घरालगत घेऊ नका. या पिकांमध्ये बिबट्याला लपून बसता येतं. ही पिकं थोडी लांब लावा.
* आपला परिसर स्वच्छ ठेवा. जिथे उरलेलं अन्न आणि इतर कचरा टाकला जातो, तिथे कुत्री आणि डुकरं येतात. हे सावज टिपायला बिबट्या तिथे येऊ शकतो.
* चुकून बिबट्या समोर आलाच, तर त्याच्यावर उलटून हल्ला करण्याचा किंवा त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये.कुठलीही प्रतिक्रि या न देता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करावा.
* वनविभागाच्या कारवाईदरम्यान गर्दी करून अडथळा आणू नका.
 

बिबट्यांचं जग
* बिबट्या भारतात सर्वत्र आढळतो.
* बिबट्या सर्व प्रकारच्या भूप्रदेशात राहू शकतो. उदा. दाट जंगल, विरळ जंगल, गवताळ प्रदेश इत्यादि.
* बिबट्याला राहायला लागणारा परिसर भक्ष्य मिळण्यावर कमी-जास्त होऊ शकतो. ज्या भागात जास्त भक्ष्य आहे तिथे कमी जागेत जास्त बिबटे राहू शकतात; पण एक बिबट्या सुमारे पंधरा चौरस किमी जागा व्यापतो.
* बिबट्या हा एकट्यानं राहणारा प्राणी आहे. नर-मादीदेखील फक्त मिलनापुरते एकत्र येतात. पिल्ले दोन ते अडीच वर्षे आईबरोबर राहातात. नंतर ती त्यांची स्वतंत्र जागा शोधतात.
* प्रत्येक बिबट्याच्या अंगावरचे ठिपके वेगवेगळे असतात.
* बिबट्याच्या अंगावरच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या ठिपक्यांचा पॅटर्न वेगवेगळा असतो.

(लेखिका ‘जाणता वाघोबा’ या उपक्रमाच्या प्रकल्प अधिकारी आहेत.)

Web Title: When the Leopard comes in the city ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.