शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योतसिंग क्लीन बोल्ड बाय सिद्धू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 06:05 IST

क्रिकेटमध्ये सिद्धू चमकदार सलामीवीर होता; पण तो ‘सुनील गावसकर’ कधी बनू शकला नाही. राजकारणात लोकप्रियतेच्या बळावर त्याने निवडणुका जिंकल्या; पण तो अमरिंदरसिंगांसारखा ‘कॅॅप्टन’ बनू शकला नाही. ठोको ताली!

ठळक मुद्देभारतीय क्रिकेटमध्ये पंधरा-सोळा वर्षं खेळल्यानंतरही सिद्धू कधीच कर्णधार बनू शकला नाही. ना संघातलं स्थान त्याला कधी भक्कम राखता आलं. अमरिंदरसिंग यांची जागा घेण्याची घाई केली, पण फासे असे पडले की त्याला पालखीचं भोई व्हावं लागलं.

- सुकृत करंदीकर

सन १९९४. उत्तर भारतातल्या कडाक्याच्या थंडीचे दिवस. जानेवारीतला अठरावा दिवस. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्याच सामन्यासाठी लखनौचं मैदान खचाखच भरलेले. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मनोज प्रभाकर आणि नवज्योतसिंग सिद्धू ही सलामीची जोडी मैदानात उतरली. फिरकी गोलंदाजी ही श्रीलंकेची ताकद होती. मुथय्या मुरलीधरन या विशी-बाविशीतल्या श्रीलंकेच्या ऑफ-स्पिन गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय पदार्पण करून जेमतेम वर्षच झाले होते; पण तेवढ्यातही मुरलीधरनचे नाव गाजू लागले होते. दुसऱ्या बाजूला नवज्योतसिंग सिद्धूला भारताकडून खेळण्यास सुरुवात करून तोवर दहा वर्षे झाली होती. छातीपर्यंत उसळणाऱ्या, कानाजवळून सुसाट जाणाऱ्या चेंडूंसमोर सिद्धूची बॅॅट फार बोलत नसे; पण फिरकी, मध्यमगती गोलंदाज समोर आले की सिद्धूचे डोळे लकाकत. भारताविरुद्ध पहिलाच सामना खेळणाऱ्या मुरलीधरनला याचा अनुभव लवकरच आला. सिद्धूने त्या सामन्यात १२४ धावा फटकावल्या. त्यात ८ उत्तुंग षटकार होते. यातले सहा षटकार तर त्याने एकट्या मुरलीधरनलाच खेचले होते. क्रिज सोडून पुढे सरसावत जात मुरलीधरनला त्यानं लाँग-ऑन, लाँग-ऑफवरून लांबवर भिरकावले होते. पुढे हाच मुरलीधरन कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल आठशे बळी मिळविणारा जगातला एकमेव गोलंदाज ठरला; पण भारतातला पहिला दौरा तो आयुष्यभर विसरू शकला नाही. ‘षटकार ठोकणारा सिद्धू’ अशीच त्याने त्याची ओळख कसोटी आणि वन-डेतही निर्माण केली होती. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या शेन वॉर्नने नंतर सांगितले होते, ‘माझ्या गोलंदाजीवर क्रिजबाहेर सरसावत माझ्या डोक्यावरून मला फेकून देणारा सचिन माझ्या स्वप्नात येतो आणि माझी झोपच उडते;’ पण याच वॉर्नला क्रिजबाहेर येत फिल्डरच्या डोक्यावरून फटकावण्याची सुरुवात सिद्धूने आधी केली होती. करिअरच्या सुरुवातीला मात्र सिद्धूला फार चमक दाखविता आली नव्हती. एवढेच काय; पण ‘स्ट्रोकलेस’ अशी त्याची हेटाळणीही झाली. संघातले स्थान त्याला गमवावे लागले. त्यानंतर सिद्धूने खूप मेहनत केली. १९८७ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये ती फळालाही आली. या मालिकेत सिद्धूने सलग चार अर्धशतके ठोकली. १९९६ च्या भारतात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वर्ल्ड कपमध्येही सिद्धू एक अविस्मरणीय खेळी खेळून गेला. खरे तर ती फार कोणी लक्षात ठेवत नाही. मैदान होते बंगळुरूचे आणि मुकाबला होता थेट पाकिस्तानशी. दोनच गोष्टींमुळे हा सामना भारतीय क्रिकेटप्रेमींच्या कायमचा लक्षात राहिला. एक म्हणजे अखरेच्या षटकांमध्ये अजय जडेजाने केलेली वकार युनूसची बेदम धुलाई आणि वेंकटेश प्रसादने उद्दाम आमिर सोहेलच्या उडवलेल्या दांड्या; पण हे दोन्ही घडण्यापूर्वी सिद्धू हाच भारताच्या डावाला आकार देणारी ९३ धावांची मजबूत खेळी खेळून गेला होता. त्याच्या जोरावरच भारताने २८७ धावांचा डोंगर उभा केला ज्यापुढे पाकिस्तान नेस्तनाबूत झाला.

१९९६ मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. दौरा चालू असताना मधूनच सिद्धू महाशय स्वत:चे किट उचलून निघाले आणि कोणालाही न सांगता थेट भारतात परतले. असा प्रसंग यापूर्वी कधीच न घडल्याने बीसीसीआयने चौकशी समिती नेमली. तेव्हा सिद्धू एकच सांगत राहिला ते म्हणजे, ‘मेरी गलती मैं मानता हूँ.’ पण दौरा अर्धवट टाकण्याचा वेडगळपणा का केला, हे त्याने कधीच सांगितले नाही. बहुधा चूक मान्य केल्याने त्याला वेस्टइंडीज दौऱ्यावर नेण्यात आले. त्या दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेनला सिद्धूने सलग अकरा तास फलंदाजी करून द्विशतक ठोकले. त्यानंतर मात्र फार काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकला नाही. त्याचे क्रिकेट करिअर चढ-उताराचे; पण चमकदार राहिले. कसोटीतली ४२ ची आणि वनडेतली चाळीसला टेकणारी त्याची सरासरी वाईट अजिबातच नाही. त्याच्या रूपाने भारताला एक चांगला सलामीवीर मिळाला होता; पण १९९८-९९ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या सुमार कामगिरीमुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून वगळले. त्यानंतर १९९९ मध्ये त्याने ‘नो रिग्रेटस्’ म्हणत क्रिकेटला तडकाफडकी रामराम ठोकला. निवृत्त होताना त्याला इंग्लंड दौऱ्यातल्या ‘त्या’ घोडचुकीबद्दल विचारणा झाली त्यावेळी त्याचे उत्तर होते, ‘मी भूतकाळाचा किंवा भविष्याचा फार विचार करीत नसतो.’ सिद्धूच्या व्यक्तिमत्त्वातला हाच दोष असावा. सिद्धूच्या संघ सहकाऱ्यांचा अनुभव असा की सिद्धू बऱ्यापैकी अबोल आणि एकलकोंडा होता. सिद्धूने आणि त्याच्या मित्राने १९८८ मध्ये रस्त्यावरच्या भांडणात एका वयस्क माणसाला बॅॅटने इतके मारले की त्यात त्याचा मृत्यू झाला. सदोष मनुष्यवधाच्या आरोपावरून सिद्धूला तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. नंतर तो जामिनावर सुटला. क्रिकेट समालोचक म्हणून २००१ मध्ये माइक हाती घेतलेला नवाच सिद्धू जगासमोर आला. मंदिरा बेदी-सिद्धू या जोडगोळीने क्रिकेट कॉमेंट्रीचे स्वरूपच बदलून टाकले. क्रिकेटपेक्षा जास्त चाहते सिद्धूने त्याच्या अखंड बडबडीतून मिळविले. या लोकप्रियतेच्या बळावर २००४ मध्ये तो भाजपाचे कमळ हाती घेऊन अमृतसरमधून खासदार झाला; पण १९८८ मधल्या खून प्रकरणात दोषी आढळल्याने त्याने २००६ मध्ये राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा स्थगित केल्यावर पुन्हा २००७ मध्ये पोटनिवडणूक जिंकली. २००९ मध्ये अमृतसरमधून विजयाची पुनरावृत्ती केली.

भाजपानं २०१४ मध्ये अरुण जेटलींसाठी सिद्धूला तिकीट नाकारलं. एव्हाना अनेक कॉमेडी शो, रिऍलिटी शो यातून सिद्धू ‘टीव्ही स्टार’ बनला. या लोकप्रियतेनं त्याची महत्त्वाकांक्षा वाढवली. भाजपानं त्याला राज्यसभा दिली पण त्यानं तो समाधानी नव्हता. भाजपामध्ये नरेंद्र मोदींशी त्याचं जुळलं नाही. आपमध्ये अरविंद केजरीवालांशी संधान साधण्याचा प्रयत्न असफल ठरला. ‘आवाज-ए-पंजाब’ ही आघाडी काढून पाहिली आणि लगेच गुंडाळलीही. सिद्धुचे वडील भगवंतसिंह पंजाब काँग्रेसचे नेते होते. शेवटी त्यानं वडलांचा पक्ष जवळ केला आणि कॅॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या ‘टीम’मधे पंजाबचा मंत्री झाला. पण तिथंही मांड पक्की बसण्याआधीच त्याला सिंहासन खुणावू लागलं. भारतीय क्रिकेटमध्ये पंधरा-सोळा वर्षं खेळल्यानंतरही सिद्धू कधीच कर्णधार बनू शकला नाही. ना संघातलं स्थान त्याला कधी भक्कम राखता आलं. अमरिंदरसिंग यांची जागा घेण्याची घाई केली, पण फासे असे पडले की त्याला पालखीचं भोई व्हावं लागलं. संयम, दूरदृष्टीचा अभाव, उतावीळपणा आणि प्रसंगी माघार न घेण्याचा हट्टीपणा यामुळं सिद्धूचं राजकीय भवितव्य अस्थिरतेच्या गर्तेत आहे. अमरिंदरसिंग यांनी जाहीर केलेल्या व्यक्तिगत वैराची त्यात भर पडली आहे. त्यामुळं पंजाब कॉंग्रेसला घेऊन सिद्धू बुडणार की कॉंग्रेस आणि सिद्धू स्वतंत्रपणे बुडणार ही उत्सुकता आता आहे. क्रिकेटमध्ये ‘हिट विकेट’ असते. यात फलंदाज स्वत:च्याच चुकीनं यष्ट्या उद्ध्वस्त करतो आणि त्याला तंबूत परतावं लागतं. सिद्धूनं राजकारणात तेच केलं आहे. क्रिकेटमध्ये सिद्धू चमकदार सलामीवीर होता, पण तो ‘सुनील गावस्कर’ कधी बनू शकला नाही. राजकारणात लोकप्रियतेच्या बळावर त्यानं निवडणुका जिंकल्या, पण तो अमरिंदरसिंगांसारखा ‘कॅॅप्टन’ बनू शकला नाही. ठोको ताली!

(सहायक संपादक, लोकमत, पुणे)