शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

१२०० ग्रंथपेट्यांचा वाचन प्रवास..

By admin | Updated: September 24, 2016 18:03 IST

१५ आणि १६ सप्टेंबर रोजी शारजा येथे एक वाचक मेळावा ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त या उपक्रमाचेसंयोजक विनायक रानडेयांच्याशी ही बातचित...

मुलाखत आणि शब्दांकन - धनंजय वाखारे
 
वाढदिवसाला भेट म्हणून पुस्तकं द्या या कल्पनेतून साकार झालेल्या एका पुस्तकपेटीची ही गोष्ट, जी आता देशातल्या विविध राज्यांतच नाही तर जगभरात राहणाऱ्या मराठी माणसांपर्यंत पोहचली आहे.
ग्रंथ तुमच्या दारी ही चळवळ बनत आता देश-विदेशात १२०० ग्रंथपेट्यांचा संसार सुरू आहे, आणि तो वाढतोही आहे.
दीड कोटी रुपयांची सव्वा लाख ग्रंथसंपदा जमा करणाऱ्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ कशी आणि कधी रोवली गेली?
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना मित्र-हितचिंतक यांच्या वाढदिवशी ग्रंथदेणगीची संकल्पना समोर आली आणि २००९ मध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. माझा सख्खा भाऊ अनंत रानडे हा पहिला देणगीदार ठरला आणि म्हणता म्हणता गेल्या आठ वर्षांत सुमारे पाच हजार देणगीदारांच्या मदतीतून दीड कोटी रुपयांची सव्वा लाख ग्रंथसंपदा उभी राहिली. शंभर पुस्तकांची एक पेटी तयार करत सर्वप्रथम भावना विसपुते यांच्या ग्रुपला ती प्रदान करण्यात आली. आज देश-विदेशात १२०० ग्रंथपेट्यांचा संसार थाटला गेला आहे. 
महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक यांसह देशातच नाही, तर परदेशस्थ मराठी माणसांपर्यंतही हा उपक्रम पोहोचला. परदेशात मराठी ग्रंथ चळवळ पोहोचविण्याची कल्पना कशी सुचली आणि तिला मूर्तरूप कसे आले?
- सन २००९ ते २०१४ पर्यंत भारतातील काही प्रांतांपुरतीच जाऊन पोहोचलेली ही ग्रंथ चळवळ सीमापार जाण्यासाठी इंटरनेटवरील फेसबुक, ई-मेल ही साधने प्रभावी ठरली. तोपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपची चलती नव्हती. फेसबुकच्या माध्यमातून मी हा उपक्रम शेअर करायचो. त्याला एकदा मूळ नाशिककर असलेल्या दुबईस्थित डॉ. संदीप कडवे यांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ देणगी देत हा उपक्रम दुबईतील मराठी वाचकांपर्यंत नेण्याची संकल्पना मांडली. परदेशात १०० पुस्तकांची पेटी पाठविणे अवघड होतेच; शिवाय किती वाचक मिळतील, याविषयी शंका होती. त्यासाठी २५ पुस्तकांची एक पेटी तयार करण्यात आली आणि २०१४ मध्ये आठ ग्रंथपेट्या दुबईला रवाना झाल्या. कडवे यांच्या पत्नी स्वाती यांनी समन्वयकाची धुरा सांभाळली. तेथे दर तीन महिन्यांनी ग्रंथपेट्यांची अदलाबदल होते. आता दोन वर्षांत दुबईला २० पेट्या झाल्या आहेत आणि २०० मराठी कुटुंबे जोडली गेली आहेत. 
 
दुबईनंतर नेदरलॅण्ड, स्वीत्झर्लंड, जपान, आॅस्ट्रेलिया ह्या देशांमध्येही ग्रंथपेट्या जाऊन पोहोचल्या. हा प्रवास कसा झाला?
- नेदरलॅण्डमधील महाराष्ट्र मंडळाचे विनय कुलकर्णी यांनी दुबई येथे सुरू झालेला उपक्रम फेसबुकवर पाहिला आणि माझ्याशी संपर्क साधला. मूळ मुंबईच्या असलेल्या कुलकर्णी यांनी नेदरलॅण्डला १२ ग्रंथपेट्या नेल्या. त्यानंतर टोकिओतील मराठी मंडळाचे निरंजन गाडगीळ यांच्याशीही संपर्क होऊन त्यांनी १० पेट्या नेल्या. टोकिओमध्ये तर मोेठ्यांसह लहान मुलांसाठीही एक पेटी पाठविण्यात आली आहे. आमच्या मुलांना आम्हाला मराठी शिकवायचे आहे, हा आग्रह धरत गाडगीळ यांनी या उपक्रमाला साद घातली. पुढे मूळ कोपरगावच्या, पण स्वीत्झर्लंडमधील झुरीक या शहरात वास्तव्यास असलेल्या आरती आवटी यांनीही नऊ ग्रंथपेट्या नेल्या. नाशिकच्या हर्षद पाराशरे यांनी अ‍ॅटलांटा येथे २१ ग्रंथपेट्या, आॅस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे प्रसाद पाटील यांनी आठ पेट्या नेल्या आहेत. आता द. आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथूनही मागणी आली आहे. जगात जेथे जेथे मराठी माणूस आहे तिथे मराठी पुस्तक नेऊन पोहोचविण्याचा माझा ध्यास आहे. 
 
परदेशात ग्रंथपेट्या पाठविताना ग्रंथांची निवड कशी करता? हे नेटवर्क कसे हाताळले जाते?
- आपल्याकडे ग्रंथालये, तेथील उपलब्ध ग्रंथसंख्या आणि वाचकसंख्या यांचे व्यस्त प्रमाण आहे. अभ्यासाअंती ते मला दोन टक्केच असल्याचे जाणवले. मात्र मी या उपक्रमातून किमान १०० पुस्तकांमागे ३५ पुस्तके वाचली जातील यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याला यशही येत गेले. परदेशात ३५ मराठी वाचक मिळणे अवघड होते. म्हणून शंभरंऐवजी २५ ग्रंथांची पेटी तयार केली. पुस्तके निवडताना जुन्या-नव्यांची सांगड, नामवंत लेखक आणि नवरसाची अनुभूती देणारे या गोष्टींना प्राधान्य दिले. आजमितीला दोन वर्षांत सहा देशांत ८० ग्रंथपेट्या मराठी वाचकांची भूक भागवित आहेत. 
 
‘ग्रंथ तुमच्या दारी’ चळवळीचा पुढचा टप्पा काय असेल? आणखी कोणत्या योजना आहेत?
- कुसुमाग्रजांनी ‘परभाषेतही व्हा पारंगत, पण माय मराठी सोडू नका’ असे म्हटलेले आहे. त्यामुळे यापुढे मराठी पुस्तकांबरोबरच इंग्रजीतील दर्जेदार ग्रंथसंपदाही जगभर नेऊन पोहोचविण्याचा मानस आहे. सध्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची योजना राबविली जात आहे तशीच योजना तरुणाईसाठीही सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील सहा कारागृहांतील कैद्यांपर्यंतही ही चळवळ जाऊन पोहोचली आहे. देणगीदार आणि मराठी वाचकांच्या साथीने ही चळवळ आता वैश्विक बनली आहे, यातच मोठे समाधान आहे.
 
(लेखक ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)