शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

शोध धारवाडमधील वास्तव्याचा

By admin | Updated: June 22, 2014 13:56 IST

कर्नाटकातील धारवाड येथे शाहू महाराजांच्या शिक्षणाची खास व्यवस्था करण्यात आली होती. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त (२६ जून) त्यांच्या धारवाडमधील वास्तव्यावर नव्याने टाकलेला प्रकाश..

 प्रा. डॉ. जयसिंगराव पवार

 
समतेचा विचार प्रत्यक्ष कृतीतून रुजवला तो शाहू छत्रपतींनी. या सार्‍यांची बीजे होती त्यांना मिळालेल्या शिक्षणात. कर्नाटकातील धारवाड येथे शाहू महाराजांच्या शिक्षणाची खास व्यवस्था करण्यात आली होती. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त (२६ जून) त्यांच्या धारवाडमधील वास्तव्यावर नव्याने टाकलेला प्रकाश..
----------------
कोल्हापूर संस्थानातील कागल जहागिरीचे अधिपती जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे हे छत्रपती घराण्याचे आप्तस्वकीयच होते. चौथ्या शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी निधनानंतर जयसिंगराव घाटगे यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंतराव यांना राणी आनंदीबाई यांनी कोल्हापूर गादीसाठी दत्तक घेतले आणि मग शाहू छत्रपती म्हणून वयाच्या १0व्या वर्षी १७ मार्च १८८४ रोजी छत्रपतींच्या गादीवर आले.
आबासाहेब घाटगे हे कोल्हापूर संस्थानचे रिजंट होते. त्यांनी शाहू राजांच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. त्यासाठी तज्ज्ञ व निष्णात शिक्षक व प्रशिक्षकांची त्यांनी नेमणूक केली होती. लवकरच त्यांनी शाहूराजांना राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये दाखल केले. त्यांच्यासोबत आबासाहेबांनी शिक्षक, प्रशिक्षक तर पाठविलेच, शिवाय आपले धाकटे पुत्र पिराजीराव ऊर्फ बापूसाहेब, धाकटे बंधू दत्ताजीराव ऊर्फ काकासाहेब आणि दत्ताजीराव इंगळे (ज्यु.) ही समवयस्क मुलेही सहाध्यायी म्हणून दिली. (जानेवारी १८८६) पुढे राजकोटच्या कॉलेजमध्ये शाहूराजांची भावनगरच्या भाऊसिंगजी महाराजांशी घनिष्ठ मैत्री जमली. त्यात मणिपूरचे कालुभा नावाचे समवयस्क सहाध्यायी येऊन मिळाले. अशा प्रकारे शाहूराजे, बापूसाहेब, काकासाहेब, दत्ताजीराव इंगळे, भाऊसिंगजी व कालुभा अशा या राजकुमारांचा एक ग्रुपच राजकोटमध्ये तयार झाला.
तथापि शाहूराजे राजकुमार कॉलेजमध्ये फारसे रमले नाहीत. तेथील अभ्यासास सुरुवात होते ना होते एवढय़ात त्यांच्या पित्याचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांचा स्वभाव अबोल झाला. मन विषण्ण झाले. या वेळी कोल्हापुरात ब्रिटिशांचे पोलिटिकल एजंट विल्यम लीवॉर्नर हे होते. ते आबासाहेबांचे जिव्हाळ्याचे मित्र झाले होते. मृत्यूशय्येवर असतानाच आबासाहेबांनी शाहूराजांच्या भावी शिक्षणाविषयी व जडणघडणीविषयी महत्त्वाच्या सूचना त्यांना केल्या होत्या. जणू त्यांनी लीवॉर्नरला पालकच बनवले होते.
लीवॉर्नर हे एक सचोटीचे ब्रिटिश अधिकारी होते. कोल्हापूरच्या गादीचे दक्षिणेतील महत्त्व ते जाणत होते. या गादीवरचा राजा हा आदर्श राजा व्हावा, असे त्यांना वाटत होते आणि म्हणूनच शाहू राजांच्या शिक्षणाची व प्रशिक्षणाची खास व्यवस्था करायचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेजर या अतिशय बुद्धिमान, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक आय.सी.एस. अधिकार्‍याची निवड करून त्यास शाहूराजे व त्यांचे सहाध्यायी यांचे शिक्षक व ‘पालक’ म्हणून नेमले. ब्रिटिश सत्तेच्या मुलखात असणार्‍या धारवाड या ठिकाणी त्यांना आपले अध्यापनाचे कार्य सुरू करायचे होते. विशेष म्हणजे राजकुमार कॉलेजमधील भाऊसिंगजी व कालुभा हे शाहूराजांचे मित्रही त्यांच्यासोबत असणार होते. बहुधा शाहूराजांनीच तसा आग्रह धरला असावा.
कोल्हापूरच्या राजाच्या शिक्षणाची व्यवस्था नव्या ठिकाणी करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. कारण शाहूराजांसोबत त्यांचे सर्व सहाध्यायी तर होतेच, शिवाय त्यांचा इतर शिक्षक, प्रशिक्षकांचा व नोकर, चाकरांचा परिवारही होता. त्यासाठी प्रथम फ्रेजर धारवाड येथे आले. त्यांनी काही बंगल्यांचा शोध घेतला; परंतु ऐन वेळी त्यांना चांगल्या वस्तीत बंगले मिळाले नाहीत. शेवटी फोर्ट भागात त्यांना दोन बंगले, आवार व काही लहान-मोठी घरे मिळाली. त्यापैकी एका बंगल्यात शाहूमहाराज, बापूसाहेब, काकासाहेब व दत्ताजीराव यांची, तर दुसर्‍या बंगल्यात भाऊसिंगजी व कालुभा यांची निवासव्यवस्था करण्यात आली. आवाराच्या एका बाजूस शाहूराजे व त्यांचे सहाध्यायी यांच्यासाठी तालीमखाना (आखाडा) बांधला गेला. (याचा संदर्भ राजर्षी शाहू छत्रपती पेपर्स, खंड -१ मध्ये कागद क्र. १0८ मध्ये मिळतो.)
जून १८८९ ते जानेवारी १८९३ अशा साडेतीन वर्षांच्या कालखंडात शाहूराजांचा निवास धारवाड मुक्कामी राहिला. या कालावधीत अधून-मधून प्रसंगपरत्वे ते कोल्हापूरला येत असत. तसेच याच काळात फ्रेजरसाहेबांनी आपल्या शिष्यवृंदासाठी तीन सफरी (अभ्यासदौरे) आयोजित केल्या. दोन उत्तर हिंदुस्थानच्या तर एक सिलोनसह दक्षिण हिंदुस्थानची त्या सफरी शाहूचरित्रात प्रसिद्ध आहेत. या सफरींतून तत्कालीन हिंदुस्थानची सामाजिक परिस्थिती शाहूराजांस अभ्यासता आली. याच कालखंडात १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याचे सरदार गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येशी शाहूराजांचा विवाह झाला.
दि. १0 मे २0११ रोजी मी संपादित केलेल्या ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथा’च्या कन्नड आवृत्तीचे प्रकाशन धारवाड विद्यापीठात कुलगुरू डॉ. वालीकार यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष म्हणून कोल्हापूरचे विद्यमान छत्रपती शाहूमहाराज होते. त्या दिवशी सायंकाळी धारवाडमधील ‘मराठा विद्या प्रसारक मंडळ’ या संस्थेने महाराजांसाठी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याप्रसंगी आम्हाला धारवाडमधील अनेक बुजुर्ग सामाजिक कार्यकर्ते भेटले. त्यांच्याशी चर्चा करत असता राजर्षी शाहू छत्रपती महाराजांविषयीच्या आठवणी निघाल्या. महाराजांचे बालपणीचे शिक्षण धारवाडमध्ये झाल्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून ओसंडत होता.
धारवाडमधील शाहूमहाराजांच्या निवासस्थानाचा शोध घेण्याचा विचार बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनात होता. आता तसा प्रत्यक्ष शोध घेण्याची संधी मिळाली. माझा शोध यशापर्यंत जाण्याचा मार्गही दिसू लागला. शाहूराजांचे धारवाडमधील निवासस्थान सुस्थितीत असल्याचे समजले. शाहू चरित्रकार या नात्याने माझ्या आनंदाला उधाण आले. 
दुसर्‍या दिवशी या बुजुर्गांपैकी अँड. नारायणराव रसाळकर (वय ७0) व भालचंद्रराव जाधव (वय ८२) यांच्याबरोबर शोधयात्रेस जाण्याचे ठरले. अँड. रसाळकरांचे आजोबा कोल्हापूर दरबारात नोकरीस होते, तर भालचंद्ररावांचे आजोबा धारवाडमधील मोठे प्रतिष्ठित कार्यकर्ते होते. जुलै १९२0 मध्ये धारवाडमध्ये ‘कर्नाटक ब्राह्मणेतर सामाजिक परिषद’ भरली होती. त्या वेळी धारवाडमधील ब्राह्मणेतरांनी शाहूमहाराजांची जंगी मिरवणूक काढली होती. त्यात भालचंद्ररावांचे आजोबा आघाडीवर होते. महाराजांनी त्या वेळी तेथील ‘मराठा विद्या प्रसारक मंडळ’ या मराठा समाजाच्या शिक्षण संस्थेस भेटही दिली होती.
आम्ही प्रथम शाहूराजांच्या धारवाडमधील शाळेकडे गेलो. ही मदिहाळ रोडवर असून तिची इमारत देखणी आहे. हिची स्थापना सन १८८२ सालची असून, तिचे प्रारंभीचे नाव ‘प्रिन्सेस स्कूल’ होते. असे दिसते की राजकोटच्या राजकुमार कॉलेजप्रमाणेच मुंबई इलाख्यातील संस्थानिकांच्या मुलांसाठीचे हे स्कूूल ब्रिटिशांनी सुरू केले असावे. सन १८८९ मध्ये फ्रेजरसाहेब कोल्हापूरच्या कुमारांना घेऊन याच प्रिन्सेस स्कूलमध्ये शिकवत असावेत. अधिक संशोधनांनी यावर आणखी काही प्रकाश पडू शकेल. धारवाडकरांच्या सांगण्यातून मात्र कोल्हापूरचे शाहूमहाराज या स्कूलमध्ये शिकले, असे पुढे येत आहे. काही कालानंतर या स्कूलचे ‘व्हिक्टोरिया स्कूल’ असे नामांतर झाले. स्वातंत्र्यानंतर या स्कूलचे ‘स्वामी विद्यारण्य हायस्कूल’ असे रूपांतर झाले आहे.
मला सर्वांत जास्त उत्कंठा लागून राहिली होती ती शाहूराजांच्या निवासस्थानाची. कारण ती शाहूचरित्रातील एक महत्त्वाची उपलब्धी ठरणार होती. थोड्याच वेळात आम्ही तिथं पोहोचलो. तो एक ब्रिटिश काळातील जुना बंगला आहे. त्याच्या दर्शनी भागात सहा खांबांवर उभा असणारा पोर्च असून, पायर्‍या ओलांडून आत गेल्यावर त्या वास्तूच्या आतील दालने पाडून सलग तीन अपार्टमेंट केल्याचे व त्यासाठी भिंती उभारल्याचे दिसून आले. तिथं आता तीन कुटुंबे राहत असून, गेल्या १00 वर्षांत या वास्तूचे अनेकदा हस्तांतर झाले आहे. कोल्हापूरचा राजपुत्र या वास्तूत राहत होता, याची किंचितही जाणीव या भाडेकरूंना नाही. बंगल्याच्या आत एक मोठी फायरप्लेस आहे. ती सोडल्यास आता ऐतिहासिक अशा काहीच खुणा राहिलेल्या दिसत नाहीत. बंगल्यांचे उंच-उंच सिलिंग व कमानी त्याच्या आतील वास्तूकलेची थोडीशी कल्पना देतात, एवढे एक समाधान वाटले. बाकी सर्व गोष्टी मन खट्ट करणार्‍याच होत्या.
पण लगेच मन प्रसन्न करणारी एक वास्तू समोर दिसली. ती होती शाहूराजांसाठी बांधलेला कुस्तीचा आखाडा (तालीम). चांगल्या अवस्थेत असणारा आणि कुस्तीच्या सरावासाठी आजही वापरला जाणारा हा आखाडा म्हणजे जिवंत वास्तू वाटली. आम्ही तिथं गेलो तेव्हा १0/१२ मुले व त्यांचे वस्ताद व्यायाम, सराव करत होते. आखाड्याच्या लालमातीच्या हौद्याच्या एका भिंतीतील देवळीत कुस्तीगिरांचे दैवत हनुमान यांची संगमरवरी मूर्ती विराजमान होती. तिच्या खाली लहान-मोठे करेला (मुदगल) ठेवलेले होते. शाहूराजे यांनी ज्या मातीत कुस्तीचा सराव केला, त्या मातीला स्पर्श करण्याचा मोह मला आवरता आला नाही. हौद्यात उतरून माती हातात घेऊन मी इतिहासात डोकावले. हौद्यातच असणार्‍या दोन पैलवानांच्या अंगावर माती टाकून त्यांना सलामी देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सलामी देऊन फोटोसाठी पोझही दिली.
आखाड्याबाहेर एक हॉलवजा दालन आहे. त्यातही एक हनुमानाची मूर्ती आहे; मात्र ती दगडी आहे. आखाड्याच्या बाहेर एक मोठा आड असून, त्यावरील रहाटांनी पाणी काढून पैलवान आंघोळ करत असत. तो आडही शाहूकालीन आहे. आजही तो वापरात आहे.
शाहूराजांचा आखाडा पाहत असतानाच शाहूकालीन घोड्याची रपेट करणार्‍या मैदानाचा विषय निघाला. आजही ते मैदान अस्तित्वात असल्याचे ऐकून आम्ही तिकडे मोर्चा वळवला. आज ते मैदान सौंदत्ती रोडवर असून ते ‘कर्नाटक हायस्कूल ग्राऊंड’ म्हणून ओळखले जाते. शाहूराजे व त्यांचे सहाध्यायी याच मैदानावर घोडेसवारीचा सराव करत असत. शिकार, घोडदौड, मल्लविद्या आदींच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूर दरबारने बुवासाहेब इंगळे या अत्यंत निष्णात व तज्ज्ञ सरदाराची नेमणूक केली होती.
धारवाडमधील व्हिक्टोरिया हायस्कूल, फोर्टमधील बंगला व आखाडा तसेच घोडेसवारीचे मैदान तिन्ही ठिकाणी राजर्षी शाहू छत्रपतींच्या बालपणीच्या चरित्राशी जिव्हाळ्याचा संबंध ठेवणारी असली तरी तेथे वावरणार्‍या धारवाडकर मंडळींना त्याची सुतराम कल्पना नाही. ज्या ठिकाणी महाराजांचे वास्तव्य होते, ज्या ठिकाणी ते व्यायाम व कुस्ती करत होते, तेथे आज त्यांची एखादी प्रतिमाही नाही. कोणाही शाहूप्रेमीस याची खंत वाटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच या ठिकाणी शाहू छत्रपतींची स्मृती जागृत राहावी यासाठी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाशी तसेच कोल्हापूर महापालिकेने धारवाड महानगरपालिकेशी संपर्क साधून उचित पावले उचलावीत, असे जाहीर आवाहन आम्ही करत आहोत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा वैचारिक वारसा चालविणारे महाराष्ट्र शासन खात्रीने प्रतिसाद देईल, अशी आपण आशा करू या.
(लेखक कोल्हापूरस्थित ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत.)