शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

युद्धांचा आणि बुद्धाचा लडाख

By admin | Updated: October 14, 2016 15:10 IST

ग्रेट हिमालयन रांग आणि काराकोरम पर्वतरांगेत दहा हजार फुटांवर वसलेला अनोखा, निसर्गश्रीमंत प्रदेश. एका बाजूला पाकिस्तान, तर दुसरीकडे चीन.

 - मकरंद जोशी

ग्रेट हिमालयन रांग आणि काराकोरम पर्वतरांगेत दहा हजार फुटांवर वसलेला अनोखा, निसर्गश्रीमंत प्रदेश.एका बाजूला पाकिस्तान, तर दुसरीकडे चीन.टोळीवाल्यांच्या आक्र मणापासून ते आॅपरेशन विजयपर्यंत या भूमीत अनेक युद्धंही झाली आहेत.आक्र मणांचे झंझावात सोसूनही येथील लोक मात्र कायम आनंदी, समाधानी दिसतात.कारण युद्धांच्या या भूमीला बुद्धाचंही वरदान लाभलेलं आहे. 

 

आकाशाकडे झेपावलेल्या पहाडाच्या कुशी-खांद्यावरून घरंगळत गेलेला, स्वत:शीच फुगडी खेळत गोल गोल फिरणारा आणि बघता बघता दुसऱ्या पहाडावर चढणारा लांबच लांब रस्ता... कोणाची तरी रंगपेटी सांडावी आणि त्यातल्या पिवळ्या, किरमिजी, जांभळ्या, लाल, तपकिरी रंगाने माखून निघावेत असे डोंगर, ज्यांच्यावर नावालाही हिरवं पातं नाही.. पहाडांच्या घेऱ्यात पहुडलेले शांत, स्वस्थ जलाशय ज्यांचे रंग पाहताना प्रश्न पडावा की याने आभाळाकडून रंग उसना घेतलाय का आभाळाला उसना दिलाय?.. - ही सारी रूपं आहेत लडाखची. लडाख (मूळ तिबेटीत ‘ला द्वाग्स’) अर्थात ‘लँड आॅफ हाय पासेस’ आपल्या नावाप्रमाणेच ग्रेट हिमालयन रांग आणि काराकोरम पर्वतरांगेत दहा हजार फुटांवर वसलेला अनोखा प्रदेश. जम्मू आणि काश्मीर या राज्याचा हिस्सा असलेला लडाख भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या मात्र सर्वस्वी निराळा, वेगळा आहे. निसर्ग म्हणजे भरपूर हिरवाई, हिरव्यागार झाडांनी भरलेले डोंगर आणि घनदाट अरण्य या चौकटीत अडकलेल्या आपल्या बहुसंख्य भारतीय पर्यटकांसाठी नव्वदचं दशक संपेपर्यंत जणू लडाख अस्तित्वातच नव्हता. अत्यंत प्रतिकूल हवामानात अत्यंत समाधानाने राहणाऱ्या लडाखी लोकांकडे आणि त्यांच्या ‘आउट आॅफ द वर्ल्ड’ निसर्गाकडे भारतीयांचे लक्ष वेधल्याबद्दल आभार मानायला हवेत ते ‘बॉलिवूड’च्या लोकप्रिय चित्रपटांचे. थ्री इडियटपासून ते जब तक है जान पर्यंत जेव्हा मल्टीप्लेक्सच्या पडद्यावर पँगॉन्ग त्सो आणि खारदुंगला पासची दृश्ये झळकली त्यानंतर भारतीय पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणावर लडाखकडे वळली.खरंतर हा सगळा प्रदेश आपल्या देशासाठी संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनक्षम आणि महत्त्वाचा आहे. लडाखच्या एका बाजूला पाकिस्तानी सरहद्द आहे, तर दुसरीकडे चायनाची. (मुळात ती तिबेटची होती, पण आता तिबेटवर चायनाची सत्ता असल्याने चायनाची.) साहजिकच लडाखने या दोन्ही शेजाऱ्यांचे प्रताप (!) वेळोवेळी अनुभवले आहेत आणि त्यांच्या उपद्रवी कारवायांना समर्थपणे तोंडही दिलं आहे. १९४७-४८ मधल्या टोळीवाल्यांच्या आक्र मणापासून ते १९९९ च्या आॅपरेशन विजयपर्यंत लडाखच्या भूमीत झालेल्या लढायांची जंत्री पाहिल्यावर ही भूमी युद्धांची याचीच खात्री पटते. ११,५७५ फूट उंचावरच्या झोजीला पासमध्ये रणगाडे नेण्याची अफलातून शक्कल लढवणाऱ्या जनरल थिमय्यांपासून ते वयाच्या १७ व्या वर्षी महावीर चक्र मिळवणाऱ्या जमादार छेवांग रिंचेनपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत ‘रेझांग ला’ लढवणाऱ्या मेजर शैतानसिंग आणि त्याच्या बहादूर ११८ जवानांपासून ते कारगिलमध्ये वीरमरण पत्करणाऱ्या कॅप्टन विक्र म बात्रापर्यंत लडाखच्या वीरांची परंपरा अखंड आहे. तुम्ही जेव्हा सोनमर्गवरून झोजलामार्गे लेहकडे येता तेव्हा द्रास येथे उभारलेलं कारगिल विजय स्मारक या सगळ्या इतिहासाची साक्ष देतं. तोलोलिंग टॉप, बात्रा पॉइंट, टायगर हिल ही कारगिल युद्धातली धारातीर्थे दूरवरून पाहतानाही डोळे पाणावतात, हात सलामीसाठी वर जातात आणि आपोआप शब्द उमटतात ‘जय हिंद’. असाच अनुभव येतो लेह शहरातील ‘हॉल आॅफ फेम’ हे लष्करी संग्रहालय पाहताना. या संग्रहालयात १९६२ सालच्या चायनिज आक्रमणापासून ते ६५, ७१ आणि १९९९ च्या पाकिस्तानी कारवायांपर्यंत लडाखमध्ये लढलेल्या सगळ्या युद्धांचा इतिहास पाहायला मिळतो. प्रत्येक भारतीयाने पाहायलाच हवं असं हे संग्रहालय आहे.इतक्या सगळ्या युद्धांमध्ये होरपळून आणि इतिहासकाळापासून आक्र मणांचा झंझावात सोसूनही लडाखमधील स्थानिक आनंदी, समाधानी कसे? तर या युद्धाच्या भूमीला बुद्धाचं वरदान लाभलेलं आहे. लडाखचा इतिहास सांगतो की इसवी सनाच्या पहिल्या शतकात लडाख कुशाण साम्राज्याचा भाग होता. या भूमीवर तथागतांची शिकवण रुजू लागली ती इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात आणि तेव्हापासून ‘ओम मणी पद्मे हुम’ हा मंत्रघोष लडाखच्या कानाकोपऱ्यात अखंड निनादतो आहे. लडाखमध्ये फिरताना प्रत्येक गावाजवळ, गावामध्ये, रस्त्यावर कुठे ना कुठे तुम्हाला चोर्तेन अर्थात स्तूप पाहायला मिळतातच. या स्तूपांप्रमाणेच लडाखभर विखुरलेले अनेक प्राचीन गोम्पा म्हणजे इथल्या धर्मपरंपरेचे साक्षीदार, रक्षक आणि मार्गदर्शकच. लिकीर, लामायुरू, अलची, ठिकसे, हेमिस, रंगदूम, स्पितुक अशा गोम्पांमधून जतन केलेली पारंपरिक बौद्ध उपासना, पुरातन कलाकौशल्याचे नमुने पाहिल्यावर लडाख खरोखरच लिटल तिबेट आॅफ इंडिया आहे याची खात्री पटते. तसं तर लेहच्या बाजारात फिरताना लागणाऱ्या तिबेटियन मार्केट्समुळे आपण लेहऐवजी ल्हासात तर नाही ना, असा प्रश्न पडतोच. पण लडाखमधल्या गोम्पा आणि मॉनेस्ट्रीजना भेट दिल्यावर आपल्याला अपरिचित अशा तांत्रिक बौद्ध धर्मातील अनेक पैलूंचं दर्शन घडतं. भविष्यात येणारा प्रसन्न मैत्रेय बुद्धा काय किंवा बुद्धाचे स्त्रीरूप तारा काय, लडाखमधील बुद्धदर्शन चकित करणारे असते.छोट्याशा हिमालयीन मार्मोटपासून ते कियांग म्हणजे वाइल्ड अ‍ॅसपर्यंत आणि ब्लॅक नेक क्रेन्सपासून ते बार हेडेड गीजपर्यंत लडाखचं वन्यजीवन हा स्वतंत्र लेखाचा आणि स्वतंत्रपणे अनुभवण्याचाच विषय आहे. पँगॉन्ग लेक आता फारच ओळखीचा झालाय. पण त्सो मोरिरी आणि त्सो कार ही दोन रत्नं मात्र आजही जरा उपेक्षित आहेत. शिवाय झंस्कार व्हॅली हे तर लडाख पर्यटनातील स्वतंत्र आणि अधिक रंगतदार प्रकरण आहे.हाय अल्टीट्यूडवरील या प्रदेशाचा आनंद घेताना योग्य ती काळजी अवश्य घ्या. डायमॉक्ससारखी गोळी वैद्यकीय सल्ल्यानुसार न चुकता घ्या. जलद चालणे, धावणे, उड्या मारणे असे प्रकार टाळा. भरपूर पाणी प्या, भीमसेनी कापूर हुंगत राहा. श्वसनाचे विकार, हृदयविकार असलेल्यांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय लडाखवारीचा बेत आखू नये. थोडी काळजी घेतली तर या अनोख्या प्रदेशाची आनंदयात्रा तुमच्या पर्यटनानुभवात लाखमोलाची भर टाकल्याशिवाय राहणार नाही.अतिउंचावर असल्याने आणि भोवती उंचच उंच पर्वतांचा पहारा असल्याने इथे पाऊस नाही आणि म्हणून इथल्या डोंगरांवर वनराई नाही. सिंधू, श्योक, झंस्कार, सुरू या इथल्या नद्यांना पाणी मिळते ते ग्लेशियरमधून आणि उन्हाळ्यात बर्फवितळल्यानंतर. या नद्यांच्या पाण्यावर लडाखमधली शेती, बागायती फुलते. नुब्राचं वाळवंट किंवा लामायुरूजवळची मून लँड असे नैसर्गिक चमत्कार लडाखच्या सौंदर्यात भर घालतात. जगातला सर्वात उंचावरचा रस्ता खार्दुंगला (१८३८० फूट) वर प्रवास करण्याबरोबरच चांगला (१७,५९० फूट), तांगलांगला (१७,४८० फूट), फोतुला (१३,४७८ फूट) या रस्त्यांवर प्रवास केल्याचा शिक्काही मिरवता येतो. डबल हम्प कॅमल राइड आणि सिंधूच्या खळाळत्या प्रवाहातील थरारक राफ्टिंग लडाखच्या सफरीला मजा आणतात.