- माधव इमारते
सुहास बहुळकरांची नवीन चित्रं स्मरणरंजनासह आजचं वास्तवही नेमकं सांगतात. लाल, पिवळा, निळा असे शुद्ध तेजस्वी असलेले रंग हे या चित्रंचे प्रमुख वैशिष्टय़ं. त्यात काही ठिकाणी जुन्या वास्तू, चिनी खेळणी यांचाही प्रतीकात्मक वापर दिसतो. त्यातून चांगला वाईट बदल आणि त्यांच्या खुणा या चित्रत सापडत जातात.
प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांचे ‘पास्ट अॅण्ड प्रेङोण्ट’ (भूत आणि वर्तमान किंवा काल आणि आज) हे प्रदर्शन येत्या 24 नोव्हेंबरपासून जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे निमित्त साधून त्यांनी लिहिलेल्या ‘आयुष्याची मौल्यवान माती - शिल्पकार करमकर’, ‘गोपाळ देऊस्कर कलावंत आणि माणूस’ आणि ‘- बॉम्बे स्कूल आठवणीतले आणि अनुभवातले’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळाही होणार आहे. मूलत: वास्तववादी व्यक्तिचित्रकार असलेल्या बहुळकरांनी या पुस्तकातून शब्द-माध्यमातूनही ही व्यक्तिचित्रे अतिशय बोलकी रंगविलेली आहेत.
सुहास बहुळकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले चित्रकार आहेत. विशेषत: व्यक्तिचित्रणावर त्यांची जबरदस्त पकड आहे. प्रख्यात चित्रकार गोपाळ देऊस्कर हे त्यांचे गुरु. लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे, दुर्गाबाई भागवत, स्वा. सावरकर अशा काही थोर व्यक्तींची त्यांनी केलेली व्यक्तिचित्रणो याची साक्ष देतात. जवळजवळ नऊ वर्षानी हे प्रदर्शन होत आहे. मध्यंतरीच्या काळात हे चित्रकला/शिल्पकला- चरित्रकोशाचा एक मोठा प्रकल्प राबवीत होते. महाराष्ट्रातील गेल्या 2क्क् वर्षाच्या कालावधीत 3क्5 चित्रकार/शिल्पकारांची माहिती यात असून, महाराष्ट्रातील ‘बॉम्बे स्कूल’ या चित्रकलाशैलीचा इतिहास या कोशात प्रथतमच एवढय़ा विस्मृत स्वरूपात नोंदला गेला आहे. या कोशाद्वारे महाराष्ट्रातील चित्रसंस्कृतीचा, तसेच चित्रकारांच्या वैविध्यपूर्व शैलींचा परिचय होतोच, परंतु याहूनही विशेष म्हणजे अनेक अज्ञात कलाकारांचे योगदान या कोशाद्वारे प्रथमच उजेडात आले आहे. सुहास बहुळकर यांनी आजवर अनेक प्रकल्प राबविले आहे. पण हे कार्य म्हणजे त्यांच्या जीवनातील माइल स्टोन ठरावा. या शिवाय सावरकर-स्मारक, चित्रकुट येथील रामदर्शन, पुण्यातील मस्तानी महल, जहांगीर आर्ट गॅलरीच्या सहयोगाने केलेली ‘मास्टरस्ट्रोक्स’ ही प्रदर्शन मालिका इत्यादी प्रकल्प त्यांच्या नावावर आहेतच.
1992 साली झालेल्या आधार संस्कृती या त्यांच्या प्रदर्शनातून त्यांनी एका विशिष्ट शैलीतून अभिव्यक्ती करायला सुरुवात केली. या शैलीला स्मरणरंजनात्मक कथनशैली असे म्हणता येईल. पुण्यात बालपण गेलेल्या बहुळकरांनी पेशवाई काळातील वाडय़ांतील वस्तूंची होणारी पडझड, जीर्णावस्था व त्यावर झालेले आधुनिकतेचे आक्रमण यामुळे होणा:या मनोवस्थेतून या शैलीचा आधार घेऊन आविष्कार केला. प्रत्येक शहराची एक आकार संस्कृती असते. ती एका विशिष्ट काळाशी निगडित असते. तसेच तत्कालीन अनेक घटकांनी ती बांधली जाते. विशेषत: वास्तुरचना, नित्य व्यवहारातील भांडीकुंडी, घरातील भिंतीवरील सुशोभन, स्त्री-पुरुषांचे पोषाख, अलंकार इत्यादी. काळाच्या ओघात ही संस्कृती लोप पावत जाते. हे सर्व घटक हळूहळू विस्मृतीत जायला लागतात. मात्र, त्या संस्कृती-संचितांनी निर्माण झालेले भावविश्व एखाद्या संवेदनक्षम कलाकारांना व्यथित करते. मग तो कलावंत स्मरणरंजनात रमतो व त्यातूनच विस्मृतीत जाऊ पाहत असलेल्या साठवणींचा एक प्रतीकात्मक आविष्कार घडतो. बहुळकरांची शैली घडली ती या अस्वस्थ मताच्या स्मरणरंजनातून हेच सूत्र वा आशय हा सध्याच्या ‘पास्ट-प्रेङोण्ट’ या चित्रमालिकेतूनही दिसतो. आकार संस्कृती, देवाचे पाऊल ठसे, परिवर्तन व नियती ही त्यांची याच शैलीतील आजवर झालेली प्रदर्शने.
‘पास्ट अॅण्ड प्रेङोण्ट’ या मालिकेत मराठी संस्कृतीच्या स्मरणरंजनासोबतच आधुनिक काळातील स्थित्यंतरे व झालेले बदल, त्यामुळे झालेले विद्रूपीकरणही दिसते. 19व्या शतकातील पेशवेकालीन वाडय़ांचा :हास व त्यावरील आधुनिक जीवन पद्धतीचे सावट या दोन्ही गोष्टींचे एकत्रिकरण या चित्रतून प्रत्ययास येते. तत्कालीन पगडी, धोतर नेसलेले, उपरणो घेतलेले, कानात भिकबाळी घातलेले पुरुष; नऊवारी नेसलेल्या, खोपा घातलेल्या, नाकात नथ घातलेल्या, कपाळावर चंद्रकोर असलेल्या, विविध अलंकारांनी नटलेल्या स्त्रिया, परकर-पोलक्यातल्या लहान मुली, जुन्या वाडय़ांच्या भिंतीवरील देवाधिकांची जीर्ण झालेली चित्रे, भिंतीवरील अलंकरण, कमानीदार खिडक्या, भक्कम दरवाजे याबरोबरच खिडक्यांच्या गजांना लावलेला निळा चमकदार एनॅमल रंग, वाळत घातलेले आधुनिक कपडे, गायी, माकडं, मुखवटे, आधुनिक चिनी खेळणी, अशा सांस्कृतिक संकराचे अतिशय वेधक चित्रण या मालिकेतून प्रत्ययास येते. भूतकालीन-कालचे पारंपरिक वास्तव आणि काळाच्या संक्रमणातून हे बदलेले नवे वास्तव यातून बहुळकरांनी एक विचित्र दृश्यंरूप निर्माण केले आहे. आपल्या पूर्वीच्या व सध्याच्या जीवनातील सर्वच बाबतीत खूप बदल झाला आहे. मात्र परंपरेची नाळ आपण तोडू शकत नाही. प्रत्येक पिढी आपल्या पूर्व पिढींचे संस्कार घेऊनच पुढे जात असते. बहुळकरांची चित्रे हीच मानसिकता व्यक्त करतात.
ब्रिटिश अकॅडमिक पद्धतीतील वास्तववादी व्यक्तिचित्रण शैली, भित्तीचित्रतील भारतीय शैलीतील देवदेवतांची पुराणातील घटनांची रेषाप्रधान चित्रे, पेशवेकालीन पडझड झालेल्या वास्तू-वाडे या सर्वाचा कौशल्यानं उपयोग करून बहुळकरांनी स्वत:ची एक विशेष चित्रशैली घडवली आहे.
‘पास्ट आणि प्रेङोण्ट’ या मालिकेतील हीच शैली भाषा बहुळकरांनी वापरली आहे. गेल्या काही वर्षात झालेले सामाजिक-राजकीय परिवर्तन, आपल्या देशातील अति धार्मिकता, विभूतीपूजेचे अवडंबर, राजकारणी लोकांची पोकळ आश्वासने, आजची भडक जीवनशैली व मन हरवलेला माणूस याचा प्रतीकात्मक प्रतिसादच या चित्रमालिकेतून दिसतो. या प्रदर्शनात ‘वंडर इंडिया’ व स्मरण रंजन अशा दोन उपमालिकेमधील चित्रे पाहायला मिळतात. कागदावर, कॅन्व्हसवर, लाकडी चुलीवर अॅक्रिलिक रंगमाध्यमात चित्रे असून, प्लेटोग्राफी या माध्यमातील काही मुद्राचित्रेही प्रदर्शित केलेली आहेत.
‘पास्ट अॅण्ड प्रेङोण्ट’ या मालिकेतील चित्रंची पूर्वीच्या चित्रंपेक्षा थोडी वेगळी वैशिष्टय़े आहेत. विशेषत: यातील रंग. लाल, पिवळा, निळा असे शुद्ध रंग (प्राथमिक रंग कुठलीही छटा न मिसळता), काहीसे भडक वाटणारे व तेजस्वी असलेले रंग हे या चित्रंचे प्रमुख वैशिष्टय़े. काही ठिकाणी मुखवटे व चिनी खेळणी यांचाही प्रतीकात्मक वापर दिसतो. तसेच काही चित्रतून नरेंद्र मोदी, महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचा, अच्छे दिन आयेंगे अशा घोषवाक्यांचा उपयोगही उपरोधिकपणो केलेला आढळतो. वाडय़ाच्या भिंतीवर अच्छे दिन आयेंगेचे पोस्टर, गाईच्या गळ्यातील मोदींच्या प्रतिमेचा फोटो तसेच भगवा फेटा बांधून संगणकावर बसलेले मोदी अशा आजच्या प्रतिमाही वापरल्या आहेत. या शिवाय एका चित्रत तर एकच स्त्री अर्धी पारंपरिक, अर्धी आधुनिक पेहरावात दाखविली आहे. त्यांच्या एका चित्रत आपल्याला वाडय़ाच्या भिंतीवरील द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणारी मारुतीची प्रतिमा व वाडय़ाच्या बाहेर जीन्सची पॅँट व गुलाबी रंगाची अंडरवेअर, भगवा लंगोट असे कपडे वाळत टाकलेले दिसतात. तर खाली दोन माकडांच्या हातात लेजची पाकीट दाखविली आहेत. आजच्या जीवनशैलीचं हे वास्तव चित्र आहे. आजचे जाहिरात युग, परदेशी वस्तूंची क्रेझ, यंत्रवत झालेले जीवन, त्यातून नराचा वानर होतो आहे की काय अशी शंका यावी, अशी सुचकता यातून दिसते. तसेच आपल्या सभोवतालाबद्दल आपली उदासीनता व स्वत:चाच स्वार्थ पाहण्याची मानसिकता, यातून सूचित करण्याचा प्रयत्नही केलेला दिसतो.
‘नियती’ आणि तिच्या पाऊलखुणातून जाणवणारी मानवी अस्तित्वाची क्षणभंगुरता ही चित्रे देतात. स्मरणरंजकता हे मानवाला मिळालेले वरदान आणि शापही. आपल्या पूर्वसुरींनी घडवलेल्या इतिहासाचे स्मरण आपल्याला भविष्याकरिता बळ देते, त्याबरोबरच बदलत जाणारा काळ, एक उदासीनताही आणतो.
‘पास्ट अॅण्ड प्रेङोण्ट’ (भूत आणि वर्तमान किंवा काल आणि आज) हा आशय असलेली काळाची पावले दाखविणारी ही चित्रे, बहुळकरांच्या उद्याच्या चित्रंचीही (भविष्यकालीन) नांदी ठरतील असे वाटते.
(लेखक सुप्रसिद्ध कलासमिक्षक आहेत.)