शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

विजयाबार्इ ...त्या सापडत गेल्या, त्याची गोष्ट!

By admin | Updated: February 25, 2017 17:45 IST

ज्येष्ठ लेखिका-समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीच्या ‘जनस्थान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहे. उद्याच्या मराठी राजभाषादिनानिमित्ताने नाशिक येथे होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने...

 -योजना यादव

 
‘उद्वेग व उद्रेक हे तात्पुरते विक्षेप समजून, आधी जुळवून घेतले पाहिजे आणि नंतर त्यातून लाभणारी शांती स्वत:तच रिचवली पाहिजे. निर्मितीच्या चकव्यात मला अशांती आणि शांती या दोन्ही वाटा दिसल्या. पुढे पुढे अशांतीची वाट शांतीच्या वाटेला येऊन मिळाली.’
 
विजयाबार्इंचा जन्म १९३३चा. म्हणजे आमच्यात जरा कमी थेट अर्ध्या शतकाचं अंतर. त्यात वाचनदरिद्री संस्कृतीत वाढल्यानं एकूणच लिहिणाऱ्या लोकांची ओळख उशिरा उशिरा होत गेली. अकरावीत कॉलेजात गेल्यावर पहिल्यांदा लायब्ररी पाहिली. माझ्याहून तीन फूट उंचीची भली मोठी कपाटं. कपाटापुढं उभी राहिले की नजर थेट कवितांवरच जायची. खालच्या कप्प्यांतल्या कथासंग्रहांकडे पाह्यचं ध्यानातच यायचं नाही आणि वरच्या कप्प्यातली समीक्षा आपल्या आवाक्यातली नाही, असं व्हायचं. तेव्हा वरच्या कप्प्यात विजया राजाध्यक्ष हे नाव खूप ठळकपणे दिसायचं; पण आपले हात तिथंवर पोहोचणारच नाहीत, म्हणून तिथं पोचायचा प्रयत्नही केला नाही. नंतर कित्येक वर्षं विजयाबाई मला काचेच्या तावदानातनं खुणावत राहिल्या. कपाटातल्या पुस्तकांची ओळख वाढू लागली, तसं एक विलक्षण जग भेटल्याचा आनंद झाला. त्यातही मराठीतल्या लिहित्या बाया मला अधिक खुणावत होत्या. त्यातनं मेघना पेठे, गौरी देशपांडे, सानिया ही नावं ओळखीची व्हायला लागली. मेघनाच्या नायिकांची बंडखोरी आणि त्यांचा कडवा रॅशनॅलॅझिम इतका आपलासा झाला, की फार हळवं आणि तडजोडीनं जगणाऱ्या नायिकांसाठी जणू माझं गेट कायमचं बंद झालं. त्या गेटमधनं अगदी इसाबेल अलांदे आणि आयन रँडही आत आली; पण आपल्या भोवतालातल्या, इथल्या मातीशी नातं सांगणाऱ्या बाया माझ्यासाठी काचेच्या तावदानात राहिल्या. त्या काळात विजयाबार्इंच्या कथांशी स्वत:ला जुळवून घेता आलं नाही, त्यामागचं कारणही कदाचित हेच होतं. तेव्हा त्यांच्या नायिकांमध्ये स्वत:ला पाहता येत नव्हतं; पण काळ आणि अवकाश अनंत असतो. तावदानातल्या त्यांच्या नायिकाही आपल्या जगण्याशी इतक्या मिळत्याजुळत्या आहेत, त्याही आपलाच आवाज आहेत, हे एक दिवस कळलंच. निव्वळ निर्णयक्षमतांच्या भिन्नतेमुळं परिस्थितीतली सार्वकालिकता नाकारता येत नाही. विजयाबाईंनी रंगवलेली नायिका तर उमलत्या वयापासनं परिपक्वतेच्या टप्प्यांपर्यंतचा प्रवास सांगणारी. तिची भेट झाली. तिच्यात स्वत:चं प्रतिबिंबही दिसलं; पण तिचं परिस्थितीला शरण जाणं किंवा तडजोडीसाठी स्वागतशील असणं पाहिलं की प्रत्येक वेळी मी नाही बुवा तशी, असंच स्वत:ला समजवत राहिले. तारुण्यात समजुतीचा सूर कुणाला हवा असतो? अगदी स्वत:ला बंडखोर होता आलं नाही, तरी तेव्हाचे आदर्श तरी किमान त्याच धाटणीतले असतात. बेमुर्वत, पठडीला भीक न घालणारे आणि तत्कालीन समाजालाही काहीसे युटोपियन वाटावेत असे.आमच्या पिढीत अशा बंडखोरीसाठी आणि स्वातंत्र्याच्या हव्यासासाठी स्त्री-पुरुष हा भेदही कितीतरी अंशी कमी झाला आहे. पुस्तकांशी ओळख झालेल्या पोरींना म्हणूनच वाचनविश्वात आपल्या जगण्याशी सुसंगत असणाऱ्या व्यक्तिरेखा शोधाव्याशा वाटतात. विजयाबार्इंच्या कथांमधून हे वय अनेकदा अधोरेखित झालं आहे; पण त्यातल्या तारुण्याचा बहर अंगणात रोज पहाटे बहरणाऱ्या चाफ्यासारखा संयत आहे. त्यांची ‘आवर्त’मधली नायिका पाहिल्यावर गंमतच वाटलेली. ही कथा लिहिली तेव्हा स्वत: विजयाबाईही फारफार विशी-पंचविशीतल्या असतील. या नायिकेचा भोवताल एक व्यक्ती आणि एका घरात संपतो. ही मुळात पूर्ण लांबीची कथाही नाही. एक छोटा प्रसंग. एक सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी एका उच्चभ्रू कुटुंबाचा भाग होताना तिच्यात होणारी भावनिक आंदोलनं, एवढंच प्रासंगिक भावनांचं ते चित्रण. - आज सोशल मीडियावर सेकंदा-सेकंदाला अशा पोस्टी पडतात, त्यामुळं आज कदाचित तिला तशा साहित्यिक मूल्यातही गणलं गेलं नसतं; पण तत्कालीन परिस्थितीत कित्येक जणींना त्या तेवढ्याशा चित्रणानं आधार दिला असेल. विजयाबार्इंच्या कित्येक कथांत अशी प्रासंगिक भावनिक आंदोलनांची मांडणी पाहायला मिळते. त्यातनं त्या नायक-नायिकेच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा तो क्षण आणि त्यावेळची सर्वसाधारण घुसमट अधोरेखित होते. अशा क्षणांची रेलचेल प्रत्येकाच्या आयुष्यात असल्यानं त्या कथांशी आपोआप समरस होता येतं. त्याआधी विजयाबार्इंच्या कथा परकाया प्रवेशापेक्षा मला कित्येकदा नॉस्टॅल्जिक करणाऱ्या वाटतात. त्यातनंच तत्कालिक आणि समकालीनतेतलं अंतर अंधुक होऊ लागतं. बाईचं शरीर आयुष्यभर परिवर्तनाची चक्रं घेऊन फिरतं. त्या अनुभूतीचा परिपाक तिच्या मनोविश्वात कायमस्वरूपी वास्तव्यास असतो. त्या परिवर्तनाचा आणि भावनिक आवर्तनाचा माग विजयाबार्इंची कथा काढत जाते. स्त्रीदेहाची स्थित्यंतरं त्यांच्या अनेक कथांमधून दिसतात. वयात येताना सुरू झालेला हार्मोन्सचा झगडा, मैथुन आणि बाळंतपणापासून मेनोपॉजपर्यंत बाईच्या आयुष्यात अनेक वावटळी उडवत असतो. अशावेळी स्वत:च्या देहाकडं विदेहीपणं पाहण्याची कसरत प्रत्येक बाई करते. ही कसरत त्या मांडतात. त्यांची विदेही कथा वाचताना कुठल्याही काळातल्या बाईला आपल्या गरवारपणाच्या आठवणी घेरल्याशिवाय रहाणार नाहीत. त्यांची ‘विदेही’ कथा सत्तरच्या दशकातली. जी गरवारपणावेळचं बाईचं मानसिक द्वंद स्पष्ट करते. तिच्या लैंगिक जाणिवांमधील बदल आणि तो समजून घेतेवेळी होणारी तिच्या जोडीदाराची दमछाकही त्या नेमकेपणानं हेरतात. आपल्या आयुष्यातल्या बाईचं हे शारीरद्वंद तिच्या आयुष्यातल्या पुरुषाच्या नजरेतनं मांडताना विजयाबाई रोमॅण्टिसिझमचा आधार घेतात. तो रोमॅण्टिसिझम वाचणाऱ्याच्या मनात एक हळवी लहर उमटवल्याशिवाय रहात नाही. विदेहीतल्या त्यांच्या या ओळीच पहा ना ! हा देह माझा? मी भोगलेला? ही सगळी वळणे माझ्या ओळखीची? यातील सगळी स्थित्यंतरे मी पाहिलेली? कसे पाहिले? कसे ओळखू लागलो? संकोच कसा वाटला नाही? मला- आणि तिलाही? गरोदर बाईच्या नवऱ्याची भावछटा याहून वेगळी ती कशी असणार, असंच ‘विदेही’ वाचताना वाटत राहातं... हे देहचक्र कालातीत असणार, हा अनुभव कालातीत असणार आहे. त्यामुळं विजयाबार्इंची नायिकाही बाई जोवर प्रसवते तोवर कालसमर्पकच राहील! विजयाबाई एका प्रदीर्घ सामाजिक परिवर्तन प्रक्रियेच्या साक्षीदार आहेत. व्यक्ती आणि समाज यांची बदलती जीवनमूल्यं त्यांच्या लेखनातून प्रतित होतात. त्यांची एकेक कथा जणू तत्कालीन दशकाचा इतिहास मांडते. पन्नास-साठच्या दशकातली त्यांची हळवी-बुजरी नायिका ऐंशीच्या दशकापर्यंत लग्न आणि कुटुंबव्यवस्थेची नवी परिमाणं सांगू लागते; पण या नायिकेला फार ठामपणे त्या उभं करत नाहीत. प्रवाहाविरुद्ध पोहताना होणारी तिची दमछाक जितकी स्पष्ट समोर येते, तितक्या तीव्रतेनं त्या बंडखोरीमागची कारणमीमांसा पुढे येत नाही. किंवा स्वत:च्याच नायिकेशी विजयाबाई परक्यानं वागतात, असं वाटायला लागतं. ‘जानकी देसाईचे प्रश्न’सारखी त्यांची कथा लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या व्यवस्थेचं दर्शन घडवते; पण या कथेचं शीर्षकही निव्वळ ‘त्या’ व्यक्तीचे प्रश्न म्हणून तिला परकं करतं. स्वत:पलीकडे जाऊन भोवतालाचं आकलन मांडणं, ही दर्जेदार साहित्याची जमेची बाजू असेलही; पण विजयाबार्इंची अशी निव्वळ दर्शकाच्या भूमिकेतली मांडणी अस्वस्थ करते. या सगळ्या विषयावर त्या भूमिका का घेत नाहीत, असं वाटायला लागतं. पण व्यक्तिसापेक्ष समजूतदारपणा दाखवणं, हा मोठा गुणच म्हणायला हवा. विजयाबार्इंच्या लिखाणात हा समजूतदारपणा ठायीठायी जाणवतो. त्यामुळं त्यांच्या कथांमध्ये घर जोडून ठेवण्यासाठी ओठावर आलेले शब्द गिळणाऱ्या बाईचा समंजसपणा दिसतो. कुठल्याही वाद, कलह आणि तीव्र संघर्षापेक्षा थोड्याबहुत सहनशीलतेतून उत्तर शोधण्याचा त्या प्रयत्न करतात. याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट आणि नेमकी आहे. त्या थेट म्हणतात, ‘उद्वेग व उद्रेक हे तात्पुरते विक्षेप समजून, आधी जुळवून घेतले पाहिजे आणि नंतर त्यातून लाभणारी शांती स्वत:तच रिचवली पाहिजे. निर्मितीच्या चकव्यात मला अशांती आणि शांती या दोन्ही वाटा दिसल्या. पुढे पुढे अशांतीची वाट शांतीच्या वाटेला येऊन मिळाली.’ विजयाबार्इंच्या या समजूतदार भूमिकांमुळेच कदाचित आजच्या बंडखोर बाया त्यांच्याकडे कशा पाहातात, हा प्रश्न उपस्थित होतो. मला वाटतं, विजयाबाई हटवादीपणं टाळलेल्या शक्यतांकडे पहाण्याची एक नवी नजर देतात. घटस्फोटानं पोरीचा संसार उधळू नये म्हणून शक्य तितक्या पद्धतीनं समजावणाऱ्या आईच्या भूमिकेत त्या असतात. आणि तो टाळता आला नाहीच, तर त्यांना न रुचलेल्या निर्णयानंतरही लेकीचा त्रास कमी करण्यासाठी समर्थपणे तिच्या पाठीशी उभ्या राहातात. मानवी नातेसंबंधांना विद्रुपाची झालर लागू नये, याची काळजी घेत राहतात. जीवनसंघर्षातलं अटळ एकाकीपण त्या नाकारत नाहीत. त्यांच्या कथाविष्कारातनं ते नित्यानं समोर येतंच; पण या एकाकीपणाशी गेला अर्धा दशकभर प्रत्येक स्तरातील बाई जोडली गेली आहे. त्यातनं एका सकारात्मक संवादालाही नक्कीच सुरुवात झाली असेल. सोशल मीडियाच्या युगात लिहिणारे मशरूमसारखे उगवतात आणि त्याच वेगानं मावळूनही जातात. या जीवनओघात अनुभवांची व्यापकता वाढत असली तरी सातत्य आणि सचोटीला ग्रहण लागलंय. संवादाच्या अतिरेकानं अनेकदा थकवा येतो. कसदार लिहिणारेही या प्रवाहात स्वत:चा रस्ता हरवतात. अशा वेळी साठ वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या विजयाबाई एखाद्या मिथकासारख्या वाटायला लागतात. प्रखर समाजभानाचा आवेश घेत त्या प्रचारकी होत नाहीत. आपल्या आकलनाला शब्दरूप देऊन तत्कालीन समाजाचं आलेखन करत राहातात. म्हणूनच विजयाबार्इंची कथा मराठी माणसाच्या साठ वर्षांतल्या स्थित्यंतराचा लेखाजोखा मांडणारा दस्तावेज आहे. ... त्या स्थित्यंतराचा भाग असणारी प्रत्येक बाई विजयाबाईंच्या कथांमध्ये स्वत:ला शोधू शकते. त्यात मी आणि माझ्यासारख्या अनेकजणी आहेत.
 
(लेखिका मेहता पब्लिशिंग हाऊसच्या संपादक आहेत.yojananil@gmail.com )