साडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:05 AM2019-06-02T06:05:00+5:302019-06-02T06:05:10+5:30

काहीच दिवसांचं अंतर. साडी देणारी गेली,  साडी घेणारी गेली, साडी मात्र आहे.

Sari .. | साडी..

साडी..

Next
ठळक मुद्देमनाला चटका लावणारा एक अनुभव..

- विनायक पाटील

डॉ. मीना, डॉ. मनोहर आणि डॉ. मनीष ही बापये मंडळी माझे मित्र. त्यांची नाशिकजवळ अंजनेरी डोंगराच्या पायथ्याशी दोन एकर जमीन.
जमीन उजाड ठेवण्याऐवजी शेती करावी असे त्यांच्या मनात आले. सगळे भेटायला आले आणि काय शेती करावी, असा सल्ला विचारती झाली. मी म्हणालो, ‘‘शेती आमदनी म्हणून करणार आहात की छंद म्हणून’’ ते उत्तरले, ‘‘झाडेझुडपे असावीत एवढेच! फायद्याची अपेक्षा नाही. शिवाय पाणी भरपूर आहे. शेताला संरक्षक कुंपण आहे. पीक सुचवा.’’ मी विचारले, ‘‘माझ्या मनातील या परिस्थितीत येणारे, उत्पन्न देणारे पीक सांगू की, आपल्याशी चर्चा करून पीक ठरवू?’’ ते म्हणाले, तुम्हीच ठरवा. मी उत्तरलो, दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली करवंदाची एक प्रजाती आहे. तिचे नाव ‘कोकण बोल्ड’. टप्पोरी मधुर करवंदे. उत्पन्नही बरे आहे. दर्जेदार करवंदे दुर्मीळ आहेत. डोंगरी शेतीत एक चांगला पर्याय आहे. करवंदाची शेती करायचे ठरले. कृषी विद्यापीठाकडे रोपांची मागणी केली. रोपे मिळाली. लागवड करण्यापूर्वी शेतावर कायमस्वरूपी काम करणारा जाणकार मजूर मिळविला. त्याचे नाव विजय शिगाडे. जातीने महादेव कोळी. बायकोचे नाव यमुना. सहा अपत्ये. चार मुली, दोन मुलगे. त्यांचा पगार बापये करतात. पगारपत्रकावर मी सही केल्यानंतर पगार मिळतो. दर महिन्याचा हा क्रम. पगार मासिक. एकदा पगारपत्रकासोबत मी केलेल्या खर्चाचेही बिल डॉ. बापयेंकडे पाठविले. रुपये सात हजार दोनशे. त्याला सांगितले तुझा पगार तुला ठेव, माझे पैसे सवडीने पुढील महिन्याच्या पगारपत्रकावर सही घेण्यासाठी येशील तेव्हा दे. सोबत त्याची बायको यमुनाही आली होती. नेहमी एकटाच येत असे, आज जोडीने आला होता. त्याला जोडीने पाहिल्यावर माझी बायको सरोज हिने तिला देण्यासाठी कपाटातून एक कोरी साडी काढली आणि कॅरीबॅगमध्ये घालून बाजूला ठेवली. जाताना तिला द्यावी म्हणून. आणि सरोज घरकामात गुंतली. मोटारसायकल सुरू होण्याचा आवाज आल्यावर तिने बाहेर डोकावून पाहिले तर विजय आणि यमुना निघाले होते. ती धावत साडी घेऊन आली आणि मला म्हणाली, ‘अहो त्यांना मोबाइल करून थांबवा, साडी द्यायची राहिली.’ मी फोन केला. त्याने गाडी चालवत असल्याने उचलला नाही. सरोज खट्ट झाली. मी म्हणालो, ‘अगं पुढच्या पगाराला येईल तेव्हा साडी विजयजवळ दे.’ दरम्यान सरोजला हृदयविकाराने ग्रासले. उपचारासाठी पुण्याला न्यावे लागले. एक महिना पुण्याला होती. मीही तिच्यासोबत. विजय शिगाडेचा फोन आला. ‘दादा तुमच्या सहीशिवाय पगार मिळत नाही आणि तुम्ही नाशिकमध्ये नाही.’ मी उत्तरलो, ‘अरे माझे सात हजार दोनशे रुपये तुझ्याजवळ आहेत ते सध्या खर्च कर. मी आल्यावर पगार होईल.’ ‘दादा ते पैसे माझ्याकडून खर्च झाले आहेत,’ विजय उत्तरला. मी म्हणालो, ‘‘अरे गाढवा माझे पैसे तू परस्पर खर्च केले आणि वर पगार मागतोस? काही अक्कल? ठीक आहे. मी नाशिकला आल्यावर बघू.’’ दरम्यान सरोजचे आजारात 13 मे 2019 रोजी निधन झाले. काही दिवसांनी विजयचा फोन आला. पगारपत्रकावर सही घेण्यासाठी येऊ काय?. मी त्याच्या बायकोला देण्यासाठी सरोजने काढून ठेवलेली साडी आठवणीने जवळ ठेवली, विजयला देण्यासाठी. विजय आला. मी त्याला म्हणालो, मी पगारपत्रकावर सही करतो; पण माझे पैसे का आणि कशासाठी खर्च केलेस ते सांग. तो म्हणाला, यमुना आजारी पडली होती. तिच्या औषधासाठी केले खर्च. मी परत करीन. ठीक आहे, पुन्हा असे करू नकोस. मी पत्रकावर सही केली आणि म्हणालो, अरे ही साडी घेऊन जा. सरोजने यमुनासाठी ठेवली आहे. देणारी गेली; पण साडी बाजूला काढून ठेवली आहे. विजय थोडा थांबला आणि म्हणाला, दादा घेणारीही गेली आहे. त्याच आजारात ती गेली.
साडी देणारी गेली, साडी घेणारी गेली. साडी आहे.
vinayakpatilnsk@gmail.com
(साहित्य, कला आणि शेतीसह अनेक विषयांमध्ये सखोल जाण असलेले लेखक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत.)

Web Title: Sari ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.