शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

राजांच्या रयतेचं काय?

By admin | Updated: December 31, 2016 13:07 IST

अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेला विरोध करणा:या कोळी लोकांची हरकत नेमकी कशाला आहे? का आहे? आणि आता पंतप्रधानांच्या हस्ते थाटामाटात जलपूजन झाल्यावर हे कोळी लोक त्यांची लढाई थांबवणार का?

- परिक्रमा
- ओंकार करंबेळकर
 
मुंबईच्या दक्षिणेस जायला लागलो की ती निमुळती होत असल्याचे जाणवायला लागते. सीएसटी, चर्चगेट, नरिमन पॉइंट मागे टाकत आपण पुढे दक्षिणेस जाऊ तसा कुलाब्याचा परिसर लागतो. एकेकाळी मुंबईच्या सात बेटांपैकी कुलाबा आणि लिटल कुलाबा (ओल्ड वूमन्स आयलंड) अशी ही दोन बेटं होती. १८३८ साली ती कुलाबा कॉजवेने इंग्रजांनी जोडली आणि सगळ्या सात बेटांची साखळी होऊन एकसंध मुंबई तयार केली. पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या आधीपासून या बेटावर मासेमारी करणारे कोळी आणि इतर जातीचे लोक राहत होते. या कॉजवेच्या पश्चिमेला विसाव्या शतकापर्यंत भर टाकणं चालू होतं. त्यातून बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टद्वारे कफ परेडची निर्मिती झाली. (या ट्रस्टच्या टी.डब्ल्यू. कफ यांच्या नावावरून कफ परेड नाव पडलं). 
कफ परेडला जाताच एका बाजूस दक्षिणेस कुलाबा आणि उत्तरेस राजभवन अशा अर्ध गोलाकृती भागात निळाशार समुद्र दिसतो. कफ परेडच्या त्या निमुळत्या भागात कॅ. प्रकाश कुंटे मार्गावरच मच्छीमारांची वस्ती आहे. एका बाजूला मच्छीमारांची वस्ती तर दुसऱ्या बाजूला उंच टोलेजंग इमारती आणि जुन्या दगडी बंगली आहेत. त्यामुळे दोन बाजूंना परस्परविरोधी गोष्टी इतक्या स्पष्ट दिसतात की जणू प्रकाश पेठे मार्गाने दोन बाजूंना नाही तर दोन वर्गांना, दोन संस्कृतींना वेगळं केलंय. 
दुपारच्या वेळेस बधवार पार्कला पोहोचलो होतो. मच्छीमारनगर, शिवसृष्टीनगर, शिवशास्त्री वगैरे सलग वसाहती दिसू लागल्या. मला लोक मच्छीमारनगरमध्येच भेटणार होते म्हणून तिकडे गेलो. अरबी समुद्रात शिवछत्रपतींचं स्मारक उभारण्याचा बेत पुन्हा चर्चेत आल्यापासून या वसाहतीत मोठी हलचल, अस्वस्थता आहे. 
- आणि आत्ता तर पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होऊन दोनच दिवस उलटलेले. त्यामुळे या भागातल्या उकळ्या आणखी तीव्र झालेल्या!! या स्मारकाच्या जागेला गेली अनेक वर्षे मुंबईतील मच्छीमार समुदाय विरोध करत होता. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जलपूजनासाठी येतील त्या दिवशी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा आणि मानवी साखळी करून विरोध करण्याचा निर्धारही त्यांनी केला होता. पण त्याच्या आदल्याच दिवशी गडबड लक्षात घेऊन संभाव्य आंदोलकांना पकडण्यात आलं आणि पंतप्रधान मुंबईतून बाहेर पडल्यानंतरच त्यांची सुटका झाली.
शिवस्मारकाला हे मच्छीमार इतका पराकोटीचा विरोध का करत आहेत आणि त्या दिवशी नक्की काय झालं हे विचारायलाच त्यांच्या वस्तीत शिरलो होतो. आत आत जावं तशा गल्ल्या-उपगल्ल्यांचं जाळं! प्रत्येक वळणावर असलेल्या फळ्यावर ‘आमचा विरोध स्मारकाला नाही तर त्याच्या जागेला आहे’, ‘सरकारचा निषेध’ वगैरे जागोजागी लिहिलेलं होतं. ते वाचणारी हाफपँटीतली पोरंही सगळीकडेच दिसत होती. हाफपँट हा इथल्या सर्व पुरुषांसाठी युनिफॉर्मच असावा.
एकमेकात तोंडं अडकवून काठीवर वाळत घातलेले बोंबील (बॉम्बे डक), जाळी, दारातच लहान मासळी निवडत बसलेल्या महिला आणि छतापर्यंत टाइल्स लावलेली घरं ओलांडत पुढे जायला लागत होतं. मच्छीमारांचे नेते दामोदर तांडेलांचं घर विचारत गेलो तर ते सहज सापडलं. ते इथले प्रसिद्ध नेते आहेतच, त्यातून धरपकडीमुळे त्यांचं घर सगळ्या घडामोडींचं केंद्र झालं आहे. दामोदर तांडेल स्मारकाच्या जागेविरोधात कोर्टात गेले आहेत, म्हणून त्यांना आधी भेटलो. तुमचा विरोध नक्की कशासाठी आहे असं मी विचारण्याचा प्रयत्न करणार, इतक्यातच ते बोलू लागले..
‘आमचा स्मारकाला विरोध नाही. आमचा विरोध त्याच्या जागेला आहे. गेली अनेक पिढ्या आम्ही या परिसरात मासेमारी करत आहोत. आता अचानक आमच्यासमोर असलेल्या जागेवर ४२ एकरांचं बेट तयार करून त्यावर स्मारक बांधण्याचा विचार चालू आहे, ते आम्हाला कसं चालेल? आम्ही आमची मासेमारी करायची कोठे आणि या बेटामुळे माशांची अंडी घालण्याची महत्त्वाची जागा नष्ट होणार त्याचं काय?’ - असं विचारत त्यांनी काही फोटो दाखवले. ज्या जागेवर शिवस्मारक होणार आहे त्या प्रवाळ खडकावर वेगवेगळ्या जातीचे मासे अंडी घालतात. तिवरांची संख्या कमी झाल्यावर असे प्रवाळ खडकच माशांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित उरले आहेत. तांडेलांच्या मते या खडकावर कित्येक मीटर्सचा वाळूचा थर आल्यावर मासे कसे येतील आणि आम्ही मासेमारी तरी कशी करणार? तांडेलांचा प्रश्न खरंच महत्त्वाचा वाटत होता. सरकारने मच्छीमारांना त्याच्या बदल्यामध्ये नोकऱ्या किंवा स्मारकाशेजारचे स्टॉल, जेट्टी-फेरीसाठी काम देण्याचं आश्वासन देऊ केलंय याची मी त्यांना आठवण केली तेव्हा ते लगेच उसळून म्हणाले, ‘पण आम्हाला ते नकोच आहे, आम्ही ते मागितलेलंच नाही. आम्ही आमचे आताचे धंदे बंद करून ते का करावं? इतक्या पिढ्या आम्ही मासेमारी केली असताना आता अचानक ती बंद करून या नोकऱ्या का कराव्यात? जेव्हा या स्मारकाचा पहिल्यांदा विचार आला तेव्हा आठ जागा निवडल्या होत्या, त्यातील ही कफ परेडसमोरची जागा साफ नाकारली गेली होती. तरीही याच जागेवर स्मारक करण्याचा हट्ट का सुरू आहे हे समजत नाही.’
तांडेल सांगत होते, ‘महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क होणार म्हणतात.. त्याजागी हे स्मारक झालं तर कित्येक कोटींचा खर्च वाचणार नाही का? किंवा खांदेरी-उंदेरीसारखे मुंबईजवळचे भक्कम किल्लेही यासाठी उत्तम पर्याय होऊ शकतात. आता बाहेरून आणून येथे वाळू घालायचा होणारा मोठा खर्च त्याने वाचेल आणि भक्कम पायाही मिळेल.’ 
तांडेलांचा ठाम आवाज ऐकल्यावर ‘तुम्हाला नुकसानभरपाई मिळाली तर तुमचा विरोध मागे घ्याल का?’ - असं मी विचारून पाहिलं. त्यावर ते आणि त्यांच्या बरोबर असणारी तरुण पोरंही हसली. 
‘अहो हे सरकार आम्हाला काय नुकसानभरपाई देणार? २०१० साली चित्रामधून तेलगळती झाली (एमएससी चित्रा आणि एमव्ही खालिजा या जहाजांच्या अपघातामुळे मुंबईजवळ मोठी तेलगळती झाली होती) तेव्हा आम्हाला एक महिना मासेमारी बंद ठेवायला सांगितलेलं. आम्ही सरकारचं ऐकून त्यांचा आदेश पाळला. ना दर्यावर गेलो ना बाजारात. एक महिना बसून काढला. नंतर आमच्या लोकांची आठ कोटी नुकसानभरपाई सरकारला सादर केली पण आश्वासनांशिवाय अजूनही आमच्या हातात काहीही आलेलं नाही. सरकार बदललं तरी तेच. आता तुम्हीच सांगा, इतका अनुभव असल्यावर आम्ही सरकारवर कसा विश्वास ठेवायचा आणि जे सरकार ३६०० कोटी रुपये खर्च करायचा संकल्प करून हे स्मारक बांधायचं म्हणतंय त्यांना आमचे आठ कोटी द्यायला वेळ नाही हे तुम्हाला तरी पटतं का?’
राजकीय वर्तुळात वावर आणि अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती ही संघटना चालवत असल्यामुळे तांडेल यांच्या बोलण्यात भरपूर विषय येत होते. रिक्लमेशन, पर्यावरण, कायदे, सीआरझेड, ग्लोबल वॉर्मिंग असे अशा एकेक विषयावर ते बोलत होते. इतकं सगळं बोलल्यावर मी शेवटी म्हटलं, पण सरकारने तर आता भूमिपूजन केलं आणि स्मारक होणार ही काळ्या दगडावरची रेघ असं सरकार म्हणतंय, आता तुमचं काय होणार, किती दिवस विरोध करणार?
त्यावर ते म्हणाले, ‘अहो ती पण एक गंमत आहे. ज्या खडकावर त्यांना भूमिपूजन करायचं होतं त्यावर कार्यक्रमाच्या वेळी ओहोटीमुळे पाणी होतं म्हणून विविध किल्ल्यांची माती आणि नद्यांचं पवित्र जल पंतप्रधानांना पाण्यातच विसर्जित करावं लागलं. जर भूमीला पाय लागलेच नाहीत तर कसलं आलंय भूमिपूजन? त्यापुढचा मुद्दा तर आणखी वेगळा आहे, ही माती दुसऱ्या दिवशी पुन्हा किनाऱ्याला लागली, असं सगळं ते भूमिपूजन आहे.’ भूमिपूजनाच्या धामधुमीत पंतप्रधान मुंबईत येण्याअगोदरच या विरोधी आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलं होतं. तो विषय निघताच आजूबाजूला जमलेली तरुण पोरं उसळली,
‘अहो एकेका पोराला उचलून ताब्यात घेतलं आदल्याच दिवशी. आम्ही निषेधासाठी काळे कपडे घातलेले. त्यामुळे काळे झेंडे आणि काळे कपडे घातलेल्या प्रत्येकाला सरळ पकडत होते. आमच्या सभेच्या वेळेस काळे कपडे घालून जाणाऱ्या एका मोटारसायकलवाल्यालाही अडवलेलं. तुम्ही असे आला असतात परवा तर तुम्हालाही उचललं असतं.’ 
- मी गडद निळा शर्ट आणि काळी जीन्स घातलेली बघून एका मुलानं सरळच सांगितलं, तसे आम्ही सगळेच हसलो. पण ती मुलं म्हणाली, ‘आजवर आम्ही एवढी आंदोलनं केली पण असा प्रकार कधी झाला नव्हता. सगळी वसाहत एखाद्या छावणीसारखी झालेली.’ मध्येच तांडेल म्हणाले, ‘त्याच्या आधी तीनचार दिवस आम्ही बोटींवर रोज काळे झेंडे लावायचो पण रात्री कोस्टगार्ड किंवा अशाच बोटी येऊन ते झेंडे काढून टाकायचे. हा खेळ दोन चार दिवस चालला होता.’
तांडेलांशी भरपूर बोलणं झालं, तरी संपलं नव्हतंच. इतके विषय, इतका संताप भरलेला. अरबी समुद्रातल्या या नियोजित स्मारकासंबंधी विविध सरकारी संस्थांनी घालून दिलेल्या अटींबद्दलची कागदपत्रं त्यांनी दाखवली. २०१५ साली मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सुरक्षा, वाहतूक, आपत्कालीन व्यवस्थापन, कोस्टगार्ड, अग्निशमन दल, एमटीएनएल, बेस्ट, शासकीय रुग्णालय यांच्या तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांचे अभिप्राय घ्यावेत अशी सूचना केली होती. त्याचप्रमाणे २६-११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे ठिकाण दहशतवादी कृत्यासाठी सहजसाध्य (व्हल्नरेबल) असल्यामुळे दहशतवादविरोधी उपाययोजना आधीच करण्यास आणि संभाव्य पर्यटकांची संख्या लक्षात घेता वाहतुकीच्या प्रश्नावरही विचार करण्यास सुचवलं होतं. तांडेल सांगत होते त्यातलं काहीही प्रत्यक्षात झालेलं नाही. सरकार ज्याला एनओसी म्हणतंय त्यातल्या कित्येक अटी कधीच पूर्ण केलेल्या नाहीत. या एनओसी सशर्त आहेत याचा उल्लेखही केला जात नाही. मुंबई एकेकाळी कोळ्यांची मुंबई म्हणून ओळखली जायची. मुंबईचं वर्णन हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे गोविंद नारायण माडगावकर कुलाब्याचं वर्णन करताना लिहितात, ‘कुलाबा हे एक मुंबईच्या दक्षिणेच्या शेवटास लहानसे ओसाड बेट असून, ढोरे चरण्याचे ठिकाण होते. तेथे फक्त कोळी लोकांची वस्ती होती. ते लोक भाजीपाला उत्पन्न करीत व मासळी विकून निर्वाह चालवीत असत.’
- म्हणजे हे कोळी लोक पूर्वापार या बेटावर राहत आहेत. आजचं कफ परेड हे लिटल कुलाबा आणि कुलाब्याला जोडणाऱ्या भागावर आहे. कुलाबा नावच मुळी कोलाभात म्हणजे कोळी लोकांची संपत्ती अशा अर्थावरून तयार झालं आहे. आता मात्र हे लोक कोणाला नकोसे झाले आहेत. त्यांच्या मासेमारीची फारशी चिंता कोणाला वाटत नाही. तांडेल तर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची सागरी किल्ल्यांची माळ जपण्यासाठी कोळ्यांनाच जबाबदारी दिली होती. ते खरे रयतेचे राजे होते. पण आता मात्र आमच्याच रोजीरोटीच्या थडग्यावर हे स्मारक उभं केलं जाणार आहे. 
त्यांच्या बोलण्यात सारखा सारखा आमचा विरोध स्मारकाला नाही तर जागेला आहे, असं येत होतं. कारण त्यांच्या विरोधाचा मुद्दा भावनिक बनवून त्यांचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाच आहे असं भासवलं जात होतं. तसा समज होऊ नये म्हणून त्यांची धडपड चाललेली होती. 
तांडेलांचा निरोप घेऊन बाहेर पडलो ते त्यांच्या घरापासून काही पावलांवर असलेल्या जेट्टीवर. ही वस्तीला खेटून असणारी जेट्टी एकेकाळी आंतरराष्ट्रीय बातम्यांचं केंद्र होती. कारण इथेच दहशतवादी कसाब आणि त्याची टोळी बोटीतून उतरली होती. आपल्या सुरक्षाव्यवस्थेला पडलेलं हे भगदाड देशी-विदेशी लोकांना काही लोक टॅक्सी थांबवून दाखवतात. मला इथे भेटणार होते ते प्रदीप पाताडे. काही वेळात ते आलेच. त्यांनी सांगितलेली कहाणी आणि त्यांनी चालवलेली लढाई हा आणखी एक वेगळा अध्याय आहे. 
या साऱ्यांची धडपड जबरदस्त आहे खरी!
ती सार्थकी लागेल का? सरकार त्यांचं ऐकेल का?... आज तरी सांगणं कठीणच! ही मंडळी त्यांची लढाई हरली, तर कदाचित काही वर्षांनी इथे खरंच स्मारक तयार होईल. जेट्टीवरून आपण तिकडे जाऊ. लाइट-साउंड शोमधून मुंबईचा आणि कोळ्यांचा इतिहास पाहू, झालंच तर फोक डान्स म्हणून थर्मोकोलचे मासे घेऊन नाचणाऱ्या लहान पोरींचं कौतुक करू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबर सेल्फीही काढू. तेव्हा अतिदुर्मीळ किंवा नामशेष झालेल्या बोंबिलाचे छोटे फोटो नाहीतर प्रतिकृती सुवेनियर म्हणून विकत घेऊ. नंतर ठेचकाळत आणि लोकलच्या गर्दीचे धक्के खात घरी जाऊ. तेव्हा मासेमारी नसल्यामुळे तांडेल नसतील आणि नव्या प्रजातींचा अभ्यास करत फोटो काढायला पाताडेंनाही कदाचित दुसरीकडे जावं लागेल.
 
‘आम्ही थांबणार नाही, आम्ही लढतच राहू!’
 
 
प्रदीप पाताडे खरंतर वॉटरस्पोर्ट्स शिकवणारे प्रशिक्षक आहेत. पण पर्यावरण अभ्यासाने ते पूर्ण झपाटलेले आहेत. गेली अनेक वर्षे ते दक्षिण मुंबई परिसरामध्ये लहानशा बोटीतून फिरतात आणि समुद्री जिवांचे निरीक्षण करतात आणि फोटोही काढतात. पाताडेही तांडेलांबरोबर सरकारविरोधी याचिकेमध्ये सहतक्रारदार आहेत. ज्या प्रवाळ खडकावर हे स्मारक होणार आहे त्यावर ३०० पेक्षा अधिक प्रजातींचा वावर त्यांनी शोधून काढला आहे. या परिसरामध्ये ५० प्रकारचे मासे आढळून येतात आणि समुद्री घोडे, एंजल, स्टींग रे, पफरफिश असे माशांचे वेगवेगळे प्रकार आणि दुर्मीळ जातीच्या पाणवनस्पती असल्याची माहिती त्यांनी स्वत: भेट देऊन संकलित केली आहे. ज्या परिसरामध्ये बोंबील, लॉबस्टर्स, खेकडे नव्या पिढीला जन्म देण्यासाठी येतात ती जागा नष्ट केली तर मासेमारी आणि पर्यावरणाची किती मोठी हानी होईल याचा विचार सरकारने करावा, असं त्यांनी याचिकेमध्ये म्हटलं आहे. माशांची ही पिलं केवळ याच भागात फिरत नाहीत, तर ती मोठी झाल्यावर आजूबाजूच्या परिसरामध्ये जातात. याचाच अर्थ केवळ कफ परेडची मासेमारी बंद होणार नाही तर शेजारच्या परिसरालाही मोठा फटका बसेल. पाताडेंच्या मतानुसार ११० किमीच्या परिसरातील समुद्री पर्यावरणाला यामुळे धोका पोहोचणार आहे. सीआरझेड, पर्यावरण संरक्षण कायदा यासारख्या कायद्यांचं सरळसरळ उल्लंघन सरकारकडूनच होत असल्याचं ते सांगत होते. पण पाताडेंनाही मी मघाचाच प्रश्न विचारला, आता स्मारकाचं भूमिपूजन तर झालंय, आता काय करणार तुम्ही? 
त्यावर ते म्हणाले, आम्ही थांबणार नाही. ज्या एनओसी मिळवल्या आहेत त्या कशाच्या आधारावर मिळवल्यात यावरच आम्ही बोट ठेवलंय आणि आम्ही लढतच राहणार.! या परिसरात दिवसा काही हजार नागरिक या स्मारकाच्या भेटीसाठी येतील त्यांच्या वाहतुकीसाठी, स्वच्छता, पिण्याचं पाणी याची काय सोय केली आहे, सरकारने याबाबतीत काय विचार केला आहे असे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. न्यायालयात याचिका, माहिती अधिकार, पुस्तकं, इंटरनेट, सोशल मीडिया अशी अनेक पातळीवर पाताडेंची लढाई चालू आहे. आता स्मारकाच्या जागेबाबत आॅनलाइन सह्यांची मोहीमसुद्धा सुरू झाली आहे. पाताडेंच्या धडपडीचं कौतुक वाटतं. दुबईमध्ये पाम आयलंड ही मोठी बेटांची साखळी वाळू भरून भर समुद्रात तयार 
केली आहे, पण अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरूनही निसर्गाच्या पुढे तेथेही कोणाचं काहीच चालत नाही. सतत वाळू वाहून जात असल्याने नव्याने वाळू भरण्याचे काम अव्याहत करावं लागतं. ही कृत्रिम 
बेटं तयार झाल्यामुळे किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या समांतर प्रवाहांमध्येही बदल झाले आहेत. मुंबई फार वेगळी नाही. कुलाबा हे बोंबील, रावस, हलवा, कोळंबी, लॉबस्टर्स आणि खेकड्यांसाठी प्रसिद्ध मानलं जाई, काळाच्या ओघात माशांची संख्या कमी झाली तरी या मानवनिर्मित स्मारकामुळे उरलीसुरली मासळीही नष्ट होण्यासाठी आपण झपाट्याने वाटचाल करत आहोत.
 
संदर्भ आणि अधिक वाचनासाठी :
1) मुंबईचे वर्णन : गोविंद नारायण माडगावकर
- समन्वय प्रकाशन
2) मुंबई शहर गॅझेटियर 19क्9 : जयराज साळगावकर
- मॅजेस्टिक प्रकाशन
3) स्थलकाल : अरुण टिकेकर - मौज प्रकाशन
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
onkark2@gmail.com