शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

'भारता'च्या पोटात

By admin | Updated: October 18, 2014 14:10 IST

एखाद्या दुर्गम गावात, जगापासून तुटलेल्या आदिवासी पाड्यात रस्त्याच्या आधी मोबाईलचे नेटवर्क पोहोचते, तेव्हा काय घडते? या एका प्रश्नाच्या शोधात देश धुंडाळून पूर्व, पश्‍चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारही टोकांकडून शोधून आणलेल्या चार कहाण्या!धूळभरल्या जगात घडणार्‍या नव्या घडामोडी शोधून आणणारे हे चारही लेख सविस्तर वाचण्यासाठी चुकवू नका:दीपोत्सव २0१४

 लोकमत दीपोत्सव २0१४ : विशेष रिपोर्ताजचा एक वानोळा

 
 
एका अद्भुत विश्‍वातून भटकताना दिसलेलं अजब जग : कुंभमेळा
 ट्रक आर्टच्या दुनियेची दिलखेचक सफर : ट्रक नही ये तो दुल्हन है हमारी!
 आपापल्या कंपन्या चालवायला परदेशातून भारतात येणार्‍या, इथे राहणार्‍या उच्चपदस्थांच्या व्यक्तिगत अनुभवांच्या गाठी-निरगाठी :  इंडियन लेस्ट उंस निश्त 
 बॉलिवूडच्या गाण्यांमधले तुम्ही-आम्ही : बंदे को खुदा करता है इश्क
 
 
 
व्हॉट्स अँप, ब्युटी पार्लर आणि चायना
 
कास आणि विस्थापन याच्या कात्रीत सापडलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यातून फिरत होते. सरदार सरोवराच्या लाभ-हानीची गणितं मांडण्यात खर्च झालेलं पाऊण शतक. झुंजणार्‍या, खंगणार्‍या तब्बल दोन पिढय़ा. गुजरातला सुजलाम सुफलाम करण्यासाठी धरणाच्या पाण्यात बुडणारी अडीचशे गावं.. गुजरातमधली ३३, महाराष्ट्रातली ७२ आणि मध्य प्रदेशातली १९१. यांच्यापर्यंत ना पाणी पोहोचलं ना वीज. सोबत होती फुलवंती. तिनं नुकतीच बारावीची परीक्षा दिलीय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिनं हिनाताईसोबत प्रचारही केला. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेली इथली तरुण खासदार डॉक्टर हिना गावित ही फुलवंतीसाठी रोल मॉडेल. हिनाताई बीएएमएस आहे. फुलवंतीलाही बीएएमस व्हायचंय. पण जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळालं नाही म्हणून तिची यंदाची अँडमिशन हुकली. वर्ष वाया जायला नको म्हणून ती आता डीफार्म करणार आहे आणि नंतर बीएएमएससाठी ट्राय करणार. 
पण कधीपासून तिच्या डोक्यात ठाण मांडलेले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत,
‘‘मॅडम, बीएएमएस आणि एमबीबीएसमध्ये काय फरक असतो? आणि बीडीएस म्हणजे काय? त्याला काही स्कोप असतो का?’’ 
- तिची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. आमचं बोलणं सुरू असतानाच आजूबाजूच्या आणखी दोन मुली गोळा झाल्या. त्यातल्या एकीचं काही ठरलं नव्हतं, बारावीतला तिचा एक विषय राहिलाय. तो क्लिअर करून तिला नर्सिंगला अँडमिशन घ्यायचंय. 
तोपर्यंत फुलवंतीनं तिच्या मोबाइलमधून काढून एक मेसेज दाखवला.. 
University of China invites you for graduate and post graduate courses in medicine. for details please contact...
यात काही तथ्य आहे का, ही संस्था खरी आहे का, याची तिला माझ्याकडून खात्री करून घ्यायची होती. मला खूपच गंमत वाटली. जिल्ह्याच्या बाहेरही न गेलेली ही आदिवासी मुलगी; पण देशाबाहेर शिक्षणासाठी जाण्याची शक्यता तिच्या विचारांमध्ये निर्माण झाली होती ती  मोबाइलमुळे. आमच्या गप्पा चालू असताना फुलवंतीच्या एका मैत्रिणीने सहज विचारलं, 
‘‘ताई, चीन कोणत्या देशात आहे?..’’
 तिची आई आशाबाई बाजूलाच बसली होती. म्हणाली, ‘‘ताई, तुम्हीच सांगा आमच्या मुलींना काहीतरी.. त्यांना खूप काही करण्याची इच्छा आहे, पण कसं करायचं काहीच माहीत नाही..’’ मागच्या पिढीतल्या वंचिततेची जागा या पिढीतल्या उत्सुकतेनं घेतलेली. योगेश, फुलवंती दोघेही फेसबुकवर आहेत, व्हॉट्स अप वापरतात. मिळेल तशी माहिती गोळा करतात. केसाला बरगंडी कलर लावलेली फुलवंती, लाल-पिवळा डिझायनर ब्लाऊज घातलेली तिची वहिनी जानकी, शेजारी उभ्या मुलीच्या नखांवरचं निळं नेलपेंट, समोरच्या कुडाच्या भिंतींवर डकवलेला ‘सौंदर्या’ ब्युटी पार्लरचा बोर्ड, त्याच्यावरची हिरव्या डोळ्यांची ऐश्‍वर्या राय.. आभासी स्वप्नांच्या या रंगीन दुनियेत वास्तवातल्या खर्‍या विकासाचं चित्र मात्र ब्लॅक अँण्ड व्हाइटच राहिलं होतं..  
- दीप्ती राऊत
 
 
नलमल्लाच्या जंगलात बन्कू      
आम्ही पेच्चेरूला निघालो. दुचाकीवर. 
दगडमातीचा रस्ता. पूर्णत: जंगल. रस्त्यात फक्त पक्ष्यांचा आणि झाडांचा आवाज.  कोणीच वाटसरू नाही. एकट्याने जाण्याची हिंमत होणार नाही असा रस्ता. पाऊस झालेला असल्याने एक-दोन ठिकाणी दुचाकीही ढकलावी लागली. जास्त पाऊस झाला की रस्ता बंद पडणार, हे त्याच्या अवतारावरूनच दिसत होतं. 
तासाभराचा प्रवास करून अखेर पेच्चेरूत पोहोचलो. 
मुख्य डांबरी रस्त्यापासून २0 किलोमीटर आत. जंगलात. 
दूरवरूनच घरांवरच्या ‘डीटीएच’ चमकायला लागल्या. 
एवढय़ा खोल जंगलात टीव्ही? पेच्चेरूत पोहोचताच ओळीने काही पडक्या खोल्या दिसतात. जुनाट. त्यांच्या समोर फॉरेस्टचं एक छोटं कार्यालय. या इमारतींच्या मागे गाव पसरलं आहे. सदुसष्ट कुटुंबांचं. अडीचशे लोकसंख्येचं. तेथे पोहोचताच फॉरेस्टचे दोन-तीन कर्मचारी आमच्याकडे टक लावून बघायला लागले. तेलुगूत विचारणा सुरू झाली. ‘कोण? कुठून आलात? कुणाची परवानगी घेतली?’ आम्ही गावात येणार असल्याबाबत त्यांना वरिष्ठांचा काहीही आदेश नव्हता, त्यामुळे बीट ऑफिसर सत्यनारायणाचार्य यांचं फायरिंग सुरू होतं. मला वाटलं हा बाबा आपल्याला आल्या पावली परत पाठवणार. पण रवींद्र मध्ये पडले. हे पत्रकार आहेत, दूर महाराष्ट्रातून आलेत, अशी समजूत काढत परवानगी मिळवली. 
रवींद्र हे तेलुगू होते, शिवाय चेंचू होते म्हणून काम भागलं.
‘ज्या पडक्या इमारती दिसतात त्या ब्रिटिशांनी बांधल्या आहेत,’ तिथलाच एक कर्मचारी बोलता बोलता म्हणाला. 
वाघांचं जंगल असल्याने इथे ब्रिटिशांचं कार्यालय होतं. 
एका दवाखान्याची कोनशिलाही दिसते. 
रूढ अर्थाने हे गाव नाही. आखीवरेखीव नाही. रस्ते नाहीत. पाण्याची लाइन नाही. गटारं नाहीत. श्रीमंती, सुख, ऐश्‍वर्य, हॉटेल्स, मोठमोठी दुकानं हे काही नाही.
काही लोक खांद्याला बांबूचं धनुष्य अडकवून व कमरेला बाण खोचून जंगलात चाललेले दिसले. पडक्या इमारतींपासून थोडं पुढं गेलं की एक लाकडाची बंद टपरी आहे. तिथं आर्ती अंकन्ना हे एका दगडावर उभे राहून वर आकाशात मोबाईल उंचावून बोलत होते.
 दृश्य मोठं मजेशीर होतं. मी माझा मोबाइल काढून रेंज बघू लागलो. ती गायब होती. अंकन्नांना म्हटलं, ‘‘हे काय?’’ ते म्हणाले, ‘‘हा रेंज पॉईंट आहे. दोन-तीन वेळा प्रयत्न केला की इथून ‘बीएसएनएल’चा टॉवर मिळतो. त्यामुळे ज्याला कुणाला फोन करायचा आहे तो या पॉइंटवर येतो.’’ भर वाटेतल्या एका मोठय़ा दगडावरचं पेच्चेरूचं हे ‘कम्युनिकेशन सेंटर’. या ठिकाणाला हे लोक ‘बन्कू’ म्हणतात. रात्री-अपरात्री मोबाइल करायचा म्हटलं तरी हे ‘बन्कू’ गाठायचं. रेंज मिळाली नाही तर जंगलाबाहेर निरोपच पोहोचत नाही. थेट माणूसच पाठवावा लागतो. आम्ही बोलत असतानाच या ‘बन्कू’चा ताबा दासरकुमार या तरुणाने घेतला. आता तो रेंज शोधत होता. वाघाने शिकार शोधावी तसा ‘रेंज’ शोधण्याचा हा प्रकार.
 - सुधीर लंके 
 
 
सत्तीदेवीची सही
झाडी नव्हती. पाऊसही नव्हता. एकाची सायकल मिळाली. सायकल म्हणजे फक्त लोखंडी सांगाडा. त्यावरच बसून अमरुतिया नावाच्या एका छोट्याशा खेडेगावी गेलो. तिथेही तेच- बायकांची गँग! शाळेत मुलांच्या पोषणआहारात ‘घपला’ व्हायचा. अन्नात किडे निघायचे. तक्रार करूनही बदल होत नाही म्हटल्यावर गावातल्या बायका गोळा झाल्या. खडे, अळ्या, किडे असलेल्या खिचडीचं भांडं अधिकार्‍यापुढे नेऊन आपटलं आणि सांगितलं, ‘खा के दिखा’ - दुसर्‍याच दिवसापासून पोषणआहारात सुधारणा झाली! ग्रामपंचायतीलाही या बायकांचा धाक आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आता आधी त्यांची संमती विचारात घेतली जाते.
बायका फावल्या वेळात एकत्र येतात. चार बुकं शिकलेली कोणीतरी त्यांना ‘गमभन’ शिकवते. त्याही हौसेनं शिकतात. मी गावात गेलो, तर बायकांची मीटिंगच सुरू होती. सकाळी मजुरी करून दुपारी घरी जेवायला आल्या होत्या. जेवण करून पुन्हा खड्डे खणायला जायचं होतं. मधल्या  वेळेत त्यांनी मीटिंग ठेवली होती. ६0-७0 बायका. सत्तर वर्षांची एक म्हातारी उभं राहून सांगायला लागली, ‘‘मैं बुढी. कल तक अंगुठा लगाती थी. इस उमर में कहाँ स्कूल जाती, मगर मैं भी अब साईन करती हॅँू. बताऊ लिखके?’’
पूर्वी कोणी सामाजिक कार्यकर्ता गावात आला की काठी घेऊन ही म्हातारी त्याला मारायला धावायची- ‘तुझी समाजसुधारणा तुझ्याजवळच ठेव’ म्हणून.
- तिलाच बायकांनी आता आपला ‘लीडर’ निवडलं आहे. 
हे शिकण्याचं वेड डोक्यात घेतलेल्या बायका काही भलत्याच तेज दिसतात. 
सदर ब्लॉकमधील सरडिहां गावच्या सत्तीदेवीचं घर. या गावातही वीज अजून पोहोचलेली नाही. पण तिच्या घरात सोलरवर चालणारा टीव्ही होता. सून एकटीच टीव्ही पाहत होती.
गेल्याच वर्षी सत्तीदेवीच्या मुलाचं लग्न झालं. सत्तीदेवीने सुनेला सुचवलं, ‘‘बेटा, पढाई चालू रख.’’ 
आता गावात कॉलेज नाही, म्हणून बिटौली बाजारला ये-जा करून सत्तीदेवीची लाडली सून बीए करते आहे. गेल्याच आठवड्यात एका ठिकाणी इंटरव्ह्यू होता. सत्तीदेवीच सुनेला घेऊन गेली. 
सत्तीदेवीला विचारलं, ‘‘शादी के बाद बहु की पढाई, घर के बाहर निकलना, नौकरी करना.. मजबुरी है?’’
सत्तीदेवीचं म्हणणं स्पष्ट होतं, ‘‘बेटा, मजबुरी नहीं, जमाने के साथ बदलना पडता है. खेती का क्या भरोसा? खुद का पेट नहीं भर पाये, तो हम बुढों को कैसे पालेंगे?’’ 
 - समीर मराठे
 
मेरी कोमचा भाऊ आणि शिडी
ईरांग नावाचं हे गाव मणिपूरची राजधानी इम्फाळपासून ४५ किलोमीटरवर आहे. तुम्हाला वाटेल ‘फक्त ४५ किलोमीटर’ म्हणजे फार फार तर तासाभराचा प्रवास. पण इथं या प्रवासाला किती वेळ लागेल याची काही शाश्‍वतीच नव्हती, नसतेच कधी! मोईरांग ही तशी टुरिस्ट प्लेस. जगातलं सर्वाधिक उंचीवरचं गोड्या पाण्याचं आणि झुलत्या-वाहत्या वेलींचं अत्यंत सुंदर ‘लोकताक सरोवर’ ही मोईरांगची एक ओळख. पण तेवढीच नाही, ‘भारतीय’ माणसांना माहितीही नसेल कदाचित, पण भारताचा तिरंगा पहिल्यांदा याच मोईरांगमधे फडकला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तयार केलेल्या आझाद हिंद फौजेनं जपानी सैन्याच्या मदतीनं ब्रिटिशांना धूळ चारत स्वतंत्र केलेला हाच तो पहिला भूभाग. आजही मोईरांगमधे ‘वॉर मेमोरिअल’ त्या आठवणी जागवत उभं आहे.
पण खरंतर आजच्या ‘मोईरांग’ची ही ओळख नाहीच. मोईरांगची ओळख सांगणार्‍या आजच्या चेहर्‍याचं नाव आहे, मेरी कोम. पाच वेळा बॉक्सिंग जगज्जेती असलेली, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी आज ईशान्य भारताची ओळखच नाही तर ‘ब्रॅण्ड’ बनली आहे. त्याच मेरीचा मोईरांगशी एक खास कनेक्ट आहे- मेरीचं गाव कांगथेई. ते मोईरांगपासून अगदी जवळ, म्हणजे साधारण चार किलोमीटरवर आहे. छोटी मेरी रोज मोईरांगच्या शाळेत कांगथेईपासून पळतच जायची. सुरुवातीला धाकट्या भावाला पाठीवर बांधून पळत पळत शाळा गाठायची, नंतर तिच्याकडे सायकल आली. मग सायकलवर यायची. नंतर नंतर तर त्याच सायकलने रोज पहाटे इम्फाळला ( ४५ किलोमीटर, तेही पहाडातले) साईच्या प्रशिक्षणकेंद्रात बॉक्सिंगच्या ट्रेनिंगसाठी जायची.
मी मोईरांगला पोहचले, पण गावात शिरण्याआधी तिथून कांगथेईला निघाले. आजही या दोन गावांना जोडणारा रस्ता नाही. चिंचोळी जेमतेम वाट, त्यालाच रस्ता म्हणायचं. वाहतुकीची साधनं नसल्यातच जमा. शेअर रिक्षा माणसांनी गच्च भरून खडखडत धावतात. काही माणसं सायकली चालवत जाताना दिसतात. बाकी सगळी सुनाटीच. सैन्य मात्र दिसतं पहार्‍यावर, सर्वत्रच. कांगथेई गाव अजूनही तसंच छोटुसं, मोजक्या घरांचं.
पहिल्यांदा मेरी कोमच्या घरी पोहोचले. तिचा धाकटा भाऊ खुपरेंग कोम, अंगणातच शेतीची अवजारं घासतपुसत बसलेला होता. जेमतेम २३ वर्षांचा. मोईरांगच्या कॉलेजात शिकत होता, पण आता शिक्षण सोडलंय त्यानं. कांगथेईतलं शांत, सरळसोट आयुष्यच बरं वाटतं म्हणाला. कॉलेज का सोडलं अर्धवट असं विचारलं तर म्हणाला, ‘‘लग्न झालंय, एक मुलगा आहे मला, किती काळ नुस्ता शिकू? पोट कसं भरणार?’’ मग एक श्‍वास घेत हळूच शांतपणे म्हणाला, ‘‘मला नाही जमलं, पण मी मुलाला मात्र खूप शिकवणार आहे, मोठ्ठा झाला की बाहेर पाठवीन त्याला शिकायला..’’
या अशा अवस्थेतल्या जगण्यातून ‘मेरी कोम’ घडली, इंटरनॅशनली फेमस झाली.  तिने इथल्या तरुण मुलांना एक महत्त्वाची गोष्ट दिली आहे : स्वप्नं! 
- चित्रा अहेंथेम