शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

निर्मला : एक कुस्करलेली कळी

By admin | Updated: September 6, 2014 15:02 IST

कोवळ्या मनावर झालेले ओरखडे कधीच पुसले जात नाहीत. अत्यंत विश्‍वासाने शेजारच्या काकांसमवेत निघालेल्या मुलीसोबत जेव्हा अतिप्रसंग झाला, तेव्हा तिच्या मनाच्या पाटीवरही असाच एक चरा उमटला. त्याचा परिणाम लग्नानंतरही टिकून राहिला.. काय झालं तिचं पुढे?..

 डॉ. संप्रसाद विनोद

 
उन्हाळ्याची सुट्टी लागली. नगरजवळच्या खेड्यात राहणार्‍या दहा वर्षांच्या निर्मलाला पुण्यातल्या मावशीकडे जाण्याचे वेध लागले. कधी कशाचा फारसा हट्ट न करणारी निर्मला याबाबतीत मात्र काही ऐकायला तयार नव्हती. आईबाबा तिची समजूत काढून दमले. त्यांना कामामुळे तिच्याबरोबर जाणं शक्य नव्हतं आणि एवढय़ाशा मुलीला एकटं पाठवणंही जिवावर आलं होतं. दुसर्‍या कोणाबरोबर पाठवणंही योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे, काय करावं असा निर्मलाच्या आईवडलांना प्रश्न पडला होता. 
शेजारी राहणार्‍या गणपतभाऊंना त्यांची ही अडचण समजली. ते तालुक्याच्या कार्यालयात कामाला होते. त्यांना सरकारी कामासाठी पुण्याला आणि नंतर मुंबईला जायचं होतं. त्यांनी निर्मलाला पुण्याला घेऊन जायची तयारी दाखवली. निर्मलाच्या मामाने पुण्यातल्या मावशीकडे निरोप धाडला. ती निर्मलाला घेऊन जाण्यासाठी एसटी स्टँडवर येणार होती. गणपतभाऊंबरोबर संध्याकाळच्या एसटीने पुण्याला जायचं ठरलं. निर्मला आनंदाने नाचू लागली. चार कपडे पिशवीत भरून ती भाऊंची वाट पाहत बसली. भाऊ आले. निर्मलाचे आईवडील, मामा स्टँडवर सोडायला गेले. एसटी फलाटाला लागली. गणपतभाऊंबरोबर निरागस, छोटीशी निर्मला एसटीत चढली. आपल्या खिडकीजवळच्या जागेवर आनंदाने बसली. तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. गाडी चालू झाली. निर्मला बाहेरची गंमत पाहण्यात रमली. सगळे प्रवासी आपापल्या विश्‍वात रमले. पन्नाशीचे गणपतभाऊ निर्मलाच्या स्पर्शाने अस्वस्थ झाले. त्यांचा कामविकार बळावला. घडू नये ते घडू लागलं. त्यांनी तिला मांडीवर घेतलं. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. 
लहान वयाच्या निर्मलाला त्याही वेळी तो स्पर्श वेगळा वाटला. ती थोडी गांगरली. चपापली. हट्टाने मांडीवरून खाली उतरून अंग सावरून भाऊंच्या शेजारी बसली. भाऊंनी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तोही स्पर्श तिला नकोसा वाटला. पण, खिडकीजवळची जागा असल्याने तिला काही करता येईना. हळूहळू गणपतभाऊंचा हात तिच्या अंगावर फिरू लागला. कसाबसा जोर लावून तिने तो दूर केला. आता ती भलतीच घाबरून गेली. काय करावं तिला काही समजेना. शेवटी, बाथरूमला जायचंय असं सांगून ती एका बसथांब्यावर उतरली. गाडीत परत जाऊच नये, असं तिला वाटलं. पण, पर्याय नसल्याने पुन्हा बसमध्ये चढली. दरम्यान, गणपतभाऊंच्या शेजारी दोन माणसं बसली. त्यामुळे, निर्मला त्या दोघांच्या शेजारी आणि गणपतभाऊंपासून थोडं दूर बसू शकली. पण, पुढच्या एका थांब्यावर ती दोन माणसं उतरली आणि निर्मलाला पुन्हा गणपतभाऊंच्या जवळ बसावं लागलं. त्यांनी डोळे वटारून तिला दम दिला, की जर झालेल्या गोष्टीबद्दल ती कुठे बोलली तर तिची काही खैर नाही. निर्मला आणखीनच घाबरली. गणपतभाऊंचे चाळे सुरूच राहिले. तिला अगदी कसंनुसं होत राहिलं. जोरात ओरडावं असंही वाटलं; पण गणपतभाऊंची भीती वाटल्याने ती ओरडू शकली नाही. मुसमुसून रडत मात्र राहिली. निर्मलाचं रडणं पाहून शेजारच्या बाकावर बसलेल्या एका महिलेने आस्थेने चौकशी केली. थातुरमातुर उत्तरं देऊन गणपतभाऊंनी तिचं तोंड बंद केलं. निर्मलाला कधी एकदा पुण्याला पोचतोय, असं होऊन गेलं होतं.
पुणं आलं. खाली उतरण्यापूर्वी गणपतभाऊंनी तिला पुन्हा एकदा डोळे वटारून दम दिला. निर्मलाची नजर तिच्या मावशीला शोधत होती. फलाटावर मावशी दिसली आणि निर्मलाच्या जिवात जीव आला. ती पटकन एसटीतून खाली उतरली. पळत जाऊन मावशीला बिलगली आणि हमसाहमशी रडू लागली. मावशी चपापली पण बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे निर्मला भावनाविवश झाली असेल, अशी तिची समजूत झाली. तिने निर्मलाच्या डोक्यावरून, चेहर्‍यावरून हात फिरवला. ‘हा स्पर्श किती वेगळा आहे!! नाहीतर तो!!’ निर्मलाच्या मनात येऊन गेलं. भाचीला सुखरूप आणून पोचवल्याबद्दल मावशी गणपतभाऊंचे आभार मानू लागली. हे पाहून निर्मलाने सर्व शक्तीनिशी मावशीचा हात इतक्या जोराने दाबला, की मावशी कळवळली. थोडी अचंबितही झाली. एवढीशी मुलगी इतक्या जोराने हात का दाबतेय, असा तिला प्रश्न पडला. केवढय़ा जोराने दाबलास माझा हात!! असं म्हणत मावशीने आपला हात सोडवून घेतला.
निर्मला महिनाभर मावशीकडे राहिली. पण, सतत गप्प गप्पच असायची. तिला एसटीतली घटना सारखी आठवत रहायची. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेणं तिला शक्य झालं नाही. ती मोकळेपणाने बोलली नाही. लोकांत मिसळली नाही. मावसा, मावसभाऊ किंवा इतर कोणीही पुरुष जवळ आला, की घाबरून त्यांच्यापासून दूर जाऊ लागली. झोपेत असताना घरातला एखादा पुरुष आपल्याला भाऊंसारखं हाताळणार तर नाही ना, या भीतीपोटी ती पाय पोटाशी घेऊन, मुटकुळं करून, अंग चोरून मावशीशेजारी गादीवर पडून राहायची. पण, धसक्यामुळे धड झोपही लागायची नाही. लागलीच तरी अचानक दचकून, घाबरून अंथरुणात उठून बसायची. मावशीला आश्‍चर्य वाटायचं. नेहमी एवढं हसणारी, खेळणारी, उत्साहाने ओसंडून वाहणारी ही पोर असं का करतेय, असा तिला प्रश्न पडायचा. एकदा, निर्मलाला जवळ घेऊन काय झालंय हे जाणून घेण्याचा मावशीने प्रयत्न करून पाहिला; पण  भाऊंच्या धमकावणीमुळे निर्मला मावशीशी काही बोलली नाही. सगळं ठीक आहे, असंच म्हणत राहिली आणि आतल्या आत कुढत, रडत सगळ्या पुरुषांना घाबरू लागली. त्यांना टाळू लागली. 
सुट्टी संपली. निर्मला घरी परतली. आईलाही तिचं वागणं वेगळं वाटलं. अशी सहा वर्षे गेली. लग्नाचं वय झालं. पण, लग्नाचा विषय काढला की ती रडायलाच लागायची. त्यामुळे लग्न लांबलं. वय वाढलं. आईवडिलांची काळजी वाढली. कोणीतरी सुचवलं म्हणून अंगारे-धुपारे, देव, देवऋषी केले. ज्योतिष्याला निर्मलाचा हात दाखवला. कुंडली दाखवली. शेवटी १९व्या वर्षी ओळखीतल्या नामदेवशी तिचं लग्न ठरलं आणि मुहूर्त पाहून ती बोहल्यावर चढली. ‘आपलं कौमार्य भंग पावलं आहे’ या धारणेमुळे पहिल्या रात्री तिचा समागम होऊ शकला नाही. नंतरही प्रत्येक समागमाच्या वेळी प्रचंड भीतीमुळे ती सगळं शरीर आखडून घेऊ लागली. त्यामुळे, समागम होणं आणखी अवघड होऊ लागलं. असं वारंवार झाल्यामुळे नामदेवही त्रासला. वैतागला. रागावला. अशी अवस्था पाहून निर्मलाला वाईट वाटायचं. दु:ख व्हायचं. पण, कोवळ्या वयात झालेल्या अतिप्रसंगाचे विचार तिचा पिच्छा सोडत नव्हते. या विचारांच्या भोवर्‍यांमधून तिला काही केल्या बाहेर पडता येत नव्हतं. काय करावं तिला काही समजत नव्हतं. काय झालं पुढे या निर्मलाचं?
(क्रमश:)
  (लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरूआणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)