शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाची पावलं..

By admin | Updated: September 30, 2016 18:28 IST

आठ दिवसात चौदा ठिकाणं किंवा सहा दिवसात पाच शहरं अशा सहलीला काय अर्थ?

- मकरंद जोशी

आठ दिवसात चौदा ठिकाणं किंवा सहा दिवसात पाच शहरं अशा सहलीला काय अर्थ?सुटीचा खरा आनंद उपभोगायचा असेल तर डोंगराच्या कुशीतलं किंवा समुद्राकाठचं एखादं छानसं गाव शोधायला हवं आणि त्या गावाच्या लयीशी जुळवून घेत निवांतपणे तिथे पथारी टाकायला हवी.आपल्या काही काही गोष्टींमध्ये कसे कमालीचे साम्य असते. म्हणजे बघा ना, आपण सध्या सर्वत्र प्रचारात असलेल्या बुफे जेवणाचा जसा ‘आस्वाद’ (?) घेतो, त्याच पद्धतीनं आपण पर्यटनालाही जातो. बुफेसाठी मांडलेल्या पदार्थांमधील एखादा जरी पदार्थ घेतला नाही तर जणू शिक्षा होईल अशा थाटात जसे आपण सगळे पदार्थ ताटात कोंबायचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे पर्यटनाला जायचं म्हणजे पाच सहा दिवसांत जमतील तेवढी ठिकाणं बघायची असा जणू नियमच झाला आहे. आता आपण पर्यटनाला का जातो तर रोजच्या कंटाळवाण्या, दमवणाऱ्या, थकवणाऱ्या रुटीनपासून सुटका म्हणून ना? पण आपण करतोय काय, तर इथे जशी आणि जितकी धावपळ करतो तशीच शिमला, मनाली, नाहीतर जयपूर-उदयपूरला करतो. पाश्चिमात्य संकल्पनेनुसार पर्यटन दोन प्रकारचे असतात. बिझनेस ट्रॅव्हल आणि लेजर ट्रॅव्हल. बिझनेस ट्रॅव्हल म्हणजे कामकाजाच्या, व्यापार उद्योगाच्या निमित्ताने केलेला प्रवास. तर लेजर ट्रॅव्हल म्हणजे कामापासून सुटी घेऊन, मनोरंजनासाठी, विश्रांती घेण्यासाठी केलेलं पर्यटन. ‘लेजर’ या शब्दाचा डिक्शनरीतला अर्थ बघितला तर कामापासून सुटी पासून ते रिलॅक्सेशन, फ्री टाइम पर्यंत अनेक अर्थ मिळतात.आता आपण जर आठ दिवसात चौदा ठिकाणं किंवा सहा दिवसात पाच शहरं अशी सहल करत असू तर लेजर या शब्दाचा अर्थच बदलावा लागेल ना? सुटीचा खरा आनंद उपभोगायचा असेल तर एखादं छानसं डोंगराच्या कुशीतलं किंवा समुद्राकाठचं गाव (‘गाव’ बरं, शहर नाही!) गाठायचं आणि तिथल्या हॉटेलमध्ये तीन- चार दिवस मुक्काम ठोकून त्या गावाच्या ठाय लयीशी जुळवून घ्यायचं. आपल्या भारतामधील शिमला, नैनिताल, मसुरी, उटी (अगदी माथेरानसुद्धा) ही हिल स्टेशन्स शोधणाऱ्या गोऱ्या साहेबाची सुटीची कल्पना हीच तर होती. पण भारतीय पर्यटकांनी आपलं लक्ष तिकडे वळवलं आणि त्या ठिकाणी साइट सिइंगच्या जागा तयार झाल्या.लेजर ट्रॅव्हलचा हा अनुभव घ्यायला भारतात कुठे कुठे जाता येईल ते पाहूया. भारतातील उत्तराखंड म्हटल्यावर सर्वसाधारणपणे नैनिताल आणि मसुरी ही दोन नावंच पटकन आठवतात. पण उत्तराखंडमधील हिमालयाच्या रांगांमध्ये अनेक छोटी छोटी ठिकाणं तुमचं स्वागत करायला उत्सुक आहेत, त्यातलंच एक म्हणजे ‘लॅन्सडाउन’. हिमालयाच्या डोंगररांगांवर ५६०० फुटांवर पाइन आणि ओकच्या हिरव्यागार जंगलामध्ये धुक्याची शाल ओढून पहुडलेल्या या ठिकाणी तुम्हाला ‘शांततेचा ध्वनी’ नक्की ऐकायला मिळेल. ब्रिटिशराजमध्ये गढवाल रायफल्सचे ट्रेनिंग सेंटर म्हणून वसवलेल्या या ठिकाणाचे मूळ नाव होतं ‘कालू डांडा’ म्हणजे गढवाली भाषेत ‘काळा पहाड’. १८८७ साली भारताचा तत्कालीन व्हॉइसरॉय लॅन्सडाउन याला मानवंदना देण्यासाठी त्याचे नाव या वसाहतीला देण्यात आले. या ब्रिटिशराजच्या खुणा आजही इथल्या वास्तूंमधून पाहायला मिळतात. दिल्ली-कोटद्वारा-लॅन्सडाऊन असा प्रवास करत तुम्ही येता तेव्हा कोटद्वारा ते लॅन्सडाउन या रस्त्यावरील अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहून डोळे निवतात. लॅन्सडाउनमध्ये साइट सिइंग करायचेच म्हटले तर तारकेश्वर महादेव मंदिर, दरवानसिंग म्युझियम, सेंट जॉन्स चर्च, भीम पकोडा अशा जागा आहेत. पण ‘दिल धुंढता है फिर वही फुर्सत के रात दिन’ हे गाणं अनुभवायचं असेल तर लॅन्सडाऊनच्या रानवाटांवरून मस्त भटका, भोवतालच्या हिरवाईचा मनसोक्त आनंद घ्या आणि परिसरातली शांतता मनात भरून घ्या.शहराच्या कोलाहलाची, गजबजाटाची सवय असलेल्या आपल्या कानांना काही काही आवाज किती सुखद असतात याचा जणू विसरच पडलेला असतो, अशा विसरलेल्या आवाजांमधील एक म्हणजे समुद्राची गाज. गोव्यासारख्या कमर्र्शियल बीचवरसुद्धा ही ‘गाज’ कळत नाही. त्यासाठी केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील सागराकाठचं ‘बेकल’ गाठायला पाहिजे. गावाचं नाव फारसं आकर्षक वाटलं नाही? मग मणिरत्नमच्या ‘बॉम्बे’मधलं भर पावसातलं ‘तू ही रे’ गाणं आठवा. त्या गाण्यातला समुद्र आणि किल्ला बेकलचा आहे. काय एकदम सीन ट्रान्स्फर झाला ना? बेकलचा सागरकिनारा शिल्पांनी आणि कोरीव कलाकृतींनी सजवलेला तर आहेच, पण सायंकाळी हा किनारा दिव्यांच्या प्रकाशझोताने उजळत असल्याने तुम्ही उशिरापर्यंत थांबून समुद्राची मजा घेऊ शकता. बेकल हे ठिकाण मंगळुरूपासून तीन तासांच्या अंतरावर आहे. या ठिकाणी बजेट हॉटेल्सपासून ते लक्झरी स्पा रिसॉर्ट्सपर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. समुद्राकाठचे निवांत क्षण अनुभवायला तसं फार लांब जाण्याची गरज नाही. कोकणातल्या थोड्या आडवाटेवरच्या गावात जाऊन राहिलात तरी माडांच्या बनात आणि सागराच्या लाटांमध्ये हरवून जाण्याचं सुख अनुभवता येतं. आंबोलीसारख्या अजूनही फारशा कमर्र्शियलाइज न झालेल्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या कावळेसादच्या दरीच्या काठावर किंवा हिरण्यकेशी मंदिराच्या आवारात फक्त बसून राहिलात तरी शहरात न मिळणारी शांतता अनुभवता येईल. कर्नाटकातील कुर्ग, दमणच्या जवळचं दिव, हिमाचलमधील सांगला व्हॅली अशी कितीतरी ठिकाणं सांगता येतील जिथे जाऊन फक्त त्या परिसराची स्पंदनं ऐकण्यात रमून जाता येतं. मात्र त्यासाठी स्थलदर्शनाचा सोस सोडून, निवांतपणे सुटी घालवायची तयारी पाहिजे. समर्थ रामदासस्वामींच्याच शब्दाचा आधार घ्यायचा तर ‘विश्रांती वाटते जेथे, जावया पुण्य पाहिजे’.सुटी घेऊन पर्यटनाला जाताना एक नक्की ठरवून टाका की रोज घरी जे करतो ते तिकडे करायचंच नाही. म्हणजे गजर लावून सकाळी लवकर उठायचं नाही, मस्त आरामात लोळत पडायचं, उठल्यानंतर हे पाहायला जायचंय, तिकडची वेळ संपत येईल म्हणून घाई गडबड करायची नाही, भरपेट नाश्ता करायचा आणि मग वाटलं तर अवती भवती एक चक्कर मारून यायची. उंच उंच झाडांच्या पायाखालच्या वळणदार पायवाटांवरून फेरफटका मारायचा किंवा चपला हातात घेऊन पावलं भिजतील इतक्याच पाण्यात समुद्राच्या काठावर चालत सुटायचं. बाजारातल्या दुकानांमध्ये मांडलेल्या भाज्या, वस्तू पहिल्यांदाच बघतोय अशा बघायच्या, एखाद्या कोपऱ्यावरच्या छोट्या हॉटेलातून तळल्या जाणाऱ्या भज्यांचं आमंत्रण आलं किंवा कढईतून पाकात बुडत पडलेल्या जिलबीचा मोह झाला तर ‘नको, आता काय जेवायचंय’ असा विचार न करता त्या पदार्थांचा मान (आणि आपलं मन) राखायचं, दुपारी एखादं पुस्तक वाचत पसरावं, संध्याकाळी डोंगराच्या कडेवरून किंवा समुद्राच्या काठावरून बुडणाऱ्या सूर्याने आभाळात साजरी केलेली रंगपंचमी बघावी आणि रात्री झोपताना उद्या लवकर उठायचं नाही या आनंदात झोपून जावं. याला म्हणतात सुटी आणि याला म्हणतात खरंखुरं लेजर ट्रॅव्हल.