शेतीशाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:04+5:30

भारत हा शेतीप्रधान देश आहे. बहुसंख्य लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. तरीही शेती तोट्याची, आतबट्टय़ाची का? शेतकर्‍यांचे प्रo्न, त्यांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन,  त्यांना सोबत घेऊनच सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीशाळा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सध्या 14 हजार 788 शेतीशाळा सुरू आहेत.  त्यामाध्यमातून शेतीची उत्पादकता वाढते आहे आणि शेतकर्‍यांनाही आत्मभान येते आहे.

Shetishala - New initiative by government for the farmers | शेतीशाळा!

शेतीशाळा!

Next
ठळक मुद्देमाझी शेती. मीच शहाणा होवून कसणार..

- विर्श्वास पाटील

‘आम्ही आजपर्यंत अशी शेती केली बघा, की पोत्यातून धान्य काढून शेतात टोकणत असू. बियाणं बदलायचं असतं, हे आमच्या ध्यानीमनीही कवा आलं नाही. नात्यात मुलगी दिली तरी मुलं चांगली निपजत नाहीत, हे पक्कं माहीत होतं; परंतु तेच-तेच बियाणं वापरून पीक चांगलं येत नाही, हे काय कवा कळलं नाही. आम्ही शेतीशाळेत जाऊ लागलो आणि बीजप्रक्रिया शिकलो.. त्याचा चांगला फायदा झाला आणि आमचं सोयाबीन, भुईमुगाचं उत्पादन वाढलं..’ 
- कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील शेतकरी महिला घडाघड बोलत होत्या. जयर्शी पाटील, इंदुबाई पाटील, भारती पाटील, संगीता पाटील, शीला मगदूम, मंगल पाटील, सुवर्णा पाटील, वंदना पाटील अशी त्यांची नावे. या सगळ्यांची जमीन कमी आहे; परंतु त्या शेतीशाळेत जातात. तेथील ज्ञानाचा स्वत:च्या शेतीसाठी चांगला उपयोग करतात. येत्या 15 नोव्हेंबरपासून त्यांची रब्बी हंगामातील हरभरा पिकाची शेतीशाळा सुरू होत आहे.
**
कोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) हे सुमारे 450 लोकवस्तीचे गाव. पारंपरिक शेती करणारे; परंतु या गावाचे रूप शेतीशाळेने बदलून गेले. गावात दोन राजकीय गट; त्यामुळे शेतकरीही गटातटांत विभागलेले. शेतीशाळेतही बसताना वेगवेगळे बसायचे; परंतु हळूहळू संवाद वाढला, तसे त्यांच्यातील गट-तट गळून पडले आणि चांगली शेती करण्यासाठी आपण राजकारण बाजूला करून एकत्र येऊया, असा शेतकर्‍यांनी निर्धार केला. त्यातूनच गावात 100 टक्के ठिबक सिंचन करण्याचा निर्णय झाला. एकरी एक लाख 16 हजार खचरून गावाने 100 एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. पूर्वी एकरी 30 टन ऊस काढणारे शेतकरी आता एकरी 60 टन ऊस उत्पादन घेत आहेत. ही सारी किमया शेतीशाळेचीच असल्याची प्रतिक्रिया गावातील प्रगतशील शेतकरी प्रदीप पाटील यांनी दिली.
**
शेतकर्‍यांच्या प्रश्नांची, अडीअडचणींची उत्तरे त्यांच्या शेतात जाऊन, त्यांना सोबत घेऊनच सोडविणे म्हणजेच राज्य शासनाच्या कृषी विभागाचा शेतीशाळा उपक्रम. तो गेली अनेक वर्षे राज्यभर राबविला जात आहे. राज्यात सध्या 14 हजार 788 शेतीशाळा सुरू आहेत. पूर्वी कृ षी विभागाची प्रशिक्षण व भेट योजना होती; परंतु नव्वदच्या दशकानंतर ती बंद केल्यानंतर शेतकर्‍यांना गावपातळीवर काही मार्गदर्शन हवे असेल तर तो पर्याय उपलब्ध नव्हता. कृषी साहाय्यक ही यंत्रणा असली तरी  त्याला एकूण गावे व त्याच्याकडील कार्यक्षेत्र यांचा विचार करता शेतकर्‍यांना प्रशिक्षित करण्यावर र्मयादा येत होती. ती कसर शेतीशाळेने भरून काढली. 
शेतकर्‍याला पुस्तकी ज्ञान, सूचना देण्यापेक्षा त्याच्या शेतात जाऊन त्याला प्रत्यक्ष नवे तंत्र समजावून सांगितले तर त्याला ते सहजरीत्या समजते, हा या शेतीशाळेचा मुख्य गाभा. तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचविण्याच्या या प्रक्रियेत प्रत्यक्ष शेतकर्‍याचाही सहभाग असतो. एका हंगामाबद्दल, एका पिकाबद्दल शेतकर्‍याला सर्वंकष माहिती दिली जाते. त्यामुळे ज्या पिकाची शेतीशाळा असेल, ते पीक किती कालावधीचे असते तेवढे दिवस या शाळा भरतात. या शाळेत किमान 30 शेतकरी असतात. राज्यात भात, कापूस, सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, ऊस आणि रब्बी हंगामातील हरभरा या पिकांच्या शेतीशाळा घेतल्या जातात. आवश्यकतेनुसार 15 दिवसांनंतर एक वर्ग व किमान सहा वर्ग घेतले जातात. एक वर्ग दोन तासांपासून ते पूर्ण दिवसभरासाठीच्या पिकानुसार घेतला जातो. सोयाबीनची उत्पादकता वाढविण्याचा वर्ग असेल तर त्याची बीजप्रक्रिया, उगवण क्षमता, रोगराईपासून संरक्षण कसे करायचे याची माहिती दिली जाते. तेच जर भाताची, शेतीची शाळा असेल तर त्यात भाताची रोपवाटिका कशी करायची येथपासून ते चांगली रोपे निवडणे, खताचे व्यवस्थापन अशी माहिती दिली जात असल्याने हे वर्ग जास्त दिवस चालतात. या काळात शेतकर्‍यांना चहा-नाष्टा दिला जातो. त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. त्यांच्या शेतीतील बदलाच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात. माझी शेती. मीच शहाणा होवून करणार हे आत्मभान देण्याचे काम शेतीशाळेतून होत आहे.
शेतीशाळेअंतर्गत एका शेतकर्‍याला साडेसात हजार रुपयांचे डेमो किट दिले जाते. शेतीशाळा म्हणजे उत्पादनवाढीची कौशल्ये व तंत्रे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन विकसित करणे होय. माणूस एकदा सायकल चालवायला शिकला की आयुष्यभर विसरत नाही; तसेच एकदा उत्तम शेतीची तंत्रे त्याने आत्मसात केली की तो त्यापासून बाजूला जात नाही, असे कोल्हापूरचे कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले. ज्या पिकाची शेतीशाळा असेल त्या पिकाचा नवीन तंत्रज्ञानानुसार प्लॉट घेतला जातो व त्याच शेतकर्‍याचा त्याच पिकाचा पारंपरिक पद्धतीने तेवढाच प्लॉट त्या गावातच घेतला जातो. माती तपासणीपासून ते पीककाढणीपर्यंतचे तंत्रज्ञान त्याला पुरविले जाते. नवीन जातीचे बियाणे, लागवड पद्धत, अन्नघटक व मूलद्रव्यांची कमतरता, पाणी कधी द्यायचे, पिकाच्या पानांवर दिसणारी लक्षणे, खुणा, त्या ओळखायच्या कशा व त्यावर काय उपाययोजना करायची येथपासून ते प्रत्यक्ष पीककाढणीपर्यंत त्याला कृषी साहाय्यकामार्फत मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे या पद्धतीने घेतलेले पीक व पारंपरिक पद्धतीने घेतलेले पीक यांतील फरक शेतकर्‍यांना शेतातच पाहायला मिळतो. शेतीला नव्या तंत्रज्ञानाची, लागवड पद्धतीची जोड दिल्यास ती फायद्याची ठरते, याचे धडे त्याला शेतीशाळेत स्वानुभवावरून मिळतात.
पूर्वी आम्ही उसासाठी तीन फुटांपेक्षा कधीच जास्त मोठी सरी सोडली नाही; परंतु शेतीशाळेत मार्गदर्शन मिळाल्यावर साडेचार फुटांची सरी सोडली व मोठय़ा सरीमध्ये कोबी, फुले अशी आंतरपिके घेतली. आम्ही स्वत: मातीपरीक्षण करून घेतले; त्यामुळे आपल्या शेतीला नेमके काय कमी आहे हे समजले. आमच्या गावामध्ये आता घर तिथे गांडूळखताचा बेड आहे. ठिबक सिंचन झाल्यामुळे शेतीचा वाफसा चांगला झाला. मातीची प्रत सुधारली. त्यामुळे शेती सुधारायची असेल तर गाव तिथे शेतीशाळा सुरू व्हायला हव्यात, असे शेतकरी प्रदीप पाटील यांनी सांगितले. महिलांचा शेतीशाळेतील प्रतिसाद व जागरूकता जास्त असते. त्या नियमितपणे येतात, ज्या सूचना केल्या जातील, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही चांगल्या पद्धतीने करीत असल्याचा अनुभव कृषी साहाय्यक जयर्शी बाटे यांनी सांगितले.
शेतीशाळेचे मुख्य चार टप्पे आहेत. पेरणीपूर्व, पेरणीवेळी, पीकवाढीच्या अवस्थेत आणि काढणी व काढणीत्ताेर व्यवस्थापन. शेतीशाळेत येणार्‍या शेतकर्‍यांना सध्या वही-पेन दिला जातो; परंतु त्यासोबतच त्यांना नवीन बियाण्यांची पाकिटे देता आली तर ते जास्त उपयुक्त ठरेल, अशी मागणी काही शेतकर्‍यांनी केली.
एकंदरितच या शेतीशाळांचा शेतकर्‍यांना चांगला उपयोग होत असून शेतकरीही त्याकडे  गांभीर्याने पाहताहेत. या शेतीशाळांतून शेतीसज्ञान नागरिक तयार होत आहेत.

शेतकर्‍यांना का हवी शेतीशाळा?
* कमी खर्चात शेती कशी करावी याचे ज्ञान.
* मित्र कीड आणि शत्रू कीड यातला फरक.
* गांडूळ खताचे बेड करण्याचे तंत्र.
* पिकांच्या बीज प्रक्रियेचे ज्ञान.
* बियाणांची निवड करण्याचे कौशल्य.
* कीडीचा बंदोबस्त कसा करायचा याचे प्रशिक्षण.
* चांगली उगवण व चांगल्या उत्पादनाचे तंत्र.
* ठिबकचे महत्व. खते व औषधेही ठिबकद्वारे देणे.
* माझी शेती. मीच शहाणा होवून करणार, पिकवणार हे आत्मभान. 

उत्पादनात किमान 20 टक्के वाढ!
राज्यात सरासरी एक हजार खातेदारांमागे एक कृषी साहाय्यक काम करतो. गावे लहान असतील तर पाच-सहा गावांसाठी एक साहाय्यक असतो. त्यामुळे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यावर र्मयादा येतात, ही अडचण शेतीशाळेच्या माध्यमातून दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतीशाळेच्या माध्यमातून छोटे-छोटे गट तयार करून त्याद्वारे शेतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न असून, त्यास राज्यभरातील शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. साधे बियाणे बदलले आणि बीजप्रक्रिया केली तरी उत्पादनात किमान 20 टक्के वाढ होते, हा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे.
- नारायण शिसोदे
कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), 
कृषी आयुक्तालय, पुणे

शेतीशाळेतील विद्यार्थी कोण?
खरीप व रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची शेतीशाळेसाठी निवड केली जाते. त्या गावांतील पेरणी होणार्‍या क्षेत्रांपैकी 70 टक्क्यांहून जास्त क्षेत्रावर ते पीक हवे. कृषी विभाग जे तंत्रज्ञान देईल ते राबविण्याची क्षमता असणार्‍या शेतकर्‍यांचीच या शेतीशाळेसाठी निवड केली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात 293 शेतीशाळा असून त्यामध्ये 7546 शेतकर्‍यांचा सहभाग आहे. एका शेतीशाळेसाठी शासन 14 हजार रुपये निधी देते. 

राज्यभरातील विभागनिहाय शेतीशाळा
ठाणे : 1180
नाशिक : 1680
पुणे : 1580
कोल्हापूर : 919
औरंगाबाद : 653
लातूर : 3508
अमरावती : 4110
नागपूर : 1158
vishwas.patil@lokmat.com
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत मुख्य बातमीदार आहेत.)

Web Title: Shetishala - New initiative by government for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.