शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

कलेचा श्रीमंत वारसा

By admin | Updated: February 10, 2017 17:19 IST

समर्थ कलावंतांच्या अजरामर कलाकृती आणि या कलावंतांनी उभारलेल्या कलाचळवळींनी बॉम्बे आर्ट सोसायटीला जगाच्या नकाशावर आणून ठेवले. सोसायटीचे १२५ वे कलाप्रदर्शन मुंबईत सुरू झाले असून २० मार्चपर्यंत लारसिकांसाठी ते खुले राहणार आहे. त्यानिमित्त..

प्रा. डॉ. सुभाष पवार
 
कलाक्षेत्रात सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टनंतरची जुनी कलासंस्था म्हणून बॉम्बे आर्ट सोसायटीकडे पाहिले जाते. कलावंतांची एक चळवळ म्हणून व भारतीय कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून बॉम्बे आर्ट सोसायटी जगभरातील कलारसिकांना परिचित आहे. 
बॉम्बे आर्ट सोसायटीच्या व्यासपीठावर ज्या कलावंतांना आपली कलाकृती सादर करण्याचा बहुमान मिळाला त्यापैकी बहुतेक चित्रकार-शिल्पकारांनी जगभरात आपल्या कलाकारकिर्दीचा ठसा उमटवला आहे. 
जमशेदजी जीजीभाई यांच्या पुढाकाराने १८५७ साली स्थापन झालेल्या सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये चित्र शिल्पकलेचे शास्त्रशुद्ध कलाशिक्षण सुरू झाल्यानंतर भारतीय कलावंतांच्या कलाकृतींची चित्रप्रदर्शने व्हावीत, त्यांच्या कलाकृतींना जनमानसात स्थान मिळावे अशा विचारांचे तरंग कलावंताच्या मनात उमटू लागले होते. एतद्देशीय कलावंतांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व कलावंतांना योग्य न्याय मिळावा आणि कलाविषयक संस्कृती रुजवली जावी या हेतूने १८८८ साली बॉम्बे आर्ट सोसायटीची स्थापना झाली. 
या काळात युरोपियन-ब्रिटिश स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने भारतात राहत होते. त्यांच्यासाठी येथील पारंपरिक कलेचा उपयोग शिकवण्यासाठी व आनंदासाठी महत्त्वाचा होताच. सुरुवातीला या संस्थेच्या माध्यमातून फक्त कलावंत व ब्रिटिश अधिकाऱ्यांपर्यंत सीमित असलेले चित्रप्रदर्शन नंतर जनसामान्यांसाठी खुले केले गेले. १९८८ पासून १९१० पर्यंत १८ चित्रप्रदर्शने बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आली. त्यातील पहिले प्रदर्शन १८८९-९० च्या दरम्यान मुंबईच्या ‘सेक्रेटरिएट’ बिल्डिंगमध्ये भरवले गेले होते. पहिली तिन्ही प्रदर्शने याच इमारतीत आयोजित केली होती. नंतर २ प्रदर्शने ‘टाउन हॉल’मध्ये तर उरलेली सर्व प्रदर्शने ‘जे.जे. स्कूल आॅफ आर्ट’मध्ये भरवण्यात आली होती. या १८ प्रदर्शनांमधून सुमारे दहा हजार कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.
बॉम्बे आर्ट सोसायटीच्या सभासद नोंदणीमधून वर्गणी रूपाने पैसा गोळा होई व पुढे ब्रिटिश शासनाने वेळोवेळी आर्थिक मदतही दिली. १९९० साली म्हणजे संस्था स्थापन झाल्यानंतर २२ वर्षांनी त्यावेळचे मानद सचिव प्रा. ओ. व्ही. मुल्लर यांच्या कार्यकाळात ‘पिरियड १९०६-१९१०’ या शीर्षकाखाली त्या वेळच्या कलेचा, प्रदर्शनाचा आणि कलासंस्थेचा आढावा घेण्यात आला होता. 
प्रत्येक प्रदर्शनात किती कलावंतांनी सहभाग घेतला, किती चित्रे प्रदर्शित झाली, किती लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली व किती कलाकृती विकल्या गेल्या, असा संपूर्ण तपशील या आर्ट जर्नलमध्ये देण्यात आला होता. सोसायटीचे काम चांगले चाललेले पाहून सरकारने ५०० रुपयांचे अनुदान दिल्याचा उल्लेखसुद्धा या ‘आर्ट जर्नल’मध्ये करण्यात आलेला आहे. 
चित्रांकित केलेलं व बरीचशी कलेविषयक माहिती असलेलं हे पहिलंच ‘आर्ट जर्नल’ प्रकाशित झालं होतं. त्यात दगड फोडून साकारलेल्या पश्चिम भारतातील वेरूळच्या कैलासमंदिराविषयी एस.व्ही. भांडारकर यांचा अभ्यासपूर्ण लेख चित्रासहित प्रसिद्ध झालेला होता. त्यानंतर १९११ ते १९३४ पर्यंत ‘आर्ट जर्नल’ प्रकाशित करण्यात आले होते. 
सुरुवातीला ब्रिटिश मान्यवर कलावंत व कलाप्रेमींनी संस्थेची धुरा सांभाळली. त्यात सर बेसील स्कॉट, सर मोरीस हयवर्ड, सर गिल्बर्ट वेल्स, आर. बी. इवबॅक, रेवरंड आर. डी. आॅकलंड हे काही युरोपियन होते. त्यानंतर १९३६ साली पहिले भारतीय कलाप्रेमी सर कावसजी जहांगीर रेडीमनी हे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी १९६२ पर्यंत हे पद सांभाळले. १९६३ ते १९६९ पर्यंत श्रीमती निर्मलाराजे भोसले या अध्यक्ष म्हणून विराजमान होत्या. १९७० ते १९७५ पर्यंत ज्येष्ठ चित्रकार एम. आर. आचरेकर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. पुढे १९७५ ते १९८३ पर्यंत आचरेकरांसोबत व्ही. बी. पाठारे यांनीही मदत केली. १९८४ ते १९८७ पर्यंत शिल्पकार बी. विठ्ठल हे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सुप्रसिद्ध चित्रकार के. के. हेब्बर यांनी सोसायटीच्या कार्यभार सांभाळला होता. याच काळात बॉम्बे आर्ट सोसायटीचा शतक महोत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. 
या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने सुवर्णपदक व इतर सन्मानप्राप्त जुन्या व मान्यवर कलावंतांच्या दुर्मीळ कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान कै. राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते. 
या शतकोत्तर चित्रसोहळ्याच्या निमित्ताने याच दुर्मीळ कलाकृतींचा संग्रह व सोसायटीच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारा सर्वांगसुंदर ग्रंथ राज्याच्या कला संचालनालयाचे माजी कलासंचालक व सुप्रसिद्ध चित्रकार कै. बाबूराव सडवेलकर यांच्या अथक मेहनतीतून प्रसिद्ध करण्यात आला होता. 
१९९० नंतर प्रफुल्ला डहाणूकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, गोपाळ आडवरेकर, विजय राऊत अशा काही मान्यवरांनी सोसायटीचा कार्यभार सांभाळला. सध्या ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत अध्यक्ष आहेत. त्यांच्या काळात सोसायटीच्या बांद्रा येथील स्वतंत्र इमारतीचे उद्घाटन होऊन सोसायटीची हक्काची जागा नावारूपास आली.
बॉम्बे आर्ट सोसायटीने जसा सुवर्णकाळ पाहिला तसा उतरणीचा काळसुद्धा अनुभवला आहे. १९६७ पर्यंतचा सोसायटीचा कालखंड हा उत्तरोत्तर प्रगतीकडे जाणारा होता असे म्हटले जाते. याच काळात हळदणकर ते हुसेन, बेंद्रे ते बद्रीनारायण यासारख्या कलावंतांच्या जीवनावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव टाकलेला आहे. १९६८ ते १९८८ पर्यंतचा २० वर्षांचा काळ हा सोसायटीचा उतरणीचा काळ असल्याचे म्हटले जाते.
बॉम्बे आर्ट सोसायटीने १९८९-९० पासून बेंद्रे-हुसेन शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. तरुण कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक पाठिंबा देऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून २५ हजार रुपयांच्या दोन शिष्यवृत्त्या देण्यात येतात. त्यातून युवा पिढीच्या कलावंतांना आर्थिक मदत मिळतेच व त्यांच्या हातून चांगल्या कलाकृती निर्माण होऊ शकतात, हा उदात्त हेतू या शिष्यवृत्तीमागे आहे. त्यानंतर सोसायटीने ज्येष्ठ कलावंतांना ‘रूपधर’ जीवनगौरव पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली. त्यात सदानंद बाकरे, तय्यब मेहता, शांती दवे, अकबर पद्मसी यासारख्या कलावंतांना ‘रूपधर’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
बॉम्बे आर्ट सोसायटीने व्यक्तिचित्रकार पेस्तनजी बोमनजी, पीठावाला, मुल्लर, आगासकर, तास्कर, लालकाका, हळदणकर, त्रिंदांद यासारख्या कलावंतांना सन्मानित केले आहे. एन. एस. बेंद्रे, व्ही. ए. माळी, गोडबोले, डी. जे. जोशी, रसिकलाल पारिख, धोपेश्वरकर, शुक्ला, सोलेगावकर, गोधळेकर, व्ही. डी. भगत, रविशंकर रावळ, शिवाक्ष चावडा, गोपाळ देऊस्कर, डी. जी. गोडसे, एम. आर. आचरेकर यांनी सोसायटीच्या प्रदर्शनात सहभाग घेऊन पारितोषिके प्राप्त केली आहेत. 
रावबहाद्दूर धुरंधर, राजा रविवर्मा, जी. के. म्हात्रे, सेसील बर्न्स, एम. एफ. पीठावाला, जी. के. गांगुली, ए. एच. मुल्लर, ए. एक्स. त्रिंदांद, एस. एल. हळदणकर, जी. एच. नगरकर, एन. आर. सरदेसाई, व्ही. पी. करमरकर, बी. व्ही. तालीम, गोपाळ देऊस्कर, मेरी हेंडरसन, जी. एम. सोलेगावकर, अमृता शेरगील, वॉल्टर लँगहमर, व्ही. ए. माळी. डी. बी. जोग, के. के. हेब्बर, एस. एच. रझा, शंकर पळशीकर, के. एच. आरा, ए. ए. आलमेलकर, ए. ए. रायबा, एच. ए. गाडे, बाबूराव सडवेलकर, हरकिसन लाल, राघव कनोरिया, प्रभाकर कोलते, शांतीनाथ आरवाडे, व्ही. टी. कामत, जयंती राबोडिया, वासुदेव कामत आदि कलावंतांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या सुवर्णपदकांचा सन्मान मिळाला होता. ही परंपरा आजही सुरू आहे. १२८ वर्षांची प्रदीर्घ देदीप्यमान कलापरंपरा लाभलेल्या बॉम्बे आर्ट सोसायटी शासन दरबारी १९२९ साली नोंदणी झालेली असून, नवी दिल्लीच्या ललित कला अकादमीशीही संस्था संलग्नित आहे.
बॉम्बे आर्ट सोसायटीला अत्यंत दीर्घ आणि देदीप्यमान अशी परंपरा आहे. या संस्थेने जसे अनेक कलावंत घडवले, तसेच या कलावंतांनीही आपल्या प्रतिभाबळावर कला अधिक उंचीवर नेऊन ठेवली. कलाप्रांतातील ही सुवर्णसफर अजूनही सुरूच आहे..
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आणि कलासमीक्षक आहेत.)