शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

अफुचा वळसा

By admin | Updated: January 3, 2015 15:06 IST

कर्जात बुडालेल्या अमेरिकेच्या इमेजचे ‘गारुड’ अजून इतके लखलखते कसे? भाजणीच्या थालीपीठापेक्षा मॅक्डोनल्डच्या चवीने जीभ का चाळवते?

- वैशाली करमरकर
 
फार फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी आयाबायांना घर-शेताची, पोराबाळांची उस्तवार एका हाती करता करता नाकी नऊ येत. त्या काळी काही ‘एक मूल, गुलाबाचे फूल’ असा प्रकार नसे. एक चालते, एक रांगते, एक पालथे, एक पिते मूल. तिने कसा बरे उपसावा हा सारा खसाला. मग एखादे पोर भारीच किरकिरे निघाले तर ती माउली रोजच्या बाळगुटीत अफूचा वळसा उगाळी. त्यातला खारीक-मधाचा गोडवा ओळखीचा. बाळ मुटुमुटू गुटी चाटून टाकी. त्या अंमलाखाली मूल सुशांत निजे. त्या माउलीचा दिवसभराचा कार्यभाग विनासायास पार पडे. या भानगडीत त्या बाळाला ‘माझे अंथरुण ओले झाले आहे’ ‘माझे पोट दुखते आहे.’ ‘मला भूक लागली आहे’ असे काहीबाही म्हणण्याची शुद्ध (किंवा मुभा) रहात नसे, हा मुद्दा अलाहिदा.
आपल्या कार्यभागात अडथळा आणणार्‍यांना चतुराईने गप्प करण्यासाठी मनुष्यस्वभाव वेगवेगळे मार्ग निवडतो. आडदांड आणि विनाशकारी वृत्तींना बंदुकीचा धाक दाखवून गप्प करावे लागते, तर बिलंदर वृत्तींना लाडूवडीचे आमिष पुरते. एकूण काय तर वय, वृत्ती, परिस्थिती याचा लेखाजोखा घेऊन आपल्या कामात अडचण आणणार्‍यांना गप्प करता येते. आणि त्या योगे कार्यभाग बिनबोभाट उरकता येतो. लेकुरवाळी माउली हे आपले एक प्रतिनिधिक उदाहरण. मुळात हा मनुष्यस्वभाव.
हा मनुष्यस्वभाव एखाद्या शितासारखा. त्याचे प्रतिबिंब संपूर्ण भातात म्हणजे समाजात न पडले तर नवल. कुटुंब हा मनुष्यसमाजाचा एक छोटा आरसा. अशा अनेक कुटुंबाचा बनतो समाज. अठरापगड समाजांचे बनते राष्ट्र आणि अशी अनेक राष्ट्रे मिळून बनतो विश्‍वसमुदाय. आजच्या भाषेत ग्लोबल व्हिलेज.
आपले कुटुंब ही जणू मनुष्यस्वभावाला पैलू पाडणारी एक प्रयोगशाळा असते. प्रत्येक कुटुंबात वर्चस्वासाठी रस्सीखेच असते. हेवेदावे असतात. इतरांचा आवाज कौशल्याने गप्प करण्याचे प्रयोग सुरू असतात. हेच सर्व प्रयोग प्रथम समाजाच्या, मग देशाच्या प्रांगणात सुरू राहतात. त्यातले सदस्य म्हणजे त्यातले विविध समूह. अनेक धर्मांचे, व्यवसायांचे, आकाराने मोठे-छोटे, त्यातले काही चलाख, काही आडदांड, काही बघे, काही तान्हे. या सर्वांची उस्तवार गाडा हाकणार्‍याला अनेक आघाड्यांवर करायची असते. कामे निपटायची असतात. गटागटातील भांडणे मिटवण्यात भारी वेळ जातो. मग प्रत्येक गटाचे वय आणि वृत्ती पाहून कधी अफू, कधी लाडूवडी तर कधी शिप्तराचे फटके अशी अस्त्रे वापरावी लागतात आणि कामात अडथळा आणणार्‍यांना गप्प करावे लागते.
हाच खेळ जगाच्या प्रांगणात विस्तारित पडद्यावर पहायला मिळतो. त्यातले सदस्य म्हणजे लहानमोठी राष्ट्रे. त्यांच्यातले सख्खे चुलत. भाऊबंदकी. क्वचित साटेलोटे. आज या विश्‍वसमुदायातील लोकांची संख्या आहे सहा अब्जाच्यावर. या सहा अब्जांना गप्प करून आपला कार्यभाग बिनबोभाट उरकायचा म्हणजे काय खायचे काम? बरे या वर्चस्वासाठी धडपडणार्‍या अनेक पाटर्य़ा, व्यापारी, उत्पादक, माध्यमे, राजकीय मुत्सद्दी, धर्म, भाषा. अगदी इतिहासकार आणि संस्कृतीसुद्धा या वर्चस्व झगड्यातून सुटलेल्या नाहीत. सार्‍या जगातील अब्जावधी प्रजेने आपली उत्पादने वापरावी, आपल्या गटाची भाषा बोलावी, आपलाच धर्म स्वीकारावा आणि आपल्या गटाची संस्कृतीच सार्‍या जगभर नांदावी- असा हा वर्चस्ववादी अट्टहास.
यातल्या काही पाटर्य़ा शरीरबळावर आणि शस्त्र बळावर धाकदपटशा करू पाहातात तर काही पाटर्य़ा मधात उगाळलेली अफूची गोळी चाटवून विरोधाची किरकिर बंद करण्याचे कसब दाखवतात आणि कोणाच्याही न कळत आपला कार्यभाग बिनबोभाट उरकतात.
बाळगुटी नेहमी गोड असते. ती इवलीशी मात्रा असते. दररोज न चुकता दिली जाते. आणि ती चांदीच्या बोंडल्यात असते. ‘अंथरुण ओले झाले आहे ते बदला’ असा टाहो फोडण्याचा जन्मसिद्ध हक्क ती विसरायला लावते.
- या बाळगुटीचे नाव ‘सॉफ्ट पॉवर’. 
सॉफ्ट म्हणजे मऊ, मृदू. पॉवर म्हणजे नियंत्रणक्षमता किंवा समुदायावर वर्चस्व स्थापण्याची क्षमता. 
ही ‘सॉफ्ट पॉवर’ नावाची बाळगुटी आज जगभर आपल्या सर्वांना सतत चाटवली जात आहे. अगदी त्यातल्या अफूच्या वळशासह चोरपावलाने आणि आपल्या नकळत. उद्देश सरळ आहे. माणसाची स्वतंत्र विचार करण्याची, विरोध करण्याची शक्ती जितकी कमी होईल तितके बरे. 
विश्‍वास नाही ना बसत? मग खालील प्रश्नांची स्वत:पुरती उत्तरं द्या बरं!
8तुम्ही प्रवासात आहात. वाटेत भूक लागलीये. शेजारी शेजारी दोन रेस्तराँ आहेत. एकावर पाटी आहे. ‘ताज्या भाजणीची थालीपीठे मिळतील.’ दुसरे रेस्तरॉ आहे मॅक्डोनल्ड. तुमची पावले कुठे वळतील?
8कुठेसा भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. तुम्ही गडबडीने टीव्ही लावता, तर तुम्ही दूरदर्शन लावाल? की बीबीसी किंवा तत्सम परदेशी वाहिनी?
8लेकरू तीन वर्षांचे आले म्हणताना योग्य शाळेच्या शोधाशोधीत तुम्ही आहात, तुमचा सहज कल मराठी माध्यमाच्या शाळेकडे जातो? की इंग्रजी माध्यमाच्या?
8तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला स्थलांतर करावेसे वाटत आहे. तर तुम्ही अमेरिकेच्या वकिलातीसमोर लाईन लावाल? की ‘ब्रीक्स’ (इफकउर) म्हणजे ब्राझील, रशिया (इंडिया), चीन, दक्षिण आफ्रिका या चारांपैकी कोणत्या तरी एका देशाच्या वकिलातीपुढे?
हो, ठाऊक आहे. तुमच्या चॉईसला तशी कारणे आहेत. ती आजच्या मूळ प्रवाहाबरोबर वाहात जाताना क्षणभर सयुक्तिक वाटू शकतात. ‘‘मॅक्डोनल्ड निदान स्वच्छ तरी आहे. काय जाणो भाजणी ताजी आहे का नाही?’’.  ‘‘मराठी शाळा? माझ्या लेकराला पुढे जाऊन न्यूनगंड आला तर?’’ . असे काही बाही.
- अगदी कबूल ! पण क्षणभर विचार करून बघा, मॅक्डोनल्डच्या जाहिराती आणि त्या भोवतालचे प्रतिमेचे वलय आपले डोळे इतके दिपवते की त्या खाण्यात शरीराला अपायकारक असे काही असू शकते अशी आपल्याला शंकासुद्धा येत नाही. हवामानानुरूप आहार आणि त्यातला सकसपणा ही साधी गोष्ट विसरायला होते. 
बीबीसीचे डोळेच आपल्याला खरी बातमी देण्याची क्षमता बाळगतात असा आपला ठाम विश्‍वास आहे.
 भारतीय भाषा या टाकावू. इंग्रजी टिकावू. ती बोलता आली की आपण ज्ञानी झालो, शहाणे झालो या भ्रमाची गुंगी साधारत: एकोणिसाव्या शतकापासून आपल्याला चढवली गेली आहे. ती उतरण्याचे नाव म्हणून घेत नाहीत. बरं हा माध्यमाचा प्रश्न कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि इंग्रजेतर युरोपियन देश असा इतरत्र कुठेही का बरे पडत नाही? तिथे मातृभाषेतून शिक्षण ही गोष्ट श्‍वासोच्छ्वासाइतकी सहजमान्य आहे, ते आपल्याला का पटत नाही? 
अमेरिकेएवढा कर्जबाजारी देश आज दुनियेत क्वचितच असेल. पण अमेरिकन इमेजचे गारुड असे काही आकर्षक की त्याने जगभरातील बुद्धिमत्ता पूर्ण झपाटली जावी! जगाचा नकाशा उलगडून पाहिला तर ब्रीक्स देशांतच पुढला विकास शक्य आहे ही गोष्ट ‘करतलआमलक’वत म्हणजे तळहातकावरल्या आवळ्याइतकी स्पष्ट आहे. हे सर्व कळते पण वळत नाही.
- तर हा असा असतो सॉफ्ट पॉवरचा प्रताप. प्रश्न विचारण्याचे, विरोध करायचे सार्मथ्य तो विसरायला लावतो. केवळ एकट्या दुकट्याला नव्हे, तर अखंड मानवसमुदायाला ही सॉफ्ट पॉवर नावाची बया साधा कॉमनसेन्स वापरण्यापासून परावृत्त करू शकते. 
लाओत्से या चिनी तत्त्ववेत्याने हजारभर वर्षांपूर्वी म्हणून ठेवले आहे. ‘‘सॉफ्ट इज हार्ड’’ म्हणजे मृदू वाटणार्‍या गोष्टीत वज्रासारखे काठिण्य असू शकते. एखाद्या कातळावर वर्षानुवर्षे पाणी ठिबकत राहिले तर तो सहज भंगू शकतो. तसेच समाजमनावर वर्षानुवर्षे अमुक एक गोष्ट बिंबवली तर कुठलाही अजस्त्र मानवसमाज हवा तसा वळवता येतो. हतगात्र करून टाकता येतो. त्याच्या मनावर अनिर्बंध अधिसत्ता गाजवता येते.
ही सॉफ्ट पॉवर हे आगामी युगाचे प्रभावी अस्त्र बनत चालले आहे. अनेक राष्ट्रे अत्यंत दूरदुष्टीने हे अस्त्र वापरत आहेत. भांडवलदार त्यात प्रचंड पैसा गुंतवत आहेत. जगातील विविध भाषा आणि संस्कृती जगातील सहाअब्ज लोकांचे लक्ष सतत स्वत:कडे वळत रहावे अशा कसून प्रयत्नात आहेत. स्वत:च्या संस्कृतीतील काळ्या बाजू लपवून फक्त उजळ बाजू रंगमंचावर सादर करीत आहेत. ते ही अगदी साळसूदपणे.
- तर अशा या सॉफ्ट पॉवरच्या सुरस आणि चमत्कारिक कथा हा या लेखमालेचा विषय आहे. त्यासाठी आपण जगभरातल्या घडामोडींची सफर करणार आहोत. कधी इतिहासाला स्पर्श करणार आहोत तर कधी दैनंदिन जीवनाला. कधी माध्यमविश्‍वात डोकावणार आहोत तर कधी आंतरराष्ट्रीय राजकारणात.
ही सफर चालू होईल पुढल्या रविवारी. तोपर्यंत शहाळ्याचे पाणी घेणार? की थंडगार कोकोकोला?
(लेखिका आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ असून, ग्योथे इन्स्टिट्यूट मार्क्‍स म्यूलर भवन येथे विपणन प्रमुख (कॉर्पोरेट ट्रेनिंग) म्हणून कार्यरत आहेत)
(हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होईल.)