शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी तरसणारं केरळचं पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 07:45 IST

आम्ही केरळमध्ये हाहाकार शोधत होतो; पण तशी परिस्थिती कुठेच आढळली नाही. वस्त्यांमध्ये शिधा, किराणा वाटला जात होता; पण लोकांना त्यात रस दिसत नव्हता. एक शेठ पाण्याच्या बाटल्या घेऊन आला, तेव्हा मात्र झुंबड उडाली. पुढच्या वेळेला पुन्हा पाण्याची गाडी आली, तेव्हा घरटी एक तरी बाटली मिळेल अशी व्यवस्था केली गेली. आता ना झुंबड उडाली, ना गर्दी झाली! हाहाकार शोधण्याची आमचीही गरज संपून गेली.

-योगेश गायकवाड

केरळात पूर येऊन गेला त्याला साधारण 15-20 दिवस लोटलेत. सडल्या, कुजल्याचा घाण वास पुराच्या आठवणी विसरू देत नाहीये. नदीपासून दूरच्या भागात जनजीवन सुरळीत झालं आहे. मात्र नदी किंवा बॅकवॉटरच्या जवळील भागातली बरीचशी माणसं दिवसभर घरातील गाळ उपसतात आणि रात्री सरकारी किंवा सामाजिक संस्थांच्या कृपेने चालणा-या कॅम्पमध्ये येऊन राहत आहेत. खरं तर मोसमी वारे ज्या ठिकाणी भारतमातेचे चरण स्पर्श करतात ती देवभूमी म्हणजे केरळ. पाऊस आणि इथलं बॅक वॉटर ही केरळची खरी ओळख. पण यंदाच्या वर्षी त्याच पावसाच्या पाण्याने केरळी माणसाचा घात केला. आणि या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणा-या या पाण्यानेच केरळला मदतीसाठी हात पसरायची वेळ आणली.

अलापाझू जिल्ह्यातील काही पाणथळ जागा फिरून बघायचा प्लॅन करून आम्ही पहाटेच निघालो होतो. अजूनही माझी दिग्दर्शकाची नजर  हाहाकार  शोधात होती. अथांग पसरलेलं गढूळ पाणी, त्यावर तरंगणारी भांडीकुंडी, किमान 5 फूट बुडालेली घरं, काल-परवापर्यंत स्वाभिमानाने जगणारी; पण आज कोणाच्या तरी दयेवर दोन घास खाणारी बचाव शिबिरातील माणसं, घरात आणि शाळेत पाणी साचल्याने रिकामटेकडी फिरणारी पोरंटोरं, अशी खास व्हिज्युअल्स आणि त्यांचा परिणाम अधिक वाढवणारा एखादा मस्त करुण बॅकग्राउण्ड ट्रॅक अशी माहितीपटाची सुरुवात करायची माझी इच्छा होती. आणि अर्थातच मी तशी परिस्थिती शोधत होतो. संस्थेच्या लोकल को-ऑर्डिनेटर सोबत दोन तालुके पालथे घातले; पण तो  हाहाकार काही मला सापडेना. खोटं, अर्धसत्य किंवा अरेंज करून स्टोरी बनवायची नाही, हे तत्त्व पक्कं असल्याने अधिक अधिक शोधात राहाण्याला पर्याय नव्हता.

शासकीय अधिकारी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, स्थानिक लोक, पत्नकार अशा अनेकांशी बोलून आणि  प्रत्यक्ष निरीक्षण करून शेवटी मी या निष्कर्षाला पोहचलो की हे केरळचं पाणी काहीतरी वेगळं आहे. एवढ मोठं नैसर्गिक संकट येऊन गेलं तरीही इथली परिस्थिती एवढी नियंत्रित कशी? प्रश्न पडला म्हटल्यावर त्यांचं उत्तर शोधणं आलं. आणि  मग  हाहाकार  शोधण्याचे व्यर्थ प्रयत्न सोडून आम्ही आमच्या शोधाचा रोख केरळमधील मदतकार्य दुस-या टप्प्यात इतकं सुरळीत चालण्यामागची कारणं शोधणं आणि त्यातून चांगलं काही सापडलं तर ते जगासमोर मांडणं, या दिशेने वळवला.

 

हाऊस बोट्सचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणा-या   पल्लाथुरूटी गावात गेलो. बोटी बहुतेक सुरक्षित होत्या; पण बॅकवॉटरच्या कडेने असणा-या बोटचालकांच्या वस्त्यांची अवस्था मात्र बिकट होती. 15 दिवस लोटूनही अंगणात गुडघाभर पाणी होतं. अधून मधून डोकावणार्‍या उन्हात छतावर अंथरूण पांघरूण वाळत घातलेली दिसत होती. बोटींवर कामाला असणा-या कर्मचा-याची वस्ती तिथेच आतल्या बाजूला हाती. ती घरं बसकी आणि कच्ची असल्याने त्यांचा प्रश्न अधिकच बिकट होता. ‘कडक ऊन पडल्याशिवाय यांचं काय खरं नाही,’ गाडीचा एसी फुल करताना माझ्या मनात विचार आला. आणि तेवढय़ात एक चकाचक एसयूव्ही आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि पाण्याचं एक डबकं ओलांडून वस्तीजवळ थांबली. गेल्या 15 दिवसात मदत करायला म्हणून आलेल्या अशा ब-याच गाड्या वस्तीने पाहिल्या होत्या. त्यामुळे आला असेल कोणी शेठ तांदूळ वाटायला म्हणून सुरुवातीला वस्तीतल्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण मदत म्हणून येणारं धान्य घरात ठेवायला कोरडी जागा त्यांच्याकडे होतीच कुठे? जवळपासच्या मोठय़ा गावातली धनिक मंडळी किंवा छोट्या मोठय़ा संस्था आपापल्या कुवतीप्रमाणे रोज शिधा घेऊन अशा वस्त्यांमध्ये वाटप करत फिरत होती. पण या वस्तीत किराणा घेऊन येणार्‍या गाड्यांना फारशी किंमत नसावी.

वस्तीच्या नाक्यावर बसलेली रिकामी 12-15 वर्षांची मुलं गाडी आली की त्यात काय आहे ते अगदी चेक नाक्यावरच्या पोलिसाच्या थाटात चेक करायची. किराणा असेल तर गाडी तिथूनच परतवून लावली जायची आणि काही इंटरेस्टिंग वस्तू असेल तर लगेच वस्तीत निरोप जायचा आणि घरातली एक व्यक्ती येऊन आलेली मदत घेऊन जायची. मात्र यावेळी पुढे गेलेल्या त्या एसयूव्हीजवळ एकच झुंबड उडालेली दिसली. उत्सुकतेने जवळ जाऊन बघितल्यावर समजलं की कोण्या भल्या माणसाने गाडी भरून मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटायला आणल्या होत्या. संपूर्ण वस्तीला पुरेल एवढं पाणी त्याच्याकडे अजिबात नव्हतं. पण प्रत्येक घरात किमान एक तरी बाटली मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता. दीड मिनिटात गाडी रिकामी झाली. तरी लोक हात जोडून जोडून अजून पाण्यासाठी विनंती करत होते. आश्वासन देऊन एसयूव्ही यू टर्न मारून निघून गेली.

एक मध्यमवयीन बाई घरी पोहचण्याची वाटसुद्धा न बघता तिथेच अधाश्यासारखं पाणी पीत होत्या. त्यांना दोन बाटल्या पाणी मिळालं होतं. पण घरी लेकरांच्या हातात बाटली दिल्यावर त्यांना घोटभरही पाणी मिळालं नसतं. पण आजारी न पडता त्यांना त्याच लेकरांसाठी उभं राहायचं होतं. म्हणून भामट्यासारखा आधीच घसा ओला केला आणि घराकडे धाव घेतली. हाती लागलेलं थोडंसं पाणी मुलाबाळांच्या आधी गुपचूप पिणा-या त्या माउलीच्या डोळ्यात मला तो हाहाकार स्पष्ट दिसला. आणि तेव्हा मला केरळी माणसाचं वेगळेपण जाणवलं. नावाड्यांच्या त्या लहानशा वस्तीतल्या अतिसामान्य परिस्थितीतल्या लोकांनाही पूर येऊन गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत प्रदूषित झालेले असण्याची दाट शक्यता असते. तेव्हा पाणी अत्यंत जपून प्यायले पाहिजे. त्यातूनच रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते, याबद्दल तेथे प्रचंड जागृती होती. हे शहाणपण नक्कीच शिक्षणापाठोपाठ येतं. आणि केरळ जवळ जवळ 100 टक्के साक्षर राज्य आहे. तुलनेने साक्षरतेचं प्रमाण कमी असलेल्या आपल्या इतर राज्यांत अशा अपत्कालीत परिस्थितीत लोकांच्यात एवढी जागृती असेल का? एसयूव्ही पुन: पाण्याच्या बाटल्या घेऊन येईपर्यंत या प्रश्नाने माझ्या डोक्याचा भुगा केला होता. 

यावेळी एसयूव्हीवाला शेठ शहाणा झाला होता. त्याने पंचायत सदस्य असलेल्या गावातील एकाला सोबत घेतलं. गाडीत पुढच्या सीटवर बसून त्याच्याशी चर्चा केली. वस्तीत एकूण घरं किती, प्रत्येक घरात माणसं किती आणि आधीच्या खेपेला कोणाला पाणी मिळालं आहे, अशी लिस्ट तयार केली. डायरीचा कागद फाडून त्याप्रमाणे टोकन्स तयार केली. मग तो पंचायत सदस्य ती टोकन्स वस्तीत वाटून आला. ज्यांना ज्यांना टोकन मिळालं आहे त्याला प्रत्येकाला पाणी मिळेल म्हटल्यावर गडबड न करता लोक रांगेत येऊन पाणी घेऊन गेले. म्हणजेच टोकनची सिस्टीम राबवण्याइतपत जागृती त्या समजात शिक्षणामुळे आलेले होती. मोबाइल फोनवर येणारा केरळच्या मुख्यमंत्र्यांचा, स्थानिक जिल्हाधिका-याचा टेक्स्ट मेसेज अगदी तळागाळातल्या लोकांनी स्वत: वाचलेला असायचा. त्यामुळे पूरपरिस्थिती हाताळताना प्रशासनाला खूपच मदत झाली. अफवा पसरल्या नाहीत. आणि येणारी मदतपण सुरळीतपणे गरजवंतांपर्यंत पोहोचायला मदत झाली. 

 

आमच्या प्रवासात यांसारख्या काही घटनांवरून मी अशा निष्कर्षाला पोहचलो की, प्राथमिक शिक्षणाच्या पाठोपाठ येणा-या सामाजिक शहाणपणामुळेच केरळ या नैसर्गिक संकटातून लवकर बाहेर पडतो आहे. आम्ही तयार करत असलेल्या माहितीपटाला आता एक वेगळा विचार मिळाला होता आणि तो टिपिकल हाहाकार शोधत बसण्याची गरज संपून गेली होती. आमच्या कॅमेरा क्रूमधल्या प्रत्येकाने एक हजार रुपयांची जागीच कॉण्ट्री काढली आणि एसयूव्ही शेठला अजून बाटल्या आणून द्यायची विनंती केली. जलविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या; पण जलप्रलयाने कोलमडून पडलेल्या केरळला पुन: उभं राहण्याचं बळ मिळावं म्हणून काम करता करता आमच्या हातून घडलेला हा चार थेंबांचा जलाभिषेक..  

(लेखक फिल्ममेकर, दिग्दर्शक आहेत.)

yogmh15@gmail.com