शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पोटापाण्याचं बगाय नगं व्हय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 06:05 IST

रस्त्यावरून मोटारसायकली-सायकली-चालत जाणारे दिसतात. गावात येणारे आणि बाहेर जाणारे सगळे रस्ते बंद, पण ‘लॉकडाऊन’चा घट्ट विळखा आताशा सैलावलाय. दोन आठवडे झालेत ना!   हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांच्या तोंडाला मास्क.  नाही म्हणायला बायकांच्या तोंडाला  अंगावरच्या पातळाचा पदर गुंडाळलेला, तर कुणी धडपा बांधलेला. 

ठळक मुद्देहॅण्डग्लोव्हज्-सॅनिटायझरपासून कोसो मैल लांब असलेल्या खेड्यापाड्यातल्या ‘लॉकडाऊन’ची चित्रं..

र्शीनिवास नागे

सांगली-इस्लामपूर रस्त्यावरचं कसबे डिग्रज. कृष्णाकाठावरचं सोळा हजार लोकवस्तीचं सधन गाव. सकाळचे आठ-साडेआठ झालेले. गावातल्या मेनरोडवर वर्दळ. कोण शेताकडं चाललंय, तर कोण डेअरीकडं दूध घालायला. किराणा मालाची दुकानं, डेअर्‍या, बेकर्‍या उघडलेल्या. तिथं गिर्‍हाईकांची लगबग. बाकी सगळं बंद. चौकातल्या चार-पाच कोपर्‍यात काही टोळकी गप्पा मारत थांबलेली. कुणी मोटारसायकलीवर बसलेलं, तर कुणी दुसर्‍याच्या खांद्यावर खात टाकून! रस्त्यावरून मोटारसायकली-सायकली-चालत जाणारे दिसतात. मधूनच साताठ बायकांचा घोळका डोक्यावर पाट्या-भाकरी बांधलेली फडकी, हातात खुरपी घेऊन बिगीबिगी जातो.कोरोनामुळं सुरू असलेल्या तीन आठवड्यांच्या ‘लॉकडाऊन’मधलं हे चित्र. संचारबंदी फाट्यावर मारून सुरू असलेला गावगाडा. ‘लॉकडाऊन’चा घट्ट विळखा आताशा सैलावलाय. दोन आठवडे झालेत ना! कोरोनाच्या संसर्गाची भीती नाही का, या प्रश्नावर, ‘व्हय, मग किती दिवस काढायचं असंच? पोटापाण्याचं बघाय नगं.?’ असं पांडुरंग म्हारूगडे आपल्यालाच विचारतात. एम-80ला दुधाचे कॅन लावून ते निघालेले. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांच्या तोंडाला मास्क. नाही म्हणायला बायकांच्या तोंडाला अंगावरच्या पातळाचा पदर गुंडाळलेला, तर कुणी धडपा बांधलेला. खेड्या-पाड्यातलं हे जग हॅन्डग्लोव्हज्-सॅनिटायझरपासून कोसो मैल लांब असलेलं.‘लॉकडाऊन’चा पहिला आठवडा जरा कडक गेला. सगळ्या गावगाड्याला खीळ बसलेली. घरातून बाहेर जायचं म्हणजे मुश्कील. टीव्हीवरच्या बातम्यांमुळं सगळी घरातच बसून. कोरोना पार सांगलीतल्या इस्लामपुरात घुसल्याच्या बातम्या सुरू झाल्या अन् सगळेच गपगार झाले. संचारबंदी सुरू झालेली. रस्त्यावर पोलिसांकडून धुलाई सुरू असलेली. गावात येणारे आणि बाहेर जाणारे सगळे रस्ते बंद. कसबे डिग्रजमध्ये येणारे नऊच्या नऊ रस्ते लाकडं, दगड, काट्याची झुडपं लावून अडवलेले. तिथंच मंडळांची पोरं खुच्र्या टाकून बसलेली. कडेकोट पहारा. दोन-तीन दिवसांनी तलाठी-सर्कलनं मिनतवारी करून रस्ते मोकळे केले. पण गाव मात्र चिडीचूप. रात्री तर भयाण वाटायचं.संचारबंदीसारखी जीवघेणी शांतता कृष्णा-वारणाकाठानं ऑगस्टमधल्या महापुरावेळी अनुभवलेली. पार कर्‍हाडपासून शिरोळपर्यंत अन् वारणावतीपासून हरिपूरपर्यंत. तेव्हा तर घराघरात पाणी घुसलेलं. जीव वाचवण्यासाठी लोक बाहेर पडलेले. शाळा-देवळं-समाजमंदिरात घोळक्यानं थांबलेले. वीज-पाणी बंद..- आता चित्र उलटं. कोरोना घरात घुसू नये म्हणून लोक घरातच थांबलेले. घोळका टाळून एकटंएकटं बसण्यासाठी चाललेली धडपड. वीज आहे, पाणी आहे, पण घरातून बाहेर पडणं बंद. आठवडाभरानं मात्र या भागातली भीती कमी झाली. पोटा-पाण्यासाठी धडपड सुरू झाली. पण सगळंच बंद असल्यानं हातावरचं पोट असणार्‍यांचं हाल होऊ लागले. घरात असलेला शिधा संपला. शेजार्‍यापाजार्‍यांनी काहीबाही दिलं. मग दानशूर मंडळी, चमको कार्यकर्ते, सामाजिक संस्था-संघटना पुढं आल्या. गव्हा-तांदळापासून तेलापर्यंत अन् मीठ-मिरचीपासून चहा-साबणापर्यंतच्या वस्तूंचं कीट काहींच्या घरात येऊ लागलं. अर्थात फोटोसेशन झाल्यावर बरेबसे गायब, कीट मात्र टग्यांच्या घरात, हा अनुभव सगळीकडं सारखाच.***‘दुकानात महिन्याचा माल भरलावता. आता जवळजवळ संपलाय. सांगलीतनं मागवलावता, पन गाड्या बंद हुत्या. टेम्पोवाला जात न्हवता. काल-परवा कसाबसा थोडा माल आलाय. लोकांनी घरात पंधरा-तीन आठवड्याचं सामान भरलंय. अजूनबी येत्यात, पण शॉर्टेज हाय. दर वाढल्यात..’ तासगाव तालुक्यातल्या मणेराजुरीचा दुकानदार चन्नाप्पा सांगतो. यानं एकही दिवस दुकान बंद नाही केलेलं. गावपातळीवर दुकानं चालू-बंदचा निर्णय तिथल्या गावकमिट्यांनी घेतलाय. काहींनी जीवनावश्यक वस्तूंसाठी किराणा दुकानं, दूध केंद्रं, औषध दुकानं एकही दिवस बंद ठेवली नाहीत, तर काहींनी अधूनमधून दोन-तीन दिवस कडकडीत ‘लॉकडाऊन’ केलं. औषध दुकानं सोडून सगळं बंद! मोठय़ा डेअर्‍यांनी दूधसंकलन सुरू ठेवलंय. दूध आणि दुग्धपदार्थांना मागणीच नाही. त्यामुळं दूध घेऊन करायचं काय? साठवायचं कशाला? पावडरलाही उठाव नाही. त्यासाठी दर दोन-तीन दिवसांनी एक दिवस दूधच घ्यायचं नाही ठरवलंय. ‘आता दूधदुभत्याला कमी न्हाई. घरातली पोरं-म्हातारी माणसं तर खात्यात. तीन-चार आठवड्याचा सवाल हाय. तोपर्यंत काढायची कड..’ दारात दोन-तीन म्हशी असलेल्या समडोळीच्या रुक्मिणीबाई चौगुले सांगतात. जत्रा-यात्रा-ऊरूस रद्द झाल्यानं गावातलं सांस्कृतिक चलनवलनच थांबलंय. कुपवाडच्या मारुती कांबळेंनी अनेक तमाशा फडांत काम केलंय. ‘जत्रांच्या सिझनमधे वर्ष-सहा म्हैन्याची बिदागी मिळायची. दिवसरात्र खेळ करायचो. यंदा मातूर खायाची मारामार दिसतीया..’ असं सांगताना डोळ्यात पाणी आलेलं.***‘सकाळी रानात जायचं. वैरण काढायची. जनावरांना घालायची. भांगलण करायची. बायकूसोबत दोघं पोरंबी येत्यात. आता भांगलणीला गडी-बायका मिळंनात. दुपारी जेवायचं. झोपायचं. दुपारनंतर परत तेच..’ ऊसाच्या पट्टय़ातले अण्णाप्पा पाटील सांगत होते.. ‘पलीकडच्या रानात मळणी सुरू झालीया. आता मंत्र्यांनी सांगितल्यावर डिझेल मिळायला लागलंय. दोन तुकड्यात ऊस शिल्लक हाय. पंधरवडाभर तोडायला मजूर मिळत न्हवते. आता पोटाला चिमटं बसाय लागल्यावर काहीजण तोडायला आल्यात. पण कारखान्याकडून उसाची बिलं थांबल्यात.’बागायतदारांची हालत तर आणखी वाईट. मिरज पूर्व आणि पश्चिम भागातला भाजीपाला मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, बेंगलोर, बेळगावच्या बाजारात जातो. मळीकाठची वांगी, ढबू मिरची, टोमॅटो, मिरची, कारली, दोडका, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर ही इथली नगदी पण नाशवंत पिकं. मालवाहतूक ठप्प झालीय. गावोगावचे बाजार बंद झालेत. विक्रेत्यांनी खरेदी थांबवलीय. हॉटेल्सला टाळं लागलंय. खाद्यपदार्थांचे हातगाडे थांबलेत. कार्यक्रम रद्द झालेत. परिणामी काढणीला आलेला हा भाजीपाला विकत घ्यायला कुणी येत नाहीय. रानात पडून सडून चाललाय. तुंगच्या सचिन डांगे यांनी दोन टेम्पो भरून ढबू मिरची काढली. बॉक्समध्ये भरून पुण्याला नेली. दर आला किलोला पाच रूपये! काढणी, पॅकिंग, तोडणी, वाहतूक खर्च परवडत नाही म्हणून दोन एकरातली ढबू मिरची उसात खत म्हणून टाकली!या भागात रस्त्याकडेला टोमॅटोचा खच लागलाय. प्रमोद पाटील यांनी दीड एकर डवरलेल्या झेंडूच्या बागेत मेंढरं घुसवली अन् नंतर रोटर फिरवला. फूल मार्केट बंद असल्याचा फटका. सचिन डांगे म्हणतात, ‘दोन महिन्यांनी भाजीपाला मिळायचा नाही. कारण लागवड थांबलीय. आमच्या भागातून रोज भाजीपाल्याची वीस लाख रोपं जायची. पण मार्केट कधी सुरू होणार, भरवसा नाही म्हणून लागवड करायचं धाडस कुणाकडं नाही.’तिथल्या बाबासाहेब बिरनाळेंची सहा एकर द्राक्षबाग. शरद सीडलेस म्हणजे काळी द्राक्षं. तीन एकरमधला माल गेलाय. आता व्यापारी गायब. ‘लॉकडाऊन’आधी चार किलोच्या पेटीला अडीचशेवर दर होता. तो ऐंशी-नव्वदवर आलाय. आता हिमतीनं विजयवाड्याला द्राक्षाचा ट्रक पाठवलाय. दर किती मिळणार, पैसे कधी येणार, माहीत नाही. तासगाव-कवठेमहांकाळची निर्यातक्षम द्राक्षं पाठवायला वाहनं नाहीत. उठाव नाही. तोड नाही. काही गावांत ही टपोरी-रसरशीत द्राक्षं आता बेदाण्याच्या रॅकवर पडलीत, कवडीमोल होऊन! दुधगावच्या तरुण शेतकर्‍यांनी कलिंगडं पाच-दहा रुपयांना वाटायला सुरुवात केलीय. आष्ट्याजवळच्या चांदोली धरणग्रस्त वसाहतीतल्या नथुराम मोरेंनी तीन एकरातली केळी तोडायला सुरुवात केलीय. जड झालेले घड तुटून पडताहेत. त्यांचा रोजचा दिनक्रम ठरलेला : केळी घरातच पिकवायची. कुणी घेतली विकत तर दहा रुपयाला फणी द्यायची. नाही तर ‘घ्या तशीच’ म्हणून सोपवायची अन् कॅलेंडरकडं बघत बसायचं.. ‘लॉकडाऊन’ कधी उठेल, नुकसान किती होईल याची मोजदाद करत!

.. घरातली कावत्यात, म्हणून गावात आता चायनीज पदार्थांच्या हातगाड्यांपासून मोबाईल दुरुस्तीच्या दुकानापर्यंत सगळं-सगळं आलंय. पण ‘लॉकडाऊन’मध्ये मोबाईल दुरुस्तीच्या दुकानांचं शटर बंद. त्याच्या पायरीवर बसून तरणी पोरं मोबाईलवर डोळं मिचकवत असलेली. ‘काय करायचं घरात बसून, शेतात गडी लावून आलोय. हितं कट्टय़ावर बसून तेवढाच टाईमपास..’ आष्ट्याजवळच्या कारंदवाडीचा संदीप जाधव सांगतो. साडेदहा-अकराला पोलिस गाडी स्पिकरवर पुकारत येते. पोरं भराùùरा पळत सुटतात. कवठेपिरानला रस्त्यावर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करणारा आशुतोष पाटील भेटतो. हातात पुस्तकं. तो सांगतो, ‘कॉलेज बंद आहे. परीक्षा पुढं गेल्यात. नुसता मोबाईल बघून वैताग आलाय. घरातली कावत्यात म्हणून दोस्ताकडं जाऊन बसतोय..’ 

‘गड्या आपला गाव न्हवं बरा’गावागावात पुण्या-मुंबईवरून आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवलं जातंय. काहीजण स्वत:च होम क्वारण्टाइन झालेत, तर काही जणांनी डॉक्टरांकडून तपासून घेऊन घरात बसणं पसंद केलंय. प्राथमिक आरोग्य केंद्रं, आशा वर्कर्स, तलाठी-कोतवाल-ग्रामविकास अधिकार्‍यांची नजर चुकवून कोणी आलेलं आहे का, याची तपासणी सुरू झालीय. ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत घराकडं परतलेल्या बाहेरगावच्या नोकरदार-कामगारांना काही गावांनी खड्यासारखं बाजूला काढलंय, तर काहीजण पंधरवड्यानंतर स्वत:च गावात मिसळायला लागलेत. पुण्या-मुंबईकरांना पहिल्या आठवड्यात मात्र नको-नकोसं झालेलं. गाववाले येऊ देत नव्हते. त्यांच्यासाठी गावं बंद झालेली. आपलीच माणसं परक्यासारखं वागू लागलेली. सातार्‍यातल्या कर्‍हाडजवळच्या गावांत तर मुंबईकरांची दहशत तयार झालीय. कारण मुंबईतून आलेल्या दोघांना कोरोनानं गाठल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळं शेजारच्या शिराळा तालुक्यातही मुंबईकरांकडं शंकासूराच्या नजरेनं बघितलं जातंय. नवी मुंबईच्या एपीएमसीत, गोदीत, खानावळीतच नाही तर बेस्टपासून मोठय़ा कंपन्यांपर्यंतच्या आस्थापनांत इथला घरटी एक तर दिसतोच. वर्षातले गणपती-दिवाळीसारखे सण-वार, जत्रा-यात्रा-ऊरूसाला हमखास येणारी ही मंडळी आता अध्येमध्येच बर्‍याच दिवसांच्या मुक्कामाला आलीत.-------------------- (लेखक  ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत)

shrinivas.nage@lokmat.com

छायाचित्रे : नंदकिशोर वाघमारे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या