शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

मेघदूतातील खेळ पावसाचा

By admin | Updated: June 22, 2014 13:18 IST

भारतवर्षातील पाऊसकळेचे रोमांचक आणि विलोभनीय असे वर्णन कालिदासाच्या ‘मेघदूता’त आहे. हे सृष्टीचे प्रेमगीत आहे. त्यात जशी ओघवती शैली आहे, तसा त्याला शास्त्रीय आधार आहे. ‘मेघदूता’तील हा पावसाचा ठिकठिकाणचा खेळ जाणून घेणे म्हणजे आनंदाची पर्वणीच.

 गणेश दिघे

 
भारतवर्षातील पाऊसकळेचे रोमांचक आणि विलोभनीय असे वर्णन कालिदासाच्या ‘मेघदूता’त आहे. 
हे सृष्टीचे प्रेमगीत आहे. त्यात जशी ओघवती शैली आहे, तसा त्याला शास्त्रीय आधार आहे. ‘मेघदूता’तील हा पावसाचा ठिकठिकाणचा खेळ जाणून घेणे म्हणजे आनंदाची पर्वणीच.
----------
कालिदासाचे ‘मेघदूत’ हे सृष्टीसौंदर्याचे अपूर्व सूक्त आहे. भारतवर्षातील पाऊसकळेचं विलोभनीय आणि रोमांचक वर्णन केवळ आणि केवळ ‘मेघदूता’तच आहे. ‘मेघदूता’तील चेतन आणि अचेतनाच्या प्रेमातून रोमांचित होणारा प्रणयोत्सुक भोवताल थक्क करून सोडणारा आहे. रूढार्थाने मेघदूत हा कुबेराच्या दरबारात काम करणारा यक्ष आणि त्याची पत्नी यक्षिणी यांची ही प्रेमकथा आहे; परंतु त्याचबरोबर हे सृष्टीचे प्रेमगीतही आहे. हिमालयाच्याही उत्तरेत बर्फाने आच्छादलेल्या पर्वतांच्या पायथ्याशी राहणार्‍या यक्षाला कुबेराने कोसो दूर दक्षिणेच्या दगडाळ रामगिरी पर्वतावर एक वर्षाची विजनवासाची शिक्षा दिली. केवळ पत्नीच्या प्रेमात गुरफटल्यामुळे त्या यक्षाच्या हातून कुबेरसेवेत कसूर होतो. त्याला ही शिक्षा सह्य होते; पण ताटातूट झालेल्या प्रिय पत्नीचा विरह मात्र सहन होत नाही.
जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी तिला शोधत कसेबसे आठ महिने तो काढतो. आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला आभाळात एक मेघ दिसतो. या मेघाला पाहून यक्षाच्या आशा पल्लवीत होतात. उत्तरेच्या दिशेने निघालेला हा मेघ हिमालयापर्यंत जाणारा असेल, तर अलकेत असलेल्या आपल्या पत्नीला याच्यासोबत निरोप पाठवण्याची कल्पना त्याला सुचते. त्या मेघाची करुणा भाकून तो त्याला दूत बनण्यास तयार करतो. प्रथम त्याला अलकेपर्यंत जायचा मार्ग सांगतो आणि नंतर यक्षिणीला द्यायचा निरोप सांगतो.
आठ महिन्यांच्या हिवाळ्या-उन्हाळ्याच्या त्रस्त एकटेपणानंतर वसुंधरेचा प्रिय पाऊस येतो. तो तिला चिंब भिजवतो. धरती पावसाच्या या मधुर मिलनानंतर नवथर धरती एखाद्या सुस्नात स्त्रीसारखी तजेल होते. ‘मेघदूता’तील यक्ष आणि यक्षिणीचीही प्रेमकथा अशीच आहे. एकमेकांच्या विरहात यक्ष-यक्षिणीही आठ महिने व्याकूळ झाले आहेत. धरतीइतकीच यक्षिणी व्याकूळ झाली आहे, तर पावसाइतकाच यक्षही प्रेयसीच्या भेटीसाठी अधीर झाला आहे. ‘मेघदूत’ म्हणजे एकात एक गुंतलेल्या शेकडो प्रेमकथांचे काव्य आहे. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमवर्षावात चिंब व्हायचे आहे. मेघ- दामिनी हे ‘मेघदूता’तील आणखी एक प्रमुख प्रेमी युगुल. प्रत्येक युगुलाची वेगळी कहाणी आणि प्रेमाची रीतही वेगळीच. या सगळ्यांना प्रेमाच्या एका धाग्यात गुंफतो, तो मेघ. या मेघाला यक्ष प्रेमाची रीत आणि प्रणयाचे छंद शिकवतो. यक्षाने मेघाला जायचा जो मार्ग सांगितला आहे, त्यात कुठे कसे बरसायचे, कुठे खाली उतरायचे, कुठे अतिशय उंचीवर जायचे, कुठे विश्रांती घ्यायची, कुठे धो-धो बरसायचे, कुठे हलकेच जलकण शिंपायचे आणि कुठे स्वत:ला विसरून दामिनीच्या प्रेमपाशात प्रणयधुंदीत रंगून जायचे, हे सांगतो. ती वर्णने कालिदासाने अशा काही नजाकतींनी केली आहेत, की आपले भान हरखून जाते. कालिदास आपल्याला मेघाच्या रूपाने भारताची दक्षिणोत्तर पर्जन्य परिक्रमा घडवून आणतो.
विदर्भातील रामगिरीवर आषाढपूर्व काळात धरित्री केवळ उष्ण श्‍वास सोडत असते. राम, सीता आणि लक्ष्मणाच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही धरणी आहे. रामगिरीच्या अत्यंत दुर्गम भागातून पुढचा प्रवास करताना डोंगरमाथ्यावर विसावण्याचा सल्ला यक्ष मेघाला देतो. पावसाळ्यात डोंगरमाथ्यावर हळुवारपणे बाष्प पाझरणार. स्थिरावलेल्या कृष्णमेघाचे विहंगम दृश्य आपण नेहमीच पाहतो; पण दुसर्‍याच क्षणी वारे या मेघाला दूर वाहून नेतात. मार्गात त्याची ही अवस्था पाहून सिद्धांच्या स्त्रिया, ‘पर्वत कृष्णमेघाचे पंख लेवून उडून गेला की काय,’ अशा कौतुकभरल्या नजरेने तुझ्याकडे पाहतील, असे यक्ष मेघाला सांगतो. अर्थात, कौतुक झाले, की कुणीही तिथे रेंगाळतोच. मेघही त्याला अपवाद नाही. अशा वेळी त्याचे रेंगाळत लाडिक बरसणे डोळ्यांसमोर येते. एक लाडिक स्मित रेघ आपल्याही चेहर्‍यावर उमटते. ही तर मेघाच्या प्रवासाची सुरुवात. रामगिरी तीर्थालाही असेच अलुवार सरींचे आलिंगन देऊन बरसण्याची विनंती यक्ष करतो.
रामगिरीहून पुढे जाताच उत्तरेला मोठी पर्वतकुंडे आहेत. त्यातून मार्गक्रमणा थोडी कष्टप्रद आहे. इथे जोरात बरसायचे नाही, स्वत:ला ओठंगून ठेवायचे. त्यामुळे तुला सर्वत्र इंद्रधनू दिसतील. पावसाच्या ओठंगलेल्या अवस्थेत नभात इंद्रधनू दिसतात. अगदी नावापुरती एखादी सर बरसलेली असते आणि मेघांच्या दाटीतून सूर्य डोकावतो. पाना-फुलांवर पडलेले थेंब चकाकून उठतात. पायवाट ओली होईल आणि झाडांची पाने चकाकतील असली सरसर येऊन गेलेली सर इंद्रधनूची कमान टाकू शकते आणि हेच जर खोल दर्‍या असलेल्या पर्वतराजीत घडले, तर समोरच्या विहंगम दृश्याने डोळे दिपतात, एकापेक्षा अधिक इंद्रधनू दिसू लागतात आणि त्यातून पुढे सरकणारा मेघ आपल्या जावळात मोरपीस खोचल्यासारखा दिसतो. आषाढात हे मनोहारी दृश्य पाहून आपण कित्येक वेळा मोहरून आलेले असतो. 
मेघांचे तेवीस प्रकार आहेत. कलिक, मंडल, धुम्रक, श्‍वेतशुंड, पुष्कर, आवर्तक, ध्वलाग्नी, चंडक, विकंडक, मित्रध्युमन, महाधर वगैरे.. यांची बरसण्याची पद्धती ठरलेली आहे. पुष्कर हा इंद्राचा खास सेवक. त्याने पृथ्वीमंडल कायम फळते, फुलते ठेवायचे; तर आवर्तक हा रुद्र स्वभावाचा कोपिष्ट मेघ. कुठलीही दयामाया न दाखवता पाप धुणे हेच याचे काम. हा बरसला, तर जगबुडी नक्की. तो शिवाने तृतीय नेत्र उघडल्यानंतरच बरसतो, असे ‘शिवविहगत’मध्ये म्हटले आहे. ‘मेघदूता’तला मेघ यांचाच वंशज. आपल्या पूर्वजांचा एकेक गुण दाखवत हा मेघ बरसतो.
पर्वतराजीतून पुढे गेल्यानंतर निचूल आणि सरस या दोन विद्वानांची गावे लागतील. इथे एकदम शांततेने, कुठलीही आगळीक न करता मेघाने बरसावे, असे यक्ष सांगतो. ते वर्णन वाचताना एखाद्या आज्ञाधारी मुलागत कुठलीही आगळीक न करता शांत आणि प्रमाणात बरसणारा पाऊस डोळ्यांसमोर येतो. तो येतो नि वातावरणात आल्हाद येतो. शांत-शांत वाटते. पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होत नाहीत. शेताचे बांध फुटत नाहीत, की नदीला पूर येत नाही. सगळे आसमंत शीतलतेने तृप्त झालेले असते. पावसाचे हे शांत रूपही आपण कधी ना कधी पाहिले असेल आणि सुखावून गेले असू; पण पुढे लागणार्‍या माळव्यात मात्र मेघाने खूप जबरदस्तीने बरसायचे आहे. वळवाच्या पावसाने अगोदरच धरणीला वाफसा आलेला असतो. मशागतीची कामे वेगात चालू असतात. तेथील शेतकरणी मेघाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्या मेघाला पोषणकर्ता राजा मानतात. तिथे थोडा अधिक वेळ थांबावे. त्यांची शेती पिकली पाहिजे. नानाविध वाहनांवर बसून पाऊस नक्षत्रांचे गाणे गात आपले काम पूर्ण झाले, की मग काढता पाय घेतो. माळव्यात मेघाने असेच बरसायचे आहे. पुढच्या प्रवासात थोडी दंगा-मस्ती, खोडकरपणा करायचा आहे. इथून उत्तरेस आम्रकुट पर्वताच्या दिशेने जायचे आहे. तिथल्या जंगलात वणवा लागला असेल, तर क्षणार्धात विझला पाहिजे, असा जोमदार बरस.  इथल्या आमराईत असा उत्कट बरस, की एखादी स्त्री फुलांचा गजरा माळते, तसा तुझ्या सरींचा गजरा करून तिने माळला पाहिजे. अहाहा!!! पावसाच्या सरीतील एका-एका थेंबाचे सुंदर फूल होते. ही फुले जलद-जलद एकमेकांत गुंफली जातात, त्यांचा गजरा होतो आणि काही क्षणातच एखाद्या स्वरूपसुंदरीच्या केशसांभारात ही फुलांची वेणी लटकते आणि ती रूपगर्विता स्वत:शी खूश होत, खूप मोहक लाजते. मन:चक्षूंना वेड लावणारे पावसाचे हे रूप कल्पिताना कालिदासाच्या आनंदाला पारावार तरी राहिला असेल काय? 
अल्लडपणे बरसणारा खोडकर पाऊस आपण कित्येक वेळा पाहिला असेल. एखादी सर अचानकपणे येते, जोरकस बरसते, सर्वांची धांदल उडवते आणि क्षणात निघून जाते. अगदी अशाच प्रकारे खोडकरपणा करून आम्रकुट पर्वतावरच्या भिल्लिणींना ओल्या चिंब करण्याचा नाठाळपणा मेघाने करावा, असे यक्ष त्याला सांगतो. या पावसाचा लटका राग त्या भिल्लिणींना न आला, तर नवलच! 
आता मेघाला विंध्य पर्वतराजीतून पुढे जायचे आहे. इथून मात्र सावकाश मंद गतीने पुढे जायचे आहे. जंबूच्या खोर्‍यात वनवेलींचे घनदाट जंगल आहे. खाली खडकाळ दरीतून नर्मदा वेगात वाहते आहे. इथे पाण्याचे दुर्भिक्ष नाही. त्यामुळे सावकाश जा.. म्हणजे मंद संततधार बरसलास, तरी चालेल. आत्तापर्यंत बरसून जर जलदाली रिकाम्या झाल्या असतील, तर नर्मदेचे सुगंधित पाणी प्यायला हवे. कारण, पुढच्या गावात धुंद होऊन बरसायचे आहे. इथे यक्ष मेघाला नर्मदेच्या पात्रात उतरण्याचा सल्ला देतो. नदीवर झुकलेला मेघ कसा बरसत असेल? की त्या पात्रावर विसावून केवळ क्षुधाशांती करीत असेल? काय असेल हे रोमहर्षक दृश्य? मेघ स्तब्ध झालाय.. आतून रिता आहे.. नर्मदेच्या पात्रावर जमलेले बाष्प मेघ शोषून घेतो आहे. विहंगम, निव्वळ विहंगम असे हे दृश्य!!!
पुढे कदंबवनात अलवार सरींनी बरसायचे आहे. तिथली हरणे बावरली पाहिजेत, अशा विलंबित तालात बरस. वनकेळीच्या कोवळ्या कळ्यासुद्धा दुखावणार नाहीत, अशा सौम्य सरींचे नर्तन इथे अपेक्षित असल्याचे यक्ष मेघाला सांगतो. इथे मोर नाचतील, तुझे स्वागत करतील, त्यांना दुखावू नकोस. रेंगाळून राहा इथे थोडा. आता हा रेंगाळणारा आल्हाददायक पाऊस मन किती प्रफुल्लित करीत असेल, ना? पावसाच्या सरींची ही विलंबित चाल हरणेच काय, आपल्यालाही मोहवून टाकणारीच असणार.
पुढे विस्तीर्ण विदिशानगरी लागेल. तिथे जिच्या जललहरींमधून संगीत स्रवते, अशी वेत्रवती नदी आहे. इथे अशा सरी बरसव, की त्यांचा नादही स्वर्गीय असायला हवा..! आपणही अनुभवतो पावसाची संगीतमग्न अवस्था.. भान हरपून जावे, असा हा अनुभव स्वत: मेघ कसा घेत असेल, या विचारानेच आपण शहारून येतो. कालिदासाने पावसाची ही सारी रूपे त्या नजाकतींसह अनुभवली असतील. पुढे नग नदीतीरावर जाईच्या बागा आहेत. इथे तर खूपच नाजूक आणि हळवेपणाने मेघाला बरसायचेय; जणू नाजूक हाताने कुणी जलकण शिंपते आहे, इतक्या नाजूक सरींनी त्या कळ्यांना खुलवावयाचे तरल रूप मेघसरींना घ्यायचे आहे. त्यानंतर मेघाला उज्जयिनीनगरीला जायचे आहे. या नगरीत स्त्रियांचे मोहक आणि तेजाळलेले चकित चेहरे पाहायचे असतील, तर इथे विजा चमकवून पाहा. याच वाटेवर निर्विध्या नदी आहे. जशी डोळ्यांची भाषा वापरून स्त्रिया पुरुषाला भुरळ पाडतात, तशी ही नदी मेघाशी वागणार आहे. तेव्हा अगदी प्रियकरासारखे तिचे सौंदर्य खुलवत त्याने इथे जलदाली भरून घ्यायच्या आहेत. एका बाजूला ही नटवी नदी, तर पुढे दुसर्‍या बाजूला सिंधू व्याकूळ होऊन मेघाची वाट पाहते आहे. तिचे शुष्क झालेले प्रेमपात्र दुथडी भरून वाहील, असे मनमुराद मेघाने इथे बरसावे, असे यक्ष सांगतो. 
अफाट आहेत कालिदासाची वर्णने. मेघाच्या या दोन रूपांची कल्पनाही आपण करू शकत नाही..! कसा बेधुंद बरसत असेल मेघ इथे? की कारुण्याने विलाप करीत असेल? की सर्वस्वी सिंधूरूप होत असेल? गंधवतीच्या काठावर असलेल्या चंडीश्‍वराला अभिषेक घालतानाचे मेघाचे रूप, म्हकाळाच्या देवराईवर मंडल करून बरसतानाचे भाविक रूप, नगरीतल्या ललनांची थट्टा करतानाचे खट्याळ रूप, हिमाद्रीवर बरसतानाचे करुणाद्र रूप, हिमालयातील मृदंगाच्या कपालध्वनीसारखे विराट रूप, देवललनांशी खेळतानाचे त्याचे सुखनैव रूप, त्यांना दरडावणारे त्याचे गोड रूप, स्वप्न पाहणार्‍या यक्षिणीच्या महालाच्या छतावर दिवस उजाडण्याची वाट पाहत थांबणारे मेघाचे संयमित रूप..! मेघ किती प्रकारे बरसू शकतो, हे ‘मेघदूता’तच वाचावे. मन चिंब होते. गात्र थक्क होतात. 
(लेखक कालिदासाच्या साहित्याचे अभ्यासक आहेत.)