शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
2
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
3
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
4
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
5
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
6
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
7
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
8
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
9
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
10
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
11
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
12
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
13
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
14
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
15
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
16
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
17
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
18
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
19
प्रेम, अनैतिक संबंध अन् ३ हत्या! घरात सुरू होती दिवाळीची तयारी, पण पत्नीची एक चूक जीवावर बेतली
20
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स

‘तेव्हा’चं नाइटलाइफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 06:00 IST

1992च्या आधी ‘मध्यरात्रीची मुंबई’ सतत जागीच असे. समुद्रकिनार्‍यावर उतरणारा स्मगलिंगचा माल, पोटात दारू घेऊन शहरभर धावत्या फियाट, सतत गजबजलेले आँटीचे गुत्ते, जुगाराचे अड्डे एवढं असूनही मिनर्व्हा, अप्सरा, इरॉस, मेट्रोतले लास्ट शो बघून माणसं घरोघर नीट जात! बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या दंगली, त्यापाठोपाठच्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर  मुंबईतलं नाइटलाइफ कोमेजत गेलं ते गेलंच, आणि आता तर सगळंच बदललं..

ठळक मुद्देरात्रीच्या वेळी अनेक गुन्हेगारी कारवाया चालूनही मुंबई तेव्हा फारशी असुरक्षित मानली जात नव्हती. चित्रपटांचे शेवटचे शो पाहून शेवटच्या लोकलने उपनगरवासीय अगदी निर्धोक आपलं घर गाठत.

- रवींद्र राऊळ

अखेर राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीनंतर प्रजासत्ताक दिनापासून दक्षिण मुंबईत तांत्रिकदृष्ट्या नाइटलाइफ सुरू झालं आहे. कामानिमित्त रात्र जागवणार्‍या युवावर्गाने सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. नाइटलाइफला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी व्यापारीवर्गाची अपेक्षा आहे; पण गेल्या काही वर्षांत वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हे नाइटलाइफ निशाचरांसाठी कितपत सुरक्षित असेल, या प्रश्नाचा भुंगा सर्वसामान्यांभोवती भुणभुणत फिरतोय आणि त्यावर समाधानकारक उत्तर सरकारकडे नाही.नाइटलाइफकडे जसं रात्रीच्या शिफ्टमध्ये नोकरी करणार्‍यांचं, मौजमजा करत फिरणार्‍यांचं लक्ष आहे तसंच अधोजगतातील अधोनायकांचं म्हणजे गुन्हेगारी जगतात आपापलं कौशल्य आणि कसब आजमावणार्‍या गुन्हेगारांचंही बारीक लक्ष आहेच. गुन्हेगारी जगतात अनेक कारवाया होतात त्या रात्रीच्या अंधाराचा लाभ घेत. नाइटलाइफचा आनंद घेत फिरणारे सर्वसामान्य नागरिक म्हणजे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी आयती गिर्‍हाईकंच. म्हणूनच नाइटलाइफचा निर्णय नक्कीच गुन्हेगारांना सुखावून गेला असेलच. गेले काही दिवस वारंवार कानावर पडत असलेल्या नाइटलाइफ या शब्दाने असे अनेकांचे कान टवकारले गेले आहेत. मुंबईचं नाइटलाइफ म्हणजे रात्रभर कामासाठी जागे राहाणार्‍यांच्या सोयीसाठी हॉटेलपासून इतर आवश्यक सोयीसुविधा सुरू ठेवणं, इतकंच अभिप्रेत आहे; पण यानिमित्त होणार्‍या गर्दीत आपला बनावट रुपया चालवण्याची स्वप्नं गुन्हेगार अर्थातच पाहात असणार. त्यांना वेसण घालण्यासाठी मुंबई पोलीस कितपत तयार आहेत, हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. सरकारला अभिप्रेत असलेल्या नाइटलाइफचा फायदा घेत गुन्हेगारांनी समांतर नाइटलाइफ सुरू केल्यास ते कसं हाताळणार, याचा उलगडा नागरिकांना हवा आहे. वर्षानुवर्षे मुंबईकर अनुभवत आले ‘ते’ नाइटलाइफ सध्या पुसट झालंय. मध्यरात्रीची ती मुंबई म्हणजे मुंबईकरांच्याच नव्हे तर तमाम देशभरातील लोकांचा औत्सुक्याचा विषय होता. मुंबईकरांनी खर्‍या अर्थाने मध्यरात्रीची ती मुंबई अनुभवली ती म्हणजे 1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगलीपर्यंतच. दंगलीपाठोपाठ झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुंबईतील ते नाइटलाइफ कोमेजत गेलं. तोवर मात्र मध्यरात्रीच्या मुंबईत काय होत नव्हतं? त्यावेळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये राज्य होतं ते हाजी मस्तान, करीमलाला, युसूफ पठाण आणि वरदराजन मुदलीयार या डॉन मंडळींचं. त्यांच्या कारवायांनी मुंबईतल्या मध्यरात्री जागवल्या आणि गाजवल्या. आताच्या सारखी तेव्हा मुंबई लोकांनी खच्चून भरलेली नव्हती. परदेशातून येणारा स्मगलिंगचा माल थेट मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावरच उतरायचा. नरिमन पॉइंट आता गजबजलेलं असतं; पण त्या काळी रात्रीच्या अंधारात तेथेही समुद्रकिनारी स्मगलिंगचा माल उतरायचा आणि काहीवेळा तो पकडलाही जायचा. इतकंच नव्हे तर राजभवनाच्या किनार्‍यावरही स्मगलिंगचा माल उतरलेला आहे. दादरच्या चौपाटीवर बॉस्की कापड, घड्याळं असा तस्करीचा माल उतरायचा आणि तो लुटण्यासाठी वालजी पालजी गँगने फिल्डिंग लावलेली असायची. मुंबई गजबजली तशी स्मगलिंगच्या मालाचं लॅण्डिंग होणारी ठिकाणं विरार, पालघर तसंच रायगड जिल्ह्यात गेली.मुंबईत आरे कॉलनी, भांडूप, दहिसर खाडी येथे रात्रभर दारूच्या भट्टय़ा पेटायच्या आणि रबरी ट्यूबमधून ती दारू फियाट कारने रात्रभरात मुंबईतल्या गल्लीबोळातील सगळ्या दारू अड्डय़ांवर पोहोचायची. आँटीच्या गुत्त्यावर तर नेहमीच्या ग्राहकांना रात्रभर हवी तेव्हा दारू मिळे. दमणहून येणारी बनावट दारू दुधाच्या टँकरमधून विनासायास रात्रीच्या वेळी मुंबईत प्रवेश करीत असे. ग्रँटरोडवरील भल्या मोठय़ा, प्रशस्त आणि शेकडो पंटरनी गजबजलेल्या जुगारखान्यात फासे टाकून खेळल्या जाणार्‍या जुगारावरच्या इसमाने रात्रभर ठोकलेल्या ‘जिते भाय जिते’ आणि ‘हारे भाय हारे’ या आरोळ्या ज्याने ऐकल्या त्याने एकेकाळचं मुंबईचं नाइटलाइफ पाहिलंय याची खूणगाठ बांधायला हरकत नाही. अशा अनेक अड्डय़ांवर जुगारी लोक रात्रभर पडीक असत. मटक्याचे अड्डे तर पावलोपावली होते. राज्य सरकारने कागदोपत्री मटक्यावर बंदी घातली आहे; पण आजही मटका सुरू आहे. केवळ तो चालवणारे सूत्रधार आता मुंबईऐवजी गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये बसून अधिकच सुसूत्रपणे तो चालवतात, इतकाच काय तो फरक. मुंबईत मटका आणि दारूचे तर इतके अड्डे होते की पोलिसांच्या संगनमताने ती एक समांतर व्यवस्थाच निर्माण झाली होती. हे अड्डे अहोरात्र चालवण्याची परवानगी देतानाच पोलीस त्यांच्यावर त्यांच्या विभागात खट झालं तरी आपल्याला कळवण्याची जबाबदारी टाकत. त्यामुळे कुठल्याही एरियात काही अनुचित प्रकार घडला तरी पोलिसांनी त्याची खडान्खडा माहिती या अड्डेवाल्यांकडून ताबडतोब मिळे. पांढरपेशे लोक पोलिसांपासून दूरच राहात असल्याने पोलिसांनी हा तोडगा काढलेला असे.रात्र सुरू झाली की मुंबईचा वेगळाच रंग दिसू लागे. म्हणूनच ही मध्यरात्रीची मुंबई पाहण्याचा मोह मुख्यमंत्री असताना ए. आर. अंतुले यांनाही आवरता आला नाही. हारून-अल-रशीद बनून त्यांनी शिवसेना नेते प्रमोद नवलकर आणि ज्युलिओ रिबेरो यांना सोबत घेऊन मध्यरात्रीची मुंबई पालथी घातली. धारावीत धडाधड पेटलेल्या दारूच्या भट्टय़ा पाहून तेही थक्क झाले होते.रात्रीच्या वेळी अनेक गुन्हेगारी कारवाया चालूनही मुंबई तेव्हा फारशी असुरक्षित मानली जात नव्हती. मुंबईत मिनर्व्हा, अप्सरा, इरॉस, मेट्रो अशा थिएटरांमध्ये लागलेल्या चित्रपटांचे शेवटचे शो पाहून शेवटच्या लोकलने उपनगरवासीय अगदी निर्धोक आपलं घर गाठत.पण 1992च्या दंगलीनंतर मात्र सर्वच गणितं बदलली. खबर्‍यांचाच पोलिसांवर विश्वास राहिला नाही. मग सर्वसामान्यांची तर गोष्टच वेगळी. गेल्या तीन दशकात गुन्हेगारीचंही स्वरूप पार बदलून गेलंय. हातभट्टीच्या दारूची जागा वेगवेगळ्या ड्रग्जनी घेतलीय. नाइटलाइफची मौज लुटणार्‍या तरुणाईला ट्रॅप करण्याची नामी संधी ड्रग्जमाफिया अर्थातच सोडणार नाहीत. मागणी तसा पुरवठा, हा अर्थशास्राचा नियमच आहे. त्या न्यायाने नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना नाइटलाइफचा फायदा घेत नशेबाजीत अडकवण्याचा प्रयत्न होणार नाही, याची हमी कोणीही देणार नाही.दुबई, सिंगापूर, न्यू यॉर्कसारख्या शहरांत नागरिकांना, पर्यटकांना संपूर्ण रात्र बाहेर मौजमजा करता येते. तशी सोय मुंबईत नव्हती. त्यामुळे मुंबईला जागतिक दर्जा मिळण्यासाठी नाइटलाइफ सुरू करणे ही काळाची गरज होती. अर्थात, संभाव्य धोक्यांची शक्यता आजही तशीच आहे. रात्रीबेरात्री बेदरकारपणे गाड्या उडवणारे बायकर्स, छेडछाड करणारे रोडरोमिओ, आडोशाने चालणारे अनैतिक धंदे, वाहनचोर्‍या आणि नशेबाजीतून होणारे अपघात व गुन्हे आता वाढण्याची शक्यता आहे. रात्रभर चालणार्‍या आर्थिक व्यवहारांवर गुन्हेगारांची नजर असणारच आहे. नाइटलाइफ नसताना भुरट्या चोर्‍या, पाकीटमारीपासून ते लूटमार, फसवणूक, दरोडे, भेसळबाजी असे अनेक गुन्हे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पार पडत असतात. या सगळ्याचा बंदोबस्त करण्याची क्षमता आधीच संख्याबळ कमी असलेले मुंबईचे पोलीस दल कशी वाढवणार आहे, याचं उत्तर आधी द्यावं लागेल. सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात सुरक्षिततेची भावना उत्पन्न झाली तर शहरातील नाइटलाइफला कुणाचाच आक्षेप असणार नाही. अन्यथा ती भावी धोक्याची नांदीही ठरू शकेल.साधारण पंचवीस - तीस वर्षांपूर्वी होतं तेव्हढंच मुंबई पोलीस दलाचं मनुष्यबळ आजही आहे. पाच - सात हजार पोलीस कर्मचार्‍यांची भर पडली असेल,  तितकीच काय ती वाढ. दरम्यान शहरातील लोकसंख्या मात्र प्रचंड वाढली आहे. दीड कोटी हा मुंबईच्या लोकसंख्येचा आकडा गेली पंधरा-वीस वर्षे सांगण्यात येतोय. मात्र पोलीस अधिकार्‍यांच्या मते त्यात मोठय़ा प्रमाणावर वाढ झालीय.केवळ कागदोपत्री कायद्यांमुळे सुरक्षित वातावरण निर्माण होत नाही. पॉक्सो कायदा करून आठ वर्षं उलटली तरी अल्पवयीन मुलामुलींवरील अत्याचार कमी होत नाहीत, हा अनुभव आहे. मुली- महिलांवरील अत्याचाराच्या घटना या निर्मनुष्य परिसरात घडतात. नाइटलाइफमुळे वर्दळ आणि जागं असल्याने अशा घटनांना पायबंद बसेल, असा दावा काहीजण करीत आहेत. पण सुरक्षित वातावरणाची हमी यातून मिळू शकत नाही. म्हणूनच पोलिसांना नाइटलाइफच्या क्षेत्रात विशेष दक्षता घेत प्रभावी कामगिरी करावी लागेल. समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, तक्रारींचा शीघ्र गतीने निपटारा, प्रचलित कायद्यांचा गुन्हेगारांविरोधात प्रभावी वापर, सातत्याने गस्त, तातडीची मदत, सराईत गुन्हेगारांच्या प्रणालीचा अभ्यास, देशी-विदेशी पर्यटकांना सुरक्षा,  सीसीटीव्हीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर अशा मार्गांनी पोलीस गुन्हेगारांविरुद्ध आपला वचक निर्माण करीत नाइटलाइफ निर्विघ्नपणे कसे पार पडेल याची व्यवस्था करू शकतात.आयटी कंपन्या, बीपीओ, कॉल सेंटर, कार्पोरेट कंपन्या, बँका यांच्या कामाच्या पद्धतीमुळे कर्मचार्‍यांना नाइट शिफ्ट अनिवार्य झाली आहे. या सगळ्यांना सुविधा पुरवणं अपरिहार्य आहे. नाइटलाइफ हा यावर काढलेला तोडगा योग्य आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकार आणि पोलीस यंत्रणेवरच आहे. 

ravindra.rawool@lokmat.com(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपवृत्तसंपादक आहेत.)