कराचीचा चांद

By admin | Published: August 22, 2015 06:27 PM2015-08-22T18:27:24+5:302015-08-22T18:27:24+5:30

एक साधा पत्रकार, लाइव्ह बातमी सांगताना गडबडणारा.आज तो एकाएकी स्टार झाला, तेही त्याच्यावर बेतलेल्या एका भूमिकेने! पाकिस्तानातल्या एका मस्तमौला माणसाची ही गोष्ट.

Karachi moon | कराचीचा चांद

कराचीचा चांद

Next
>- ओंकार करंबेळकर
 
साधारणत: सहा वर्षापूर्वी पाकिस्तानच्या इंडस वृत्तवाहिनीच्या चांद नवाब या रिपोर्टरच्या एका बातमीचा व्हिडीओ यूटय़ूबवर झळकला होता. कराची रेल्वेस्थानकात उतरलेले लोक ईद साजरा करण्यासाठी आपापल्या गावांमध्ये जात आहेत इतकी एका ओळीची बातमी देण्यासाठी चांद नवाबने वीस टेक्स घेतले होते आणि इतके करूनही ती बातमी नीट झाली नव्हती. त्याचे हे वारंवार सांगणं, बोलताना आडव्या जाणा:या लोकांना बाजूला करणा:या चांदची ही बातमी यूटय़ूबमुळे जगभरात जाऊन तो एक चेष्टेचा विषयच झाला होता. मात्र आता चांद नवाब पुन्हा चर्चेत आला आहे, तेही त्याच बातमीमुळे. आता तो चेष्टेचा विषय नसून तो हिरोसारखा पाकिस्तान आणि भारतीयांच्या समोर आला आहे.
हे सर्व शक्य झाले आहे ते कबीर खानने बजरंगी भाईजानमध्ये त्याच्या या बातमीचा वापर केला म्हणून. भारतात हरवलेल्या लहानग्या मुलीला पाकिस्तानात सोडायला गेलेल्या सलमान खानला चांद नवाबची शेवटपर्यंत मदत होते अशा पद्धतीने हे कथानक रंगविले आहे. इतकी वर्षे चेष्टेचा विषय झालेल्या चांदसाठी मात्र ही चांगली संधी होती. नवाजुद्दिन सिद्दीकी या कलाकाराने त्याचे पात्र हुबेहूब रंगविलेच; त्याहून त्याला दोन्ही देशांमध्ये मानाचे स्थान मिळेल अशी संधी दिली. बजरंगी प्रदर्शित झाला तेव्हा चांदला अभिनंदनाचे फोन येऊ लागले. ‘चांदभाई आप तो बडे हो गये, हमे आपका ऑटोग्राफ चाहिये’ अशा शब्दांमध्ये त्याचे कौतुकही होऊ लागले. ज्या व्हिडीओमुळे एकेकाळी नामुष्कीसारखी वेळ चांदवर आली होती, आज त्याच व्हिडीओसाठी त्याचे कौतुक होत आहे.
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चांदला पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने सर्वप्रथम ही कल्पना दिली तेव्हा त्याला क्षणभर काळजीच वाटली. पुन्हा आपली त्याच पद्धतीने टर उडविली जाणार असे त्याला वाटू लागले. पण सिनेमातील नवाजुद्दिन  सिद्दीकीने केलेली सकारात्मक भूमिका आणि नंतर मिळालेल्या लोकप्रियतेनंतर त्याचा जीव भांडय़ात पडला. भारतीय सिनेमातील या पात्रसाठी आपली मदत झाली याबाबत त्याने कबीर खान या बजरंगीच्या दिग्दर्शकाचे आभार मानले. केवळ पत्रकार म्हणून ओळखल्या जाणा:या चांदला घराघरांत ओळखले जाऊ लागले. सर्व वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांची त्याचा बाईट घेण्यास एकच झुंबड उडाली. पाकिस्तान आणि भारतातील वाहिन्यांनीही त्याच्या मुलाखती घेतल्या. पण केवळ आनंद व्यक्त न करता चांदने पत्रकारांना उन्हातान्हात काम करताना कसा त्रस सहन करावा लागतो हे यामुळे लोकांना समजले असेल अशी अपेक्षा व्यक्त केली. कडाक्याचे ऊन, एक डोळा कॅमे:याकडे, तर दुसरा डोळा स्थानकातून जाणा:या रेल्वेकडे. आपल्याला जे वाक्य बोलायचे आहे त्यामध्ये मागच्या बाजूस जाणारी ती रेल्वेही दिसली पाहिजे अशी असणारी अट.. या सगळ्या पाश्र्वभूमीवर आपली तारांबळ उडाली हे गमतीने सांगत त्यामागील कष्टांची जाणीवही करून दिली. अशा चुका होत राहतात, त्यानंतर टीकाही झाली पण त्यातूनच पुढे जायचे असते असे निर्मळ मनाने त्याने मुलाखती देताना सांगितले. बजरंगीमुळे कराचीसे अपनोमें ईद मनाने के लिये लोग अंदरूनी मुल्क जा रहे हे.. हे वाक्य मात्र भारत आणि पाकिस्तानसह जगातील सर्व बॉलिवूड प्रेक्षकांच्या तोंडामध्ये बसले आहे..
आता जाहिरातींच्या ऑफर्स
चांद नवाबला या सर्व प्रसिद्धीनंतर मिळालेला आश्चर्याचा धक्का म्हणजे त्याला आता टीव्हीवर जाहिरातीच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. इंडस न्यूजमधील त्याचा व्हिडीओ यूटय़ूबवर पाहून अनेक लोक ही पाहा पाकिस्तानातील पत्रकारितेची पातळी म्हणून हिणवत होते. मात्र बजरंगीने तेच दिवस पालटले. तरुणवर्गाने तर डब्समॅश या सॉफ्टवेअरद्वारे त्याच्या आवाजात आपापले व्हिडीओ प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे. जे लोक कधीकाळी त्याला चिडवत होते तेच लोक त्याला आता बजरंगी भाईजानमधील भूमिका तुङयावर बेतलेली आहे म्हणून मानधन माग असे सल्ले देऊ लागले. चांदने मात्र जर दिग्दर्शकास इच्छा असेल तरच मी मानधन घेईन अन्यथा नको असे नम्रपणाने सांगितले आहे.
सीमेअलीकडला सिनेमा आणि सीमेपलीकडला माणूस यांची ही कहाणी. वास्तव कधी कधी सिनेमापेक्षाही जास्त रंजक असतं ते असं!
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत 
उपसंपादक आहेत)
onkark2@gmail.com

Web Title: Karachi moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.