शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

डिस्कव्हरी काय?

By admin | Updated: November 29, 2014 14:04 IST

बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरच्या तरुणाईची चित्रपटाकडे पाहण्याची बदललेली दृष्टी टिपता आली. प्रश्न निर्माण झाले म्हणून ही पिढी गळा काढत नाही, तर ती त्यांच्या पद्धतीने त्या प्रश्नांना भिडते, हात घालते. भावनांच्या जंजाळात ती गुंतून पडत नाही, तर वास्तव काय आहे, प्रश्न चांगल्या पद्धतीने कसा मांडता येईल, याचा विचार ही पिढी करते.

- अशोक राणे

 
देशविदेशातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना सातत्याने आणि आवर्जून हजेरी लावणारे आम्ही वारकरी डिस्कव्हरी काय? हा प्रश्न हमखास विचारतो. नव्हे, त्या-त्या महोत्सवाची फलश्रुती काय, या चर्चेचा मुख्य रोख याच प्रश्नाभोवती असतो. कधी एखादा नवा तरुण दिग्दर्शक, तर कधी नवा ट्रेंड किंवा पारंपरिक ट्रेंडचा बदलता तोंडवळा! जगातला सर्वांत जास्त चित्रपटनिर्मिती करणारा देश हे बिरुद मिरविणार्‍या आपल्या देशापासून ते जगभरच्या सर्व लहानथोर देशांत, अगदी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशांतही सातत्याने चित्रपटनिर्मिती होत असते. यातून प्रेक्षकानुनय करणार्‍या धंदेवाईक मसालापटांपासून ते वेगळं काही, खूप वेगळं काही करणार्‍या चित्रपटांपर्यंत बरंच- बरंच काही तरी घडत असतं. त्याचा एकाच जागी आढावा घेण्याचं, जगभरच्या चित्रपटनिर्मितीचा वेग आणि रोख समजून घेण्याचं एकमेव व्यासपीठ म्हणजे हे महोत्सव! चित्रपटाच्या जगात त्या-त्या वेळी नेमकं काय चाललं आहे, याचा अशा प्रकारे वारकरी धांडोळा घेत असताना त्यांच्या मनात येणारा प्रश्न स्वाभाविकच आहे..
‘‘या महोत्सवाची ‘डिस्कव्हरी’ काय?’’
नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कोरियातील बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ‘डिस्कव्हरी’ म्हणायची, तर ‘मेलोड्रामाचा बदलता पोत’! बुसान महोत्सवावर लिहिलेल्या यापूर्वीच्या लेखातून मी याचा उल्लेख केला आहेच. इथं थोडं त्याच्या अधिक मुळाशी जायचं आहे.
एक गोष्ट इथं आरंभीच नमूद करायला हवी आणि ती म्हणजे, मेलोड्रामाचा पोत केवळ बुसानमध्येच बदललेला दिसला, असं नाही. गेली दहाएक वर्षं तरी ठळकपणे जाणवतं आहे. कारण या दहा वर्षांत चित्रपटनिर्मितीत आलेली तरुण मंडळी! खरं तर ती तशी प्रत्येक काळात येत असतातच. आपल्याबरोबर आपल्या काळाच्या नव्या गोष्टी आणतच असतात. जे कालबाह्य झालंय ते बिनधास्त अडगळीत टाकत असतात. तिथं कणभरही ती भावुक होत नाहीत. हे असं घडतं म्हणूनच आपण म्हणतो, काळ पुढे सरकला. मेलोड्रामाच्या बाबतीत मला हे विशेषत्वानं जाणवतं. मेलोड्रामा हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. हळव्या, रडव्या घटना सभोवताली सतत घडतच असतात. तसंच, मेलोड्रामाचा अविभाज्य भाग असलेला योगायोगही घडत असतो. मात्र, नवी पिढी या सर्वांकडे वेगळ्या नजरेनं पाहते आहे. उगाच भावुक होणारी, त्यांच्याच भाषेत बोलायचं, तर ‘सेंटी’ होणारी ही जनरेशन नाही. ती त्यांच्या पद्धतीनं हळवी होते; मात्र अलिप्तपणा संपूर्णत: टाकून देत नाही. प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारणभाव समजून घेण्याची, मुळात तो शोधण्याची त्यांची क्षमता आधीच्या पिढीपेक्षा नक्कीच जास्त आहे. फिलिपिन्सच्या मिलो सोग्युको या तरुण दिग्दर्शकाच्या ‘मारिक्विना’बद्दल मी याआधी सविस्तर लिहिलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याची ईर्षा बाळगून आपली गारमेंट फॅक्टरी मोठी करीत नेणार्‍या तिशीतल्या इमेल्डानाला आपले वडील गेल्याचं कळाल्यानंतर ती लगेच टाहो फोडीत नाही. अगदी चटकन तिचे डोळे भरून येत नाहीत. क्षणभर ती स्तब्ध होते; परंतु पुढच्याच क्षणी आपल्या सहकार्‍यांना आवश्यक आणि तातडीच्या कामाच्या नीट सूचना देते व मगच बाहेर पडते. त्यातही ती लगेचच अंत्यविधीचं प्लॅनिंगही करायला लागते. ओके! वडील गेले, दु:ख आहेच; परंतु नुसतं रडत बसायला आणि सांत्वनाचे कढ झेलायला वेळ आहे कुठे? सो, द मॅनेजमेंट इज द प्रायोरिटी! ती तेच करते. तिचे वडीलही एकके काळचे मोठे व्यावसायिक! पादत्राणे बनविणे हा केवळ त्यांचा व्यवसाय नाही, तर ते त्यांचं पॅशन आहे. त्यांचं जगणं आहे. त्यामुळे हाताखाली खूप मोठा कामगार असूनदेखील ते आपल्या मालकपणाची झूल बाजूला ठेवून एका सर्वसामान्य कामगाराप्रमाणेच स्वत:च्या कारखान्यात वावरतात. वडिलांचं आपल्या कामगारांशी कुटुंबीयांप्रमाणे वागणं आणि इमेल्डाचं त्यातलं कॉर्पोरेट कल्चर हा या दोन पिढय़ांतला फरक त्यांच्या एकूण दोन टोकांच्या वृत्तींमध्येच आहे. तोच दाखवताना दिग्दर्शक या दोन पिढय़ांतील भावनांचं व्यवस्थापन अधोरेखित करतो आणि मेलोड्रामाचा बदलता पोत दिसायला लागतो.
पूर्वीच्या बायकांची एक तक्रार असायची. त्या स्वत:च म्हणायच्या, माझी सवत आहे. नवर्‍याला एखाद्या गोष्टीचं इतकं टोकाचं वेड असायचं, की त्याला बायकोपेक्षा ते वेड महत्त्वाचं असायचं. म्हणून बायका हे असं कधी कौतुकानं, तर कधी चिडून, तर कधी अगदी टोकाला जाऊन म्हणायच्या. इमेल्डाची आई टोकाला गेली. दिवसरात्र पादत्राणं डोक्यात असलेल्या नवर्‍याला टाकून तिनं अमेरिका गाठली. याला धक्का होता. त्याहीपेक्षा लाडक्या लेकीच्या ताटातुटीचं दु:ख होतं; परंतु ते तो थांबवू शकला नाही. सुदैवानं त्याचं पादत्राणप्रेम त्याला या परिस्थितीतून तगवून नेणार होतं. सरत्या काळाबरोबर त्याच्या सहकारी स्त्रीबरोबर त्याला सहजीवन सुरू करावं लागलं. वडिलांच्या अंत्यविधीची तयारी करताना त्यांचं पूर्वायुष्य जसजसं तिला उलगडत जातं, तसंतसं ती वडिलांच्या आयुष्यातलं हे पर्वही नीट समजून घेते. इमेल्डाला तिचा बाप नेमका आणि सर्वार्थानं कळतो. वडिलांची दुसरी पत्नी जेव्हा अंत्यदर्शनासाठी येते, तेव्हा ती कटू होत नाही. तिला नेमकं भान आलेलं असतं. विशीतला कोवळा कोरियन दिग्दर्शक  कीम देहवन आपल्या पहिल्याच चित्रपटात, ‘एंड ऑफ विंटर’मध्ये कथानकात ओतप्रोत भावविभोरता ठासून भरलेली असूनदेखील एका संयमानं नुकत्याच नवृत्त झालेल्या वृद्धाचं व्यक्तिमत्त्व रेखाटतो. सगळं काही आलबेल दिसत असताना या माणसाला वयाच्या टप्प्यावर का घटस्फोट घ्यावासा वाटला असेल, याकडे कुठल्याही ठोस उत्तराशी न येता तो कुतूहलानं पाहतो, त्यातून केवढय़ा तरी गोष्टी समोर येतात. अन्यथा घटस्फोट हा विषय म्हणजे मेलोड्रामाची परमावधी गाठणारा. आजच्या नव्या पिढीत तो काहीसा कमी झाला असला, तरी घटस्फोट हा भावनिक पातळीवर स्फोटकच विषय म्हणावा लागेल. आजवर आपण काही कमी सिनेमे, नाटकं, कथा-कादंबर्‍या, सिरियल्स पाहिल्या; परंतु ‘एंड ऑफ विंटर’ करणारा हा पठ्ठय़ा मात्र वेगळ्या चष्म्यातून त्याकडे पाहतो. ज्याकडे सर्वांचं सर्व अंगांनी पाहून झालंय. अलीकडेच मी ज्यांच्यावर सविस्तर लिहिलंय ते ‘डोंट से दॅट वर्ड’, ‘नाता’, ‘वुई विल बी ओके’ त्या या बुसानमध्ये पाहिलेल्या चित्रपटांतून मेलोड्रामाचं संयमी रूप पाहायला मिळालं. अधिक नेमकेपणानं म्हणायचं झालं, तर कुठल्याही गोष्टींकडे, अगदी भावविभोर करून टाकतील, अशाही गोष्टींकडे पाहण्याचा, त्या हाताळण्याचा या नव्या पिढीचा अलिप्तपणा वाखाणण्याजोगा आहे. म्हणूनच ही पिढी मेलोड्रामाचा पोत काळानुरूप बदलू शकते.
हे केवळ बुसानमध्येच जाणवलं असं नव्हे, तर वर म्हटल्याप्रमाणे माझं गेल्या दहाएक वर्षांतलं निरीक्षण आहे. यंदाच्या कान महोत्सवात पाहिलेला ओलिव्हर दाहनचा ‘ग्रेस द मॉनॅको’, ज्याँ-पिएर दारदेन दिग्दर्शित बेल्जियमचा ‘टू डेज वन नाईट’, जपानच्या नाओमी कावासे हिचा ‘स्टिल द वॉटर’, हंगेरीच्या कोर्नेल मुंद्रोझोचा ‘व्हाईट गॉड’, कोरियाच्या ज्यूली जंग हिचा ‘अ गर्ल अँट माय डोअर’, चीनच्या वांग चाओचा ‘फँटासिया’, इटलीच्या आसिया आरगेंतो हिचा ‘मिस अंडरस्टूड’ या सर्व चित्रपटांतून मला हे स्पष्ट दिसलं आहे. जाणवलं आहे. या यादीत दारदेन बंधू हेच काय ते वडिलधारे, अनुभवी. बाकी सारे जवळपास पहिलटकर किंवा नुकती नुकती कुठं सुरुवात केलेले. लहान मुलांना घरात पाळलेल्या कुत्र्या-मांजरांचा वगैरे किती लळा असतो आणि मग तीच जर गोष्ट असेल, तर भावनांचे पाट अव्याहत वाहत ठेवण्याची केवढी सोय. परंतु, ‘व्हाईट गॉड’मध्ये तसं होत नाही. आपल्या लाडक्या कुत्र्याच्या ताटातुटीनं हळवी झालेली शाळकरी पोर कथानायिका असतानादेखील हे होत नाही, हे विशेष! गोष्टीची सुरुवात तिथून मात्र ती जाते. एका व्यापक राजकीय पर्यावरणवादी वादाकडे. ‘टू डेज वन नाईट’मध्ये नोकरी गेल्यामुळे अगतिक झालेल्या तिशीतल्या जोडप्याची गोष्ट आहे. मात्र, त्या अगतिकपणाशी अडकून न पडता गोष्ट पुढे सरकत जागतिकीकरणाच्या महाकाय प्रश्नाला आणि त्यातून निर्माण झालेल्या अपरिहार्य परिणामांना भिडते. ‘स्टिल द वॉटर’मध्ये हळूहळू मृत्यूच्या दिशेनं निघालेल्या खंगत, विझत चाललेल्या आईकडे पाहणारी कोवळी पोरगी आहे; परंतु इथंही त्यातलं कारुण्य ठसठशीत न करता मृत्यूचा मन:पूत स्वीकार करीत जाणारी आई दाखवून मृत्यूचं अवघं तत्त्वज्ञानच उलगडून दाखवलं आहे. ग्रेस केली या हॉलिवूडच्या अभिनेत्रीनं मॉनॅकोच्या राजपुत्राशी लग्न केल्यानंतर तिची तिथं होणारी घुसमट, देशातल्या-जगातल्या असहाय लोकांसाठी काही तरी करण्यासाठी तिची चाललेली तगमग आणि एक प्रकारे तिला बंदिवासात ठेवणारा राजशिष्टाचार म्हणजे मेलोड्रामासाठी केवढा वजनदार ऐवज! मात्र, ‘ग्रेस द मॉनॅको’मध्ये त्या वैयक्तिक ट्रॅजेडीला फाटा देऊन एका व्यापक मानवी भावनेला अधोरेखित करण्यात आलंय. ‘अ गर्ल अँट माय डोअर’, ‘फँटासिआ’, ‘मिस अंडरस्टूड’ याही चित्रपटांतून त्यातल्या सार्‍या अंगभूत भावुकपणाच्या पल्याड जात सांप्रतकालीन वास्तव टिपण्याचा यशस्वी प्रयत्न आहे.
गेल्या वर्षी चेक रिपब्लिकमधील कालरेव्ही व्हारी महोत्सवात पाहिलेल्या लॅटिन अमेरिकेतील ‘द क्लीनर’ आणि ‘द गोल्डन केज’ याही चित्रपटांत भावुक करणारे केवढे क्षण होते. एकूण चित्रपटच मस्तपैकी मेलोड्रामा होते; परंतु दोन्ही तरुण दिग्दर्शकांनी एका हतबल, असहाय परिस्थितीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या दु:खात पार भिजवून न टाकता, काळजात बारीकशी कालवाकालव केली; परंतु मुख्यत: ते ज्या परिस्थितीत सापडलेत, ज्या कारणांमुळे सापडलेत ते नेमकेपणानं दाखविण्यावर भर दिला. ही पिढी प्रश्न निर्माण झालेत, म्हणून गळा काढत बसणारी नाही. ती त्या प्रश्नांना भिडणारी आहे.. आणि म्हणूनच त्यांच्यात अतिशय लोकप्रिय असलेल्या पारंपरिक मेलोड्रामाचा पोत बदल्याची क्षमता आणि सार्मथ्य आहे!
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)