खेड्यांतून शहराकडे! - ग्रामीण भागातून शहरांकडे ‘स्थलांतरित’ होऊ पाहणारी  आधुनिक शेती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:03 AM2020-01-26T06:03:00+5:302020-01-26T06:05:11+5:30

शेती आणि ग्रामीण भाग हे नाते  समाजमनामध्ये घट्ट रुतलेले असले तरी, शहरांतील शेती वाढते आहे, रुजते आहे.  आजच्या घडीला जगभरात 30 टक्के शेती उत्पादन शहरांतून होते आहे. एकेकाळी कारखान्यांची काजळी,  धूर यांनी ग्रासलेली शहरे भाजी-फुलांचे मळे पिकवून  हिरवी, पर्यावरणपूरक होत आहेत. शेतीशी संलग्न व्यवसायही खूप वेगाने वाढत आहेत.  येणार्‍या काळात जगभरात नागरी शेती  मोठय़ा प्रमाणात पसरलेली दिसेल.

From the village to the city! - Modern agriculture that seeks to 'migrate' from rural areas to cities .. | खेड्यांतून शहराकडे! - ग्रामीण भागातून शहरांकडे ‘स्थलांतरित’ होऊ पाहणारी  आधुनिक शेती..

खेड्यांतून शहराकडे! - ग्रामीण भागातून शहरांकडे ‘स्थलांतरित’ होऊ पाहणारी  आधुनिक शेती..

Next
ठळक मुद्देसिटीज ऑफ टुमॉरो- जगभरातील ‘प्रयोगशील’ शहरांच्या कहाण्या..

- सुलक्षणा महाजन

1970 नंतर पाश्चिमात्य देशांमधील अनेक महानगरांतील मोठमोठे कारखाने शहराबाहेर पडायला लागले. त्याआधी शहरामध्ये कारखानदारी आणि ग्रामीण भागात शेती अशी स्पष्ट विभागणी असे. परंतु कारखानदारी खेडोपाडी पसरायला लागली आणि शहरांमध्ये शेती दिसायला लागली. ही शेती मात्न वेगळ्या प्रकारची होती. नगररचना शास्राचा अभ्यास करत असतानाच ‘नागरी शेती’ हा विषय परिचयाचा झाला. डॉ. जो नासर आमचे शिक्षक होते. नागरी शेती हा त्यांचा संशोधनाचा विषय. त्यांच्या अभ्यासानुसार जगामधील 30 टक्के शेती उत्पादन हे नागरी प्रदेशातून निर्माण होते. विशेषत: मेक्सिको, क्युबा अशा विकसनशील देशांप्रमाणेच विकसित देशांमध्येही भाजी आणि फळबागा, नागरी शेती याकडे आता मोठय़ा प्रमाणात लक्ष दिले जाऊ लागले आहे. काही ठिकाणी तर गायी-गुरे यांचेही पालन केले जात आहे. असे असले तरी शेती आणि ग्रामीण भाग हे नाते अजूनही समाजमनामध्ये घट्ट रुतलेले आहे. परंतु येणार्‍या काळात नागरी शेती मोठय़ा प्रमाणात जगभर पसरलेली दिसेल.
1990साली सोव्हिएत युनियन देशातून क्युबाला निर्यात होणारी खते आणि गहू यांचा पुरवठा थांबला. तेथील अन्न आणि साखर उत्पादन संकटात सापडले. त्यावेळी हवाना या राजधानीच्या शहरामध्ये लाखो लोकांना शहरातल्या जमिनीवर, इमारतींच्या रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये भाजी पिकवण्याला मोठी चालना दिली गेली. प्रशिक्षण देऊन उसाची शेते गहू, मका अशा धान्य उत्पादनासाठी वळवली गेली. आजही हवानामध्ये 35 हजार एकर जमीन भाजी आणि फळांच्या उत्पादनासाठी वापरली जाते. सुमारे दोन लाख शेतकरी त्यावर आपली उपजीविका करू शकतात आणि शहरी नागरिकांना जवळच पिकवलेल्या ताज्या भाज्या सहज उपलब्ध होऊ शकतात.
या उलट विकसित देशांमधील कारखान्यातील उत्पादन थांबले, अनेक इमारती ओस पडल्या आणि तेथे विविध प्रकारच्या शेती व्यवसायाकडे लोक वळू लागले. अमेरिकेत शिकागो येथील एका बंद पडलेल्या कारखान्यात आता लेट्युसचे मोठे उत्पादन घेतले जात आहे. अशा कारखान्यांना सुदैवाने, पाणी, वीज, वाहतुकीची साधने सहज उपलब्ध होती. त्यातूनच मोठमोठय़ा, उंच इमारतींमध्ये भाजीपाला, मशरूम (अळिंबी), फुले यांची शेती करण्याच्या कल्पनेचा उदय झाला. त्याला ‘उभी शेते’ म्हणून ओळखले जाऊ लागले. विशेषत: अतिशय थंडी आणि बर्फ असलेल्या प्रदेशांमध्ये सूर्यप्रकाशाचा मोठा अभाव असतो. त्यामुळे शेती करणे अशक्य असते. अशा भागात दूरवरून ताज्या भाज्या आणून पुरवाव्या लागतात आणि नागरिकांसाठी त्या महागही पडतात. तेथे कारखान्यांच्या इमारतींमध्ये विशिष्ट प्रकारची विजेची उपकरणे आणि दिवे वापरून, शेतीसाठी लागणारी सौरऊर्जेची गरज कृत्रिम ऊर्जेने भागवली जाते. कोकोपिट किंवा निव्वळ पाणी अशी माध्यमे वापरूनही मातीविरहित शेती केली जाते. बारीक नळ्यांमधून वनस्पतींच्या वाढीला आवश्यक असे खाद्य पुरविले जाते. इमारतींमधील तापमानही प्रत्येक भाजीसाठी आवश्यक तितक्या प्रमाणात गरम राखले जाते. अशा प्रकारच्या नागरी शेतीमुळे वाहतुकीसाठी लागणारे इंधन तर वाचतेच; परंतु हवेतील प्रदूषण आणि कार्बन वायू शोषला जाऊन पर्यावरण सुधारायला मदत होते. याशिवाय नागरी भागातील वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून तेसुद्धा अशा शेतीसाठी वापरात येते. नागरी भागातच पाला-पाचोळा, भाजी बाजारातील हिरव्या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याचे खतामध्ये रूपांतर केले जाते.
अमेरिकेतील डेट्रॉइट शहर एकेकाळी मोटार उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. पण त्याला उतरती कळा लागली, नागरिक तेथून इतरत्र निघून गेले. घरे, जमिनी ओस पडल्या; पण तेथील अनेक कामगार आता रिकाम्या जमिनीवर शेती करू लागले आहेत. भाजीचे मळे पिकावू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी त्याला कायदेशीर मान्यता नव्हती; पण आता तो अडसरही दूर झाला आहे.
विकसनशील देशातील शहरांच्या भोवतालच्या प्रदेशातील खेडी जेव्हा नागरीकरणाच्या प्रभावात येतात तेव्हा तेथील शेती क्षेत्नातील उत्पादने आमूलाग्र बदलतात. तेथे नवीन प्रकारची नागरी शेती सुरू होते. 1998 साली मी नाशिक शहरावर एक शोधनिबंध लिहिला होता. 82 साली अनेक खेडी शहरात विलीन करून नाशिक महानगर बनले, तेव्हा महानगरातील 40 टक्के जमीन शेती आणि बागायतीसाठी वापरली जात होती. लहान-मोठय़ा जमिनींच्या तुकड्यांवर भाजी, फुले आणि विशेषत: द्राक्ष बागायतीचे मळे फुललेले दिसत होते. त्यांना बाजारात मोठी मागणी निर्माण झाली होती. डॉ. नासर यालाच ‘नागरी शेती’ म्हणतात. तेथे शेतकर्‍यांना लहान जमिनीतूनही जास्त उत्पन्न मिळते. अशी शेती-बागायती आर्थिक, सामाजिक आणि शहरांच्या पर्यावरणाच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात.  गेल्या वीस वर्षात तर नागरी शेतीचे क्षेत्न आणि प्रमाण अधिकच विस्तारले आहे.
नागरी शेतीमधील अलीकडचा अजून एक नवीन प्रकार म्हणजे ‘उभी शेती’. त्यात आडव्या जमिनीऐवजी उभ्या शेतीसाठी उंच कपाटे असतात. त्याच्या प्रत्येक फळीवर भाजी वाढते. यंत्न आणि संगणक यांच्या सहाय्याने तापमान, आद्र्रता, पाणी, पोषक द्रव्ये मोजून-मापून दिली जातात. त्यांच्यावर सतत देखरेख ठेवली जाते. भाजी आणि इतर उत्पादनासाठी सूर्याच्या उजेडात हरित द्रव्य तयार होते. परंतु बंदिस्त इमारतीमध्ये कृत्रिम उजेडामुळे दिवस-रात्न वनस्पती वाढू शकतात. भाजीपाला उत्पादनासाठी लागणारा अवधी कमी होतो. शिवाय कीड आणि जंतू यांच्यावर नियंत्नण करणे सोयीचे असते. उभ्या शेतीसाठी मशरूम म्हणजेच अळिंबीचे पीक सुयोग्य असते. त्यांच्यासाठी तर उजेडही नको असतो. अंधार्‍या आणि दमट जागेत त्यांची वाढ चांगली होते. ते प्रथिनांचे एक महत्त्वाचे साधन असल्यामुळे त्याला मागणीही असते. अर्थात अशी शेती करण्यासाठी अनेक प्रकारची साधने लागतात, कर्मचारी प्रशिक्षित असावे लागतात, भांडवलही लागते.
तुलनेने इमारतींच्या गच्चीवरची शेती कमी भांडवालामध्ये होते. शिवाय उपलब्ध सूर्यप्रकाश आणि इमारतीच्या छताचा वापर होतो. हॉलंडमधील रॉटरडॅम शहराच्या मध्यवर्ती भागात आम्ही एका मोठय़ा इमारतीच्या गच्चीवर असलेल्या एका लहानशा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. बाजूच्या प्रशस्त गच्चीवर मोठा भाजीचा मळा पिकवला होता. जेवण तयार होईपर्यंत आम्ही त्यात मजेत फेरफटका मारला. त्यातीलच उपलब्ध ताजे मुळे, सलाड, टोमॅटो, कांदे, कोबी आणि पालेभाज्या पानात वाढल्या जात होत्या. शिवाय गच्चीवर जेवायला, शेती बघायला आणि अनुभव घ्यायला अनेक लोक मुद्दाम येत होते. गजबजलेल्या या कार्यालयीन परिसरात अनेक लोक नियमितपणे जेवायला जाणारेही असतात.
आपल्याकडेही घरांच्या भोवती, बंगल्याभोवती कुटुंबांच्या गरजेपुरती परसातील बाग फुलवली जात असे. घरांच्या छपरांवर दोडकी, घोसाळी काकड्यांचे वेल असत. सांडपाण्याचा वापर करून वाफ्यामध्ये अळूची पाने वाढत. बागेत फळझाडे आणि फुलझाडेही असत. आता शहरांच्या परसबागा सीमेवर उभ्या रहात आहेत आणि खुद्द शहरांमध्ये उभ्या-आडव्या इमारतींमध्ये भाजीमळे उभे रहात आहेत. त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविले जाते आहे. सार्वजनिक ठिकाणी सूर्यऊर्जा पकडून पाना-फुलांचे उभे ताटवे तर अनेक शहरांमध्ये जागोजागी निर्माण केले जात आहेत. जोडीने काही ठिकाणी मधासाठी मधमाशा पाळून मध उत्पादन केले जाते. सौंदर्य, पर्यावरण, जमीन, र्शम, पाणी बचत आणि पुनर्वापर करणारी शेती येणार्‍या काळात सर्व जागतिक शहरांमध्ये अधिक मोठय़ा प्रमाणात दिसायला लागली तर नवल वाटायला नको. अल्प प्रमाणातील खते वापरून, नवीन तंत्नज्ञान वापरून होणारी नागरी शेती आणि त्याच्याशी संलग्न व्यवसाय खूप वेगाने वाढत आहेत. एकेकाळी कारखान्यांची काजळी, धूर यांनी ग्रासलेली शहरे भाजी-फुलांचे मळे पिकवून हिरवी होत आहेत, पर्यावरणपूरक होत आहेत.

sulakshana.mahajan@gmail.com
(लेखिका प्रख्यात नगर नियोजनतज्ज्ञ आहेत.)

Web Title: From the village to the city! - Modern agriculture that seeks to 'migrate' from rural areas to cities ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.