अनिल नेने, लंडन
मीगेल्या चाळीस वर्षांपासून लंडनमध्ये राहतो आहे. तिथे मी जे नाईटलाईफ अनुभवलं ते खूप वेगळ्य़ा स्तरावरचं आणि वेगळ्य़ा दर्जाचं आहे.
नाईटलाईफ म्हटलं की आपल्या डोळ्य़ांपुढे काय येतं? ..रात्रभर दारू पुरवणारे बार आणि सेक्स! परंतु पॅरीस आणि लंडनमध्ये मी जे नाईटलाईफ अनुभवतो आहे, त्याचा एका वाक्यातला निष्कर्ष सांगतो की नाईटलाईफ म्हणजे केवळ एवढंच नव्हे. नाईटलाईफचा तो एक भाग मात्र नक्की आहे. पण आपल्याकडे (मुंबईच्या अगर कोणत्याही शहराच्या) नाईटलाईफची चर्चा होते तेव्हा प्रत्येकाच्या नजरेसमोर फक्त ‘त्या’ दोन गोष्टीच असतात.
खरंतर पॅरीस-लंडनमधलं रात्रीचं जीवन म्हणजे ब्लॉसम नाईटलाईफ आहे! त्यामध्ये काय नाही? कला आहे, संस्कृती आहे, मनमोकळा संवाद आहे, व्याख्यानं आहेत, खेळ आहेत, चर्चा आहेत. सारं काही आहे. सार्यांसाठी आहे! अनेकानेक कलाविष्कारांचा आनंद लुटण्याचं देखणं निमित्त असतं इथलं नाईटलाईफ!
समाजातील अत्यंत श्रीमंत, प्रतिष्ठीत व्यक्तींपासून ते सामान्यातील सामान्य माणसांपर्यंत सारे जण या रात्र-जीवनाचा आनंद घेऊ शकतात. याचं कारण तिथे नाईटलाईफचा आनंद घेताना सामाजिक बांधिलकी, सामाजिक शिस्त आणि सामाजिक उत्तरदायित्व या तिन्हीचा विसर पडू दिला जात नाही. किंबहुना ही नाईटलाईफची संस्कृती एका दिवसांत उभी राहिलेली नाहीच मुळी. गेली चार दशकं मी इथल्या नाईटलाईफचा मुक्तपणे आस्वाद घेतो आहे आणि याकाळात ही संस्कृती विकसित होतानाही पाहातो आहे. या नाईटलाईफमध्ये गुंडांच्या टोळ्य़ा, मारामार्या असले प्रकार अभावानेच असतात. दिवसभराच्या तुमच्या जगण्याइतकाच नाईटलाइफ हा जगण्याचा अविभाज्य असा भाग आहे. फ्रान्समध्ये लिडोचा खेळ रात्री १0-११नंतरच सुरू होतो किंवा फूटबॉल, क्रिकेटचे सामने रात्रीच सुरू होतात.
मूळातच लंडन, पॅॅरीस या शहरांना कलेची संस्कृती आहे आणि त्यामुळे त्या संस्कृतीची कास धरूनच इथलं नाईटलाईफ वर्षानुवर्षांच्या प्रवासातून विकसीत होत गेलं. ज्याला जे आवडतं ते इथलं नाईटलाईफ पुरवतं. त्यामुळे तुम्हाला रात्री फुटपाथवर बसून चित्र काढणारा एखादा दिसेल तर कुणी सुरेख गिटार घेऊन गाणी वाजवत बसलेला असेल. एखादा समोर हॅट ठेवून पियानो वाजवत असेल, कुठे नृत्याचे कार्यक्रम सुरू असतील, कुठे मोफत कॉन्सर्ट सुरू असतील, कॅसिनो असतील, पबही असतील! ज्याला जे आवडतं त्याने त्याचा मनसोक्त आनंद लुटावा.
लंडन, पॅरीसमध्ये जगभरातील सर्वाधिक पर्यटक येत असतात. दिवसभर अखंड काम केलेले स्थानिक रहिवासीही रात्री थोड्या सैल मनोरंजनाची वाट पाहत असतात. स्वत:ला आपल्या आवडीच्या गोष्टीत रमवावं, रिफ्रेश, रिचार्ज करावं. त्यासाठी रात्ररात्र जागायलाच हवं असं काही नाही. रात्री पबमध्ये मित्रांसमवेत बसलं, छान गप्पांचा फड जमवला आणि घरी परतलो, ही या शहरांमधली जीवनशैलीच आहे.
या संस्कृतीचा भाग होण्याची, आदर करण्याची आणि बेहोष होण्याचा परवाना घेताना नियम आणि बंधनं पाळण्याची रीत आपल्याकडे आधी रुजायला हवी.. नाईटलाईफ नंतर!