शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

घुबडे आणि अंधश्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 06:05 IST

घुबडाविषयी अनेक गैरसमजुती आहेत. ते अशुभ तर समजले जातेच; पण त्याला भूत-पिशाच्चही मानले जाते. चेटूक किंवा वशीकरण विद्येत घुबडे प्रवीण असतात, अशीही समजूत आहे. त्यामुळे घुबडे झपाट्याने नष्ट होत आहेत.

ठळक मुद्देअनेक सस्तन प्राणी, कीटक व इतर मंडळीदेखील रात्री जागे होतात आणि दिवसा झोपतात. पण बिचारे घुबड मात्र गैरसमजुतीचा बळी ठरलेले आहेत.

- डॉ. सतीश पांडेघुबडांविषयीचे अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पिंगोरी (ता. पुरंदर, जिल्हा पुणे) येथे देशातील पहिला ‘उलूक उत्सव’ २९ व ३० नोव्हेंबर रोजी झाला. त्यानिमित्त...काळोखात चांदराती काळजाचा थरकाप करणारा गंभीर, आसमंत चिरत दूरवर जाणारा ध्वनी ऐकला की घुबडाची ओळख पटते. परिसरात घुबड आहे याची खात्री मनोमन होते. उडताना पंखांचा जराही आवाज न करणारे घुबड कौतुकापेक्षा भीती, गैरसमज व अंधश्रद्धेच्या फासातच अडकलेले आहे.जगभर घुबडांबद्दल अंधविश्वास दिसतात. शास्त्रीय अभ्यासातून मात्र जी माहिती उपलब्ध झाली आहे ती अचंबित करून टाकणारी आहे. अंधश्रद्धांपासून घुबडांना मुक्त करण्यासाठी शास्राचाच आधार घेणे मात्र पुरेसे नाही. शास्रीय निकष सामान्य जनमाणसापर्यंत जोपर्यंत साध्या सोप्या भाषेत पोहोचणार नाहीत तोपर्यंत घुबड खऱ्याअर्थाने मुक्त होणार नाही. रूढी पुरातन असतात. त्यांच्यामधील गैरसमजुतींच्या शृंखला अचानकपणे तुटण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. करवतीने लाकुड कापताना सुरुवातीला वेळ लागतो; पण मग एका क्षणात अचानक तुटते - काहीसे तसेच. घुबडांबाबत समाजात रूढ असणाºया अंधश्रद्धा आपण एक एक करून बघूयात व त्यामागची रहस्यमय शास्रीय कारणे उकलून अंधविश्वासाचा पडदा हलके हलके दूर सारूयात.घुबड म्हणजे भूत-पिशाच्च अशी समजूत जगभर आहे. अर्थातच ही खोटी आहे. कारण घुबड एक पक्षी आहे. दोन पाय व पिसे असणारा प्राणी म्हणजे पक्षी. घुबड इतर पक्ष्यांप्रमाणे घरट्यात अंडी घालते, त्यातून पिले येतात, हळूहळू ती वाढतात व पिसे आल्यावर उडतात आणि पाय, नखे व चोच वापरून दृष्टी व कानांचा उपयोग करून शिकार करतात; पण हे सारे अंधारात रात्रीच्या मिट्ट काळोखात. अनेक सस्तन प्राणी, कीटक व इतर मंडळीदेखील रात्री जागे होतात आणि दिवसा झोपतात. पण बिचारे घुबड मात्र गैरसमजुतीचा बळी ठरलेले आहेत.घुबडांचे दोन्ही डोळे माणसांप्रमाणे समोर असतात. इतर पक्ष्यांचे डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूने असतात. पुढे असणाºया डोळ्यांच्या वरच्या व खालच्या दोन्ही पापण्या घुबडांना मिटता येतात. म्हणूनच विजेचा शोध लागलेला नसताना, कंदिलाच्या अंधुक प्रकाशात किंवा चंद्र प्रकाशात गर्द झाडाच्या पर्णराजीतून चेहेरा हलवणारे घुबड रात्रीच्या वेळी पाहिल्यावर आपल्या पूर्वजांना भूत वाटले असेल तर त्यात नवल ते काय? दुसºयाच क्षणी माणसाची चाहूल लागल्यावर घुबडाने पंख पसरून पोबारा केला असणार. यामुळे दुसºया अंधश्रद्धेचा जन्म झाला.पंखांचा आवाज न करता घुबडे उडतात. त्यासाठी त्यांची पिसे अतिशय मऊ असतात व पिसांच्या कडांना करवतीसारखी झालर असते. वारा त्यातून सहज निघून गेल्याने पिसांचा आवाज होत नाही. झाडीत दिसणारा मानवी चेहेरा अचानक अंतर्धान झालेला, अदृश्य झालेला याची देही याची डोळा बघून माणसाची बोबडी वळते. ज्याचे आकलन होत नाही, त्याची भीती वाटते. म्हणून घुबड निश्चितपणे मानवी दिसणारे असले तरी अमानवी शक्तींनी युक्त असणारी हडळ-भूत आहे याची जणू खात्री पूर्वीच्या लोकांना पटली असावी. एखाद्या गोष्टीतील भुताप्रमाणे चंद्रप्रकाशात पांढरी आकृती अलगद तरंगत झाडावरून निघून अंधारात अंतर्धान झाली तर साधा भोळा माणूस साहजिकच घाबरेल.चेटूक विद्या किंवा वशीकरण विद्येत घुबडे प्रवीण असतात हा अजून एक गैरसमज आहे. माणसाची मान व डोके सुमारे १८० ते १९० अंश कोनात दोन्ही बाजूंना फिरते. पण घुबडांच्या मानेतील वैशिष्ट्यपूर्ण सांध्यांमुळे त्यांची मान गर्रकन तिनशेपेक्षा अधिक क्वचित पूर्ण गोलाकारदेखील सहज व वेगाने फिरते. ही झाली आडव्या रेषेतील हालचाल; पण घुबड सहजपणे आपला हनवटीकडला भाग क्षणार्धात डोक्याच्या बाजूला फिरवून माथा हनुवटीकडे आणून शरीर सरळ ठेवून फक्त डोक्याचेच शीर्षासन करू शकते. रात्री स्मशानभूमीजवळ जर हा चमत्कार पाहिला तर माणसाने घुबडाला भुतांचा शिक्का का दिला, हे कळू शकते.अर्थात यामागे पिशाच्च सामर्थ्य नसून शरीरातील बदल आहेत. मान गोलाकार फिरवलेली असताना मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडू नये म्हणून त्यांच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये झडपा असतात. त्यामुळे मान फिरवताना ती झाडावरून खाली पडत नाहीत. त्यांना चक्कर येत नाही.दुर्दैवाने घुबडांना कर्णपिशाच्च समजतात. हे खरे आहे की त्यांची श्रवणशक्ती माणसापेक्षा खूपच प्रगत आहे. आवाजाच्या उगमाचा अचूक वेध घुबडांना घेता येतो, कारण त्यांचे दोन्ही कान माणसांप्रमाणे समान अंतरावर नसतात. त्यांच्या डोक्यावर असणारी, कानाची पाळी नसणारी कर्णछिद्रे एक पुढे व एक मागे एक वर व एक खाली तसेच त्यांंचे कोनदेखील किंचित वेगळे असतात. म्हणून आसमंतातील कुठलाही आवाज सूक्ष्म फरकाने त्यांचे दोन्ही कान टिपतात. मेंदूतील प्रगत कॉम्प्युटरच्या द्वारे घुबडांना आवाजाच्या ठिकाणाचा शब्दवेध करता येतो. चुकचुकणारे उंदीर पकडता येतात. दृष्टीपटलातील सूक्ष्म बदलांद्वारे व मोठाल्या डोळ्यांमुळे रात्री त्यांना अतितील प्रकाशात तारकांच्या अंधुक उजेडात उत्तम दिसते. बर्फाच्या दुलईखाली वावरणारे, चुकचुकणारे अदृश्य उंदीर घुबडे बर्फात पाय घालून मिळवू शकतात. पण म्हणून घुबडे कर्णपिशाच्च ठरत नाहीत. त्यांना त्या क्षणाला काय चालले आहे हे उत्तमरीत्या उमजते; पण भविष्याचा ठाव घेण्याची शक्ती त्यांना आपण बहाल करून बदनाम करणे किंवा गौरवणे निश्चितपणे चुकीचे आहे.घुबडांबद्दल अजून एक गैरसमजूत आहे. घुबड जर घरावर बसले किंवा त्याचे दर्शन झाले तर घरातील लोकांवर अरिष्ट येते, कदाचित कोणाचा मृत्यूदेखील होतो अशी एक अंधश्रद्धा प्रचलित आहे. म्हणून घुबडांना ‘मढे पाखरू’देखील म्हणतात. मोठ्या आकाराच्या घुबडांना पुरातन वृक्षातील ढोल्या अंडी घालण्यासाठी लागतात. बेभान वृक्षतोड करणाºया समाजाने स्मशानातील झाडे मात्र जपली. बिचारी घुबडे तेथे आश्रय घेऊ लागली. तेथे कोणाचा त्रास नसतो. पण अंत्यविधीसाठी स्मशानात जाणाºया माणसांना तेथे कायमच घुबाडाचे दर्शन घडू लागल्याने मृत्यू आणि घुबड यांचा गैरसमज दृढ झाला.घुबडाला जर दगड मारला तर घुबड दगड झेलते व दूर जाऊन दगड घासते. मग दगड झिजतो तसा माणूस खंगतो असा एक समज समाजात आहे. ही अंधश्रद्धा एका वेगळ्या अर्थाने खरी आहे ! घुबडाला वन्यजीव संरक्षण कायद्याने (१९७२) संरक्षण दिले आहे. म्हणून घुबडाला दगड मारला तर वनखात्याचे अधिकारी माणसाला पकडतात, तुरुंगात घालतात आणि माणूस खंगतो!घुबडांविषयीच्या गैरसमजुती जोपर्यंत नष्ट होत नाहीत, तोपर्यंत घुबडांवरील गंडांतर संपणार नाही. त्यासाठी घुबडांविषयीची शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.(लेखक इला फाउण्डेशनचे संचालक आहेत.)

manthan@lokmat.com