शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

जिंदादिल मिरासदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 06:00 IST

द.मां.चा विनोद वाचणे हा जितका सुखद अनुभव असतो, तितकाच तो ऐकणेदेखील. द.मा. बोलायला लागतात आणि गावातल्या चावडीवर, कट्ट्यावर किंवा पारावर गावकरी मंडळी तंबाखू चोळत बसलेली आहेत, गप्पांना रंग चढलेला आहे, लालभडक पिचकाऱ्यांनी आसमंत लालेलाल झालेला हे दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. आपल्या समृद्ध आणि संपन्न विनोदाने आणि कथाकथनाने मराठी माणसाला निखळ आनंद देणाऱ्या ‘दमां’मधल्या विनोदी लेखकाला जागते केले ते पंढरपूरच्या भन्नाट वातावरणाने.

ठळक मुद्देविनोदी साहित्याचे दालन आपल्या कसदार लेखनाने श्रीमंत करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार १४ एप्रिल रोजी ९५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्या निमित्ताने...

- प्रा. मिलिंदजोशी

महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे एक खास पीक असते, तसा गावरान विनोदही असतो. गावओढ्यासारखा सतत तो खळाळत असतो. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि भाबड्यांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणींतून, तरुण लोकांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. साठ वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पाडल्या, त्या प्रा. द. मा. मिरासदार यांच्यासारख्या लेखकांनी.

द.मां.चा विनोद वाचणे हा जितका सुखद अनुभव असतो, तितकाच तो ऐकणेदेखील. द.मा. बोलायला लागतात आणि गावातल्या चावडीवर, कट्ट्यावर किंवा पारावर गावकरी मंडळी तंबाखू चोळत बसलेली आहेत, गप्पांना रंग चढलेला आहे, लालभडक पिचकाऱ्यांनी आसमंत लालेलाल झालेला हे दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. आपल्या समृद्ध आणि संपन्न विनोदाने आणि कथाकथनाने मराठी माणसाला निखळ आनंद देणाऱ्या ‘दमां’मधल्या विनोदी लेखकाला जागते केले ते पंढरपूरच्या भन्नाट वातावरणाने.

‘दमां’चा जन्म सोलापूर जिल्ह्यांतील अकलूज गावचा. तरीही वास्तव्य प्रामुख्याने पंढरपुरात. बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळे तिथले जीवन त्यांना जवळून पाहता आले. त्यांचे वडील वकील होते. त्यांच्याकडे खेड्यातले अनेक पक्षकार येत असत. त्यांच्या गप्पा ऐकणे, त्यांचे निरीक्षण करणे यांचा ‘दमां’ना नाद लागला होता. पंढरपुरात त्यांनी नाना तऱ्हेची माणसं पाहिली. त्यांचा स्वभाव, त्यांच्या जगण्याच्या तऱ्हा औरच होत्या.

‘दमां’ना या साऱ्याची लहानपणी मोठी गंमत वाटायची. शाळेत असल्यापासून ‘दमां’ना वाचनाचा प्रचंड नाद होता. ‘शेळी जशी झाडाची पानेच्या पाने फस्त करते, तसा मी पुस्तकाची पाने फस्त करायचो’, असे ‘दमां’नी आपल्या वाचनवेडाविषयी सांगितले आहे. या वाचनवेडापायी ते एकदा गावातल्या ग्रंथालयात अडकून पडले आणि त्यांची कशी फजिती झाली, याचा वृत्तांत त्यांनी आत्मकथनपर लेखात सांगितला आहे. चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे हे त्यांचे लहानपणापासूनचे आवडते लेखक. त्यांच्या पुस्तकांची ‘दमां’नी अक्षरशः पारायणे केली. त्याचप्रमाणे वेताळ पंचविशी, शुकबाहत्तरी, हातिमताई, सिंहासन बत्तिशी, गुलबकावली अशा पुस्तकांच्या वाचनात त्यांना खूप आनंद मिळत होता. या पुस्तकांची भाषा साधी, सोपी आणि सरळ होती. कथानके सुटसुटीत होती. त्यामुळे जे काही सांगायचे ते कथेच्या माध्यमातूनच, अशी ‘दमां’ची धारणा होत गेली आणि कथा या साहित्य प्रकाराविषयी त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झाले. पंढरपुरात शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले.

पुण्यात आल्यानंतर त्यांची व्यंकटेश माडगूळकरांशी गाठ पडली ती पुण्याच्या आकाशवाणी केंद्रात. त्यांची ‘बनगरवाडी’ वाचून दमा प्रभावित झालेले होते. एकदा दमा माडगूळकरांना म्हणाले, ‘मी बघितलेला एक नमुना तुम्हाला सांगतो. तो ऐका.’

मिरासदार लहानसहान बारकाव्यांसह गोष्ट सांगू लागले आणि माडगूळकर तल्लीन होऊन ऐकू लागले. ‘कशी काय वाटली गोष्ट?’ असं ‘दमां’नी विचारताच माडगूळकर खुश होऊन म्हणाले, ‘मला तुम्ही ज्या पद्धतीने ही गोष्ट सांगितली. जशीच्या तशी ती लिहून काढा. फक्कड होईल.’

माडगूळकरांनी सुचविताच ‘दमां’नी ती कथा जशीच्या तशी लिहून काढली आणि ‘सत्यकथे’च्या संपादकांकडे पाठवून दिली. त्या कथेचे नाव होते ‘रानमाणूस’. ती कथा सत्यकथेत छापून आली. मिरासदार नावाच्या विनोदी लेखकाकडे महाराष्ट्रातल्या जाणकारांचे लक्ष गेले. मिरासदारांच्या मिरासदारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९५७मध्ये ‘माझ्या बापाची पेंड’ हा त्यांचा पहिला विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दिवाळी अंक ही ‘दमां’साठी मोठी पर्वणी ठरली आणि ते लिहीत राहिले.

शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, रा. रं. बोराडे ही मंडळी लिहायला लागली, त्या वेळेपर्यंत मराठीतला विनोद हा मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि पांढरपेशा लोकांच्या जीवनातील घडामोडींशी निगडित होता. काही प्रमाणात प्रसंगनिष्ठ होता. या मंडळींनी ग्रामीण जीवनातल्या गमतीजमती, तिथल्या माणसांचे स्वभाव, त्या माणसांच्या भाबडेपणातून घडणारे विनोद प्रामुख्याने मराठी कथांमध्ये आणले. मराठी साहित्याचे विनोदाचे वर्तुळ व्यापक करण्याचा प्रयत्न या पिढीने केला. माडगूळकरांनी दुःख, दारिद्र्य असतानाही प्रचंड सोशिकतेने जीवनाला सामोरे जाणाऱ्या माणसांचे जग त्यांच्या साहित्यातून उभे केले. ‘दमां’नी हास्यकथेच्या माध्यमातून ग्रामीण कथेला पुढे नेले.

देशात आणि परदेशात कथाकथनाच्या माध्यमातून ग्रामीणकथा विशेषतः विनोदी कथा लोकप्रिय करण्याचे श्रेय द.मा., व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील या त्रिमूर्तीकडे जाते. अध्यापन क्षेत्रात रमलेल्या ‘दमां’नी विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळविला. विनोदी लेखकाला त्याच्या विनोदाचे नाणे पाडता आले पाहिजे, असं म्हणणाऱ्या मिरासदारांनी विनोदी साहित्याच्या क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाचा स्वतंत्र अध्याय निर्माण केला. वयाच्या ९५ व्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. अशात कानाने कमी ऐकायला येतंय त्यावरही ‘सध्या मी सर्पयोनीत आहे’ असं ते मिस्कीलपणे म्हणतात. या जगातलं दुःख नाहीसं करता येत नाही, पण ते हलकं करण्याची ताकद विनोदात आहे यावर अढळ श्रद्धा असणाऱ्या या खेळकर वृत्तीच्या जिंदादिल साहित्यिकाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.