शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

इस दिल से तेरी याद भुलाई नहीं जाती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2023 19:06 IST

चित्रपट संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांना विजय नाफडे हे नाव चांगलेच परिचयाचे आहे. जुनी गाणी, जुने संगीत यांचं अजब वेड असलेल्या नाफडे यांनी नोकरी सांभाळून दुर्मीळ चित्रपट गीतांचे रेकॉर्ड संग्रह करण्याचा छंद जोपासला. बुधवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी त्यांचे मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या आठवणींना हा उजाळा...

- संजय मेश्राम, पुणे

सकाळी सकाळी व्हाट्स अपवर मेसेज आला. विजय नाफडे यांचं नाव दिसलं. मन आनंदून गेलं. मागच्या वर्षी जूनमध्ये तब्बल २४ वर्षांच्या खंडांनंतर त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधता आला. यासाठी चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांची मदत झाली. वीस मिनिटं बोलणं झालं. वयानुसार त्यांच्या स्मृती अंधुक झाल्या होत्या. नंतर काही दिवस मेसेजचे आदानप्रदान झाले. मागील वर्षभरात पुन्हा खंड पडला. 

विजय नाफडे रुबाबदार, उंचपुरे व्यक्तिमत्त्व. हिंदी चित्रपट संगीताचे दर्दी आणि संग्राहक. चित्रपटात येऊ न शकलेल्या गाण्यांच्या आणि कुठंही विक्रीसाठी उपलब्ध नसलेल्या गाण्यांच्या हजारो रेकॉर्ड त्यांनी वेळोवेळी जमवल्या. कुणी सांगितलं, की कोलकात्याच्या जुन्या बाजारात काही दुर्मीळ रेकॉर्डस् आल्या आहेत... कळायला उशीर तर स्वारी चालली कोलकात्याला. रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाल्यावर पत्नीच्या नोकरीनिमित्त काही वर्षे नागपूरला बजाजनगरमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. वर्ष साधारण १९९७-९८. त्या काळात त्यांचा  सहवास लाभला. 'लोकमत'च्या रविवारच्या 'साहित्य जत्रा' पुरवणीत त्यांचं 'यादें' नावाचं सदर सुरू झालं होतं. त्यापूर्वी 'लोकसत्ता'च्या 'रंगतरंग' पुरवणीत त्यांचे बरेच लेख वाचले होते. काही आजही संग्रही आहेत.मागील वर्षी म्हणजे २८ जून २०२२ रोजी त्यांच्याशी बरंच बोलणं झालं होतं. माझं नाव सांगितलं, काही आठवणी सांगितल्या.  ते म्हणाले, हे बघ. आज माझं वय आहे ८३. मागे २०१५ मध्ये पक्षाघात झाला. तेव्हापासून समरणशक्ती चांगली राहिली नाही. इतक्या दिवसांनी तू आठवण ठेवून फोन केला आहे, यापेक्षा काय हवं? पण मला काही आठवत नाही, काय करू! तू ज्या आठवणी सांगत आहेस, जे चित्र उभे केलंस ते ऐकून फार छान वाटतं. धन्यवाद!

ते सांगू लागले,  तब्येत चांगली आहे. चालताना थोडा दम लागतो.  काठी घेऊन चालावं लागतं. स्मृतींनी दगा दिला असला तरी छंद मात्र तसाच आहे. तो अखेरपर्यंत तसाच राहणार. मी रेकॉर्ड नाही विसरलो. अडीच हजार रेकॉर्ड घेऊन आलो. मला रेकॉर्डचे नंबर पाठ होते, आजही बरेच पाठ आहेत.'इस दिल से तेरी याद भुलाई नहीं जाती... हे  म. रफी यांचं गैरफिल्मी गीत पहिल्यांदा तुमच्याकडंच ऐकलं होतं, ही आठवण  त्यांना सांगितली. त्यांना छान वाटलं. ते म्हणाले, रफीला जाऊन ३० वर्षे झाली, तेव्हा आम्ही याच शीर्षकाचा म्हणजे 'इस दिल से 'तेरी याद...' हा आगळावेगळा कार्यक्रम सादर केला होता. यात रफीची आयुष्यातली पहिली ३० गाणी आम्ही निवडली होती. रसिकांना तो खूप आवडला होता.

'लोकमत' मध्ये संपादक कमलाकर धारप यांनी नाफडे यांचा फोन नंबर दिला आणि त्यांच्याकडून लेख घेऊन ये, म्हणून सांगितलं. माझ्यासाठी हे आवडीचं काम होतं. कारण यानिमित्त नाफडे यांच्याशी प्रत्यक्ष ओळख होणार होती. चांगली गट्टी जमली. पुढं अधूनमधून भेटायला जाऊ लागलो. बजाजनगरला चित्रकार आणि पर्णचित्र कलावंत सुभाष पटले (आता सुभाष तुलसीता), दूरदर्शनच्या अधिकारी प्रतिभा पांडे, आकाशवाणीच्या कुमुद कुकरेजा हे आप्त राहत असल्यानं या भागाला दर दोन- चार दिवसांत चक्कर व्हायचीच. यात आता भर पडली ती नाफडे यांच्या '५५, बजाजनगर' या घराची.

एका संध्याकाळी 'रंगधून' चा सहकारी अमन सोनटक्के आणि मी त्यांच्याकडे बसलो होतो. ही खरंच यादगार संध्या होती.  डायरीत तारखेची नोंद आहे- गुरुवार, दि. २२ जानेवारी १९९८. आमच्या गप्पा रंगायला सुरुवात झाली. त्यात लताचा स्वभाव, रफीच्या काही आठवणी, मुकेश, तलत आदींचे किस्से... कितीतरी अनुभव. मी रफीच्या मराठी गाण्यांविषयी बोललो. एका गीतात , 'अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा...' हे ऐकताना 'बदन पे सितारे लपेटे हुए...' या चालीची झलक आहे, हे सांगितलं. त्यांना हे निरीक्षण आवडलं. त्यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, लतादीदीला हवी असणारी माझ्याकडील तिचीच दोन दुर्मीळ गाणी मी तिला टेप करून दिली. कॅसेटचे २३ रुपये देईन, असं ती म्हणाली होती. अद्याप तिनं ते दिले नाहीत... अर्थात ही लाडिक तक्रार होती.

दुसरा किस्सा. एकदा हृदयनाथ मंगेशकर त्यांच्याकडे आले होते. नाफडेंनी त्यांना फार  जुनं,  'दिवाना' मधील एक गाणं ऐकवलं. हृदयनाथ म्हणाले, " काय हा आवाज! अगदीच... आवाज परिपक्व वाटत नाही." यावर नाफडे यांनी मंदपणे हसत सांगितलं," हा आवाज आहे, हृदयनाथ मंगेशकर यांचा. अगदी सुरुवातीचा!" दरम्यान चहा आला. कप ओठांकडं नेणार तेवढ्यात ते काही तरी रंजक सांगायचे. पुन्हा कप खाली. त्यांनी हॉलमधून आतील खोलीत यायला सांगितलं. ज्या खोलीत आम्ही प्रवेश केला, ती खोली... क्या बात! संगीत ऐकण्यासाठी विशेष खोली होती ती. जणू आकाशवाणीचा स्टुडिओ. एकॉस्टिकयुक्त. खाली अंथरलेला लाल गालिचा. कपाटात अनेक दुर्मीळ ऑडिओ- व्हिडीओ कॅसेट्स, एलपी रेकॉर्ड्स, अत्याधुनिक टेप रेकॉर्डर, संग्रहातील गाण्यांच्या सुचीचे दोन मोठे खंड, गुलाम महंमद (संगीतकार -पाकीजा) यांचा छोटासा सुंदर ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो, अगदी आजचा ताजा अंक वाटावा असा १९३६ चा ' फिल्म इंडिया' चा अंक. बाबूभाई पटेल त्याचे संपादक. या विषयावरील हे पहिलेच नियतकालिक. डोळ्यांचं पारणं फिटलं. आम्ही जुने अंक आणि गीतांची माहिती बघत होतो. त्यांनी एक मासिक दाखवलं. त्याच्या मुखपृष्ठावर संगीतकार सी. रामचंद्र आणि विजय नाफडे दिलखुलास हसून एकमेकांना मिठी  मारतात, तो क्षण टिपला होता. नाफडे म्हणाले, आता कधी येतील असे क्षण!

त्यांनी एक खूप जुना फोटो दाखवला. त्यांच्या चार-पाच वर्षे वयाच्या मुलीचा वाढदिवस होता. तिच्या वयाची आठ-दहा मुलं होती. शुभेच्छा द्यायला आणखी कोण आलं होतं, सांगू? गायक मुकेश! नाफडे यांनी मला आवडीचे गायक विचारले. मी म्हणालो, सहगल आणि रफी. त्यांनी विचारलं, लता आवडते की नाही? मी म्हणालो, लतादीदी आणि तलतचाही नंबर या दोघांसोबतच येतो. खरं तर सर्वच आवडतात. असा क्रम लावणं योग्य वाटत नाही. ते उठून उभे राहिले. ग्रामोफोनवर एक रेकॉर्ड लावली. ती गोल गोल फिरायला लागली. भिंतीच्या दोन कोपऱ्यात दोन मोठे स्पीकर. साधारण दहा फूट उंचीवर. खोलीत डोळ्यांना सुसह्य वाटणारा प्रकाश. ...आणि गाणं सुरू झालं.

किस दिल से ये कहते हो तुम्हें दिल से भुला दूँ हर रोज़ तो ये दुनिया बसाई नहीं जातीइस दिल से तेरी याद भुलाई नहीं जाती...

खरंच अप्रतिम गाणं. ग्रेट म. रफी ह्रदयापासून गात होते.  नाफडे हे मागे पुढं होणाऱ्या आरामखुर्चीवर टेकून बसले. डोळे मिटून गाणं ऐकत होते. गाणं खूप जवळचं वाटलं. तेवढ्यातच त्यांना मद्रासवरून कुण्या चारी नावाच्या माणसाचा फोन आला. त्याला तलतची काही गाणी रेकॉर्ड करून हवी होती. काही वेळानं मुंबईवरून त्यांच्या एका मित्राचा फोन आला. त्याला त्यांनी सांगितलं, अरे माझ्याकडे संजय मेश्राम बसला आहे. 'लोकमत'ला आहे. केवळ लताची बांगला भाषेतील गाणी ऐकण्यासाठी हा ती भाषा शिकला आहे. ऑ?  हे तर मलाही ठाऊक नव्हतं. गंमतच वाटली. खरं तर बांगला शिकून घेण्यामागं तेच एक कारण नव्हतं. मात्र माझ्याविषयी असलेलं प्रेमच त्यांनी यातून व्यक्त केलं.

मी नाफडे यांना त्यांच्याच काही लेखांची याद करून दिली. त्यावर त्यांनीही दाद दिली. म्हणाले, तुमची मेमरी खूपच स्ट्रॉंग आहे. तलतला देवनागरी लिपी येत नाही, मुकेशने फक्त ९०० (ते म्हणाले, ९१०) गाणी गायली, ही मी सांगितलेली जुजबी माहिती ऐकून त्यांनी पुन्हा हसून दाद दिली. नितीन मुकेशसोबत झालेल्या चर्चेविषयी त्यांनी सांगितलं. एकदा दुपारी कळलं की मखमली आवाज लाभलेले गायक तलत महमूद यांचं निधन झालं. दिवस होता- शनिवार, दि. ९ मे १९९८. तो ब्रेकिंग न्यूजचा जमाना नव्हता. नाफडे यांना फोन लावला. वाईट बातमी कळवली. ते म्हणाले, होय. आताच कळलं मला. मी त्याच दुःखात आहे.

एकदा ज्येष्ठ चित्रकार अरुण मोरघडेही सोबत होते. छान भेट झाली होती. नाफडे यांच्या घरात एक मोठा झब्बूदार कुत्रा होता. दारातूनच मोठ्यानं भुंकायचा. तो मोरघडे यांच्याकडे झेपावला. त्यानं मोरघडे यांची पॅन्ट पकडली. यात हलकासा दात लागला. त्यांनी शंकरनगरच्या एका  हॉस्पिटलला फोन करून आम्हाला तिथं पाठवलं. इंजेक्शन आणि औषध घेतलं. पुढं प्रत्येक वेळी नाफडे या घटनेविषयी खंत व्यक्त करायचे. मोरघडे यांची आठवण काढायचे. मागच्या वेळी फोनवर बोलणं झालं, तेव्हा नाफडे म्हणाले होते, तुझ्यासारखे लोक आठवण ठेवतात, बरं वाटतं. बेळगावला नक्की ये. तिथं मी तुझं अधिक मोकळेपणानं स्वागत करू शकेन. आपण २०-२५ वर्षे पाठीमागे जाऊया! तुझं नाव मी डायरीत लिहून ठेवतो. माझ्याकडं परमानंट राहील.

पण...

आज आलेला मेसेज विजय नाफडे यांच्या मोबाइलवरून आलेला असला, तरी त्यांनी पाठवला नव्हता. तो त्यांच्याविषयीचा होता. त्यांच्या कुटुंबीयांनी पाठवला होता. त्यात नाफडे यांचं छायाचित्र होतं. त्याखाली लिहिलं होतं- ज्योत अनंतात विलीन झाली! का.......य??? धक्का! हादरा!! कोसळलो!!!सोबत, मंगळवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबई येथे आयोजित प्रार्थना सभेची माहिती होती. नाफडे यांनी बुधवार, दि. ४ ऑक्टोबर रोजीच जगाला अलविदा म्हटलं होतं. मला तेव्हा कळलंच नाही.

माझी वाटही न पाहता, भेटही न घेता नाफडे यांनी कायमचा निरोप घेतला.   नाफडे यांची आठवण आली की रफीचं ते गाणं आठवणार; ते गाणं आठवलं की नाफडे यांची आठवण येणार.

ये प्यार की दौलत है लुटाई नहीं जाती इस दिल से तेरी याद भुलाई नहीं जाती...

 

टॅग्स :cinemaसिनेमा