शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
5
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
6
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
7
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
8
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
9
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
10
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
11
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
12
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
13
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
14
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
15
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
16
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
17
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
18
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
19
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
20
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?

काळाच्या पुढे असलेला उपेक्षित द्रष्टा कलावंत

By admin | Updated: August 30, 2014 14:31 IST

मराठी साहित्यातील एक कलंदर साहित्यिक म्हणजे रॉय किणीकर. त्यांच्या स्मृतीदिन येत्या ५ सप्टेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यिक पुत्राने केलेले त्यांचे हे स्मरण.

 अनिल किणीकर

 
वर्तमान काळात जगणारे आणि भविष्य काळाचा वेध घेणारे रॉय किणीकर हे एक प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व होते. लौकिक किंवा अलौकिक यश मिळणे किंवा न मिळणे हा एक योगायोग असतो. शिवाय असे यश मिळूनही त्या यशाचा बोलबाला सर्वतोमुखी होणे म्हणजेच प्रसिद्धी मिळणे, हा तर विलक्षण योगायोग असतो. असा हा विलक्षण योगायोग ज्यांच्या वाट्याला येत असतो, ते भाग्यवान असतात. पण, काही प्रतिभावंतांच्या आयुष्यात, प्राक्तनात असा योगायोग येत नाही, ते लौकिक-अलौकिकदृष्ट्या उपेक्षित राहतात. असे उपेक्षित प्रतिभावंत काळाच्या फार पुढे असतात. रॉय किणीकरांसारखा असा प्रतिभावंत राज्यकर्त्यांना सांगत असतो. 
भोगलीस सत्ता, सत्तेतून संपत्ती
उघडली मूठ, सत्तेची झाली माती।
घर तुझे जळाले, जळशील आता तूही
तुज लपावयाला आता जागा नाही।।
तर्कशास्त्र आणि युक्तिवाद यापलीकडे सत्य असते. शिवाय, सत्य हे सापेक्ष असते. प्रतिभावंत असे सत्य अनुभवत असतो. असे अनुभव आणि अनुभूती तो स्वत:च्या निर्मितीतून व्यक्त करत असतो. म्हणूनच ही निर्मिती अभिजात स्वरूपाची असते. वेदना आनंद, किंबहुना वेदनेतील आनंद किंवा आनंदातील वेदना एकाच वेळी जाणवत असते. ही निर्मिती म्हणजे प्रतिभावंताचे एका वेगळ्या अर्थाने आत्मचरित्र असते. पण, गंमत अशी, की प्रतिभावंत आणि त्याचे आत्मचरित्र हे अतक्र्य, अनाकलनीय, अब्सर्ड असे असते. रॉय किणीकर म्हणतात, 
रे, कुणी दिला या पाषाणाला शाप 
जा मंदिरातल्या मूर्तीचा हो बाप।
पाषाण म्हणे मूर्तीला माझ्या पोरा 
सर्वज्ञ म्हणती तुज, मीच कसा रे कोरा।।
ही केवढी शोकांतिका! काळाच्या ओघात आत्मचरित्र अजरामर होते. प्रतिभावंत विस्मृतीत जातो. आत्मचरित्राचे सूत्र आणि पर्यायाने रॉय किणीकरांचे जीवनसूत्र हे असे होते. एखादा कलावंत जगत असतो तेव्हा त्याच्या आयुष्याची पर्वा कोण करतो? एखादा प्रतिभावंत अभ्यास, चिंतन, मनन किंबहुना आपल्या प्रतिभेचे सर्वस्व देऊन कलाकृतीला जन्म देत असतो. पण, त्या परमेश्‍वराशी नाते जोडणार्‍या निष्ठावंत मनालाही दारिद्रय़ भोगायला लागणे, अपेक्षा पदरी येणे आणि त्यातून वैफल्य येऊन जगणे निर्थक जाणवणें, ही एक दारुण शोकांतिका आहे. माणूस सैरभैर होतो. स्वत:चा, ‘स्व’चा शोध घेता घेता जगण्यातूनच त्याला उमजते. भ्रमिष्टावस्था हेच तर वास्तव नाही ना? याचसाठी केला होता का अट्टहास?
आभाळ झिरपते, भरलेल्या माठात 
अन् निळा माठ, बघ भरला आभाळात। 
आभाळ पलीकडे, माठ फुटे हा इकडे, 
हा ‘वेडा’ जमवी, आभाळाचे तुकडे।। 
सृजनशील, संवेदनशील आणि चिंतनशील अशा ‘वेड्या’ प्रतिभावंताला अनाकलनीय भ्रमिष्टावस्था सतत सतावत असते. जगण्याच्या धडपडीतून तो नेहमी स्वत:ला सांगत असतो. 
जळल्यावर उरते, एक शेवटी राख 
ती फेक विडी, तोंडातील काडी टाक। 
जळण्यातच आहे, गंमत ‘वेड्या’ मोठी, 
दिव्यता, अमरता, मायावी, फसवी खोटी।।
अशा सापेक्ष सत्याचा साक्षात्कार झालेले रॉयसाहेब मला आयुष्यभर म्हणत होते, ‘‘आत्ताचा क्षण, आजचा दिवस आपण जिवंत आहोत हे केवढे महद्भाग्य, हा केवढा चमत्कार! आपण आहोत हाच आनंदोत्सव! जीवनाची वाटचाल हीच आनंदाची यात्रा.. वेदनेच्या आनंदानं आणि आनंदाच्या वेदनेनं काही शक्य असेल, तर मिळतं.. शोध मात्र जगण्यातूनच घेतला पाहिजे.. जगणं ‘सहज’ आणि ‘स्व’स्थ व्हायला हवं. म्हणजे कसं तर? ऐक- 
पाहिले, परंतु ओळख पटली नाही, 
ऐकले, परंतु अर्थ न कळला काही। 
चाललो कुठे, पायांना माहीत नव्हते, 
झोपलो, परंतु स्वप्न न माझे होते।।
‘‘डोंट वरी अनिल, जस्ट लीव.। ‘जगण्यातच’ आहे गंमत वेड्या मोठी.! ‘माणूस’ समजावून घेणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्याचा प्रत्यय मला क्षणोक्षणी येत आहे. या अभ्यासात लक्षात येतेय, की आपल्याला समजतो तो माणूस दिसणार्‍या हिमनगासारखा म्हणजे एक अष्टमांश असतो, हिमनगाचा  अष्टमांश भाग तर दिसतच नसतो.. शिवाय ‘दिसणे’ आणि ‘समजणे’ आणखी वेगळे. स्वत:ला पाहणे आणि स्वत:ची ओळख पटणे, स्वत: ऐकणे आणि स्वत:ला ऐकणे. अरे बापरे ऽऽ..
माझा बाप रॉय किणीकर असा होता, असा आहे.  आपला जन्म जिथे, जसा होईल तिथे मिळालेल्या जन्मातील आव्हाने स्वीकारणे आणि जीवनाची लढाई आपल्या सर्व शक्तीनुसार लढत राहणे हे तर सर्वस्वी माणसाच्या हातातच आहे. 
हे जीवनाचे तत्त्वज्ञान ‘उत्तररात्र’मधून सांगणारे 
रॉय किणीकर हे स्वत:च्या ओळखीच्या ‘किणीकरांबाबत किती ‘अनोळखी’ होते ते ‘स्वत:च स्वत:बद्दल सांगताना, स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे एक दाहक उत्तर पुन्हा स्वत:च सांगतात पाहा- 
हा देह तुझा, पण देहातील तू कोण 
हा देह तुझा, पण देहावीण तू कोण। 
हा देह जन्मतो, वाढत जातो, सरतो 
ना जन्म, ना मरण, त्या देहातील तो म्हणतो।।
या विश्‍वातून जाताना ‘त्या देहातील तो रॉय किणीकर तो’ म्हणून गेला, 
कानावर आली अनंतातूनी हाक विसरुनी पंख पाखरू उडाले एक।। 
‘‘विसरुनी पंख पाखरू उडाले एक हेच खरे. फार नवलाचे पाखरू होते हे. धरू जाता हाती येत नव्हते. आता फक्त कल्पनेची काही अद्भुत् पिसे ‘उत्तररात्री’च्या पानात ठेवून गेले. ते आयुष्यभर शोधीत असलेले घरटे या जगात त्यांना लाभले नाही. 
 
.. एका फार निराळ्या आणि चांगल्या अर्थाने नामनिराळे राहणे रॉय किणीकर यांच्या स्वभावातच होते. व्यवहारात याला विक्षिप्तपणाही म्हणतात. ते निराळे होते यात शंका नाही. स्वत:चा निराळेपणा मिरवण्याची त्यांनी कधीही संधी साधली नाही. त्यासाठी आवश्यक असणार्‍या व्यासपीठांपासून ते दूर राहिले. खरे म्हणजे, सगळ्यांच्या जवळ जवळ असण्याचा भास निर्माण करीत दूरदूरच राहिले. अनेकांना ते खूप आवडायचे. आवडावं असं त्यांच्या मजेदार बोलण्यात खूप काही होते.. रस्त्यात भेटले, तर कुठून आले आणि कुठे चालले, याचे खरे उत्तर ज्या कोणाला मिळाले असेल त्याने स्वत:ला दिव्यशक्ती प्राप्त झालेला सत्पुरुष मानावे.. पावसासारखे अचानक भेटायचे आणि चार थेंबांचा शिडकावा केल्यासारखे एखादा गमतीदार किस्सा सांगून गुल व्हायचे.
एकदा मात्र ते बेसावध सापडले. कोल्हापुरातल्या या मैफलीत मात्र त्यांचा सूर लागला. भारतीय शिल्प आणि चित्रकलेविषयी ते इतक्या जाणकारीनं बोलत होते आणि मासिक आणि पुस्तकं यांच्या उत्तम मुद्रणाविषयी किंवा लेआउटसंबंधीचे असे बारकावे समजावून देत होते, की आपण ज्यांना ओळखतो असे समजत आलो ते किणीकर हेच की कोणी दुसरे, अशी शंका यावी! 
..अजंठा, वेरुळ, बेल्लूर, हाळेबीड, रजपूत, चित्रकला, भारतीय इस्तकौशल्य यांच्यावर बोलणारे किणीकर हे त्यांचं माझ्या मनावर उमटून राहिलेलं चित्र! उत्तररात्रमध्ये किणीकरांनी उभं केलेलं चित्र एखाद्या अभिजात रजपुती मिनीएचर पेंटिंगची आठवण करून देतं. 
‘‘गडगडून आले माथ्यावर आभाळ 
थयथती मंजूळ पायातील लयचाळ
लचकला स्वरांचा तुरा निळ्या डोळ्यांत 
इंगळी डसे इरकली  मोरपंखात।।’’
रंगतरंगांच्या अशा स्वयंभू भिंगोर्‍या उगीच उमटत नाहीत. पाणी खोल असावं लागतं. 
..हा माणूस साहित्याइतकाच रंगरेषांच्या लीलांमध्ये गुंगणारा होता, हे किती अनपेक्षित रीतीने मला कळलं होतं.. आपण ओळखीच्या माणसाच्या बाबतीतही किती अनोळखी राहतो पाहा. पण किणीकरांनी तरी स्वत:मधला हा चिंतनशील कलावंत असा दडवून का ठेवावा? .. ते दृष्टिआड राहू इच्छित असले, तरी त्यांना तसं राहू द्यायला नको होतं. किणीकर काही अलैकिक ऋणे फेडायचीही इच्छा बाळगून होते. 
‘‘ऋण नक्षत्रांचे असते आकाशाला
ऋण फळाफुलांचे असते या धरतीला
ऋण फेडायाचे राहून माझे गेले
ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले।।’’
म्हणणार्‍या किणीकरांचे आपणही देणे लागत होतो, हे फार उशिरा कळले. 
..या अवलियाकडे आपण अधिक आस्थेने आणि आदराने पाहायला हवं होतं. त्यांनी स्वत: आदराची किंवा मानसन्मानाची चुकूनही अपेक्षा ठेवली नव्हती. म्हणून काय आपण त्यांना ओळखायला नको होते? 
पु. ल. देशपांडे