शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

..आता तोडू नका, जोडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 06:05 IST

तुम्ही सूर्योदय आहात, हे सिद्ध करण्याचे आव्हान, संधी आणि जबाबदारीही तुमच्याकडे आहे. .ती योग्य प्रकारे  पार पाडण्यासाठी मदत म्हणून हा जनतेचा जाहीरनामा! तो तुम्हाला मदतरूप ठरो.  पाच वर्षांसाठी शुभेच्छा!

ठळक मुद्देनव्या सरकारचे अभिनंदन आणि अपेक्षा !

- डॉ. अभय बंग

प्रिय नव्या सरकारा, अभूतपूर्व विजयासाठी अभिनंदन!पुढील पाच वर्षे तुम्ही हा देश चालविणार आहात. तुम्हाला मदत व्हावी या हेतुने हा ‘जनतेचा जाहीरनामा’ पाठवतो आहे. हा जाहीरनामा निवडून येण्यासाठी नाही तर निवडून आलेल्यांसाठी असल्याने माझी कार्यक्रमपत्रिका अतिशय निवडक आहे.1) पंचवीस टक्के भानदेशाच्या केवळ पंचवीस टक्के लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला आहे हे विसरू नका. 135 कोटींपैकी दोनतृतीयांश मतदार आहेत, त्यापैकी 2/3 मतदान करतात, त्यापैकी निम्म्यांनी तुम्हाला मत दिले. म्हणजे 75 टक्के लोकांनी तुम्हाला मत दिलेले नाही. हे ‘अल्पसंख्य’ भान कायम असू द्या. विनम्रता येईल.2) देश तोडू नका, जोडादेश कसा तुटतो? - प्रथम हृदये तुटतात, मग समाज तुटतो, शेवटी देश तुटतो. भारताची फाळणी, नंतर पाकिस्तानच्या विभाजनापासून युरोपच्या ब्रेक्झिटपर्यंत हाच क्रम दिसतो. आपल्याच शेजार्‍यांना व देशवासीयांना परकीय किंवा शत्रू मानल्याने देश तुटतो. ज्यांना आम्ही परकीय ठरवलं, शत्रू ठरवलं, ‘मॉबलिंच’ केलं किंवा ज्यांच्यावर सैन्य घातलं त्यांची यादी वाढत चालली आहे. सर्व मुसलमान देशद्रोही, सर्व दलित धर्मद्रोही, सर्व आदिवासी नक्षलवादी, सर्व काश्मिरी फुटीर, सर्व उत्तर-पूर्व निवासी परकीय. यात वाढ होऊ शकते. सर्व द्रविड हे अनार्य. मग ‘देश’ म्हणून उरतो कोण? याला देशप्रेम म्हणावे की देशद्रोह? त्यामुळे भारताचे दोन नव्हे, शंभर तुकडे पडतील. मनाचे व समाजाचे तर पडलेच आहेत. ही दिशा थांबवा. मुहम्मदअली जिनांचा पडसाद तुम्ही होऊ नका. मला हा भारत देश अख्खा एकत्र हवा आहे. केवळ त्याचा एक धर्मीय तुकडा नको आहे.3) गांधी की गोडसे?भगवी वस्रं घातलेल्या व भाजपची अधिकृत उमेदवारी मिळालेल्या प्रज्ञा ठाकूर जे जे बोलल्या ते भाजपला मान्य नाही हे मी कसं मान्य करावं? मोदी म्हणाले, ‘‘माझं हृदय त्यांना क्षमा करणार नाही.’’ बस्स, एवढचं? पण त्यांना क्षमा करा असं कोण म्हणतंय? तुमचं कर्तव्य आहे - त्यांना शिक्षा करा. ज्या कारणांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकेकाळी हिंदू महासभेपासून फारकत घेतली, सावरकर आणि गोडसेंना संघापासून दूर लोटलं त्यांचाच वैचारिक व हिंसक वारसा मिरवणार्‍या प्रज्ञा ठाकुरांना तुम्ही डोक्यावर घेता? ही गोळी गोडसेने गांधीवर चालवलेली नाही, ही प्रज्ञा ठाकुरांनी देशावर चालवली आहे. सावरकर-गोडसे-पुरोहित-उपाध्याय-ठाकूर यांचा बॉम्बस्फोट व पिस्तूल मार्ग भारतानेच नव्हे मानवतेने केव्हाच नाकारला आहे. त्या अतिरेकी मार्गाला राजमान्यता देऊ नका.हे झाले काय करू नका. काय प्राथमिकतेने करा?4) रोजगारयुक्त विकास व शिक्षणभारताचा वार्षिक विकासदर सात ते आठ टक्के आहे असं नीति-आयोग म्हणतं. भारतात बेरोजगारीदेखील सर्वोच्च पातळीवर, सात ते आठ टक्के, आहे असं NSSO म्हणतं. हा मोठा विरोधाभास  आहे. वाढता विकास, वाढती श्रीमंतीपण आकुंचित रोजगार-म्हणजे समृद्धीचे कमी वाटेकरी. रोजगार-विहीन विकास होतो आहे. मग हा विकास कुणाचा? त्याचे वाटेकरी केवळ दहा-वीस टक्के? मग या आठ कोटी शिक्षित बेरोजगारांचं काय करणार? सध्या त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणे व पानठेले चालविणे हे मुख्य व्यवसाय आहेत. उरलेले कोणत्या तरी सेनेत भरती होतात. रिकामे हात व रिकामी टाळकी ही अतिरेकी विचारांसाठी सवरेत्तम जमीन आहे. त्यांना कोणी तरी कल्पित शत्रू दाखवला व ‘हल्लाबोल’ म्हटलं की, रिकाम्या टाळक्यांची टोळकी होतात. हातात कुण्या रंगाचे झेंडे येतात. दगड, पिस्तूल, बॉम्ब्स येतात.शिवाय एकविसाव्या शतकात रोजगाराचं स्वरूपच बदलते आहे. शरीरश्रम करणार्‍या अकुशल कामगाराला शंभर वर्षांपूर्वी यंत्रांनी निकामी केले. आता संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबो यामुळे स्वत:ला बुद्धिवान, सुशिक्षित व म्हणून सुरक्षित समजणारे व्यवसाय माणसांच्या हातातून जाणार आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केलेल्या अंदाजानुसार वर्ष 2050पर्यंत खालील व्यवसाय कमी किंवा नाहीसे होतील. ड्रायव्हर जातील, ड्रायव्हरलेस कार येतील. ऑफिस सेक्रेटरी व क्लर्क जातील, मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रोग्राम ते काम करेल. शिक्षक जातील, ऑनलाइन कोर्सेस व डिस्टन्स लर्निंग त्यांची जागा घेतील. डॉक्टर्स जातील, हॅण्ड हेल्ड डिव्हायसेस व कम्प्युटर प्रोग्राम रोगनिदान करतील, उपचार सांगतील.मग या आठ कोटी बेरोजगारांचं व दरवर्षी भारतात जन्माला येणार्‍या अडीच कोटी नव्या माणसांचं करायचं काय? यंत्र किंवा संगणक करू शकत नाहीत अशा कामांचं व कौशल्यांचं शिक्षण त्यांना द्यावं लागेल. तशी शिक्षणव्यवस्था देणे व रोजगारयुक्त विकास ही नव्या सरकारची प्राथमिकता असावी.5) शेती-पाणी-निसर्गशेतकरी कर्जबाजारी कसा होणार नाही? शेती नफ्यात कशी येईल? मराठवाडा व विदर्भासारखं जल-दुर्भिक्ष्य देशातून कायमचं कसं दूर होईल? टँकरमुक्ती कशी मिळेल? दिल्ली ते चंद्रपूरपर्यंतचं हवा-प्रदूषण कसं कमी होईल? वाढत्या तापमानाच्या विविध दुष्परिणामांना कसे तोंड देणार? थोडक्यात ‘जल-जंगल-जमीन-जहाँ’ कसे वाचवणार? यासाठी स्थानिक व वैश्विक कार्यक्रम आखावा लागेल.6) दूरदृष्टीचे मानवतावादी नेतृत्ववरील आव्हाने पेलायला दूरदृष्टीचे व व्यापक हृदयाचे नेते आता भारतातच नव्हे जागतिक पटलावरही दिसत नाहीत. द्वेषाची उकळी फोडणारे बुश व ट्रम्प, खुनाचं साधन वापरणारे पुतिन व सौदी प्रिन्स, युरोप तोडायला निघालेल्या थेरेसा मे, चीनवरचा अजगरी विळखा वाढवून विश्वाला विळख्यात गुदमरवू इच्छिणारे क्षी जिनपिंग. सर्वत्र टॉक्सिक नेते आहेत. या निवडणुकीत आम्हाला घडलेलं भारतीय नेतृत्वाचं दर्शन फारसं सकारात्मक व आश्वासक नाही.इतिहासकार कार्लाईल असं म्हणाला की, खुज्या माणसांच्या सावल्या लांब लांब पडायला लागल्या की, समजा सूर्यास्ताची वेळ आली आहे.आज प्रश्न वैश्विक, सावल्या व कटआउट लांब लांब; पण जगभर नेतृत्व खुज्या उंचीचे आहे.येणारे नवे सरकार नवे नेतृत्व याला अपवाद ठरो. आज नाही तर उद्या ते होईल अशी मला खात्री आहे. कारण लांब सावल्या सूर्योदयाच्या वेळीदेखील पडतात.तुम्ही सूर्योदय हे सिद्ध करण्याचे आव्हान व संधी तुम्हाला आहे. ती तुम्ही योग्य प्रकारे पार पाडावी म्हणून हा ‘काय करा, काय करू नका’, असा जनतेचा जाहीरनामा. तो तुम्हाला मदतरूप ठरो. पाच वर्षांसाठी शुभेच्छा!पुन्हा 2024 मध्ये आपण भेटूच !(लेखक ज्येष्ठ समाजसेवक आहेत.)

search.gad@gmail.com