शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

अद्भुत सौंदर्याचा अनुभव देणारा लडाख हा केवळ एक भूभाग आहे की एखाद्या चित्रकारानं काढलेलं सुंदर चित्रं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 3:00 AM

विस्तीर्ण खोर्‍यात भळभळ वाहणारा थंड वारा आणि मावळत्या लालसर सोनेरी किरणांनी रंगून गेलेले लडाखी पहाड.. कधीही ढासळतील असे मातीचे उतार. कपच्या-कपच्यांचे धारदार खडक. पिवळा,मातकट, लालसर जांभळा अशा अनेकरंगी मातीचे डोंगर. मैलोन्मैल पसरलेलं शुष्क वाळवंट. सारंच अतिशय अस्थिर..

-वसंत वसंत लिमये 

हुंदरच्या ‘स्कर्मा इन’च्या व्हरांड्यात बसलो होतो. हुंदर हे नुब्रा खो-यातील शेवटचं मोठं गाव. संध्याकाळची वेळ, सोनेरी प्रकाशात दुरस्थ शिखरं खुणावीत होती. हिमाच्छादित चढ, धारदार सोंडा आणि चमकणारे दिमाखदार शिखर-माथे. चढाईचे मार्ग, टेक्निकल अडचणी, अ‍ॅव्हलांचचा धोका... कुठून?... माझ्या मेंदूतील चक्रं कुरकुरत फिरू लागली. आजही हिमाच्छादित शिखरं पाहताच मला काहीतरी होतं ! ती दुरस्थ शिखरं माझ्या गत तारुण्याला साद घालत होती. पण आज मनात कुठलीही जळजळ नव्हती. वयोमानपरत्वे आता आमच्यात अंतर पडलं होतं, त्याचीही खंत नव्हती. होतं फक्त एका जिव्हाळ्याच्या नात्याचं स्मरणरंजन !गेल्या रविवारी श्रीनगरला पोहचेपर्यंत दहशतवाद, अराजक याची भीती कधीच मागे पडली. त्याच दिवशी राजेंद्र फडके आणि जयराज साळगांवकर हिमायात्रेत सामील झाले. राजू फडके चार्टर्ड अकाउण्टण्ट आणि पोद्दार कॉलेजचा गिरीभ्रमण लोकप्रिय करणारा उत्साही मास्तर, तर जयराज हा लेखक आणि प्रथितयश उद्योजक. श्रीनगरहून आम्ही ‘जोझी ला’मार्गे लेहकडे सोमवारी निघालो.

हवामान चांगलं होतं आणि ‘जोझी ला’ कधी पार झाला हे कळलंच नाही. एरवी ट्राफिक जॅम, लॅण्डस्लाइड, अपघात यामुळे ‘जोझी ला’ खूप तापदायक ठरू शकतो. आम्ही नशीबवान होतो. द्रास येथे विनासायास पोहचून, जे अ‍ॅण्ड के पर्यटन विभागाच्या बेवसावू टूरिस्ट बंगल्यात मुक्काम केला. तिथली व्यवस्था यथातथाच होती. बहुदा सगळीकडेच शासकीय पर्यटन खात्याला मिळालेला हा शाप असावा. द्रासहून एक नवीनच रस्ता थेट झंस्कार खो-यातील ‘सांकू’ गावी जातो. त्या रस्त्यानं जाण्याचा आमचा मानस होता. मंगळवारी सकाळी आम्ही तडक दक्षिणेकडे जाणारा चढाचा रस्ता पकडला. वाटेत गावक-यानी, ‘पुढे बर्फ आहे’ अशी खबरदारीची सूचना दिली. हजार फूट चढून जाताच रस्त्यावरील बर्फ साफ करणारा बुलडोझर आणि सूरज भोसले नावाचा मराठी जवान भेटला. भोसले निघाला खेडजवळच्या खोपी-शिरगावचा. रस्ता पूर्ण साफ व्हायला दोन दिवस तरी लागणार होते. अशा परक्या वाळवंटी मुलुखात, मराठी कानावर पडणं हे आम्हा सर्वांसाठीच सुखद होतं. मस्त गप्पा मारून, परत फिरून आम्ही कारगिलकडे निघालो. वाटेत ‘आॅपरेशन विजय’चे १९९९ सालच्या कारगिल युद्धाचे स्मारक लागलं. टायगर हिल, टोलोलिंग हे समोर दिसत होतं. आपल्या सैन्याचा पराक्र म आणि बलिदान अशा ‘युद्धारत’ रम्य कथा रोमांचकारी होत्या. उंच पहाड, बोचरे थंडीवारे आणि तरीही त्या परिस्थितीत लढणं, सीमेचं रक्षण करणं अशा सा-याची कल्पना करूनही ऊर भरून आला. नतमस्तक अवस्थेत आम्ही हायवे सोडून बटालिकमार्गे ‘लामायुरू’कडे निघालो. बटालिककडून पर्यटकांना बगल देत, उंच कडे-कपारीतून जाणारा मार्ग, लडाखचं उग्रभीषण सौंदर्य उलगडून दाखवणारा आहे. ‘दारकोन’ इथे मुक्काम केला असताना कळलं की दारकोन, दार्चिक आणि दाह ही गावं आर्यन दरीत आहेत. इथे शुद्ध आर्यन वंशाचे लोक आजही राहतात म्हणे !

 

लडाख हे जम्मू आणि काश्मीरपेक्षा खूप वेगळं आहे. हे आपल्याला ‘जोझी ला’ पार करताच जाणवायला लागतं. गर्द वनराजी, हिरवीगार कुरणं यांनी नटलेलं गुलछबू काश्मीर संपून, ११००० फुटांवर असलेलं लडाख हे तिबेटशी सख्य सांगणारं, अतिशय शुष्क, थंडगार वाळवंट आहे. एकेकाळी याच भागातून ‘सिल्क रूट’मार्गे युरोप आणि मध्य आशिया यांचा व्यापार चालत असे. इथले बहुतांश लोक बौद्ध धर्मीय असून, शांत आणि आनंदी आहेत. भारतातून कित्येक शतकांपूर्वी, दळणवळणाची साधने अतिशय खडतर असताना, बौद्ध धर्म चीन, तिबेटमार्गे कसा पोहचला असेल, हे आश्चर्यकारक आहे. इथला विरोधाभास थक्क करणारा आहे. आज काश्मीरच्या अशांततेमुळे लडाखमधील पर्यटन खूप वाढलं असलं तरी इथल्या भौगोलिक अडचणी, राजकीय कारणं यामुळे इथला विकास कुर्मगतीनं चाललेला दिसतो. तरी लोकं सुखी-समाधानी आहेत हे या भागाचं उल्लेखनीय वैशिष्ट्य!

बुधवारी आम्ही लेह येथे पोहचलो. श्योक नदीच्या खो-यातील प्रवासासाठी परमिट काढणं गरजेचं आणि ती सोय आमचा स्थानिक मित्र ‘स्कर्मा’ याने करून ठेवली होती. पुढील प्रवासात आम्ही ‘खारदुंग ला’ आणि ‘वारी ला’ या १८००० फुटाच्या आसपासच्या दोन खिंडी पार करणार होतो. जयाची तब्येत किरकोळ बिनसली होती. साहजिकच तो हिरमुसला; पण पुढे विरळ हवामानाचा त्रास होईल अशा विचारानं, आपण लेहमधेच थांबून, एक-दोन दिवसांत परत फिरावं, असा अतिशय समंजस निर्णय त्यानं घेतला. आज-काल पर्यटन खूप लोकप्रिय आहे. अतिशय उत्साहानं आणि कल्पकतेनं त्याचं मार्केटिंग केलं जातं. लोकांकडे पैसे आहेत; पण वेळ नाही अशी परिस्थिती. अशावेळेस लडाखसारख्या प्रदेशात अतिउत्साह, अज्ञान यामुळे अतिउंचीवरील हवामानाचा अंदाज न घेता प्रवास केल्यास, ‘हाय अल्टिट्यूड सिकनेस’ नावाचा अदृश्य राक्षस दगा देऊ शकतो. विरळ हवामानाचा सराव सबुरीनेच करावा. त्यात घाई केल्यास अंगाशी येऊ शकते.

..इथून पुढे आम्ही तिघांनीच ‘खारदुंग ला’ पार केला. वाटेत किमान हजार मोटारसायकल वीर भेटले. गेल्या पाच-दहा वर्षात मोटारसायकलवारी हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला आहे. त्यातही अतिउत्साहामुळे आणि नियोजना-अभावी अनेकांना पस्तवावं लागतं. ‘खारदुंग ला’ येथे सारसबाग किंवा शिवाजी पार्कचा भास होत होता. खूप गर्दी होती, त्यामुळे फारसं न थांबता आम्ही पुढे नॉर्थ पुल्लू ओलांडून नुब्रा खो-यात हुंदर येथे पोहचलो. हुंदरच्या वाटेवर ‘दिस्कीट’ नावाची देखणी मोनॅस्ट्री पाहण्याचा योग आला. तिथेच १०६ फुटी मैत्रेय बुद्धांचा बसलेला पुतळा आहे. बुद्धाच्या चेह-यावरील सौम्य स्मितहास्य आणि मागून डोकावणारी हिमशिखरं, अतिशय प्रसन्न वाटत होतं.

हुंदरहून आम्ही ‘तुरतुक’च्या पुढे, भारताच्या उत्तर सीमेवरील शेवटच्या ‘थांग’ या गावापाशी पोहचलो. खोल दरीतून खळाळत वाहणा-या ‘श्योक’काठी हे गाव प्रसिद्ध आहे. येथे भेटलेल्या मराठी जवानानं दुर्बिणीतून समोरच्या उंच खडकाळ शिखरांकडे पाहायला सांगितलं. तिथल्या शिखरमाथ्यावर हिरवा ध्वज फडकत होता. सभोवतालच्या डझनभर टोकदार शिखरांवर सात-आठ पाकिस्तानी चौक्या आहेत. ‘श्योक’च्याच काठावर पुढे ‘प्राणु’ नावाचं शेवटचं पाकिस्तानी गाव आहे. हा भाग अतिशय दुर्गम असल्यानं, आपण आणि ‘ते’ केवळ स्टेलमेट प्रमाणे सुसज्ज अवस्थेत एकमेकांसमोर उभे ठाकलो आहोत आणि म्हणूनच पर्यटक इथपर्यंत येऊ शकतात. गेली सात दशकं चिघळलेले भारत-पाक संबंध, आंतरराष्ट्रीय, राजकीय हितसंबंध, माझे संस्कार आणि आत्ताची परिस्थिती हे सारं मनात जिवंत होतं...

शनिवारी ‘तीरथ’ येथे परत येऊन, श्योक नदी पार करून आम्ही सासोमाच्या दिशेने निघालो. याच खो-यात ‘वारशी’पर्यंत जाण्याची आम्हाला परवानगी होती. या खो-याच्या टोकाला ‘सियाचीन’ बेस कॅम्प आहे. सियाचीन पर्वतरांगेपलीकडे, ‘पाकव्याप्त’ नावाच्या विनोदामुळे आपल्या हातातून निसटलेला आणि मला अतिशय प्रिय असलेला भाग म्हणजे ‘बालतोरो’ हिमनदी. याच हिमनदीवर, जगातील दुसरं सर्वोच्च शिखर, चढाईसाठी अत्यंत अवघड तरीही देखणं असं k2 शिखर आहे.  k2 प्रत्यक्ष पाहण्याची संधी जवळजवळ अशक्यच आहे. ‘वारशी’च्या पुढे दरीत ढग दाटून आले होते.  k2’च्या इतके जवळ आहोत ही भावनाच अंगावर काटा आणणारी होती ! परतीच्या वाटेवर आम्ही ‘तीरथ’पाशी श्योक आणि सियाचीन नाला यांच्या संगमाजवळ ‘टी’ जंक्शन येथे कॅम्प ठोकला. तिथल्याच ढाब्यावरील नोर्बु आणि थोंडूप यांच्याशी गट्टी झाली. रात्री जेवण आम्हीच बनवणार होतो. सोबत त्या दोघांनाही जेवायला बोलावलं. ‘बहोत तुरिष्ट देखे, लेकीन आप जैसे लोग पहली बर मिले!’ इति नोर्बु. सध्या सोप्या, छोट्या गोष्टीदेखील माणसांना किती सहज जवळ आणतात.मी तंबूतून बाहेर पडलो तर समोर सोनेरी सूर्यबिंब ढगांशी लपंडाव खेळत होतं. देखावा भन्नाट होता. लडाखमध्ये कोणीही नवशिक्यानं जरी फोटो काढला, तरी उत्तमच येतो असं म्हणतात ! ‘श्योक’ नदीची गाज, विस्तीर्ण खो-यात भळभळ वाहणारा थंड वारा आणि मावळत्या लालसर सोनेरी किरणांनी रंगून गेलेले लडाखी पहाड आता सौम्य भासत होते. लडाखमध्ये शेवटच्या मावळणा-या हिमयुगात, निसर्गाचा उत्पात जणू हजारो/लाखो वर्षांपूर्वी योजल्यासारखा भासतो. या प्रदेशात पाऊस जेमतेम पाच इंच. ‘शयनकोन’ साधलेले, तरीही ढासळतील असे मातीचे उतार. कपच्या-कपच्यांचे धारदार खडक. पिवळा, मातकट, लालसर जांभळा अशा अनेकरंगी मातीचे डोंगर. मैलोन्मैल पसरलेलं शुष्क वाळवंट. सारंच अतिशय अस्थिर भासतं. निसर्ग शिल्पकार तर सूर्य चित्रकार. दुपारच्या टळटळीत उन्हात हा निसर्ग ऐरवी अतिशय निर्विकार भासतो. निळंभोर आकाश, ढग, सावल्या आणि सूर्यप्रकाश यांच्या मिलाफातून हाच निसर्ग अनेकविध, अनेकरंगी, मनोहारी रूपं धारण करतो, ते थक्क करणारं असतं. लाल काळसर आकाशात चंद्रकोर ढगांआडून हळूच हसत होती. वातावरण स्वर्गीय होतं. आसमंत स्तब्ध होता. मी होतो, निसर्ग होता. दोन्ही अस्थिर, नश्वर!

.. पण त्याचक्षणी माझ्यासाठी काळ जणू थांबला होता. मी हरवून गेलो होतो !

(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

vasantlimaye@gmail.com