शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

शांघाय !

By admin | Updated: March 4, 2017 15:53 IST

चायनाला शिफ्ट व्हायचंय हे कळल्यावर प्रचंड मोठा धक्का बसला. चायना कुठून आलं मध्येच?.. अमित काही कामानिमित्त २-३ वेळा तिकडे जाऊन आला होता;

 - अपर्णा वाईकर

जर्मनीत आम्ही रुळू लागलो होतो, तोच कळलं, चीनला शिफ्ट व्हायचंय ! बाप रे, मी घाबरलेच,‘शत्रू’चा देश ! कसं होणार तिकडे?शिवाय त्यांची भाषा, ‘काला अक्षर भैंस बराबर!’शांघायला आम्ही उतरलो, तेव्हा लक्षात आलं, इथली फक्त संस्कृतीच नाही, सगळंच फार भारी आहे, केवळ फ्रॅँकफर्टपेक्षाच नाहीतर अमेरिकेपेक्षाही भारी !

चायनाला शिफ्ट व्हायचंय हे कळल्यावर प्रचंड मोठा धक्का बसला. चायना कुठून आलं मध्येच?..अमित काही कामानिमित्त २-३ वेळा तिकडे जाऊन आला होता; पण तिकडे बदली? हे काय भलतंच. आता कुठे जर्मन भाषेत रुळायला लागलोय आणि हे काहीतरीच काय? पण पर्याय नव्हता.आमची जाण्याची तारीख ठरली. म्हणजे आता कितीही नको वाटत असलं तरी कामाला लागायला हवं होतं. जर्मनीत खूप छान मित्रमंडळ झालं होतं आमचं. या सगळ्या जिवाभावाच्या माणसांना सोडून जाताना खूप अवघड जाणार होतं. भारतात परत जाणार असतो तर कदाचित इतकं जास्त वाईट वाटलं नसतं. कारण ही सगळी मंडळी पुणे, मुंबई, नागपूरवाली होती. त्यामुळे तेव्हा ती भारतात येतील तेव्हा निदान वर्षातून एकदा तरी भेटायला जमलं असतं; पण आमच्याकडे चीनला कोण येणार सारखं? पॅकिंग होऊन सगळं सामान गेल्यावर माझ्या डोळ्यांतलं पाणी थांबायला तयार नव्हतं. पुन्हा एकदा नवा देश, नवी माणसं, नवी संस्कृती... आणि हा तर ‘शत्रू’चा देश... कसं होणार तिकडे? कशी वागणूक मिळेल आपल्याला?असे असंख्य प्रश्न घेऊन आम्ही शांघायला लॅण्ड झालो. खूप जड अंत:करणाने जर्मनीतल्या मित्रपरिवाराचा निरोप घेऊन विमानात बसल्यामुळे असेल कदाचित; पण या प्रवासाचा अनुभव काही चांगला नाही आला. जेवणाला भयंकर वेगळाच वास होता. काहीही खाऊ शकलो नाही. तेच अन्न आजूबाजूची चिनी माणसं अगदी चाटून पुसून खात होती. एअरपोर्टवर सामान घ्यायला थांबलो. तेव्हा सगळे चिनी एकमेकांशी जोरजोरात भांडताहेत असं वाटलं. पण जरा वेळाने लक्षात आलं की त्यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे. ते सगळे आमच्याकडे कुतूहलाने बघत होते. काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते, पण एकही अक्षर कळत नव्हतं. भोवती बऱ्याच पाट्यांवर काहीबाही लिहिलेलं होतं, पण वाचता काहीच येत नव्हतं. सगळी अक्षरं नुसती रांगोळ्यांसारखी! ‘काला अक्षर भैंस बराबर’ या म्हणीचा अर्थ त्या दिवशी अगदी व्यवस्थित कळला! बाहेर सगळे रस्ते मोठमोठे आणि स्वच्छ होते. रंगीबेरंगी दिव्यांची उधळण असलेल्या उंचच उंच इमारती सगळीकडे दिसत होत्या. एकमेकांवरून जाणारे अगणित फ्लायओव्हर्स आणि त्यांच्यावरून झर्रकन जाणाऱ्या एकापेक्षा एक भारी, ब्रॅण्डेड गाड्या बघून आमचे डोळेच दीपले!! माझ्या मनात चायनाचे चित्र फारच वेगळं होतं. मला चित्रांमध्ये पाहिलेला चीन माहिती होता. अर्थात अमितने मला सांगितलं होतं की शांघाय हे खूप मॉडर्न शहर आहे. तुला ते फ्रँकफर्टपेक्षा खूप वेगळं वाटणारं नाही. पण हे जे मी बघत होते, ते मात्र फ्रँकफर्टच नाही तर अमेरिकेपेक्षाही भारी होतं. आमचं घर विमानतळापासून बरंच दूर आहे. जवळपास सव्वातास लागतो. ७२ किमीचं हे अंतर पार करणं म्हणजे दुसऱ्या गावाला गेल्यासारखं आहे. विमानतळ ते घर या ७२ किमीच्या प्रवासात फक्त शेवटच्या चौकात लाल सिग्नलचा दिवा दिसला. म्हणजे तिकडून जो आम्ही फ्लायओव्हर घेतला त्यावरून खाली उतरलोच नाही. त्यामुळे सिग्नलवर थांबण्याचा प्रश्नच नाही. यावरूनच शांघाय या शहराची भव्यता लक्षात आली. घरी पोचलो. शांघायला थोडे दिवस आधी येऊन, बघून हे घर अमितने निश्चित केलेलं होतं. शाळेच्या जवळ घर असायला हवं, हा घर पक्क करताना आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. घर तर छान होतं, पण अजून आमचं सामान पोचलेलं नसल्याने ते काही आपलं वाटेना! फर्निचर, पडदे, स्वयंपाकघर सगळं व्यवस्थित होतं. मुख्य म्हणजे आपल्या भारतासारखीच गॅसची शेगडी होती, ते मला फार बरं वाटलं. थोडी फार अगदी बेसिक भांडी, चहा, साखरबरोबर आणल्यामुळे मी लगेच आपला घरचा उकळलेला चहा केला. तो पिऊन अजूनच बरं वाटलं.इथे एक गोष्ट खूप चांगली कळली की घरकाम करायला बाई मिळते. मला अगदी हायसं वाटलं. कारण जर्मनीत लहान बाळाला सांभाळत, सगळं घरकाम करून माझीच कामवाली बाई झालीय असं वाटायचं कधी कधी. तिथे कधीतरी महिन्यातून दोनदा एक क्लीनर येऊन काही तास काम करून जायची. पण रोज आपणच क्लीनर, वर्कर, कुक, माळी, प्लंबर, कारपेण्टर... त्या मानाने इकडे हे फार चांगलं आहे. आमच्या कम्पाउंडमध्ये एकूण २५ बिल्डिंग्ज आहेत. त्यात जवळपास ८० टक्के लोक इतर देशांतले आहेत. त्यामुळे मला अगदी चिनी लोकांमध्ये राहत नाही आहोत हे बरं वाटलं.जरा सेटल झाल्यावर एका ओळखीने एक बाई घरकामासाठी इंटरव्ह्यूला आली. हा इंटरव्ह्यू म्हणजे अगदी गमतीदार होता. तिला केवळ चिनी भाषा बोलता येत होती. त्यामुळे सगळं बोलणं खुणा करूनच झालं. इकडे घरकाम करणाऱ्या बाईला ‘आयी’ म्हणतात. झालं, आता आली पंचाईत. कारण माझी मुलं मला ‘आई’ म्हणतात, मम्मी, मम्मा, मॉम असलं काही म्हणत नाहीत. शिवाय मी माझ्या आईला, सासूबार्इंनाही आईच म्हणणार. बाईलासुद्धा आईच म्हणायचं म्हणजे सगळंच कन्फ्युजन. मग आम्ही तिला ‘आया’ म्हणायचं ठरवलं. ‘आयी’ म्हणजे ‘आण्टी’ असा त्याचा अर्थ आहे हे नंतर कळलं. मला दिल्लीची आठवण झाली. तिथल्या माझ्या बाईला ‘बाई’ म्हटलेलं खपत नसे. तिने मला आल्यादिवशीच सांगितलं होतं. ‘मुझे पुष्पा आण्टी बुलाना, पुष्पाबाई नही’ इथे बाकी सगळीच मुलं त्यांना सांभाळणाऱ्या बाईला ‘आयी’ म्हणत आणि माझी मुलं मला ‘आई’ म्हणत. त्यामुळे सुरुवातीला सगळी लोकं माझ्याकडे विचित्र नजरेने बघत असतं. मला प्रत्येकवेळी त्यांना सांगावं लागे, आमच्या भाषेत मॉमला आई म्हणतात. आता एवढ्या वर्षांत लोकांना सवय झाली. आम्ही २००९ पासून इथे आहोत.२००९च्या आॅगस्टमध्ये इकडे आल्याबरोबरच ‘शांघाय मराठी मंडळा’चा गणेशोत्सव बघता आला. इथे येऊन अगदी २-३च दिवस झाले होते आणि अचानक १०० आपली माणसं भेटली तेव्हा झालेला आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. त्या कुणालाच आम्ही याआधी कधीच भेटलो नव्हतो; पण केवळ भारतीय या नात्याने ती सगळी माणसं आम्हाला आपली वाटली आणि या शंभरातल्या पन्नासांशी तरी अगदी घट्ट जिवाभावाचं मैत्रीचं नातं जोडलं गेलंय ते कायमचं.सामान यायला दीड महिना लागला, कारण समुद्रामार्गे ते येत होतं. या दीड महिन्यात शाळा, घरकामाची आया, जवळपासची दुकानं यांची सवय झाली. ६ महिन्यांत आम्ही शांघायमध्ये रुळायला लागलो. सर्वात आधी मी भाषा शिकायला सुरुवात केली. कारण चायनिज भाषेमध्ये साध्या इंग्रजी शब्दालासुद्धा त्यांचाच शब्द वापरतात. म्हणजे मला दोन वस्तू हव्या असतील तर मी ‘टू’ म्हटलेलं त्यांना कळत नसे. मग दोन बोटं दाखवायची. शिवाय प्रत्येक वस्तूचं नाव वेगळं. अंड्याला ‘एग’ म्हटलं तर कळत नाही. सफरचंदला ‘अ‍ॅपल’ म्हटलं तर कळत नाही. घराला ‘हाउस’ किंवा ‘होम’ म्हटलं तर कळत नाही, पाण्याला ‘वॉटर’ म्हणत नाहीत. साखरेला ‘शुगर’ म्हणत नाहीत, जर्मनीतही हीच परिस्थिती होती; पण शब्दांचे उच्चार थोडेफार सारखे होते आणि ते शब्द वाचता येत होते, हा मोठा फरक होता. घरी बाईबरोबर बोलायची थोडी सवय झाली. सुरुवातीचे ६ महिने तर मी तिलाच मराठी शिकवत होते. भाजी लांब लांब काप, चौकोनी काप किंवा अबीरला दूध दे, पाणी संपलंय, अशी काही वाक्यं तिला कळायला लागली होती. पण आता मात्र तिच्याशी तिच्याच भाषेत मी व्यवस्थित बोलू शकते.असे आम्ही दोघे महाराष्ट्राच्या बाहेर पडलो ते दिल्लीच्या चांदनी चौकातून जर्मनीला जाऊन थेट चायनाला येऊन पोचलो. हळूहळू या देशाबद्दल आकर्षण आणि कुतूहल दोन्ही वाढायला लागलं होतं. इथली माणसं तशी फार साधी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना भारतीयांबद्दल अतिशय आदर आहे. या गोष्टीचं आम्हाला खूप आश्चर्य वाटलं, आम्ही कुठेही गेलो की लोक खूप कौतुकाने बघतात. भारतीय लोकांचे डोळे मोठे असतात. नाक सरळ असतं, या गोष्टीचं त्यांना फार अप्रूप आहे. तसंच कधी माझी आई आलेली असताना आम्ही कुठेही फिरायला गेलो की तिला खूप लोक फोटो काढला तर चालेला का, म्हणून विचारत. कारण ती साडी नेसते. साडी नेसलेली कुठलीही भारतीय स्त्री दिसली की तिचा फोटो निघालाच म्हणून समजा. आधी आम्हाला वाटायचं की केवळ आपण त्यांच्यापेक्षा नाकी-डोळी चांगले म्हणून ते आपल्याकडे कौतुकाने बघतात. पण केवळ तेच कारण नाहीये. मी विचारलं एका बाईला तर ती म्हणाली, तुम्ही आमच्या बुद्धाच्या देशांतून आला आहात म्हणून आम्हाला तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो. हे उत्तर मला फारच अनपेक्षित होतं. लोकांबद्दल आणि त्यांच्या अशा या चायनाच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याविषयी माझं कुतूहल अधिकच वाढत होतं.